आवरून आता सगळे सायलीच्या घरी पोहोचतात. लेक माहेरी येणार त्यामुळे जय्यत तयारी झालेली असते. अगदी औक्षण करून सायली आणि जावयाला आत घेतात. सायली गेल्या गेल्या काकू आणि आईला मिठी मारते.
“माझं कोकरू.. किती महिने झाले तुला एकदा पण आठवण नाही का ग आली आमची?? आईची तरी निदान! किती आठवण काढत असते तुझी पण तुला वेळच नसतो . इतकी रमलीस का संसारात??” काकूने आधी जवळ घेऊन धरला तिचा.
“अगं काकू.. आई ग ..अगं सोड.. सांगते तर..”
“आईची आठवण व्हावी म्हणूनच कान पिळला तुझा..”
“ सायू. इतकी बारीक का ग झालीस.. जावई बापू त्रास देता का आमच्या लेकीला??” रमा एकदम प विचारते.
राहुलला ह्या प्रश्नाची कल्पनाच नसते त्यामुळे थोडा गडबडतो, “ नाही हो.. मी काही त्रास नाही देत..”
तेवढ्यात मंगला बोलते, “ सायलीलाच विचारा.. सगळी कामं स्वतःवर घेते. मला काही एक करू देत नाही. मी नुसता आराम करायचा म्हणे!”
“ वहिनी खूपच काम करते पण! आमचा दादा तिला त्रासच देतो. तुम्ही विचारलं ते अगदी बरोबर होतं.” रुपाली तिच्या अंदाजात उत्तर देते. सायली आता बाजू सांभाळून घेते, “ नाही काही त्रास नाही.. चल ना आई मला माझ्या खोलीत जायचं आहे.. रुपाली येतेस?? आई तुम्ही या..”
“नको तू आणि रुपाली जा.. मी इथेच बसते..”
दोघी तिच्या खोलीत जातात. सायली ची खोली आजही तशीच ठेवलेली असते जशी ती ते घर सोडून सासरी जाते.
“वहिनी खूप छान आहे ग तुझी खोली.. मला खूप आवडली..” तिच्या कपाटाजवळ जाते तर खूप पुस्तकं असतात.
“वहिनी अगं तुला सुद्धा वाचनाची आवड आहे दादासारखी? अगं किती गोष्टी अजून आहेत तुझ्याकडे ज्या आम्हाला माहित नाही??”
“हो आहे वाचायची आवड पण आता कुठे हे सगळं. वेळ तरी आहे का?”
“वेळ नसायचा काय संबंध?? आता कुठे काम आहे तुला काही?”
“ वेडे मी सासुरवाशीण आहे आता. घरातली किती कामे असतात तुला माहित नाही का?”
“आता बास बरं का वहिनी.. अगं तू नव्हतीस अगदी ७-८ महिने आधी तेव्हा ही घरात कामे होत होती. आता होणार नाही का? ते काही नाही. तू सुद्धा आता तुझी स्वप्नं पूर्ण कर! थांब तू असं नाही ऐकणार..” हे बोलून रुपाली तडक बाहेर येते. तिच्या पाठोपाठ सायलीसुद्धा हजर होते..
“ दादा तुझ्याशी काही बोलायचं आहे येतोस का जरा??” बोलताना फार गंभीर आणि जवळपास दादाला दमात घ्यायचा मूड असल्यामुळे सगळे बसलेले अवाक् होतात.
सायलीचे काका, “ काही चुकलं का? नाही तुम्ही आत गेला होता ना?? काही झालं का? सायली काय ग?”
“ नाही हो काका.. तुम्ही काळजी करू नका. असच दादाशी बोलायचा आहे. येतोस का इथेच बोलू..”
हे वादळ असं का बोलतय अशी शंका राहुलला येते.तो अजिबात उशीर न करता तिच्याबरोबर येतो. रुपाली दोघांना घेऊन सायलीच्या खोलीत जाते.
“ये दादा. हे बघ..” असं म्हणून सायलीच्या कपाटाजवळ नेते. तिची पुस्तकं पाहून राहुलला आश्चर्य वाटतं.
“सायली ही तुझी आहेत??”
सायली जरा संकोचून सांगते, “हो माझी च आहेत..”
“मला माहित नव्हतं तुझ्या ह्या आवडी बद्दल..”
