एक पर्व मैत्रीचे

Sweet friendship

एक पर्व मैत्रीचे..


एक गाव साधंसुद धार्मिक सौंस्कृतीचा वारसा जपलेलं, थोडी थोडकीच घर, देऊळ आणि मोठी मोठी घर, बारा बलुतेदारी व्यवहार, खरंच खूप सुंदर वातावरण, निरव शांतता त्यातच पक्षांची सुस्पष्ट किलबिल आणि गुराढोरांची मातीच्या रस्त्यावरची वर्दळ. पण आता मात्र हे सगळं स्वप्नीक होऊन बसलय. आधुनिकरणाच्या नावाने आता सगळं बदललाय. गावामध्ये आता सरकारने मोठी कंपनी थाटलीय आणि बोलता बोलता गावातली झाडे झुडपे, शेती जाऊन तिथे सिमेंटची मोठी मोठी जंगले तयार झालीत.  कंपनी तशी मोठी होती आणि त्यामुळे गावात खूप लोक बाहेरगावाहून कामानिमित्त येऊन राहू लागली लागलेली. आता गावातलीही लोक पैशासाठी आपल्या शेत जमिनी विकू लागलेले. आता ते गाव गाव न राहता एक शहरच जणू झालं होत. त्या कंपनीत पूर्ण भारतातून लोक आली होती आणि काम करत असतानाच काही काळातच स्वतःच्या जमिनी घेऊन घरे बांधून जणू स्तायिकाच बनून राहिलेली. तरी अजून काही लोक आपली पारंपरिक शेतीचा वारसा जपत शेती करतात. अशाच त्या गावातल्या एका शेतकऱ्याचा मुलगा "राघव" जो त्याच गावातल्या एका प्राथमिक शाळेत सातवीच्या वर्गात शिकत होता आणि त्याच वर्षी त्याच गावात एक केरळ ला राहणाऱ्या माणसाने जमीन घेऊन तेथे एक घर बांधले होते आणि त्याच्या घराचे म्हणजे त्याची पत्नी आणि त्याची मुलगी "जानकी" यांच्यासह राहायला आले होते. जानकी सुद्धा त्या वर्षी सातवीच्याच वर्गात होती. मुलगी डोळ्यासमोर राहावी आणि शिकावी म्हणून तिचा ऍडमिशन गावातल्याच प्राथमिक शाळेत घेतले होते. पण जानकीच आणि मराठी भाषेचा कणमात्र संबंध नव्हता फक्त तिच्या वडिलांना गावात राहून राहून मराठी भाषा थोडी थोडी समजायला लागली होती. ऍडमिशन तर झालं होत पण जानकीला शिकवायचं कस ? हा मोठा प्रश्न शाळेतल्या शिक्षकांना पडला होता. आता स्टाफ रूम मध्ये सगळे शिक्षक याच विषयावर चर्चा करत होते आणि त्यातच त्यांच्यातल्या मराठी शिक्षकाने शक्कल काढली. ते म्हणाले "आपणच आपल्याच शाळेच्या मुलांना तिला मराठी बोलायला आणि वाचायला शिकवायला सांगूया. मुलांचा एक ग्रुपचं बनवूया. या कामासाठी ठरल्या प्रमाणे जानकीच्याच वर्गातल्या काही मुलांना आणि मुलींना नेमण्यात आलं. या कामा साठी त्यात राघव हा हि होता. राघव हा तेव्हा अभ्यासात ढ असला तरी तो चपळ आणि खूपच मस्तीखोर होता वर्गात. राघवला जेव्हा कळालं कि त्याचंही नाव आहे त्या ग्रुप मध्ये तेव्हा तो खूप खुश झाला होता कारण अभ्यास सोडून काहीतरी वेगळं करायचं होत शाळेत. जानकीच ऍडमिशन तर झालं होत पण अजून ती शाळेत आली नव्हती कारण तिच्या घरचेअजून विचारातच होते कि ती शाळेत जाऊन करणार काय ? शिकणार कशी ? पण शाळेतून तिच्याघरी शिक्षकांनी निरोप पाठवला होता कि प्रॉब्लेमचे सोल्युशन काढलंय.जानकीला पाठवा शाळेत. आता तिला शिकवायची जबाबदारी आमची आहे. जानकीच्या घरच्यांनीही सुटकेचा श्वास सोडला.

