Feb 26, 2024
नारीवादी

एक पाऊल, चौकटीबाहेरचे. भाग -एक.

Read Later
एक पाऊल, चौकटीबाहेरचे. भाग -एक.


एक पाऊल..चौकटीबाहेरचे!
भाग - एक.

"नाही काढायचीत मला जोडवी. बांगड्याही नाही फोडायच्या आहेत." रडून रडून थकलेली जानकी आता फक्त स्फुंदत होती.

"जानकीवहिनी काय हा बालिशपणा? आपले संस्कार, आपल्या रितीभाती, त्यांच्या चौकटी.. सगळं सगळं विसरलात होय?" नात्यातील एक नणंद तिला समजावत होती. "आमचा शशीदादा गेला हे सत्य आहे. मग रीतीनुसार हे सगळे दागदागिने सौभाग्यलंकार अंगावरून उतरवावीच लागतील ना?" उत्तरादाखल जानकीताईंनी फक्त एक हुंदका दिला.


त्यांच्या हातात घातलेल्या फिट्ट अशा बांगडया. सहजासहजी न निघणाऱ्या. मग त्या फोडायच्या हाच अंतिम निर्णय होता. पायाच्या बोटातील ती जाडेजूड जोडवी आणि बाजूच्या बोटात असणारी दुसरी नाजूकशी जोडवी अगदी फिट्टपणे बोटात बसवली होती. जेणेकरून चालताना बोटातून सरकू नयेत. कपाळावरची टिकली तर केव्हाच कुणीतरी काढून टाकली होती. गळ्यातील नाजूक पोत असलेल्या मंगळसूत्रावरही आता कोणाचातरी हात फिरणार होता.


डोळ्यातून टीपं गाळणारी पालवी हे सारं बघत होती. आपल्या सासूची ही दयनीय अवस्था बघताना तिचे काळीज फाटत होते.


तिला आठवले, तिच्या लग्न जुळण्यापूर्वी तिला बघायला आले तेव्हा पहिल्यांदा पाहिलेले जानकीचे रूप. पन्नाशी नुकतीच उलटली होती पण चेहऱ्याने त्या चाळीशीतीलच वाटत होत्या. तुकतुकीत कांती. पाणीदार डोळे. मध्यम बांधा आणि या सर्वात उठून दिसणारे त्यांच्या अंगावरचे दागिने. जानकीताईला नटण्याचा भारीच शौक. पण त्यात कुठेच बटबटीतपणा नव्हता. उलट त्या दागिन्यात त्यांचे खानदानी सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते.


पलाशशी नजरभेट होण्यापूर्वी पालवीने जानकीताईंना पाहिले नि त्यांचे ते रूप बघून ती भारावली. तिच्याकडे बघून जानकीताईंनी गोड स्मित केले आणि सासू म्हणून मला याच हव्यात हे पालवीने मनोमन ठरवून टाकले.


लग्नात नववधू म्हणून पालवी अगदीच खुलून दिसत होती. तिला मात्र आपली सासू आपल्यापेक्षा जास्त सुंदर दिसतेय असेच वाटत होते. या विचाराने तिला खुदकन हसू आलं. आई आणि सासूबाई जवळपास सारख्याच वयाच्या पण आई जरा स्थूल झालीये आणि चेहऱ्यावर वयाच्या खुणाही उमटत आल्याहेत. उलट सासूबाई म्हणजे अगदी भारीच! किती किती ते कौतुक सासूचे.


लग्नानंतर जानकी तिला शॉपिंगसाठी कुठे कुठे घेऊन जायची. मग तीच म्हणायची, "अहो आई मला नटायला फारसे नाही हो आवडत. पण तुम्हाला नटलेलं बघायला मात्र फार आवडतं."

मग त्याही म्हणायच्या, "पालवी अगं नटावं गं कधीकधी! मूड अगदी फ्रेश होऊन होतो बघ. आणि दुसऱ्यांनी छान दिसतेस म्हणण्यापेक्षा स्वतः तयार होऊन आरशासमोर उभे राहून स्वतःलाच \"सुंदर दिसतेस" अशी एक कॉम्प्लिमेंट द्यायची.

:

क्रमश:

©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

अशा ह्या नटण्याची आवड असलेल्या सासूसाठी समाजाच्या रितिविरुद्ध उभी राहील का पालवी? की तीही बनेल त्याच समाजाचा भाग? वाचा पुढील भागात.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//