Mar 03, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

एक निर्णय भाग३

Read Later
एक निर्णय भाग३

एक निर्णय भाग ३

-©®शुभांगी मस्के...

अष्टपैलू लेखक करंडक स्पर्धा

पहिली फेरी : कथा मालिका


एक दिवस, वासुदेव रावांनी सर्व पोरी जावयांना आग्रहाच निमंत्रण केलं. फोन करून सर्वांना बोलवून घेतलं. सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं होतं. वडिलांच्या शब्दाला मान देऊन सगळ्या माहेरी आपल्या छोट्या चिल्ल्या पिल्ल्यांना घेऊन आल्या होत्या.

लेकी सूनांच्या गप्पा गोष्टींना उधाण आलं होतं. बऱ्याच दिवसानंतर सगळे जावई एकत्र भेटल्याने. छान गप्पांमध्ये रमले होते.

ननंदांच्या खातीरदारीला दिव्या जोमाने लागली होती. गॅस वर छान बासुंदी आटवण्याचा सुवास घरभर पसरला होता. बासुंदी पुरीचा पाहुणचार होता आज माहेरवाशिणीसाठी.


वडिलांना काय बोलायचं असेल? त्याचा त्यांच्या बोलण्यावरून पाचही बहिणींनी थोडा अंदाज बांधलाच होता.

हॉलमध्ये सगळ्या बसल्या असताना, अखेर वासुदेवरावांनी सर्वासमक्ष विषय काढलाचं.. पोरींनो सुशिक्षित लोकं, नोकरी, घरदार, कर्तबगार मुल पाहून आम्ही तुमची सर्वांची लग्न लावून दिली..

नशिबाने पाचही जावई कर्तबगार, मनमिळाऊ मिळालेत. तुमच्या संसारात काही कमी नाही. खूश आहात सगळ्या आपल्या आपल्या संसारात .

मी काय म्हणतो? फार काही उरलेलं नाहीच आमच्या जवळ.. मी एक निर्णय घेतलाय, जे काही थोड थोडं आमच्याजवळ आहे, ते सगळं मी दीपकच्या नावावर करून द्यायचं ठरवलंय.

"बिझनेस आहे, आज चालेन उद्याचं कोणी पाहिलं","दोन सोन्यासारखे लेकरं आहेत".. कायदा काही का येईना? पण माझं असं मत आहे? बघा.. पटतयं का? बाबांचं बोलणं सगळेच ऐकत होते.

काही का करेनात, जावई लोकांनी ह्यात लक्ष न घालण्याच ठरवलं होतं.

"मी काय म्हणते बाबा! गरज काय? ह्या सगळ्याची". रुपा

शेती विकून तुम्ही त्याला व्यवसायासाठी मदत केलेलीच आहे. आता राहता राहिला प्रश्न, राहतं घर, असली नसली सगळी प्रॉपर्टी दीपकच्या नावे करण्याचा.. मला काही ते योग्य वाटत नाही...

आज ना उद्या, सगळं त्याचचं तर आहे, रुपा बोलली?

"हो ना रे दीपक" रूपाने, दीपककडे बघितलं. चेहऱ्यावर साळसूदपणाचा आव आणत, दिपकने रुपाताईच्या बोलण्यावर हलकेच मान डोलावली.

"हो.. काहीच गरज नाही" दीपक बोलला

आम्ही सुखी आहोत की आमच्या संसारात.. सोन्यासारखा संसार आहे आमचा. तुमच्या प्रॉपर्टीमधलं काही एक नको आम्हाला.. आज नको नी उद्या सुद्धा नको.. रुपा बोलत होती.

"सगळी देनीघेनी, सगळा व्यवहार दीपकच्या हवाले करताय!, कशाला उगाच त्याच्यावर एव्हढा भार टाकता एवढ्यात. नवीन बिझनेस आहे, त्याला उगाच या सगळ्याचं टेन्शन नको द्यायला.

जोवर तुमच्याच्याने होतेय, तोवर राहू द्या की तुमच्या हाती व्यवहार".. एव्हढा मोठा निर्णय एवढ्यात घ्यायची घाई कशाला? मोनाली मध्येच बोलली..

दोन्ही लेकीच्या बोलण्यावर, चित्राताई सहमत होत्या..

आज ठीक आहे, उद्याचं कोणी पाहिलं, उद्या सगळं घेऊन, तुमच्या दोघांची जबाबदारी, यांनी नाकारली तर! काहीसे कडवट विचार अदितीच्या मनात आले, मात्र अदितीने ते तोंडातच गिळले..

मला तरी वाटते, सध्या तरी, त्याला त्याच्या बिझनेस वर फोकस करू द्या.. बाकी सगळ्या रामरगाड्यापासून घराच्या जबाबारीपासून दूर ठेवा त्याला!.. न राहुन आदिती जरा जोरात बोललीच.

आमचं काहीच म्हणणं नाही.. आई बाबा सांगतील ते करू.. काही नको आम्हाला, नशिबाने खाऊन पिऊन सुखी आहोत आम्ही... कशाला माहेरच्या ईस्टेटीवर डोळा.. मला तरी काहीच नको.. समिधा बोलली..

"मला ही नको रे बाबा काही"... \"इथे कोण येतंय मरायला.. सुटले होते लग्न झालं तेव्हा... हे नका करू, ते नका करू? किती दडपणात गेलं, बालपण आणि तारुण्य... लग्न झालं आणि सुटका झाली\".. स्वगतात रमलेली, अनिका ने फक्तच सुमेधाच्या बोलण्यावर होकारार्थी मान डोलावली.