जानकीचा शाळेतला पहिला दिवस. तिला घेऊन तिचे आई आणि बाबा दोघेही आले होते. शाळा भरली होती आणि राघव आणि सगळी मुले वर्गात बसली होती. वर्गात शिक्षक अजून आले नव्हते आणि त्यामुळे वर्गात गोंधळ चालू होता. एव्हढ्यात शिक्षक आले ते जानकी सोबतच. जानकी.....जानकीला पाहताच राघव सहीत त्याच्या वर्गातली सगळी मुले शांत झालेली आणि तिच्याकडेच ताक लावून बघत होती कारण ती आलीच होती तशी नटून थटून. जानकी तशी थोडी सावळी होती पण तिचा चेहरा खूपच सुंदर होता. गोल गोल मस्त चंद्रा सारखा. तिची त्वचा जणू खोबरेलतेल खाऊन खाऊन तेलकटी मस्त चमकत होती. तिने डोक्यात दोन वेण्या लाल रिबीनीने मस्त बांधलेल्या होत्या आणि अंगार नवीन कोरा शाळेचा गणवेश आणिहो तिच्या कपाळावर आडवा पण सुंदर असा चंदनाचा टिळा. अशी हि जानकी वर्गात आली आणि तिला शिक्षकाने पहिल्या बाकावर बसायला जागा करून दिली तसेच प्रथम तिची ओळख वर्गातल्या तिच्यासाठी बनवलेल्या ग्रुप बरोबर करून दिली. जानकीला त्यांचं तुटक तुटक इंग्रजी कळायचं आणि बाकी सगळं इशाऱ्यानेच. त्या दिवशी त्या शिक्षकांकडे बघून असं वाटतहोत कि ते जणू मूकबधिर मुलांचे शिक्षकच आहेत. त्या जानकीला समजावताना होणारे त्यांचे हातवारे पाहून राघवचकाय पूर्ण वर्गाचंच हसू आवरत नव्हतं. पूर्ण वर्गात राघवच सर्वात जास्त म्हणजे पोट धरून धरून हसत होता. शिक्षक राघवकडे पाहून म्हणाले "बेटा..तू आहेस ना त्या ग्रुप मध्ये, बघूया तुझी काय गतहोतंय ती, ते या जानकीला मराठी शिकवताना. त्याच वेळेस पहिल्या बेंचवर बसलेली हि जानकी रागारागात या राघव कडे पाहत होती आणि हे राघवने पाहिलं आणि तो शांत होऊन आपल्या जागेवर बसला. आता त्या शिक्षकांच्या गालावर हसू उमटलं होत ह्या राघवाचे ते हावभाव बघून. राघव समजून चुकला होता कि हि मराठी भाषेची शिकवणी शाळेच्या परीक्षेपेक्षा कठीण जाणार होती त्याला.

आता वर्गात सर्व शिक्षकांनी जणू नाटकाचा रंगमंचच उभारला होता त्या जानकी साठी आणि राघवचा तो ग्रुप त्या रंगमंचावरच्या कटपुटल्या. शिक्षक जेजे काही शिकवायचे ते हा ग्रुप ह्या जानकीला नाट्यरूपात हातवारे करून समजवायचा आणि जानकी जेव्हापर्यंत समजण्याचा डोकं हलवून इशारा करत नाही तोवर त्या कटपुतळ्यांची सुटका नसे. गणित सोडलंतर प्रत्येक तासाला नुसती धमाल चालायची तेव्हा जाऊन राघवला आणि त्यांच्या वर्गातल्या मुलांना एक साक्षात्कार झाला तो म्हणजे शाळेत येऊन वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास म्हणजे फक्त रट्टा मारत होतो एव्हडे दिवस. या जानकीमुळे सगळे विषय हे खरोखर अनुभवायला मिळत होते या वर्गात. आता खऱ्या अर्थाने शिकत होती मुले शाळेत.

