एक निर्णय भाग ४

वडिलांच्या मताचा आदर करत... वडिलांच्या इच्छेखातर.. वडीलांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर ठेऊन, सर्वांनी हक्क सोड कागदपत्रांवर सही करायची ठरवून टाकलं होतं.

एक निर्णय भाग ४

-©®शुभांगी मस्के...

अष्टपैलू लेखक करंडक स्पर्धा

पहिली फेरी : कथा मालिका



वडिलांच्या मताचा आदर करत... वडिलांच्या इच्छेखातर.. वडीलांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर ठेऊन, सर्वांनी हक्क सोड कागदपत्रांवर सही करायची ठरवून टाकलं होतं.


मॉपने जेवणाची जागा पुसत असताना, दिव्या मध्येच बोलली. "अहो ताई, रिनोवेशनच्या वेळी, संपूर्ण घराच्या टाइल्स बदलवून घेतल्यात, बघितल्या नाही का तुम्ही"

"हो ग, बघितल्या! छान आहेत".. रुपा बोलली.

"मी घेतल्या माझ्या पसंतीने", कुर्तीच्या नसलेल्या कॉलरला दिमाखात झटकत दिव्या आपल्या चॉईसच स्वमुखाने कौतुक करत होती..

"लक्ष कसं नाही जाणार, हे घर बांधत असताना, बाबांचं तिकडे बीपी शुगर वाढलं होतं. आईला बाबांकडे जावं लागलं, बाबांच्या बदलीच्या ठिकाणी.

बाबांची बदली होईस्तोवर नंतर आई बाबांसोबत तिकडेच राहत होती. मोनालीच्या बोलण्यावर, चित्राताईंनी बोलता बोलता डोळ्यांवर पदर लावला..

हो एखाद्या सूनवायरीसारखं, घरं सांभाळाव लागलं या दोघींना.कॉलेज करून लहान भावंडाना सांभाळायच्या, त्यांचा अभ्यास, त्यांचं दुखलंखुपलं.. कधी कशाची तक्रार नाही केली... आला गेला ही होताच. चित्रा ताईंनी बोलता बोलता जवळ बसलेल्या रुपा आणि मोनालीच्या डोक्यावरून हात फिरवला.

आईचा स्पर्श, आश्र्वस्त करणारा होता. मोनाली तर आईच्या मांडीवर डोकं ठेऊन, बसल्या बसल्या तिथेच आडवी झाली.

घर, ठेकेदाराला ठेक्याने दिलं होत, तरी लक्ष ठेवावं लागायचं. दार खिडक्यांची डिझाईन, ग्रिल,टाइल्स आम्ही आमच्या पसंतीने घेतल्या होत्या. "हो ना गं ताई" दिव्याने ऐकून फक्तच मान डोलावली.

सगळं तुम्ही केलं, तर मग यांनी काय केलं... दिव्या दीपककडे बोट दाखवत बोलली..

"छोटा होता गं तो... त्याला कळायचं नाही काही"... रुपाली

हो आई सांगतात.. लाडावले होते म्हणे हे खूप.. तुम्ही सगळ्या बहिणी खूप लाड पुरवायच्या म्हणे... हो तर मुळी, लाडका एकुलता एक भाऊ होतो मी त्यांचा.. हो ना गं तायडे, दीपकने अदितीला दोन हातांनी गळ्याला कवटाळून घेतलं.

"ये हे, हा असंच करायचा हा, मला खूप इरीटेड व्हायचं बरं का?" " मला हा असाच गळ्यात पकडुन जोरा जोरात हलवायचा".. मस्ती करायचा.. आणि मग मी खूप चिडायचे... मग काय रडारड व्हायची..

आपल्या महान मातोश्री, मी का रडतेय न विचारता,भोकाड पसरून रडतेय म्हणून मलाच मारायच्या. असा होता हा बदमाश...

अनेक वर्षानंतर, दीपकचं अस मानेभोवती दोन्ही हातांनी कवटाळून घेणं, बहीण भावाचं हे मायेचं नात ती खऱ्या अर्थाने मिस करत असल्याचं तिला जाणवलं.

"आजकाल काय गं, घरकामाला बाया असतात. एक दिवस का बाई नाही आली.. की मॉप काढतो आपण.. पण ओल कापड घेऊन, कोपरा न कोपरा उजळवला आहे या घराचा". रुपा जुन्या आठवणीत रमली होती.

कसं विसरेन बरं! तुम्ही घराच्या टाइल्स बदलवल्यात ते.. पण छान आहेत!! परिस्थितीनुसार बदलावं लागतं, हाच निसर्ग नियम. बोलताना रुपालीला गहिवरून आलं होत.

