राहुल आता सायली सोबत मैत्री करतो. दुसऱ्या दिवशी सायली लावकर उठते आणि स्वयंपाकघरात जाते.. मंगला सुद्धा तिथे आलेली असते.
“आई, काय करायचं आहे आज?मी नाश्ता करू का?”
“हो कर की.. काय करशील?”
“राहुलना काय आवडतं? म्हणजे तसं करेन..”
“वाह.. गाडी एकदम जोरात धावत आहे..”
“हो.. मैत्री झाली आहे ना आता आमची..”
“हो का… चांगलं आहे.. सायली तुझ्यासारखी सून मिळाली मला खूप नशीबवान आहे मी.. नाहीतर एखाद्या मुलीने नवरा लक्ष देत नाही म्हणून गप्प राहणं पसंत केलं असतं किंवा मग फाडफाड बोलून मोकळी झाली असती.. अर्थात अश्या वेळेस मुलीचं काही चुकत नाही ग.. पण मी काय करू राहुलच्या बाबतीत??”
“आई काही नाही.. मला कळलं आहे काय झालंय.. वाईट वाटून घेऊ नका पण त्यांना लग्नं करायचं नव्हतं इतक्यात.. ते तुमच्या शब्दामुळे तयार झाले..”
“हो मला माहित आहे पण आम्ही पालक आहोत.. वेळेत सगळं करायला सांगणं, भल्याचं सांगणं आमचं कर्तव्य आहे.. मुळात लाजाळूच आमचा मुलगा.. कधीही लग्नाचा विषय काढला असता तर ते पुढेच गेलं असतं.. माझा निर्णय मी देऊन टाकला त्या वेळेस.. थोडी जबरदस्ती झाली पण इलाज नाही.. माझ्यामुळे मात्र तुला हे झेलायला लागत आहे..”
“आई… मी तुम्हाला काही बोलले का? उलट तुम्ही मला मार्ग दाखवला कसं वागायचं ते.. अगदी दुसरा कुठला मुलगा नशिबी आला असता तरी काही ना काही करावच लागलं असतं.. राहुल अडजस्ट करत आहेत, तुम्ही पण आणि मी सुद्धा.. आता तुम्ही बघा मी आमचं नातं किती घट्ट करते ते.”
मंगलाला कौतुक वाटतं..
“आई सांगा काय करू नाश्त्याला??”
“उपमा कर.. खूप आवडतो त्याला..”
सायली उपमा करते.. दोघी गप्पा मारत काम आवरून घेतात. इकडे राहुल कधीच उठलेला असतो.. सायली त्याला नाश्त्यासाठी बोलवायला जाते तेव्हा तो शीर्षासन करत असतो. सायली सरळ आत येताच तिला पाहून गडबडतो..
“अरे देवा.. उलटे झालात का??” असं म्हणून दोन्ही हात कमरेवर ठेऊन त्याचा समोर उभी राहते..
“उलटे झालात का?? ह्याला शीर्षासन म्हणतात..”
“हो माहीत आहे. तेवढं कळतं मला.. खूप छान जमतं तुम्हाला..”
“हो.. माझा सराव आहे. कोणीच मला ह्या आसनातून हलवू शकत नाही.”
“हो का.. बरं.. नाश्ता तयार आहे या बाहेर..”
“हमम्म््म.” असं बोलून सायली जाताना राहुलच्या पायाला गुदगुल्या करून जाते.. त्यामुळे राहुल धपकन खाली पडतो. सायली हसत बाहेर निघून जाते.. राहुल स्वतःला सावरतो आणि सायलीच्या खट्याळपणा मुळे थोडं हसायला येतं.
बाहेर नाश्त्याला सगळे एकत्र बसतात.. राहुल आल्यावर सायली लगेच त्याची डिश वाढते.. एक घास खाल्ल्यावर राहुल म्हणतो, “आई अप्रतिम झाला आहे उपमा.. वेगळीच चव आली आहे आज.. उम्म्म मस्त..”
“हो का पण मी नाही केला उपमा..”
“मग? रुपाली तू?? इतका चांगला स्वयंपाक कधी शिकलीस?”
“अे दाद्या.. मी चांगलंच करते सगळं पण उपमा मी नाही वाहिनी ने केला आहे खास तुझ्यासाठी.. आम्ही काय बिचारे खातोय तुझ्या आवडीचा पदार्थ..”
तेवढ्यात राहुल बोलतो,” ए कार्टे, खात्येस ना बकाबक तिने केलेला उपमा..”
“अरे वाह.. बायकोची बाजू चक्क?? काय मिसळलं आहे वाहिनी ह्यात? आज चक्क बायकोची बाजू?”
सायली बोलते, “ रुपाली, अगं तू खा की गपचुप.. त्यांना ही खाऊ दे शांतपणे..”
“हे देवा. हे काय ऐकत्ये मी.. दोघं एकमेकांची बाजू घेतायत आयात.. वहिनी पार्टी बदललीस ग तू.. किती विश्वास होता तुझ्यावर..” डोळ्यातलं पाणी पुसायचे नाटक करून रुपाली बोलते.
राहुल आणि सायली एकमेकांकडे बघतात आणि जोरात हसायला लागतात तेव्हा रूपालीचा चेहरा बघण्यासारखा होतो.. मंगला आणि योगेश आपल्या मुलांची गाडी मार्गावर येते हे पाहून समाधानी होते..
