Oct 29, 2020
स्पर्धा

एक ओंजळ प्रेम भाग १

Read Later
एक ओंजळ प्रेम भाग १

लग्न आहे लग्न… आज काकडे आणि गोळे ह्यांचा कडे सनई चौघडे वाजत आहेत बरं का?? अहो आमच्या सायली आणि राहुल च लग्न आहे. लग्नाला यायचं बरं का…
 काकडे परिवार विशेष उत्साहात होता.. त्यांचा घरातील एकुलत्या एक मुलीचं लग्न होतं. सायली म्हणजे त्यांचा घरातील शेंडेफळ.. चुलत सख्खे मिळून ३ भाऊ आणि ही एकटी.. बरं बाबा आणि काका ही दोघेच त्यांनाही बहीण नाही मग काय सायली लाडोबा घरचा. लग्न अगदी थाटामाटात करायचं असा चंगच बांधला होता.. सायलीने भरपूर खरेदी केली होती.. राजकन्येला लाजवेल अशी देखणी पोर नटून टायर झाली. तिच्या मैत्रिणी तिला काय हवं नको ते हक्काने बघत होत्या. राहुलचं स्थळ काका काकूने लाखात एक म्हणतात ना तसच भरपूर अभ्यास करून आणलं होतं.. हसायला येईल अभ्यास काय? पण हो लाडक्या पुतणीला असं कोणाच्याही हातात कसं सोपवणार मग अभ्यासच हवा ना! आई-बाबा नातेवाईक मंडळींमध्ये व्यस्त होते. भाऊराया आपल्या बहिणीच्या नवीन नात्यांना काही कमी पडू नये ह्यासाठी झटत होते.. असं एकंदर सगळ्याच लग्नतला थाट इथेही होत होता.
राहुलला सायलीच्या आईने म्हणजेच रमा ने ओवाळून आत घेतलं.. दिलीप रावांनी जावयाला स्टेज पर्यंत आणलं.. लोकं मंगलाष्टक ऐकायला सरसावून बसली.. नणंद बाई म्हणजे रुपाली जोरात होत्या.. दादाचं लग्न म्हणजे बहिणींचं तयार होणं विचारू नका! स्वतःच्या लग्नात पण एवढं तयार होत नसतील.. राहुलचे आई-बाबा, मंगला आणि योगेश सुनेचे स्वागत करायला सज्ज होते. मुलाकडचे म्हणून काहीतरी स्पेशल हवं, मानपान हवं अशी कुठलीही अपेक्षा नव्हती. चौकोनी कुटुंब एकदम साधं सरळमार्गी, मिळेल त्यात समाधानी पण कमालीचं उत्साही होतं..
शुभमंगल सावधान| 
आली लग्नघटी समीप नवरा घेऊनी यावा घरा।……………….
मंगलाषटके जोरात झाली.. टाळ्यांच्या गजरात सायली, सौ. सायली राहुल गोळे झाली.. लग्नाचे विधी, जेवण आटपून वरात निघाली सुद्धा…
माय पित्याचा सावलीत ला काळ सुखाचा ओसरला.. लेक चालली सासरला…
लाडाच्या लेकीला निरोप देताना काय गदगदून आलं होतं.. अखेर वरात वाजत गाजत निघाली. सायली थोडीशी अवघडून गेली होती. आता नवीन घर, नवीन जबाबदारी. तिला खूप रडू येत होतं. गाडीत बाजूला बसलेली रुपाली तिला धीर देत होती.. 
“वहिनी काळजी करू नकोस.. आम्ही आहोत ना.. आणि तुझं माहेर तुटलं नाही की उलट अजून एक घर मिळालं तुला तुझ्या हक्काचं.. असं आई म्हणते मी नाही..” रुपाली तिला हसवायचे प्रयत्न करते पण सायली नुसती रडत असते..
एकदा मंडळी घराजवळ पोहोचतात.. राहुलचं घर कौलारू आणि ऐसपैस होता. तीन वेगळ्या खोल्या, स्वयंपाकघर, माझघर, ओटी आणि पुढे छान बाग.. सायली घर पहिल्यांदाच पहात होती.. तिचं रडणं जरा वेळ का होईना थांबलं होतं. 
“सायली आता हे तुझं घर आहे.. इथे तू मला रुपाली सारखीच आहेस त्यामुळे मनात काही आलं तरी बिनधास्त सांगत जा.. रडायचं नाही आता..” मंगला साधी असली तरी खमकी होती, प्रत्येक कामात चोख होती. येणारी सून पण माझ्यासारखी खंबीर असावी असा तिचा मानस असायचा.. पण ह्या लेकीच्या डोळ्यातलं पाणी पाहून ती सुद्धा विरघळली होती.. तिच्या बोलण्यामुळे सायली जरा सावरली. गृहप्रवेश झाला. सगळे माझघरात आरामात बसले.
“जेवायला खिचडी करते.. पोट फारच भरलं आहे व्याह्यांचा आग्रहामुळे..चल रुपाली आत ये. सायली तू आराम कर खिचडी झाली की मी बोलावते तुम्हाला.. राहुल जा तिला खोली दाखव. दोघंही आवरून घ्या..”
त्या दोघी स्वयंपाकघरात निघून जातात.. जाताना रुपाली हळूच राहुलला इशारा करते की माठ्या जा लवकर तिला खोली दाखव.  तुझ्यासाठीच आम्ही मुद्दाम आत जातोय..
राहुलला कळत च नव्हतं काय करायचं.. गाडीत पण ही रडत होती आता रडली तर काय करायचं??..
योगेश ही त्यांचा खोलीत निघून जातात. आता सायली आणि राहुल दोघच असतात.. थोडा वेळ जातो पण कोणीच काही बोलत नव्हते. 
“रुपाली बाहेर डोकावून ये ग. आपलं लाजळूच झाड तिथेच आहे की गेलं तिला घेऊन आत..” 
“हो आई आलेच.” रुपाली पाहते तर दोघंही तिथेच बसलेले असतात.. ती जवळ जवळ डोक्याला हात मारते आणि मंगलाला सांगते. 
“ह्यांचं काही खरं नाही.. थांब मीच जाते आता.” असं म्हणून मंगला बाहेर जाते. रखुमाई सारखे दोन्ही हात कमरेवर घेऊन राहुलच्या पुढ्यात उभी राहते. लगेच राहुल सायलीला बोलतो, “सायली या.. मी तुम्हाला खोली दाखवतो..” सायलीला थोडं हसूच येतं..
“सायली हे असं वागायला शिक बाई नाहीतर काही खरं नाही इथे आपलं.. सगळा लाजरा कारभार नुसता..”
राहुल कमालीचा लाजाळू असतो. रुपाली सोडून त्याने कधीच कुठल्या मुलीशी स्वतःहून बोलायचा प्रयत्न केला नसतो. त्यामुळे लग्न हा विषय जरा त्याला पचायला जडच जाणार असतो.. 
राहुल आणि सायली एकमेकांना लग्नाआधी भेटलेले नसतात त्यामुळे त्यांच्यात काहीच संवाद नसतो.. सायली खूप बडबडी तर राहुल लाजाळू.. अश्या दोन शेंड्यांची गाठ घरच्यांनी बांधून दिलेली असते.
राहुल आणि सायली त्यांचा खोलीत येतात.. सायलीला खोली खूपच आवडते..
“खूप छान आहे आपली खोली.” सायली राहुलकडे पाहून बोलते.
“हमम. माझी होती आधी..” एवढंच बोलून राहुल गप्प बसतो.. .
“ हो पण आता आपली आहे ना.. मी कपडे कुठे ठेवायचे? आणि मी एक दोन फ्रेम आणल्या आहेत माझ्या त्या कुठे ठेऊ..” 
“ आईला विचार..” इतकंच बोलून तो त्याचे कपडे घेऊन बाहेर निघून जातो..
आता सायली एकटीच खोलीत असते.. तिला राहुलच्या अश्या बोलण्याच वाईट वाटतं. पण बिचारी ती गुपचूप तिचं आवरायला घेते..

क्रमशः

© स्वराली सौरभ कर्वे

​​​​​

Circle Image

Swarali Saurabh Karve

Business

लिखाणाचा प्रयत्न करत राहणे हे आपल्या हातात आहे.