हो, खूप मेहनत घेतली माझ्या पोरींनी... खऱ्या अर्थाने घराचा पाय माझ्या पोरींनीच रचला.असं म्हटल तरी वावगं ठरणार नाही!! वीणातक्रार करत होत्या बिचाऱ्या... चित्राताई, पोरींच्या कौतुकात रमणार तोच, वासुदेव रावांनी, सर्वदूर नजर फिरवत, चित्रा ताईंकडे जरास डोळे वटारून बघितलं.

माझी आई, आपली माई म्हणायची, "पोरींनी सासरी गेल्यावर, माहेरी फार लुडबुड करू नये भावाच्या संसारात", " फार माहेरचा मोह बरा नसतो... केलं पोरींनी खूप केलं, घरासाठी... मान्य पण, मी काय म्हणतो...

लग्न आटोपली, आळंतपण बाळंतपण आटोपली.. दोन चार पाच वर्षात, ईवाया जावयाच्या होतील... निवृत्ती आवश्यक असते, एका टप्प्यावर".. बाबा बोलले.

मी हे घरं आणि घरातला सगळा व्यवहार, दीपक आणि सुनबाईचा हाती देऊन खऱ्या अर्थाने निवृत्त होऊन जायचं म्हणतो.

पण बाबा, गरज आहे का? या सगळ्याची. पुन्हा एकदा विचार करावा असं मला वाटतं? घर यांचच तर आहे, आम्ही आमचे संसार सोडून येणार आहोत का इथे.. की तुमच्या प्रॉपर्टीत हिस्सा मागणार आहोत.. नकोय आम्हाला काहीच! परखड शब्दात अदिती बोलली...

आणि उद्या, समजा काही कमी जास्ती काही झालं! तर कुठे जायचं, अदितीने आवाज उचलला..

ये पोरी, काही काय बोलतेस, लाजबीज तुला... जनाची नाही तर मनाची तरी... देव न करो, अशी वेळ येवो.. फालतू विषय वाढवण्यापेक्षा, वासुदेव रावांनी कडक शब्दात पुनश्च काढलेला विषय थांबवला..

पोरींनो तुम्हाला शिकवून सवरून मोठ केलं, हं!! आता तुम्ही नोकरी करता नाही करत.. तो तुमचा प्रश्न, पण आप्पा माईची इच्छा होती तशी.. झोपायला जाताना वासुदेवराव बोलून गेले.

ठीक आहे, आज ना उद्या तुमचंचं आहे, सहीच करायची आहे ना!! करू आम्ही. अदितीचा विरोध असून ही, रुपाली च्या शब्दाला मान देत, अदितीने चार बहिणींच्या होकारात होकार भरला...

हॉलमध्ये सर्वांसाठी झोपण्याची सोय करण्यात आली. हॉलभर गाद्या टाकण्यात आल्या.. एका बेडरूममध्ये, बाबा झोपले..

" ऐक ना ताई.. आता हा गाऊन बदलायचा आहे, कुठे
बदलवायचा मी".. अदिती

\"चांगली अल्लग सल्लग रूम होती, ती ही नाही ठेवली गं, त्यावर ही कब्जा केला बघ\".. अदिती पुटपुटली.. अदितीची अभ्यासाची खोली होती ती, त्यामुळे तिला जास्तच वाईट वाटलं होतं.

ऐन झोपायच्या वेळी, अदितीची चिडचिड झाली. अखेर तिने जिन्याच्या खाली बनवलेल्या छोट्याशा स्टोअर रूम मध्ये जाऊन गाऊन चेंज केला.

सगळेच हॉलमध्ये पहुडले होते.. अदितीला छोट्या बाळाला झोपताना दूध पाजयचं होत.. तीची पुन्हा चिडचिड झाली.. एवढ्या कल्लोळात बाळ काही झोपेल याची शास्वती नव्हतीच.

"शी बाई!! सगळाच गोंधळ"... "अरे लाईट बंद करा बरं.. आणि झोपा गपचूप... अदिती संतापली

अदितीची चिडचिड ऐकून, दीपक त्याच्या रूमबाहेर आला. "काय झालं ताई!! आमच्या रूममध्ये झोप .. जा तू", "मी झोपतो इकडे", दीपक बोलला..

