Oct 20, 2020
स्पर्धा

एक ओंजळ प्रेम भाग ५

Read Later
एक ओंजळ प्रेम भाग ५

दुसऱ्या दिवशी सायली राहुलला जोरात हाक मारते.. राहुल दचकून जागा होतो आणि काय झालं ते बघायला लागतो..
“काय झालं? इतकी का ओरडलीस?”
“काही नाही सहजच..”
राहुल रागाने विचारतो, “ सहज? वेड नाही ना लागलं?” घड्याळात पाहतो तर पाच वाजले असतात. “पहाटे पाच ला कोणी सहज ओरडत उठतं का?”
आता सायली थोडी हिरमुसते, “सहज नाही.. तुम्हाला अभ्यासासाठी उठवलं.” मग एकदम जोर अंगात आणून बोलते, “ उठा आता.. अभ्यासाला बसा. निव्वळ वेळ घालवायचा आणि दुसऱ्याला बोलायचं.. उठा..” असं म्हणून निघून जाते. राहुल अचंबित होऊन बघत बसतो.
सायली आवरून मस्त चहा करते आणि राहुलच्या पाठी लागून त्याला आंघोळ आणि सगळ्या गोष्टी आवरून घ्यायला लावते. राहुल अगदी तिच्या सूचना पाळून आवरून अभ्यासाला बसतो.. काय करणार बिचारा.. तिच्यासमोर चालत कुठे होतं काही?
“आता तुम्ही करा तुमचा अभ्यास.. मी जाते माझं काम करायला..” असं म्हणून ही जाते सुद्धा.. आता काय उठलो आहोत तर करूया सुरुवात नाहीतरी आठवडा झाला हात नाही लावला अभ्यासाला.. असं म्हणून तो ही वाचायला लागतो.
सायली घरातला केर काढून, अंगण झाडून, फुलं काढून नाश्त्याच्या तयारीला लागते तितक्यात मंगला येते.. 
“काय ग आज सगळं आवरून तयार? झोप काढ की जरा. कुठे पळून जायचं आहे?”
“आई पळून नाही जायचं उलट कोणालातरी धावायला लावलं आहे..” पोह्यांची फोडणी टाकता टाकता सायली बोलते.
“धावायला?? काय बोलतेस? काही कळत नाही मला. जरा नीट सांगशील का?”
“अहो आई, तुमच्या मुलाला मी पहाटे उठवून अभ्यासाला बसवलं आहे.”
“अभ्यास? कसला अभ्यास आता?”
“ त्याचा स्वप्नांचा अभ्यास.. स्पर्धा परीक्षा देणार आहेत ते आता.”
“ वेड लागलं आहे का तुम्हाला? कशाला आता हे नवीन काहीतरी. सुखाने संसार करा..”
सायली मंगलाकडे एक नजर टाकते, “ आई, तुम्हीच मला सांगितलं ना की खंबीर हो त्याशिवाय तुला काही मिळणार नाही. आता मी खंबीर झाले आहे. सुखी संसार व्हावा असं मला नाही वाटत का? पण माझ्या नवऱ्याने माझ्यावर प्रेम करावं अगदी मनापासून म्हणून हे सारं काही आहे. माझ्या प्रेमाचा मार्ग त्यांचा स्वप्नावर अवलंबून आहे. मग सांगा बरं हे वेड आहे का??”
मंगला सायलीकडे बघतच बसते. दोन्ही हात तिच्या चेहऱ्यावरून मायेने फिरवते आणि डोळ्यात पाणी येतं.
“ पोरी माझ्या राहुलला अशीच मायेने वागवशील ह्याची खात्री आहे आता. तुमचं प्रेम बहरत राहू दे कायम. माझी साथ कायम आहे. राहुलला आम्ही जितकं समजून घ्यायला हवं होतं त्यापेक्षा जास्त तू घेत आहेस. मी, हे आणि रुपाली तुला वाट्टेल ती मदत करू..”
“हो मला माहिती आहे आई. शेवटी तो तुमचा मुलगा आहे. आता मदत म्हणजे त्यांचा वेळेवर आपलं बंधन कोणीच घालायचं नाही.”
“ठरलं. आम्ही कोणीही त्याला म्हणजे तुम्हाला त्रास देणार नाही.”
“अहो आई त्रास काय? काहीही बोलू नका. चला आता पोहे खाऊन घ्या सगळे मी राहुलला देऊन येते. आजच्या दिवस फक्त तुम्ही घ्याल ना?”
“आधी नव्हते का घेत? तूच गेले काही दिवस सवय लावलीस मला आरामाची. आता थोडं काम सांगत्येस तर मी उड्या मारत करेन..”
दोघीही खळखळून हसतात आणि सायली खोलीत जाते. दार हळूच उघडून बघते तर राहुल मग्न होऊन अभ्यास करत असतो. ती हळू हळू पुढे जाते तेव्हा राहुलला चाहूल लागते.
“ सायली.. अशी हळू का येतेस?”
सायलीला कळत नाही ती आलेली राहुलला कसं कळलं? तो तर पाठमोरा आहे.
“तुम्हाला कसं कळलं मी आले ते? तुम्हाला डिस्टर्ब नाही ना झालं?”
“नाही ग. आणि तू येशील ते मला कळणार नाही का?? तुझ्या पायातले पैंजण सगळं सांगतात.”
राहुल इतकं मोकळेपणाने बोलतो हे पाहून सायली सुखावते. चला मैत्रीपासून पायाच्या पैंजणा पर्यंत ओळख गेली म्हणजे आपली. सायली हातात पोहे आणि चहा घेऊन तशीच उभी असते.
“सायली मला खायला देशील का? भूक लागली आहे.”
“हे काय खायलाच आणलं आहे.”
राहुल तिच्याकडे न बघता हातातली ताटली घेतो आणि खायला सुरुवात करतो. 