हे ऐकायला रूपालीचे कान आसुसलेले असतात, “ हो ना.. त्यासाठी दिलेल डोकं वापरायला लागतं. तुझ्या बायकोच्या आवडी निवडी तरी माहिती आहेत का? छंद जाऊ देत पण तिला फिरायला आवडतं का? खायला काय आवडतं असं काही? एक तरी गोष्ट? नसलेच.. कारण तुला तुझ्या स्वप्नांचा पाठलाग करायचा होता. ती राबत होती बिचारी की कधीतरी तू प्रेमाने मोकळा होशील.. तिचे कष्ट तुला दिसले तरी का? आजही तू इथे यायला कंटाळा करत होतास मला माहीत आहे.. काय बोलायचं दादा तुला! अरे एक मुलगी तिचं घर सोडून आली तुझ्यासाठी फक्त तुझी होऊन. मान्य तुझ्या मनाविरुद्ध लग्न झालं पण तिच्या नाही ना.. तिने सगळी स्वप्नं बोचक्यात गुंडाळून ठेवली तुझ्यासाठी.. तिला स्पिच थेरपी मध्ये शिक्षण पुढे शिकायचं होतं हे माहीत आहे तुला? नाही तुला काहीच माहीत नाही. जाऊ दे.. पण लक्षात ठेव तिने आई बाबा मला खूप आपलंसं केलं ह्या महिन्यात, आम्हाला माया लावली पण तिला तुझ्या मायेची गरज आहे रे!! जाऊ दे तुला सांगुन काय उपयोग. जाते मी.” असं बोलून रुपाली बाहेर निघून जाते. एरवी हसत खेळत बोलणारी. एकमेव मुलगी स्वतःची बहीण आपल्याला ऐकवते. राहुलला वाईट वाटलं असेल ह्या विचाराने सायली पुढे येते.
“ राहुल नका मनावर घेऊ इतकं. लहान आहे अजून.”
राहुल काहीच बोलत नाही. शांतपणे तिथून बाहेर येतो. सगळा कार्यक्रम पार पडतो. राहुल हसत खेळत सगळं एन्जॉय करतो. सायलीला आता प्रश्न पडतो नक्की काय झालं? रुपाली इतकं बोलली राहुलना तेव्हा ते शांत होते आणि आता नीट बोलतायत सगळ्यांशी. रुपाली सुद्धा थोडी रागातच होती की हा असा कसा? सगळं झाल्यावर गोळे कुटुंब घरी येतं.
रुपाली काही न बोलता तिच्या खोलीत जाते. मंगला आणि योगेश थकले असतात म्हणून त्यांचा खोलीत जातात. सायली फ्रेश होऊन स्वयंपाक घरात दुसऱ्या दिवशीच्या तयारी साठी जाते. राहुल खोलीत जातो. सगळं आटपल्यावर सायली खोलीत जाते. आता शिरते तर राहुल सगळी पुस्तकं नीट लावत असतो. त्याचा शांततेचा अंदाज घेऊन सायली हळूच पुढे होते.
“अहो.. अजून मनात आहे वाटतं रुपली बोलली ते?”
राहुल काहीच बोलत नाही. एका लयीत त्याचं काम करत असतो..
“राहुल बोला ना..” आता तिला मुसमुसण्याचा आवाज येतो. पुढे होऊन ती एका बाजूने जाऊन बघते तर राहुल रडत असतो. आता मात्र सायलीला सुचत नाही काय करायचं. राहुलला असं रडताना पाहून तिलाही रडायला येतं. ती रडतच बिछान्यावर बसते. राहुल हलकेच तिच्या डोक्यावर हात ठेवतो. तिचा चेहरा आपल्या ओंजळीत घेऊन मऊ पणे वर उचलतो..
“सायली रडू नकोस. माझ्यामुळे खूप रडली असशील ह्या काही महिन्यात. आता बास.”
सायली त्याचं बोलणं ऐकून आणि स्पर्शाने मोहरुन जाते. राहुलला घट्ट मिठी मारते.
“ रुपाली बोलली त्यात मी तिला काही सांगितलं नाही. मी कोणालाच काही बोलले नाही.”
“ मला सगळं माहीत आहे सायली. मी इतका वाईट नाही ग. मान्य आहे तुला बायको म्हणून नाही वागवलं पण मी मनातून मात्र तुला बायको म्हणून स्वीकारलं आहे कधीच!” असं म्हणून त्याचा कपाटातून एक पिशवी, बॉक्स असं बरच सामान काढतो.
“हे बघ.”
सायली त्याचाकडे बघते, “ हे काय आहे?”