जा आदू, तू झोप दीपकच्या रूममध्ये, अशी खाली नको झोपूस. भरभर पंख्याचा वाऱ्याचा त्रास होईल बाळाला. सर्दी होईल उगाच. रुपाताईचं ऐकून अदिती दीपकच्या रूममध्ये झोपायला गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी, सगळ्यांना रजिस्टार ऑफिसमध्ये जायचं होत. दीपक आणि दिव्याने पुढाकार घेऊन, सगळी कागदपत्र पहिलेच तयार करून ठेवले होते. "ना हरकत, हक्क सोड कागदत्रांवर सर्वांच्या सह्या झाल्या तेव्हा कुठे वासुदेवराव सुखावले.

ज्या कामासाठी आल्या होत्या ते महत्वाचं काम आटोपलं होत. दोन दिवस राहून, सगळ्याच आज आपल्या आपल्या घरी निघणार होत्या. एक एक करून घर खाली होत होतं.

रुपाली निघणार तेवढ्यात, शेजारची रखमा आजी आली. "चालल्या का पोरींनो, मायबाप जिवंत आहेत तोवर येत जात राहा, ते आहेत तोवर तुमचं माहेर"," भाऊ वहिनी कोणाचे कोण होत नसत्यात, बरं का! जगाची रीतच ती"...

म्हणत्यात ना, " लेकीच्या माहेरासाठी आई सासरी नांदते!! तेच खरं व बाय", "डोळे लाऊन बसते माय माउली रस्त्याच्या दिशेनं"," गेल्या पावली लेकी कधी येतील म्हणून" रखमा आजीचे शब्द.. चित्राताईंच्या आणि रूपाच्या पोटात खोल खड्डा करत होते..

"जाते आजी", रुपाने रखमा आजीच्या पायांवर डोकं ठेवून नमस्कार केला.. "जाते नाही येते म्हणावं बाय"... थरथरता हात डोळ्यावर ठेवत रखमा आजीने "सुखी राहा!" म्हणत आशीर्वाद दिला..

कमरेला, अडकवलेल्या थैलीतून दहा रुपयाची नोट काढून अदितीच्या बाळाच्या हाती दिली... "घे माय, खाऊ घेऊन देजो बाळाले"...

"नको हो आजी, आशीर्वाद तेव्हडा द्या फक्त", म्हाताऱ्या माणसाच्या आशीर्वादाची ताकद द्या बाळाला, बाकी खाऊ खाण्या जोग व्हायचयं अजून, अदिती बोलली..

दोनशे रूपे देते पोरगा, पेंशनमधून.. दर महिन्याले.. माह्या म्हातारीचा खर्च तरी काय? खायले प्यायले, काही कमी नाय", सूनेच सोड नातसून चांगली हाय," बोलताना मात्र आजीच्या डोळ्यांच्या कडा का ओलावल्या होत्या तो प्रश्न अनुत्तरितच राहिला..

दोन दिवसांच माहेरपण आटोपलं आणि सगळ्याच आपापल्या घरी निघून गेल्या. घर रिकामं रिकामं झालं...

बाप रे बाप, कित्ती तो पसारा.. अस वाटतंय, लग्नाचे पाहून गेले की काय? गोंधळच गोंधळ... दोन दिवस डोकं चक्रावल करून करून, "रांधा वाढा उष्टी काढा" आणि पाहुण्यांनी केलेला पसारा सावडा. म्हणतच दिव्या घरात गेली..

"मला दीड दोन तास तरी, डिस्टर्ब करू नका बरं.. लोटू द्या, जरा वेळ, दिव्याने फर्मान सोडलं आणि बेडरूममध्ये पळाली..

सुण्या झालेल्या घरात जायची इच्छाच चित्राताईंना झाली नाही. रखमा आजीसोबत बोलतच, खूप वेळ त्या बाहेरच बसून राहिल्या.

चहाची वेळ झाली आणि ,"आई चहा", दीपकने फर्मान सोडलं, तशा त्या कीचनकडे वळल्या... सर्वांसाठी चहा करून आणला.

सगळं कसं मनासारखं झाल्याने, संतृप्त मनाने हळूहळू, वासुदेवरावांनी सगळा कारभार, दिपकच्या हाती सोपवला.. दर महिन्याला पेंशन होतीच. ए टी एम कार्ड ही हळूहळू दिपकच्या हवाली झालं होतं..

दोन वेळचं जेवण, दवाखाना, औषध पाणी नित्य नेमाने मिळतंय त्यातच त्यांना समाधान होत.. आताशी, चित्रा ताईंच्या पण तब्बेतीच्या कुरबुरी वाढल्याच होत्या. वासुदेव राव निवांत झाले होते तर, चित्राताई मात्र पुन्हा एकदा नव्याने संसारात गुरफटल्या होत्या.