…………………………………………………………………………….
नाश्ता करून झाल्यावर सगळे आवरून आपापल्या कामाला निघून जातात. सायली आणि मंगला स्वयंपाक करून नुकत्याच बाहेर येऊन बसतात. मंगला जरा बागकाम करायला जाते असं सांगून जाते.. सायली जरा थकल्यासारखे वाटतंय म्हणून खोलीत आराम करायला जाते.
राहुल बाहेर गाडी दुरुस्त करायला गेलेला असतो. तो परत येतो तेव्हा मंगला बागेत रमलेली दिसते. सायली कुठेच दिसत नाही म्हणून मग घरात जातो. हात पाय धुवून खोलीत जाऊन बघतो तर सायली झोपलेली असते.. हळूच आत येऊन तो बेड च्या दुसऱ्या बाजूला जातो. कपाट उघडून त्यातलं पुस्तक काढतो आणि परत निघतो. त्याला काय वाटतं, तो परत येतो आणि सायली कडे बघत बसतो.
' किती निरागसपणे झोपली आहे.. माझ्या वागण्याचं त्रास होत असेल ना हिला.. तिचं घर,आई बाबा, तिची माणसं सगळं सोडून आली इथे नवीन घरात कायमसाठी माझ्या भरवशावर आणि मी??? मी तिला चुकीचं वागवतो का? काय चाललं असेल तिच्या मनात? रुपाली सुद्धा एक दिवस अशीच जाईल सासरी. तिच्या नवऱ्याने असं केलं तर?? नाही!! मी असं होऊन देईन का तिच्या बाबतीत? चांगला खडसावेन त्याला .. सायलिचे तीन तीन भाऊ आहेत. ते सुध्दा असं करू शकतात..पण सायलिने एक सुद्धा तक्रार अजून केली नाही. ठरवलं तर ती करू शकते..' त्याचा विचारात गुंग होऊन तो शून्यात नजर हरवल्याप्रमाणे सायलीकडे एकटक बघत असतो.. सायली जागी होऊन, उठून त्याचाकडे बघते तरी त्याला पत्ता नसतो..
सायली एक टिचकी वाजवते. “ काय झालं?? कसला विचार करताय माझ्याकडे बघून?” तेव्हा राहुलला भान येतं. आपण इतका वेळ मुर्खासारखे सायलिकडे बघत बसलो आणि तिने आपल्याला पाहिलं..
“काही नाही. पुस्तक घ्यायला आलो होतो आणि पुस्तकाबद्दल आठवत होतो काही गोष्टी. तेव्हा नेमकी तंद्री लागली माझी.. आहे मी बाहेर आहे.. तू झोप..” असं म्हणून गडबडीत राहुल निघायला बघतो.
“थांबा की जरा.. मी नुसती पडले होते. बसा ना इकडेच मलाही सांगा काय वाचताय..”
“मी वाचत काही नाही.. ही माझी अभ्यासाची पुस्तकं आहेत..”
“ अभ्यास आणि तुम्ही??”
“ हो.. मी नोकरी करतोय आता पण मला सिव्हिल सर्व्हिस मधे रस आहे. त्याची तयारी चालू आहे..”
“ खूपच छान.. तुम्ही नोकरी सोडून देणार मग?”
“हो.. दोन्ही एकत्र कसं करता येईल? म्हणून मी लग्नाला तयार नव्हतो. दोन वेळा मी पास होता होता राहिलो. आता पूर्ण तयारी करून मला परीक्षा द्यायची आहे. पण हे लग्नाचं आलं मधेच.. आई बाबांना माझी नोकरी महत्त्वाची आहे त्यामुळे हा घाट घातला त्यांनी. मी छान मनासारखं सेटल होईपर्यंत मला लग्नं करायचं नव्हतं. बायकोचे हट्ट पुरवा, फिरायला जा, पूजा, नातेवाईक किती वेळ जातो माझा आणि त्या आलेल्या मुलीला काय सांगू मी नोकरी सोडणार!!!! वाह म्हणजे एकूणच अंधार……”
“ पण मी कुठे असा हट्ट केला अजून??” सायली गोड हसून राहुलकडे बघते.. राहुल ही तिच्याकडे बघतो..
“असं काही नाहीये राहुल.. तुम्ही गैरसमज करून घेतला आहे. आई बाबा तुमच्या कुठल्याही गोष्टीच्या आड नाहीत. त्यांना फक्त सगळं वेळेत झालेलं हवं होतं.. बाकी त्यांना तुमच्या सगळ्या गोष्टींचं कौतुक असणारच ना? ते तुम्हाला बोलले का की नोकरी सोडू नकोस किंवा स्पर्धा परीक्षा देऊ नकोस? माझं म्हणाल तर माझी काही फार स्वप्नं नाहीत पण तुमची स्वप्नं माझी होऊ शकतात…”
तिच्या ह्या ठाम बोलण्यामुळे राहुल चमकतो.. ही मुलगी आपल्यासाठी इतकं काही करू शकते.. कसं जमतं ह्यांना.. राहुलला सायलिचा फार आधार वाटतो.. चाफ्याशी मन मोकळं करणाऱ्या राहुलला आता हक्काचा चाफा साद घालत असतो..
क्रमशः
© स्वराली सौरभ कर्वे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा