एक पत्र भाग ३
सोनम व अपर्णा कुणाल सोबत त्याच्या घरात गेल्या. कुणालने त्यांना सोप्यावर बसण्यास सांगितले व तो आईला बोलावण्यासाठी तिच्या रुममध्ये गेला. काही वेळाने कुणाल आपल्या आईला घेऊन बाहेर आला तेव्हा सोनम व अपर्णाच्या असं लक्षात आलं की, कुणालची आई व्हील चेअरवर बसलेली आहे म्हणजे नक्कीच हिला चालता येत नसेल म्हणून तर ती आपल्या घरी आली नसेल. कुणालच्या आईकडे बघून सोनमने स्माईल दिली, सोनमने स्वतःची व अपर्णाची ओळख कुणालच्या आईला करुन दिली.
कुणालची आई म्हणाली," राधा तुझ्या सोबत का आली नाही?"
सोनम म्हणाली," काकू एकतर माझ्या आईच नाव वैशाली आहे आणि ही राधा कोण? हेही मला माहित नाहीये. माझी आई बाहेरगावी गेलेली असल्याने तिला मी याबद्दल काहीच विचारु शकले नाही. हा नावांचा काय गोंधळ आहे?"
कुणालची आई म्हणाली," पहिली गोष्ट तू मला काकू म्हणू नकोस, मावशी म्हण. दुसरी गोष्ट म्हणजे मला एक पत्र आलं होतं त्यात तुझ्या आईच बदललेलं नाव व पत्ता होता आणि त्या पत्रात जो काही मजकूर लिहिलेला होता तो मी त्या पत्रातून लिहिला आहे. तुझ्या आईने नाव का बदललं आहे? किंवा ते पत्र मला कोणी पाठवलं होतं? हे सुद्धा मला माहित नाही, त्या पत्रात एवढंच होतं की मी राधाला पत्र लिहायचं आणि राधा व मी एकत्र आले की मला पत्र पाठवणारी व्यक्ती माझ्यासमोर येऊन उभी राहील."
सोनम म्हणाली," अरे बापरे म्हणजे अजून एक पत्र आणि तेही निनावी. मावशी तुम्ही माझ्या आईला कसं ओळखता?"
कुणालची आई म्हणाली," तुझी आई म्हणजे राधा माझी लहान बहीण आहे. माझं नाव सुषमा आहे. हवंतर तू तुझ्या आईला फोनवर माझ्या बद्दल विचारु शकतेस."
यावर सोनम म्हणाली," पण मावशी मग इतके दिवस तुम्ही माझ्या आईच्या संपर्कात का नव्हत्या? मला आईने सांगितलं होतं की आम्हाला कोणीच नातेवाईक नाहीयेत म्हणून."
सुषमा म्हणाली," सोनम मी घरच्यांच्या विरोधात जाऊन लव्ह मॅरेज केलं होतं त्यामुळे माझ्या आई वडिलांच्या घराची दार आमच्यासाठी कायमची बंद झाली होती. त्यानंतर माझ्या लहान बहीण भावांचं काय झालं? त्याबाबत मला काहीच माहिती नाहीये."
कुणाल पुढे म्हणाला," सोनम राधा मावशी गावावरुन परत कधी येणार आहेत? कारण त्या आल्यावरच त्यांनी त्यांचं नाव का बदललं? हे आपल्याला समजेल, पण आईला जे पत्र आलं आहे,ते कोणी पाठवलं आणि का? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो कारण त्याच्यात कोणाचं नाव किंवा पत्ता काहीच नाहीये."
इतक्या वेळ बघ्याची भूमिका घेतलेली अपर्णा म्हणाली," सॉरी हा तुमचा फॅमिली मॅटर आहे, यात मला मध्ये पडायचा काही अधिकार नाहीये, पण मी एक सुचवू का?"
सोनम अपर्णाकडे रागात बघत म्हणाली," अपर्णा आता ही फॉर्मलिटी का करत आहेस? मी तुला माझ्या फॅमिली मेम्बरपैकीच एक मानते हे तुला ठाऊक आहे ना, मग अशी का बोलतेस? बरं तुझ्या डोक्यात काय कल्पना आली आहे? ते सांग."
अपर्णा म्हणाली," काकू दोन दिवसांनी परत येणार आहेत बरोबर, पण त्या आल्यावर आपल्याला जर कळालं की हे पत्र कोणी पाठवलं याची कल्पना त्यांनाही नाही तर आपले हे मधले दोन दिवस उगाच वाया जाईल. माझे मामा पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी करतात. मी हे पत्र त्यांना दाखवते, त्यांच्या कडून आपल्याला नक्कीच काहीतरी मदत मिळेल, ह्या पत्रावरील जो शिक्का आहे त्यावरुन ते कुठून आले आहे हे नक्कीच कळेल मग त्या एरियात तुमच्या ओळखीचे कोणी राहते का? हेही आपल्याला कळेल."
कुणाल यावर म्हणाला," चांगली कल्पना आहे, तू हे पत्र घेऊन जा मग बघू पुढे काय होईल ते?"
पत्र घेऊन सोनम व अपर्णा कुणालच्या घरातून जायला निघाल्या तेव्हा सुषमा सोनमला म्हणाली, "सोनम ह्या पत्राचा शोध लागेल की नाही? हे मला माहित नाही पण प्लिज राधाला एकदा तरी माझ्या घरी घेऊन ये."
सोनम हसून म्हणाली," हो मावशी."
सोनम व अपर्णा ते पत्र घेऊन अपर्णाच्या मामाच्या घरी गेल्या. अपर्णाच्या मामाने चौकशी करुन सांगतो असा निरोप त्यांना दिला. घरी आल्यावर सोनम विचारात बसलेली दिसल्यावर अपर्णा तिला म्हणाली," तू कसला विचार करत आहेस?"
सोनम म्हणाली," आईने तिचं नाव का बदललं असेल? आई माझ्यापासून सगळं का लपवत होती?"
अपर्णा म्हणाली," सोनम या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला काकू आल्याशिवाय मिळणार नाहीत सो एवढा विचार करु नकोस."
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा