एक निर्णय भाग ५

आई निघाली होती, लेकीच्या घरी... माहेरपणाला नाही तर नेहमीसाठी, लेकीची लेक बनून

एक निर्णय भाग ५

-©® शुभांगी मस्के...

अष्टपैलू लेखक करंडक स्पर्धा

पहिली फेरी : कथा मालिका

स्टोअर रूममध्ये एका कोपऱ्यात एक बेड टाकून तिथे, चित्राताईंची रवानगी झाली होती. अडगळीच्या खोलीत, अडगळ म्हणूनच जणु चित्राताईंची गिनती होत होती.


संक्रांतीच्या हळदी कुंकूच्या निमित्ताने, दिव्याच्या मैत्रिणी घरी आल्या.. "गपचुप झोपून राहा एका जागी, खोलीत, थंडीत बाहेर येऊन, माझी शोभा करू नका", चित्रताईंना दिव्याने निक्षून सांगितलं.

त्या दिवसापासून, आपल्या घरातच आपण उपेक्षित असल्याची भावना चित्राताईंना खोल आतआत पोखरत चालली होती.

चित्राताईची तब्बेत हल्ली बरी नसायची. आई झोपली का आहे? जेवली असेल की नसेल? तब्बेत बरी आहे की नाही? आई आहे की नाही?? कुणालाच काही पडलेलं नसायचं.

सून तर सून पण दीपकच वागणं ही काही वेगळं नव्हतं. आतल्या आत कुढत चालल्या होत्या बिचाऱ्या चित्राताई.. रूपाच्या मुलीचं लग्न ठरल्या पासुन तर घरात नुसते वाद विवाद आणि भांडण सुरू होते.

आमंत्रण करण्याच्या निमित्ताने आणि जुन्या एका मैत्रिणीच्या घरी, लेकीचं केळवण त्यानिमित्ताने रूपा लेकीला घेऊन, चार दिवस माहेरी आली होती..

आई एकटीच घरात, अंधाऱ्या खोलीत झोपली होती. आल्या आल्या रूपाने, तुमची खिडकी उघडली..

दिव्या ऑफिसमधून आली. घरी अचानक रूपाला पाहून दिव्याला धक्काचं बसला होता... रूपाने मानाने दिव्याच्या हाती पत्रिका आणि निमंत्रणाच्या अक्षता हातावर ठेवल्या. आणि आग्रहाने लग्नाला येण्याचं निमंत्रण दिलं.

"एक दोन आहात का ताई"," पाच पाच बहिणी आहात".. आमच्याकडून फार काही अपेक्षा ठेऊ नका म्हणजे झालं" जसं जमेल तसं करू हो, आवडीने आम्ही", लग्नाची पत्रिका वाचता वाचता दिव्या बोलली.

माहेर सासर, फरक नाही करता यायचा मला.. दोन्ही सांभाळावं लागत.. माझ्या मावस बहिनीच्या मुलीचं ही लग्न आहे. किती त्या खरिद्या.. दिव्या मोठ्या ठसक्यात बोलत होती..

"अगं, तुला कोण काय घे म्हणतयं, चार शब्द बोलायला तर मंडपात येशील की नाही". रुपा बोलली..

"हो तर, पण आज मी बिझी जरा". वजन वाढतयं जिमला जातेयं हल्ली. तिथल्याच मैत्रिणीचा वाढदिवस आहे आज, पार्टीला जायचयं.

ऑफिसमधून आल्या आल्या, दिव्या उभ्या उभ्या चटकमटक वनपिस घालून, धावपळ करत पार्टीला गेली सुद्धा...

आज नेमक्या, स्वयंपाकवाल्या मावशी आल्या नव्हत्या.. त्याची काहीच दखल तिने घेतली नव्हती. पोरं डॉमिनोज पिझ्झा खाऊन घेतील, तुम्ही तुमचं बघून घ्या ना प्लीज.. की ऑर्डर करू काही तरी... दिव्या जाता जाता सांगून गेली होती.

खिचडी बेसनाचा साधासा बेत, रूपाच्या लेकीने केला. अनेक वर्षानंतर, प्रेमाने घरच्या चवीच तिखट ताखट, खिचडी बेसन, चार घास खाऊन, आई तृप्त झाल्यासारखी रूपाला जाणवली..

"आई, काय झालं गं!" तू नाराज दिसतेयस, रुपाने आईला विचारलं.. आईने डबडबलेल्या डोळ्यातून अश्रूंना वाट मोकळी करून दिली.. काहीच बोलायची गरज पडली नव्हती.

रूपाने, आईच्या केसांना तेल लावून दिलं. केस विंचरून दिले. आईच्या ब्लाऊजच्या निसटलेल्या हूक लावल्या. पलांगावरची चादर कित्येक दिवस बदललेली नसल्याचं दिसत होत, ती बदलून दुसरी स्वच्छ चादर झटकुन टाकून दिली.

चित्राताईंच्या अवती भोवती.. लेक दोन दिवस सतत घुटमळत होती. राहून राहून चित्राताईंच्या डोळ्यात अश्रू दाटून यायचे. काय झालं गं? रूपाने विचारलं तर.. मानेनेच काही नाही म्हणत मान हलवत आणि.. डोळ्यातले अश्रू गालावर ओघळत...

"पोरी, पोरींची मायाच वेगळी".. पण काय करणार, तुम्हाला पण तुमचे व्याप असतातच ना..

वय वाढतं.. जोडीदार कसा का असेना पण सोबत आहे, ही भावना ही सुखावून जात असते. आणि एक दिवस, जोडीदार दूरच्या प्रवासाला निघून जातो एकटाच.. साथ सुटते आणि जिवंत माणसाच्या वाट्याला मात्र, जीवघेणं एकटेपण येतं.

मरणारा मरतो.. पण मागे उरलेला जिवंत आत्मा. प्रत्येक क्षण घुटत घुटतं मरतो. नश्वर देह घरातली अडगळ होऊन जातो. मरणाची वाट बघत पडला राहतो एका अडगळीच्या खोलीत..

अडगळ कशी, एका जागी दुर्लक्षित दिवसेंदिवस पडून राहते.. आणि एक दिवस घरातून बाहेर फेकली जाते. अडगमाळीला कोनीच वाली नसतो.

फायदा होतोय तोवर वापरायची.. आणि नंतर घरातून फेकून द्यायची. तीच अडगळ, कधीकाळी कुणाच्या कामी आली होती हे मात्र कुणाच्या लक्षात येत नाही... "आई बोलत होती.

आईने आपल्या कानातल्या कुड्या काढून रूपाच्या हाती दिल्या... "रुपा, बाळा या कुड्या घे, माहेरचा आहेर समज" बोलताना चित्राताईंच्या डोळ्याला धारा लागल्या..

"ये आजी.. काय गं हे!" काहीच नको मला.. तू येणार आहेस लग्नाला. तेच माझं सर्वात मोठं गिफ्ट असणार बघं.. नातीने आजीला दोन्ही हातांनी कवटाळून घेतलं.

"कसलं गं माहेर आणि कसला माहेरचा आहेर".. हक्क सोड कागदावर लेकींची सही घ्यायची वेळ आली, त्याच दिवशी, माहेर खऱ्या अर्थाने तुटलं होत आमचं...

नकोच काही आम्हाला. आज तुझ्या या परिस्थितीला,खऱ्या अर्थाने आम्ही जबाबदार आहोत, बोलता बोलता रूपाचे शब्दच भिजले होते.. डोळ्यातून गालावर ओघळणारे अश्रू तिने बोलता बोलता पुसले...

लग्नाच्या पत्रिका वाटून झाल्या होत्या.. आईला आवडते ते सगळं करवून खाऊ घातलं होतं. चार दिवस राहून रुपा जायला निघाली.

रूपाने, दिव्यालाच काय पण दीपकला न सांगता, आईची बॅग भरली... आई चलतेयस ना गं... दारात ऑटो उभा होता.

"बरं केलंत ताई, तुम्ही आईला घेऊन जाताय", आम्ही पुढचे पंधरा दिवस बाहेर फिरायला जातोय.. आईंचा प्रश्नच मिटला..

"माझ्या घरी लग्न आहे म्हणून नाही गं दिव्या", नेहमीसाठी घेऊन जातेय मी आज, आईला. तुमच्या घरातली अडगळ जरा कमी करतेय..

शांत, साधी चुकून ही कधीच कुणाचं मन न दुखावणारी ही तुमची ताई.. आज जरा परखडचं बोलतेय.

पोरींचा जन्म नकोसा असलेल्या कुटुंबात, या आईने आम्हाला पाच पाच पोरींना जन्म देऊन खूप उपकार केलेत आमच्यावर.

"दोन दोन महिने एका एका मुलीच्या घरी राहिली तरी, वर्ष निघून जाईल माझ्या या मायमाऊलीचं. बोलता बोलता, रुपाच्या डोळ्यात अश्रूंची दाटी झाली होती...

"अहो ताई, माझ्याकडे कोणत्या महिन्यात येईल, ते ठरवून घेऊ या पहिलेच. तसं मला थोडं, माझं शेड्यूल बघावं लागेल बरं!" मागचा पुढचा विचार न करता दिव्या बोलून गेली..

"दिव्या, तू नको ग चिंता करू" दोन महिने ही तुझ्या वाट्याला येणार नाही ही काळजी आम्ही पाच बहिणी मिळून घेऊच..

तुझ्या दोन मुलांवर, मात्र एवढे संस्कार कर, की ते तुला सहा महिने त्यांच्या संसारात ॲडजस्ट करतील..

दारात ऑटो उभा होता.. रूपाने आईची बॅग, ऑटोमध्ये ठेवली.... एक योग्य निर्णय घेतल्याचं समाधान घेऊन रुपा आईला घेऊन, ऑटोत बसली.

आईकडे, खरंच आपलं दुर्लक्ष झालं. आईला आपण गृहीत धरलं. घरातली अडगळ, शीSS... दीपकला स्वत:ची चूक उमगली होती. पण आता वेळ हातातून निसटून गेली होती..

आई निघाली होती, लेकीच्या घरी... माहेरपणाला नाही तर नेहमीसाठी, लेकीची लेक बनून...

आईवडिलांनी आपली मालमत्ता, मुलांच्या स्वाधीन करण्याआधी खूप विचार करावा हाच छोटासा संदेश या कथेतून देण्याचा प्रयत्न केलाय. सर्वच सूना किंवा मुल वाईट असतात असं माझं म्हणणं मुळीच नाही. पण दोन जनरेशन मधली गॅप , कामातली व्यस्तता.. मनभेदाच कारण असू शकते. त्यामुळे घरातल्या ज्येष्ठांना गृहीत धरून मन दुखावली जात तर नाही ना! एकदा त्यांच्या जागी राहून विचार करणे गरजेचे आहे, असेच मला वाटते..
-©®शुभांगी मस्के...



🎭 Series Post

View all