एक ओंजळ प्रेम भाग ३

Love story after marriage

सायली आत येते आणि स्वयंपाकघरात जाते. पाठोपाठ राहुल येतो. हात पाय धुवून हाक मारतो..
“आई जेवायला वाढतेस ना?? भूक लागली आहे जोरात..”
तेवढ्यात समोरून सायली येते..
“आजपासून आईला नाही मला सांगायचं.. मी तुमची बायको आहे आणि तुमचं सगळं मीच बघणार. उगाच आई आई करत त्यांना त्रास द्यायचा नाही. त्या खूप काम करतात दिवसभर..” आणि आत निघून जाते..
राहुल अवाक् होऊन पाहत राहतो.. 
मंगला सगळं ऐकत असते तिच्या खोलीच्या दारातून.. पुढे येते आणि राहुल कडे बघते.
“काय खरं नाही तुझं आता.. ही तर कडकलक्ष्मी निघाली..” आणि हसून स्वयंपाकघरात जाते..
राहुल पुरता गोंधळलेला असतो. सायली आतमध्ये तोंड दाबून हसत असते तेवढ्यात मंगला येते.
“काय झालं ग हसायला??”
“ नाही काही नाही.. उगाच..”
“ऐकलं मी सगळं.. असं बोलतात का नवऱ्याला? माझा मुलगा आहे तो लाडाचा..”
सायली थोडी वरमते की सासूबाईंना बहुतेक आवडलं नाही पण मंगलाच्या स्वभावाची पुरेपूर माहिती होती..
“असू दे.. तुम्ही पण आता घरात काम करत बसायचं नाही.. काय हवं नको ते मला सांगायचं.. कळलं??”
सासुसून हसतात.. राहुल हळूच आत काय चाललंय त्याचा अंदाज घेतो.. तेवढ्यात सायली पोळ्यांचा डब्बा घेऊन बाहेर येते आणि दोघही एकमेकाला आपटतात..
“आई ग.. बघून चाल जरा..” 
“का? तुम्हाला नाही बघता येत का? इथे लपून पाहिलं की असच होणार.”
“मी काही लपून पाहत नव्हतो. मला भूक लागली आहे म्हंटल जेवायला मिळतंय की नाही का मीच घेऊन येतो म्हणून आत येत होतो..”
“अच्छा.. मग त्या बाजूने समोरून का नाही आलात??”
राहुलला काही सुचत नाही.. “ आई जेवायला वाढ मला भूक लागली आहे..”
“तुम्हाला सांगितलं ना एकदा.. जाऊन बसा तिथे मी जेवण घेऊनच येते.. गप्प बसा जरा..”
राहुल बिचारा काही न बोलता गुपचूप चरफडत टेबल वर जाऊन बसतो.. सायली आणि मंगला सगळं बाहेर मांडतात..
“सायली बस जेवायला.. तिघही जेऊन घेऊ मग आपण मोकळे..”
“आई तुम्ही बसा मी वाढते.. रुपाली आणि बाबा येतील ना तेव्हा बसेन..”
“नाही.. कोणी वाढायला उगाच थांबायचं नाही.. चार माणसं असतात तेव्हा ठीक आहे घरातल्या घरात तसं आपण करत नाही.. चल बस..”
तिघेही जेवायला बसतात.. 
“काय मग राहुल?? फिरायला जायचं काही ठरवलं आहे का नाही??”
“फिरायला कशाला?? नको.. माझं ऑफिस सुरू होईल 5-6 दिवसात. फिरायला जायलाच पाहिजे का? असं कुठे लिहून नाही ठेवलं..”
“अरे पण सायलीचा विचार कर जरा.. तिची काही स्वप्नं असतील ना??”
राहुल जरा गप्प होतो.. 
“नको आई.. त्यांना नसेल जायचं तर राहू दे उगाच अट्टाहास कशाला? मला काही हौस नाही..”
“ अगं असं कसं? बरं मग तू माहेरी जाऊन ये ४-५ दिवस.. तेवढंच तुला बरं वाटेल..”
