एक पाऊल, चौकटीबाहेरचे. भाग -दोन.

एक विचार करायला लावणारी कथा.

एक पाऊल..चौकटीबाहेरचे!

भाग -दोन.


लग्नानंतर जानकी तिला शॉपिंगसाठी कुठे कुठे घेऊन जायची. मग तीच म्हणायची, "अहो आई मला नटायला फारसे नाही हो आवडत. पण तुम्हाला नटलेलं बघायला मात्र फार आवडतं."


मग त्याही म्हणायच्या, "पालवी अगं नटावं गं कधीकधी! मूड अगदी फ्रेश होऊन होतो बघ. आणि दुसऱ्यांनी छान दिसतेस म्हणण्यापेक्षा स्वतः तयार होऊन आरशासमोर उभे राहून स्वतःलाच 'सुंदर दिसतेस अशी 'एक कॉम्प्लिमेंट द्यायची.


"ऍब्सुलुटली करेक्ट! पालवी, जेव्हा आपण स्वतःला सुंदर म्हणतो ना तेव्हा चेहऱ्यावर एक प्रसन्नता येते नि माझ्या बायकोचा तो प्रसन्न चेहरा पाहिला ना तर माझा प्रत्येक दिवस आणखी प्रसन्न जातो." जेव्हा शशिकांत जानकीची स्तुती करायचे तेव्हा लाजेने लाल झालेले त्यांचे रूप पालवीला आणखीन सुंदर भासत होते.


कधीतरी त्यांनी पालवीला म्हटलेही होते, "देव मला न्यायला येईल ना तेव्हा त्यालाही मी म्हणेन, बाबा जरा थांब रे. जरा चेहरा, साडी नीट आहे की नाही ते बघू दे. मग मला ने. मरतानाही कसं प्रसन्न मरण यायला हवं."


आज पालवीला हे सारे आठवून आणखी जास्त रडायला येत होते.


शशिकांत, तिचे सासरे नेहमीप्रमाणे सकाळी बागेत फिरायला म्हणून गेले नि अचानक घेरी येऊन पडले. दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अगदी तासाभरात होत्याचे नव्हते झाले. पोस्टमार्टम करून त्यांचा देह घरी येईपर्यंत सायंकाळ झालेली. अचानक नवऱ्याच्या जाण्याने दुःखाने होरपळलेल्या जानकीताई आणि त्यातच त्यांचे सौभाग्यालंकार काढण्यासाठी झटपट करणारे त्यांचे नातेवाईक!


"आत्या, अहो ही जोडवी, बांगडया, दागिने.. सर्व काढायलाच हवेत का?" मोठ्या हिमतीने पालवीने सासूच्या चुलत नणंदेला विचारले. लग्नाला जेमतेम वर्ष होत आलेले, मोठ्यांच्या मध्ये नाक खुपसायचे नाही हे संस्कार असलेली ती. सासूच्या वेदना पाहवल्या नाही तेव्हा शेवटी ती बोललीच.


"बाई गं. काल आलेली पोरगी नी मोठ्यांना अक्कल शिकवतेस? अगं ह्याच रूढी परंपरा आहेत आपल्या. आपणच नाही पाळायच्या तर आणखी कोणी पाळायच्या?" आत्या जरा चिडलीच होती.


"तरीही आत्या, माझा विरोध आहे हो या गोष्टीला." पालवी निग्रहाने म्हणाली.


"तुला गं कोण विचारत आहे? बघितलंस का काकी? तुझी नातसून कशी चुरूचुरू बोलतेय ते." आत्याने निर्मलाताईकडे म्हणजे पालवीच्या आजेसासूकडे मोर्चा वळवला.


लेकाच्या अशा अचानक निधनाने त्यांनाही धक्का बसला होता. इतका वेळ एका कोपऱ्यात बसून त्यांचं मूक रडणे चालू होते. आता पुतणीने विषय काढलाच म्हणून त्या पुढे आल्या.


"पालवी योग्य तेच बोलत आहे. माझाही या विधीला विरोध आहे." समोर येत निर्मलाताई म्हणाल्या तसे सगळे त्यांच्याकडे बघतच राहिले.


"वहिनी, तुम्ही हे बोलताय? अहो भाऊ गेले तेव्हा तुमचेही सौभाग्यलंकार उतरवले होते, हे विसरलात का?" निर्मलाताईंची जाऊबाई समोर येत म्हणाली.

:

क्रमश :

©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

पालवी आणि निर्मला ताईंना जावे लागेल का सर्वांच्या रोषाला सामोर? वाचा पुढील अंतिम भागात.


🎭 Series Post

View all