“उघडून बघ तर त्याशिवाय कसं कळेल?”
सायली सगळं एक एक करून उघडते. पिशवीत छान केशरी रंगाची साडी, एका बॉक्स मध्ये मॅचींग कानातले, एकात छान सोन्याची अंगठी असते.
सायली हे सगळं पाहते.
“कसं वाटलं??”
“छान आहे..”
“हे सगळं तुझ्यासाठी आहे.. अजून एक पिशवी आहे ती बघ”
सायली पिशवी उघडून पाहते तर त्यात कागदपत्र असतात. ती वाचते तर स्पीच थेरपी च्या कार्यशाळेबद्दल माहिती असते.
“हे काय?”
“हे सगळं तुझ्यासाठी..” राहुल तिच्याजवळ येऊन बसतो. “इतके महिने तुझी काहीच इच्छा पूर्ण केली नाही पण आता करणार.. जसं माझी स्वप्नं तू आपलीशी केलीस तशीच तुझी स्वप्नं पूर्ण नको व्हायला?? आता मला फक्त तुला जपायच आहे बास. तुला वाटत असेल एका रुपालीच्या बोलण्यामुळे असं झालं? तर नाही.. तू जेव्हा मला संपूर्ण पाठिंबा दिलास तेव्हा मी तुझा झालो. तू मला रात्री, पहाटे नियमित चहा, पाणी खायला आणून देत होतीस तेव्हा मी तुझ्या प्रेमात पडत गेलो. तू खायला आणून देत होतीस म्हणून नाही.. तुझं सारखं येणं मला आवडायला लागलं. चहा देताना होणारा स्पर्श, खोली आवरताना पैंजणाचा आवाज, केसातला चाफ्याच्या फुलाचा वास… मला सगळं आवडत होतं पण मी माझ्या ध्येयापासून वेगळा झालो असतो. पण तुझी तळमळ मला समजायची. माझ्या स्पर्शाने तुलाही ओढ लागली होती पण फक्त माझ्यासाठी तू मनात ठेवत गेलीस. असे क्षण आले की मी बाहेर गेल्यावर तुझ्यासाठी ह्या वस्तू घेऊन यायचो. ठरवलं होतं जेव्हा केव्हा सांगेन तेव्हा हे तुला देईन. आणि आजसाठी सॉरी. तुझ्या घरी यायचा कंटाळा आला नव्हता मला पण मी मुद्दाम करत होतो. मला घरी थांबून तुझ्यासाठी छान काही प्लॅन करायचं होतं पण…….”
इतकं बोलून होत नाही तोच सायली त्याचा ओठांवर हात ठेवते.
“आता काही बोलू नका.. मी सगळं तुम्हाला मिळवण्यासाठी केलं पण आता ते झालं. पण एक गोष्ट मात्र तुमच्या आई बाबांनी माझ्यापासून लपवली.”
“कुठली?”
“मला सांगितलं नव्हतं तुम्ही इतके लहान मुलासारखे रडता..” तिचं हे वाक्य ऐकून राहुल जोरजोरात हसायला लागतो त्याबरोबर सायली सुद्धा खळखळून हसते..
…………………………..,…….,…….,……….,………………………………
दुसऱ्या दिवशी सकाळी सायली जरा उशिरा उठून बाहेर येते. तोपर्यंत रुपाली आणि मंगला ने सगळं आवरून घेतलेलं असतं..
“ मला उठायला उशिरच झाला थोडा..”
“अगं असू दे. काल मायेची माणसं भेटली ना त्यामुळे शांत झोप लागली असेल. त्यात काय एवढं.” मंगला बोलते.
“वहिनी तुझ्या नवऱ्याचं डोकं आलं का ठिकाणावर..” रुपाली हे बोलत असतानाच राहुल बाहेर येतो.
“आलं हो वादळकाकू..” त्याचा मूड पाहून मंगला आणि रुपाली अवाक् होतात.
“आई उद्या आपण सत्यनारायण घालतोय. माझ्या बायकोची इच्छा आहे. चला तयारीला लागुया.. मी बाहेर जाऊन सामान घेऊन येतो आल्यावर मग नाश्ता करेन.. निघतो..”
एवढं बोलून राहुल जातो सुद्धा. रुपाली तोंडाचा आ वासून सायलीकडे बघते आणि हे कसं झालं असं विचारते?? तर सायली लाजून तिच्या खोलीत जाते.
