एक पाऊल.. चौकटीपलीकडले!

एका परंपरेविरोधी आवाज उठवणारी कथा.

एक पाऊल.. चौकटीपलीकडले! (लघुकथा )

"नाही काढायचीत मला जोडवी. बांगड्याही नाही फोडायच्या आहेत." रडून रडून थकलेली जानकी आता फक्त स्फुंदत होती.

"जानकीवहिनी काय हा बालिशपणा? आपले संस्कार, आपल्या रितीभाती, त्यांच्या चौकटी.. सगळं सगळं विसरलात होय?" नात्यातील एक नणंद तिला समजावत होती. "आमचा शशीदादा गेला हे सत्य आहे. मग रीतीनुसार हे सगळे दागदागिने, सौभाग्यलंकार अंगावरून उतरवावीच लागतील ना?" उत्तरादाखल जानकीताईंनी फक्त एक हुंदका दिला.

त्यांच्या हातात घातलेल्या फिट्ट अशा बांगडया. सहजासहजी न निघणाऱ्या. मग त्या फोडायच्या हाच अंतिम निर्णय होता. पायाच्या बोटातील ती जाडेजूड जोडवी आणि बाजूच्या बोटात असणारी दुसरी नाजूकशी जोडवी अगदी फिट्टपणे बोटात बसवली होती. जेणेकरून चालताना बोटातून सरकू नयेत. कपाळावरची टिकली तर केव्हाच कुणीतरी काढून टाकली होती. गळ्यातील नाजूक पोत असलेल्या मंगळसूत्रावरही आता कोणाचातरी हात फिरणार होता.


डोळ्यातून टीपं गाळणारी पालवी हे सारं बघत होती. आपल्या सासूची ही दयनीय अवस्था बघताना तिचे काळीज फाटत होते.

तिला आठवले, तिच्या लग्न जुळण्यापूर्वी तिला बघायला आले तेव्हा पहिल्यांदा पाहिलेले जानकीचे रूप. पन्नाशी नुकतीच उलटली होती पण चेहऱ्याने त्या चाळीशीतीलच वाटत होत्या. तुकतुकीत कांती. पाणीदार डोळे. मध्यम बांधा आणि या सर्वात उठून दिसणारे त्यांच्या अंगावरचे दागिने. जानकीताईला नटण्याचा भारीच शौक. पण त्यात कुठेच बटबटीतपणा नव्हता. उलट त्या दागिन्यात त्यांचे खानदानी सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते.

पलाशशी नजरभेट होण्यापूर्वी पालवीने जानकीताईंना पाहिले नि त्यांचे ते रूप बघून ती भारावली. तिच्याकडे बघून जानकीताईंनी गोड स्मित केले आणि सासू म्हणून मला याच हव्यात हे पालवीने मनोमन ठरवून टाकले.


लग्नात नववधू म्हणून पालवी अगदीच खुलून दिसत होती. तिला मात्र आपली सासू आपल्यापेक्षा जास्त सुंदर दिसतेय असेच वाटत होते. या विचाराने तिला खुदकन हसू आलं. आई आणि सासूबाई जवळपास सारख्याच वयाच्या पण आई जरा स्थूल झालीये आणि चेहऱ्यावर वयाच्या खुणाही उमटत आल्याहेत. उलट सासूबाई म्हणजे अगदी भारीच! किती किती ते कौतुक सासूचे.


लग्नानंतर जानकी तिला शॉपिंगसाठी कुठे कुठे घेऊन जायची. मग तीच म्हणायची, "अहो आई मला नटायला फारसे नाही हो आवडत. पण तुम्हाला नटलेलं बघायला मात्र फार आवडतं."

मग त्याही म्हणायच्या, "पालवी अगं नटावं गं कधीकधी! मूड अगदी फ्रेश होऊन होतो बघ. आणि दुसऱ्यांनी छान दिसतेस म्हणण्यापेक्षा स्वतः तयार होऊन आरशासमोर उभे राहून स्वतःलाच 'सुंदर दिसतेस अशी 'एक कॉम्प्लिमेंट द्यायची.

"ऍब्सुलुटली करेक्ट! पालवी, जेव्हा आपण स्वतःला सुंदर म्हणतो ना तेव्हा चेहऱ्यावर एक प्रसन्नता येते नि माझ्या बायकोचा तो प्रसन्न चेहरा पाहिला ना तर माझा प्रत्येक दिवस आणखी प्रसन्न जातो." जेव्हा शशिकांत जानकीची स्तुती करायचे तेव्हा लाजेने लाल झालेले त्यांचे रूप पालवीला आणखीन सुंदर भासत होते.

कधीतरी त्यांनी पालवीला म्हटलेही होते, "देव मला न्यायला येईल ना तेव्हा त्यालाही मी म्हणेन, बाबा जरा थांब रे. जरा चेहरा, साडी नीट आहे की नाही ते बघू दे. मग मला ने. मरतानाही कसं प्रसन्न मरण यायला हवं."


आज पालवीला हे सारे आठवून आणखी जास्त रडायला येत होते.

शशिकांत, तिचे सासरे नेहमीप्रमाणे सकाळी बागेत फिरायला म्हणून गेले नि अचानक घेरी येऊन पडले. दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अगदी तासाभरात होत्याचे नव्हते झाले. पोस्टमार्टम करून त्यांचा देह घरी येईपर्यंत सायंकाळ झालेली. अचानक नवऱ्याच्या जाण्याने दुःखाने होरपळलेल्या जानकीताई आणि त्यातच त्यांचे सौभाग्यालंकार काढण्यासाठी झटपट करणारे त्यांचे नातेवाईक!