“नको.. तिकडे विचारतील ना मला की फिरायला का गेला नाहीत? मला काही उत्तर देता येणार नाही.”
“बरं.. बघ तू काय करायचं ते..” 
इतकं बोलून होत नाही तोच रुपाली आणि योगेश पाठोपाठ घरात येतात..
“आई मला खूप भूक लागली आहे.. मी हात पाय धुवून येते लगेच मला जेवायला वाढ..”
“आजपासून मला नाही वहिनीला सांगायचं.. असं तिनेच सांगितल आहे मला.”
“हो का? बरं.. वहिनी मला जेवायला वाढ ग आलेच मी..”
“काय सुनबाई कशा आहात? मला तुमच्याशी बोलायला वेळ नाही मिळाला सगळ्या गडबडीत.. आमचा राहुल लक्ष देतोय ना?? का काही अडचण??” योगेश सायलीला बोलतो.
सायली पहिल्यांदा सासऱ्यांशी बोलत असते पण सासुचा कानमंत्र घुमत असतो ना डोक्यात..
“मी छान आहे बाबा..अडचणी आहेत पण ठोकून सरळ केल्या की नीट होतील” असं म्हणून सरळ राहुलकडे बघते आणि आपलं ताट ठेवायला उठून स्वयंपाकघरात जाते.
योगेश मंगला ला खुणेनेच काय असं विचारतो? मंगला त्याला नंतर सांगते अशी खूण करते.. राहुल मनात बोलत असतो,' किती बोलते ही.. वाटलं होतं अबोल आहे.. पण जास्तच करते आता.. असं नाही चालणार माझ्या घरात.. दोन दिवस नाही झाले तर आई, रुपाली, बाबा सगळ्यांना खिशात घालत आहे. सगळे तिच्याभोवती असतात.. रुपाली तर आता मला विसरत चालली आहे.. दोन दिवस झाले बोलली पण नाही नीट..”
“राहुल.. अरे जेव.. तसाच घास हातात आहे. कसला विचार चालू आहे?” योगेश त्याला हलवून बोलतो.. 
“काही नाही बाबा..” तेवढ्यात रुपाली येते..“काही नाही बाबा त्याला एकांत हवा असेल आता.. दुसरं काय? फिरायला जायचं प्लॅनिंग चालू असेल डोक्यात..”
आता मात्र राहुल जोरात उठतो.. “काय चाललं आहे फिरणं, एकांत.. एकदा सांगितलं ना नाही जायचं म सारखं वेगवेगळ्या वेळेला प्रत्येकजण का बोलतोय असं?” आणि तसाच निघून जातो खोलीत..
सगळे एकमेकांकडे बघतात..
“तुला गरज होती का हे आत्ताच बोलायची?? मी त्याला मगाशीच विचारलं आणि आता परत तू.. त्याला जायचं नाही मग काय सायली म्हणाली नकोच..”
“काय ग वाहिनी तू अशी दबून नको राहुस.. तुझा हक्क आहे तो तू मिळवलाच पाहिजे..”
सायली बोलते, “रुपाली अगं मी नवीन आहे इथे. तुम्ही मला सांभाळून घेत आहात पण राहुल च काय बिनसलं आहे ते मला माहिती आहे. त्याला असं प्रत्येक ठिकाणी बोलून, माझा हक्क मागून मला तो मिळणार नाही. मला बरोबर कळलं आहे त्याचं मन कसं वळवायच.. थोडे दिवसच पुरतील मला तेव्हाच आम्ही फिरायला जाऊ..”
“वहिनी तुला नक्की खात्री आहे ना? बघ म्हणजे नाहीतर मी सरळ करते त्याला.. लहानपणापासून करत आले आहे..”
तेवढ्यात मंगला बोलते, “ रुपाली तू त्यांचा मध्ये आता पडू नकोस.. बायकोला बरोबर कळतं नवऱ्याला कसं अंजारून गोंजारून किंवा वाटलं तर एक फटका मारून सरळ करायचं..” आणि हळूच योगेश कडे बघते. योगेश ला ठसका लागतो.. सायली त्याला पाणी देते..