“एक सांगू?”
“बोल लवकर..”
“हे असं खाताना जरा अभ्यास बाजूला ठेवा. पाच मिनिटांनी काही बिघडत नाही. नीट खा आधी.” असं म्हणून त्याचा समोरची पुस्तकं बंद करते.
“हे तू सांगितलस? चक्क धाकच आहे तुझा..”
“अर्थात. तुमची मैत्रीण असले तरी बायको आहे हे विसरू नका.” 
राहुल जरा हसतो. थोडं थोडं का होईना दोघांच्यात मैत्रीच्या नावाखाली प्रेम बहरून येत होतं. मंगला दाराच्या बाहेर उभी राहुल बघत असते. मुलांच्या प्रेमाची विण घट्ट होत आहे हे तिला पक्कं समजतं.
…………………………………………………………………..,……………….
५-६ महिने जातात. राहुलने नोकरी सोडून जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला दिलेला असतो. सायली बरोबर तो प्रेमाने वागत असतो पण प्रेम अजून झालेलं नसतं. सायली मात्र लग्नाला काही महिने झाले असूनही एक मोठा निर्णय घेऊन सगळ्यांना चकित केलेलं असतं. तिची सगळी स्वप्नं मुठीत बंद ठेऊन ती फक्त राहुलला खुश करायचा प्रयत्न करत असते. जरी निर्णय घेऊन सगळं करत असली तरी तिच्या हक्काचं प्रेम, नव्या नवरीच्या चेहऱ्यावर असलेलं तेज तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं. लग्न झाल्यापासून माहेरी सुद्धा गेली नव्हती ती ! 
रुपाली आणि मंगला ला हे बघवत नव्हतं पण काय करणार सायलीनेच अट घातली होती. पण एक दिवस रुपाली ने सायलीला तिच्या खोलीत नेलं.
“वहिनी बस ना. गप्पा मार माझ्यासोबत. किती दिवस झाले आपण बोललो नाही नीट.”
“अगं ह्यांना जेवायला नेऊन देते.”
“ बास कर आता वहिनी. किती करणार आहेस अजून? स्वतःकडे पाहिलं तरी आहेस का? कशी झाली आहेस? चेहऱ्यावर गोडवा होता माझ्या वहिनीच्या किती सुंदर आहेस दिसायला आणि आता बघ. दादाला काय हात पाय नाहीत का? सगळं त्याचा हातात नको देऊ. १० मिनिट काढून तो येऊ शकतो बाहेर.”
“अगं रुपाली मी हे सगळं त्यांच्यासाठी करते ना. त्यांचं स्वप्नं पूर्ण झालं की मग मला ही आनंदच आहे ना..”
“ त्याची स्वप्नं कधी पूर्ण होणार नाहीत वहिनी. आज एक तर उद्या दुसरं. तू अशीच राहशील. ऐक माझं. अगं सारखं तू त्याला दिलं पाहिजे सगळं असं नाही. आम्ही आहोत आम्हाला सांग. पण नाही तो मूर्ख तुलाच हाका मारत सुटतो आणि तू धावतेस..”
“म्हणजे त्यांचं माझ्याशिवाय काही चालत नाही आता हे कळतंय का तुला? ह्यालाच प्रेम म्हणतात ना?”
“ असं नसतं ग वहिनी..”
“आपण नंतर बोळू येतेच मी.”
“वहिनी तू मास्टर्स केलं आहेस ना? पुढे तुला स्पीच थेरपी मध्ये काहीतरी करायचं होतं..”
सायली जागीच थांबते. रुपाली कडे वळून बघते.
“बोल ना वहिनी. खरं आहे ना? तुझ्या आईने सांगितलं आम्हाला. अगं तुझे आई बाबा आले तेव्हा सुद्धा धड बोलली नाहीस त्यांच्याशी. किती वाईट वाटलं त्यांना.” 
सायली रुपाली जवळ येते, “ रूपे हे बोलू नकोस कोणाला. राहुल आत्ता माझ्याशी छान बोलतात. आमच्यात नक्की सगळं छान होईल.”
“ठीक आहे जशी तुझी मर्जी. तुला कधी काही लागलं तर ही नणंद हक्काने तुझ्या बाजूला असणार हे लक्षात ठेव.”
“हो ग बाई.. नक्की”
असं म्हणून सायली निघून जाते आणि रुपाली मनात म्हणते वाह! काय पण प्रेम आहे हे..
काही महिन्यांनी राहुलची परीक्षा होते. निकाल थोड्याच दिवसात लागणार असतात तर सायलीच्या माहेरचे गोळे कुटुंबाला जेवायला बोलावतात. सायली खूप उत्साहात असते. आज किती दिवसांनी माहेरी जाणार असते ती. 
“राहुल चला आपण निघायचं आहे ना..”
“अगं तुम्ही जा. मी घरीच थांबतो मला कंटाळा आला आहे खूप. इतक्या दिवसांच्या अभ्यासानंतर मला आता विश्रांती हवी आहे.”
सायली हिरमुसते. “अहो माझ्या आई बाबांना मी भेटले नाही खूप दिवसात आणि तुम्ही सुद्धा. त्यांना काय वाटत असेल.आता तुमचा अभ्यास ही नाही म्हणून त्यांनी जेवायला बोलावलं ना. तुम्हाला यावं लागेल मला काही माहीत नाही.”
“बरं..” राहुल तयार व्हायला जातो. सायली मनातून कधीच माहेरी पोचलेली असते..

क्रमशः

स्वराली सौरभ कर्वे

 

Circle Image

Swarali Saurabh Karve

Business

लिखाणाचा प्रयत्न करत राहणे हे आपल्या हातात आहे.