जसा विषय आणि त्या विषयातल्या पाठातली पात्रे, त्या पात्रांचे अवतार घ्यावे लागत कोकणी भाषेत सांगायचे झाले तर "सोंग काढावी लागत वर्गात". कोणी राजा व्हायचं तर कोणी शिपाई, कोणी लेखक तर कोणी कवी तर कोणी वाघ, माकड, घोडा आणि गाढवही. एकदा मराठीच्या एका पाठात राजा राणीची गोष्ट आली होती तेव्हा राघव हा राजा बनला होता आणि त्याच्या ग्रुप मधली एक मुलगी राणी. राघव जणू त्या पात्रात भिनला होता, जानकी त्याच्याकडे निरखून पाहत त्याच पात्र नीट जाणूनघेण्याचा प्रयत्न करत होती. हे सगळं पाहता पाहता अचानक जानकीच्या डोळ्यातून पाणी आलं आणि राघवने आपण जे राजाच पात्र साकारलाय ते जाणायला कळलंय का हे पाहण्यासाठी तिच्याकडे पाहिलं तर तिच्या डोळ्यातल पाणी तिच्या गालावरून वाहताना दिसलं. राघव शांत झाला आणि त्याने बाकी पात्रांसहि थांबण्याचा इशारा केला. जानकी आता राघवच्या डोळ्यात डोळे घालून बघत होती. राघवने अलगत इशाऱ्याने तिले विचारले "काय झालं ?" तिनेही डोळ्यांच्या इशाऱ्यात उत्तर दिल "काही नाही ?" आता वर्ग शांत झाला होता आणि त्यातच जानकीने उभंराहून अलगत आपला हात पुढे केला होता राघव च्या दिशेने त्याला हात मिळवायला. राघवने पुन्हा तीला इशाऱ्यातच विचारलं "कोण ? मी ?"  तेव्हा जानकी इशाऱ्यातच म्हणाली "हो ..तूच " आणि ती एकच शब्द उच्चारली "फ्रेंड्स". राघव गालातल्या गालात स्माईल देत पुढे आला आणि तिचा हात हातात घेऊन तो हि म्हणाला "फ्रेंड्स". आता तीही खुद्कन हसली. जो राघव एव्हडे दिवस डोक्यावर हात मारून म्हणायचा "या जानकीच्या नादात एक दिवस मोठा नट होईन, हि रोजची अशी वेगवेगळी पात्रे साकारून या वर्गात. पण आता त्या सुंदर मुलीचा या शाळेत तो एकुलता एक मित्र होता. आणि आता राघवकडून तिची मराठीची शिकवणीचा चालू झाली होती जणू. आता राघव पूर्ण शाळेतल्या कोणत्याच मुलांची पर्वा न करता शाळेच्या आवारात जानकी असेल तिथे तीला तो शिकवायचा मराठी, ती पण हावभावाने प्रत्येक वस्तूजवळ जाऊन तो तीला त्याचा उच्चार शिकवायचा आणि तीही त्याच्यावर विश्वास ठेऊन त्याच्या मागोमाग बोलायचा प्रयत्न करायची. जानकी आता राघवच्या संगतीत थोडे थोडे मराठी समजू उमजू लागली होती आणि काही काही गोष्टींची नाव उच्चारूही लागली होती. जानकीनेहि आता मनापासून मराठी शिकण्याचा निर्धार केला होता आणि त्या प्रमाणे ती नुसती उच्चारचनाही तर मुळाक्षरे शिकून ती लिहायला आणि वाचायलाही शिकत होती. आता तीला मराठीची गोडी लागली होती. राघव आणि जानकीची मैत्रीही खूप घट्ट झ्हाली होती. शाळेच्या आवारातते नेहमी एकत्र दिसायचे. राघव तीला काहीतरी समजावत असायचा आणि ती मनापासून त्याच्या गोष्टी समजत. शाळेतल्या शिक्षकांनीही मान्य केल होत. जानकीने मराठी शिकण्याचं राघवच श्रेय.

आता रोज मधल्या सुट्टीत राघव आणि जानकी हे दोघे एकत्र जेवायला बसायचे आणि आपआपले डबे ते शेअर करायचे आणि हे दोघे जेवताना वर्गातली बाकी मुलं या दोघांकडे पाहून खूप मजा घ्यायची कारण रोज जानकीने आणलेले खोबरेलतेलातले जेवण खायची सवय नसलेला राघव हा आपलं तोंड वाकड करून लगेच चेहऱ्यावरचे हावभाव बदलून जानकीला "वाह..सुपर.." अशी दाद देत हाताने सुंदर अशी खून करायचा तर जानकी राघवचा डबा खाताना घामाने न्हाऊन निघायची कारण राघवच्या डब्यात नेहमीच लसूण मिरचीचा ठेचा नाहीतर शेंगदाण्याची तिखट चटणी असायची तरीही जानकी त्यातच पाणी पीतपीत राघवला स्माईल द्यायची.

अशा प्रकारे वर्षअखेर पर्यंत जानकी मराठी शिकली होती राघवच्या आणि त्यांच्या ग्रुपच्या मदतीने. जानकीच्या आई बाबा तसेच त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांनीही या सगळ्यांचे आभार व्यक्त केले होते.

जानकीची आणि राघवची मैत्री आता आणखीनच घट्ट झालेली आणि त्याच हे मैत्रीचं पर्व असच चालू राहिलेलं.

मी अजय मनोहर म्हात्रे (अलिबाग)

मनातल्या विचारांना एका रूप देण्याचा एक साधासा प्रयत्न करत असतो सतत...
तुम्हाला जर हा प्रयत्न आवडला असेल तर लाईक करून माझ्या नावासहित शेअर करा...
तसेच तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया कमेंट्स करायला विसरू नका..