"मी काय म्हणते, विचार करा एकदा.. घाई कशाला एवढी"... चित्राताई बोलल्या...

"तू गप्प बस गं, तुला काय कळतोयं व्यवहार ", एका शब्दात वासुदेवरावांनी चित्राताईंना गप्प बसवलं. उगाच कशाला जावयांसमोर अपमान करून घ्या! म्हणत चित्राताई गप्प बसल्या.

वासुदेवरावांनी तसाही कधीच चित्राताईंच्या मताचा आदर केला नव्हता. वासुदेवराव पूर्वीपासूनच, चार चौघात पटकन, मनाला येईल तसे, काही बोलून द्यायला मागेपुढे बघत नसत. कुणाही समोर पाणउतारा करायचे..

आजवर ठीक, पण चित्राताईं आजकाल थोड्या वचकूनच रहायच्या. दिव्यासमोर, दोन छोट्या छोट्या नातवंडांसमोर, काहीबाही बोलायचे, ते काही चित्राताईंना सहन व्हायचं नाही.

\"आज सगळं द्यायचं आणि उद्या हात पसरणार का लेका समोर सूनेसमोर. उद्या पोरींकडे लग्न होतील, मुलींचे मानपान सुनेने केलं केलं नाही केलं.. मनात येऊन.. त्या गप्प बसल्या..

त्यांना महिती होत, त्यांचं मत विचारात घेतलंच जाणार नाही.. उलट मुलावर आणि सुनेवर अविश्वास दाखवते म्हणून उगाच, त्यांना धारेवर धरल्या जाईल. मनात विचारांची गर्दी झाली होती. पण सांगणार कुणाला?

एकीकडे गहन विषयावर चर्चा.. दुसरीकडे,जावयांच्या गप्पा. बच्चापार्टीने तर नुसता धुमाकूळ माजवला होता. त्यांचा गोंधळच गोंधळ सुरू होता. अदितीच छोटंसं बाळ तर जणू.. मोठया ताई दादांच्या अंगा खांद्यावर घोडा घोडा करण्यात, दंगा मस्ती करण्यात दंग झालेलं होत. मस्ती करण्यात दीपकचे दोन्ही मुलं ही काही कमी नव्हते.

आज खऱ्या अर्थाने माझ्या गोकुळाचं नंदनवन झालंय.. कडकड वाजणाऱ्या गुडघ्यावर हात ठेऊन उठताना त्यांनी हॉलभर नजर फिरवली. क्षणात चित्राताईंनी भरल्या डोळ्यांनी सारं चित्र डोळ्यात साठवलं.

घराचं रिनोवेशन बाकी छान केलंय तुम्ही.. "घराचं तर पार रूपडं बदलवून टाकलं. बाहेरचा पोर्च छान केलाय बरं". डिझाईन आवडली.. गेट पण मस्त, अनिकाने तीन बोटांचा मोर नाचवला.

एक रूम कमी करून, हॉल मोठा केला होता.. मोठा हॉल, सजवलेल्या भिंतींच आणि घरातल्या इंटेरियरच, नवीन मोड्यूलर किचनच सगळे भरभरून कौतुक करण्यात दंग होते.

सगळं छान गं, पण.. "बाकी, आल्या गेल्यासाठी असलेली ती एक रूम, तशीच राहू द्यायची असती.. अल्लग सल्लग होती छान" रुपालीने न राहवून टोकलं.

"अहो ताई, इथे आमची फॅमिली वाढली", "हम दो हमारे दो झालेत"... बेडरूम छोटी पडायची. आल्या गेल्याच कुठे घेऊन बसलात.. म्हणून मधली भिंत तोडून, बेडरूम मोठी करून घेतली आमची, दिव्याने मत मांडलं..

हो, तुझ पण बरोबर आहे, अगं पण.. आल्या गेल्या आमच्या सारख्यांच काय? थोडी पाहिजे गं.. कपडे लत्ते बदलायला, पोरी मोठ्या होतायत आमच्या.. रुपाताईच्या बोलण्यावर सगळ्यांनी दुजोरा दिला होता.

हो ते ठीक आहे, पण कधी काळी येणाऱ्यांसाठी... दररोज राहणाऱ्यांची गैरसोय होते त्याचं काय? दिव्या ठसक्यात बोलली. दिपकने बहिणींच्या बोलण्यावर दुर्लक्ष केलं होत.

तोडफोड ही बरीच करावी लागली असेल नाही का गं, या रिनोवेशनसाठी.. अदिती मध्येच बोलली..

"हो तर.. किती त्रास झाला म्हणून सांगू.. कुठे पळून जाऊ असचं वाटत होतं".. मग काय बरेच दिवस मुलांना घेऊन मी माहेरीच होते. दिव्या बोलली.

फक्कड असा, बासुंदी, पुरी, बटाटे वडे, मसाले भाताचा बेत केला होता. दिव्याने सर्वांची ताट वाढली. जेवण आटोपली उचल खाचल करण्यात, सर्वांनी मदत केली. पुन्हा एकदा पाचही बहिणी गप्पांमध्ये रमल्या. निमित्त कोणतं का असेना, पण वडिलांनी मानाने बोलवून घेतलं त्यानेच सगळ्या सुखावल्या होत्या.

सासरी गेलेल्या पोरींना, आणखी काय हवं असतं!! आदरतिथ्याने अक्षरशः भाराऊन गेल्या होत्या. नशिबाने मिळालेले हे क्षण चित्राताई डोळ्यात साठवू पहात होत्या.
-©®शुभांगी मस्के...ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//