“काय झालं बाबा? ठसका का लागला?? काही तिखट लागलं का??”
“नाही.. काहीतरी आठवलं. पण एवढं नक्की की तुझ्या सासूबाईंनी चांगला कानमंत्र तुला दिला आहे आणि तुला तो बरोबर कळला आहे..” हळूच तो मंगला कडे बघतो.. ती हसत असते..
“म्हणजे काय? मला कोणी काही सांगेल का?” रुपाली मोठ्याने काहीच न कळल्यामुळे बोलते.. 
“नणंद बाई, तुमची वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला कानमंत्र देईन बरं का.. आता जेवा..”
असं म्हणत जेवणं होतात.. योगेश परत कमला निघून जातो आणि रुपाली तिच्या खोलीत जाते.. मंगला सायलीला मदत करत असते पण सायली तिला जबरदस्ती आराम करायला पाठवते.. आवरून झाल्यावर सायली खोलीत जाते तर राहुल पुस्तक वाचत बेड वर आरामात बसलेला असतो.. ती आली आहे हे त्याला कळत सुद्धा नाही इतका गुंग असतो..
सायली हळूच येऊन बेड वर बसते..
“वाह.. वाचायची आवड आहे वाटतं तुम्हाला..”
राहुल एकदम चमकुन पाहतो. सायलीला पाहताच उठून उभा राहतो.. 
“ अहो बसा.. मी काही खाणार नाही आहे तुम्हाला.. इतकी वाईट आहे का मी की तुम्ही असे घाबरुन उठला?”
“नाही.. मला वाचायचं आहे.. मी बाहेर बसतो..” असं म्हणून राहुल दाराकडे जायला लागतो..
“थांबा. तुमचं बोलणं मी ऐकलं आहे.. झाडं बोलत नसली तरी ते भावना पोहोचवतात एकमेकांना.. तुम्हाला लग्न करायचं नव्हतं पण झालं ना आता?”
राहुल चकित होतो की हिने कधी ऐकलं बोलणं? 
“तू काय करत होतीस तिथे? चोरुन ऐकत होतीस का?”
“नाही.. मी तुम्हाला बोलवायला आले होते पण तुम्ही गप्पा मारत होता झाडाशी.. आता तुम्ही इतकं मोठ्याने बोलत होता तर माझे कान ऐकणार ना? तुम्हाला लग्न करायचं नव्हतं पण आई बाबांपुढे काही चाललं नाही.. मान्य.. पण आता झालं आहे त्याला काय करणार ना दोघं.. पण तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका.. मी काही तुमच्यावर माझ्या अपेक्षा लादणार नाही. तुम्ही मनातून खूप चांगले आहात मला त्रास नको म्हणून माझ्याशी तुटक वागत आहात.. पण अश्याने मला त्रास होतोय , कळतच नाही काय चाललंय.. आधी थोडा राग आला होता पण काल तुम्ही खाली झोपलात आणि मला बेड वर जागा ठेवली तेव्हाच तुम्ही माझा विचार करायला सुरुवात केली..”
राहुल विचारात पडतो.. मी खरंच हिचा विचार केला.. तेवढयात सायली पुढे येते..
“ बायको नाही पण मैत्रीण तर करून घ्या मला.. आपल्याला एकाच घरात, एकाच खोलीत राहायचं आहे.  सोप्पं जाईल आपल्याला..” असं म्हणून ती हात पुढे करते.
राहुल मागे पुढे करत तिच्याशी मैत्रीचा हात पुढे करतो.. सायली राहुलच्या पहिल्या स्पर्शाने मोहरुन जाते….
क्रमशः

© स्वराली सौरभ कर्वे.

🎭 Series Post

View all