"आत्या, अहो ही जोडवी, बांगडया, दागिने.. सर्व काढायलाच हवेत का?" मोठ्या हिमतीने पालवीने सासूच्या चुलत नणंदेला विचारले. लग्नाला जेमतेम वर्ष होत आलेले, मोठ्यांच्या मध्ये नाक खुपसायचे नाही हे संस्कार असलेली ती. सासूच्या वेदना पाहवल्या नाही तेव्हा शेवटी ती बोललीच.

"बाई गं. काल आलेली पोरगी नी मोठ्यांना अक्कल शिकवतेस? अगं ह्याच रूढी परंपरा आहेत आपल्या. आपणच नाही पाळायच्या तर आणखी कोणी पाळायच्या?" आत्या जरा चिडलीच होती.

"तरीही आत्या, माझा विरोध आहे हो या गोष्टीला." पालवी निग्रहाने म्हणाली.

"तुला गं कोण विचारत आहे? बघितलंस का काकी? तुझी नातसून कशी चुरूचुरू बोलतेय ते." आत्याने निर्मलाताईकडे म्हणजे पालवीच्या आजेसासूकडे मोर्चा वळवला.

लेकाच्या अशा अचानक निधनाने त्यांनाही धक्का बसला होता. इतका वेळ एका कोपऱ्यात बसून त्यांचे मूक रडणे चालू होते. आता पुतणीने विषय काढलाच म्हणून त्या पुढे आल्या.


"पालवी योग्य तेच बोलत आहे. माझाही या विधीला विरोध आहे." समोर येत निर्मलाताई म्हणाल्या तसे सगळे त्यांच्याकडे बघतच राहिले.

"वहिनी, तुम्ही हे बोलताय? अहो भाऊ गेले तेव्हा तुमचेही सौभाग्यलंकार उतरवले होते, हे विसरलात का?" निर्मलाताईंची जाऊबाई समोर येत म्हणाली.

"गिरीजा, विसरले नाही म्हणूनच तर बोलतेय अगं. नवरा गेल्याचे दुःख काय असते हे मला माहितीये. ते मी अनुभवलंय म्हणून माझ्या सुनेची अवस्था काय असेल हे मी समजू शकते. शशीचे बाबा मला भर तारुण्यात सोडून गेले. नटण्यामुरडण्याचे माझे वय होते. पण ते गेले अन आयुष्यभर विरक्तासारखे जगणे माझ्या भाळी आले. बंदा रुपयाएवढे कुंकू लावायचे मी. चेहऱ्यावर साधीच पावडर अन गळ्यात काळ्या मण्यांची पोत होती तरी मला मीच सुंदर भासायचे.

हे गेले नी आयुष्य भकास झाले गं माझे. कधीतरी आरशात पाहिल्यावर कुणाचं लक्ष नाही हे बघून पुन्हा भाळी कुंकू लावावे असे मनात यायचे. कधी पावडर लाऊन बघायची इच्छा व्हायची. पण मनावर संयम ठेवून मन मारून मला राहावे लागले."

निर्मलाताई बोलताना त्यांचा हुंदका दाटून आला.

"त्यावेळी माझ्या बाजूने बोलायला कोणीच नव्हते. आज माझ्या सुनेच्या बाजूने बोलायला तिची सून आणि सासूही आहे. तेव्हा आम्हाला हा विधी नाही करायचा आहे. आमच्या कुटुंबाला रूढी परंपरेची ही चौकट ओलांडू दे. कोणाकडून कसली अपेक्षा न करता बदलाची सुरुवात स्वतःपासून करायला हवी."

"काय अभद्र बोलतेस निर्मले?" गर्दीतून कोणीतरी म्हणाले.


"त्यात अभद्र असे काहीच नाही. तसाही हा विधी नवऱ्यासाठीच करायचा असतो ना? माझ्या शशीला त्याच्या बायकोने नटलेले आवडायचे. जर तो वरून बघत असेल तर जानकीला या रूपात बघून त्यालाही वाईट वाटेल."

निर्मलाताई जानकीला मिठी मारत म्हणाल्या. दोघींच्या डोळ्यातून अश्रुंच्या धारा वाहत होत्या.

"आजी!" पालवीने दोघींना घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यात आजीबद्दलचा अभिमान दाटून आला होता.

पलाश हे सर्व पाहत होता. 'कोणत्याही बदलाची सुरुवात स्वतःपासून करायला हवी.' आजीचे म्हणणे त्याला पटले होते.

"आय एम प्राऊड ऑफ यू आजी!" त्या तिघीत सहभागी होत तो म्हणाला.

चौकटीपलीकडे एक पाऊल टाकायला त्याचे कुटुंब सरसावले होते.

  ****** समाप्त *****

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

**साहित्यचोरी गुन्हा आहे.**


ही कथा म्हणजे कुणाच्या भावना दुखावणे नव्हे. नवरा गेल्यानंतर त्या स्त्रीला नटणे, मुरडणे या भावनेवर आवर घालायलाच हवे का? यावर विचार करायला लावणारी ही कथा. तुम्हाला कशी वाटली, नक्की सांगा.