दिव्या ऑफिसला गेली की तिच्या पश्चयात, आला गेला पै पाहुणा, शाळेतून आलेल्या नातवंडांना खाऊ पिऊ घालने, त्यांचं हवं नको ते बघणे, दिव्या उशिरा ऑफिसमधून यायची त्यामुळे रात्रीच्या स्वयंपाकाला,तिचा काहीच हातभार लागत नव्हता.

सोशिकपणे चित्राताई सगळं सांभाळून घेत. गुडघे दुखायचे, कमरेत शिल्का मारायच्या, बीपी शुगरचा त्रास त्यातल्या त्यात छोट्या मोठ्या तक्रारी डोके वर काढत होत्या.

सगळेच, आपापल्या कामात व्यस्त असायचे. एवढे की कुणाला काही पडलेलं नसायचं. दिव्या आपल्या धुंदीत, दीपक आपल्या कामात, मित्रांमध्ये व्यस्त तर मुल आपल्या अभ्यासात.

आपल्या घरात आपले म्हातारे आईवडील आहेत, याचा ही कधी त्यांना विसर पडतो की काय असं या दोघांना वाटायचं. सगळेच आपापल्या कामात व्यस्त, जरा दोन मिनिट उभं राहून विचारपूस करावी, एव्हढा ही संवाद नव्हता.

सणासुदीला, पाच ही मुली आपापल्या सोयीने येत जात. आताशा घरी नणंदा आल्या की, दिव्या पण चीड चीड करायची. बोलायला पण महाग असायची. उगाच अपमान करवून घेण्यापेक्षा मग सगळ्या माहेरी येणं टाळायला लागल्या होत्या.

दीपक आणि दिव्याच्या स्वभावातला बदल, कितीही खटकत असला तरी,"आपलेच दात आपलेच ओठ" म्हटल्यावर प्रश्नच नव्हता. चित्राताई मात्र वासुदेव रावांच्या सतत अवतीभोवती असतं, त्यामुळे दोघांसाठी दोघे मात्र होते.

एक दिवस अचानक, थोडी अंगात कणकण भासतेय, म्हणून झोपलेले वासुदेवराव, झोपले तर उठलेच नाही.. वासुदेवराव अनंताच्या प्रवासाला निघून गेले होते.

बऱ्याच वर्षानंतर घरी संपूर्ण परिवार एकत्र गोळा झाला होता.. कारण मात्र दुःखदायी होत. संपूर्ण सोपस्कार आटोपले आणि सगळे नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले. घर रिकामं झालं.

चित्राताईंना घर खायला उठेल या जाणिवेने.. रुपा आईला काही दिवसांसाठी स्वतःच्या घरी घेऊन गेली.. रूपाच्या घरी महिनाभर राहून झाल्यानंतर.. एक एक करून सगळ्याच आईला आपआपल्या घरी घेऊन गेल्या होत्या..

त्यानिमित्ताने, चित्रा ताई पहिल्यांदाच लेकिंच्या घरी अशा बऱ्याच दिवस राहिल्या होत्या. अदितीने आईला काही दिवस स्वतः च्या घरी ठेऊन घेतलं.. आता चित्राताईंना घरी जाण्याचे वेध लागले. अदिती, चित्रा ताईंना सोडण्यासाठी माहेरी आली..

आईबाबांच्या खोलीचा ताबा आता, नातवंडांच्या हवाली झाला होता. सगळं घर बदलल्यासारखं भासतं होतं. घराच्या भिंतीवरचा आवडीने बनवलेला संपूर्ण परिवाराचा कोलाज फोटोच नाही तर घरातली माणसं, एवढंच काय तर ईटूकली पीटूकली ही मोबाईल मध्ये बंद झाल्यासारखी.. बदलल्यासारखी वाटली.

दोन दिवस राहून अदिती घरी परतली. स्टोअर रूममध्ये एका कोपऱ्यात एक बेड टाकून तिथे, चित्राताईंची रवानगी झाली होती.

सन समारंभाच्या निमित्ताने साज सोहळे, विरंगुळा म्हणून बाहेर फिरायला जाणे, पिकनिक, किटी पार्टी, घरातल्या सर्वांना सगळ्यासाठी वेळ होता मात्र, घरात असलेल्या चित्राताईंशी दोन शब्द बोलायला आता कुणलाचं फुरसत नव्हती.
-©®शुभांगी मस्के...

🎭 Series Post

View all