दिवसभर सायली आणि राहुल खूप उत्साही असतात. त्यांचं दिवसभर एकमेकांत असं गुंतून राहणं रुपाली आणि योगेश साठी आश्चर्यकारक असतं. पण मंगला मात्र काहीच नवीन नाही अश्या रूपात वावरत होती.
शेवटी रुपाली आईला विचारतेच, “ आई अगं काय हा असा बदल झालाय तुला काही वाटत नाही का? एका रात्रीत असं काय घडलं?”
“ रूपे अगं मलाही नाही माहिती कसं झालंय काय झालंय… बघुया काहीतरी सांगतीलच.. चाललं आहे ना छान मग असू दे की.. चल आपण तयारी करू उद्याची..” असं म्हणून दोघी स्वयंपाक घरात जातात..
…..,……………….,……………………………………………….
पूजेच्या सकाळी सायली राहुलने दिलेली साडी नेसते. त्याच्यावर नेकलेस, कानातले, अंगठी सगळं अगदी राहुलने दिलेलं.. रुपाली तिला पाहताच खुश होते.
“वहिनी काय खुलून दिसतेस ग आज.. असं काय झालंय एका दिवसात की तुझा थकवा, मरगळ सगळी झटकून टाकलीस.. ही साडी कधी घेतलीस तू??”
“मी नाही घेतली ह्यांनी दिली.. कानातले, ही अंगठी आणि लग्नात दिलेला हार.. रूपे मी म्हंटल होतं ना हे नक्की एक दिवस माझे होतील.. तसचं झालं.. खरं तर ते माझे कधीच झाले होते फक्त योग्य वेळेची वाट बघणं आपल्या हातात असतं ना. तसच झालं..”
सायली कडचे सगळे पूजेला येतात. सायली आनंदाने जाऊन काकू आणि आईला मिठी मारते. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून रडूच येतं दोघींना.. गळाभेट झाल्यावर सायली आणि राहुल पुजेला बसतात. पूजा अगदी छान पार पडते. सगळ्या मोठ्यांना नमस्कार करून दोघंही भरभरून आशिर्वाद घेतात. मंगला दोघांनाही पाटावर बसवते.
“सुनबाई जिंकलस नवऱ्याला आणि आम्हा सगळ्यांना. व्याही तुमची मी खरंच खूप आभारी आहे की अशी गुणाची लेक तुम्ही माझ्या घरात दिली.”
“ मंगला ताई अहो तुम्ही तिच्या पाठीशी खंबीर होता म्हणून ती सगळं करू शकली.” रमा बोलते.
“ मला माफ करा सगळ्यांनी. सायलीला त्रास होईल असं मला कधीच वागायचं नव्हतं. पण माझ्या स्वप्नांसाठी मी तिला तसं वागवलं. सायली ने समजूतदारपणा दाखवला म्हणून नाहीतर मला हे सगळं यश संपादन करता आलं नसतं.”
तेव्हढ्यात योगेश बोलतो, “ बरं पुरे आता. सगळं छान झालं आहे आणि आमच्या सौभाग्यवती प्रमाणे सुनबाई एकदम गुणाच्या निघाल्या आहेत.. चला आता काय तो तुमचा कार्यक्रम करा..”
मंगला पुढे येते. तिच्या हातात चाफ्याची फुलं असतात, “ मी सासू म्हणून तुझी ओटी भरू शकत नाही पण ही फुलं घे.. ह्या एक ओंजळभर फुलासारखे तुमचं आयुष्य सुगंधी होवो..”
रमा येते, “ सायली तुझी ओटी भरते. ओंजळभर तांदुळासारखे तुझे आयुष्य बहरत राहो आणि संपन्न होवो आणि ही फुलांची वेणी! ह्या सारखी घट्ट वीण तुमच्या नात्याची ठेवा.”
काकू येते, “ सायली मी ओटीत साखर देते. ह्या ओंजळभर साखरेसारखा गोडवा तुमच्या आयुष्यात सदैव राहो..”
रुपाली येते, “ वहिनी मी काही ओटी नाही भरणार. पण हे घे एक ओंजळभर बोरं. गोड आंबट असं तुमचं नातं कायम टिकून ठेवा!”
सगळ्यांचा ओंजळभर प्रेमात सायली आणि राहुल सुखावतात. एक ओंजळभर प्रेमाची शिदोरी घेऊन पुढच्या आयुष्याला सुखाने सुरुवात करतात…
सम्पात……..
© स्वराली सौरभ कर्वे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा