Mar 02, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

एक निर्णय भाग २

Read Later
एक निर्णय भाग २

एक निर्णय भाग २

-©®शुभांगी मस्के...

अष्टपैलू लेखक करंडक स्पर्धा

पहिली फेरी : कथा मालिका


एकुलता एक दीपक, माई अप्पाच नाही तर आईबाबांच्या अतीलाडाने चांगलाच डोक्यावर बसला होता. बहिणी पण छोट्या शेंडेफळ असलेल्या भावाचे लाड पुरवायच्या. हट्ट केले की आपले हट्ट पुरवले जातात, त्यामुळे दीपक चांगलाच हट्टी, जिद्दी झाला होता.

वडिलांचा लाडका होता. अभ्यासावरुन त्याला फार काही बोललेलं वडील खपवून घ्यायचे नाहीत. अभ्यास केला काय नाही केला काय? दीपकला काही फरक पडत नव्हता..

दीपकचा अभ्यास घ्यायची संपूर्ण जबाबदारी त्याच्या बहिंनीवर असल्यामुळे, मार्क थोडे जरी कमी पडले की मात्र एका काठून वासुदेवराव सगळ्यानाच धारेवर धरत.

पोरी हुशार आहेत,दीपकने पण त्यांच्या सारखं शिकावं, असं आईवडिलांना वाटत असल तरी, मुलींमध्ये असलेली अभ्यासाची जिद्द दीपकमध्ये नव्हती.

मी लाडाचा लाडोबा म्हणून आदळआपट करून हट्ट पूर्ण करवून घेण्यात तो आपली सगळी एनर्जी वाया घालवत होता.

रुपाली आणि मोनाली ग्रॅज्युएट झाल्या, दोघीही दिसायला सुंदर होत्या. दोघींची लग्न एकत्र एका मंडपात उरकून टाकण्याच्या दृष्टीने त्यांनी स्थळ बघायला सुुरुवात केली. त्यानिमित्ताने खर्च ही कमी होणार हा ही उद्देश होताच.

तशी समजून घेणारी, दोन मुलींना साजेशी दोन कर्तबगार मुलांची स्थळ ही त्यांना मिळाली. दोघींची एका मंडपात लग्न आटोपली. दोन पोरींची एका वेळी पाठवणी एक आई म्हणून, चित्राताईंना कठीण जाणार होत.

पोरींना समजून घेणारे जावई, जोडीदार रुपात मिळाले होते. पुढे शिकून त्यांनी नोकरी केलेली ही चालणार होती. माहेरचा उंबरठा ओलांडून सासरी जाताना दोघी ही खूश होत्या.

पुढे,समिधा आणि अनिका पण सायन्स ग्रॅज्युएट झाल्या. दोघींमध्ये खेळाडू वृत्ती असली तरी सराव, संधी, आणि पुरेस मार्गदर्शन मिळालं नसल्या कारणाने खेळ मागे पडले. अभ्यासावर लक्ष केंद्रित करून दोघी ही मात्र चांगल्या शिकल्या.

मुलींना हे शोभत नाही, ते नाही शोभत.. थोड्या दडपणात वाढलेल्या, थोडं जरी काही कमी जास्ती झालं तर, उगाच आईला बोल पडायचा, आईच्या काळजी पोटी सगळ्याच जरा हटकून रहायच्या.

घर ते कॉलेज एवढंच त्यांचं विश्व होत. चित्राताईंचे संस्कार होतेच. दिसायला सुंदर असल्या कारणाने, लग्न जुळवताना फार काही त्रास झाला नाही. चांगली स्थळ बघून वासुदेवरावांनी अनिका आणि समिधाचे ही हात पिवळे केले.

अदिती थोडी हट्टी होती, अभ्यासाची जिद्द होती तिला. मोठया चारही तायांची लाडाची होती स्वतःच्या हिमतीवर आणि कौशल्यावर पुढे जात होती. मेहनतीने इंजिनियर झाली. इंजिअरिंग झाल्या लगेच कॅम्पस मिळालं आणि शहरात चांगल्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तीला नोकरी ही लागली.

अदितीसाठीही आता, लग्नाचे निरोप यायला लागले. तिच्याच ऑफिसमध्ये तिच्या बरोबर काम करणारा अभय अदितीला आवडायचा. आपल्या या निर्णयाला घरून कधीच पाठिंबा मिळायचा नाही, तिला माहिती असल्यामुळे लग्नाचा विषय ती पुढे पुढे ढकलत होती.

परजातीय मुलासोबत लग्न वगैरे, घरून वडिलांचा कडाडून विरोध होईल. "नाक कापू नका आमचं, नोकरीसाठी जाताय, मन जुळवून दोनाचे चार करण्याच्या विचारात लफडी करू नका म्हणजे झालं"..नोकरीसाठी बाहेर पडताना अनेकदा यावरून वासुदेवराव अदितीला आडून आडून बोलायचे.

अभय चोरून चोरून तिच्याकडे बघायचा, तिला कळायचं मात्र अभयला सांगायचं कधी तिला धाडसच झालं नाही. अखेर अभयनेच अदितीला लग्नासाठी मागणी घातली. ऑफिसमधल्या सरांनी, मित्र मैत्रिणींनी मध्यस्थी करून, मोठ्या जोरावर, वासुदेवरावांची संमती मिळवली. लग्नासाठी बाकी तायांनी ही पुढाकार घेतला म्हणून हे शक्य झालं होतं. अखेर अदितीच्या मनासारखं झालं. आणि अदिती अभय लग्न बंधनात बांधल्या गेले.

चित्राताईंना आपल्या पाच ही मुलींचा खूप अभिमान होता. वासुदेवरावही थोडे वरमले होते. पाच ही मुलींची लग्न आटोपली असल्याने कारणाने, आता ते चिंतामुक्त झाले होते.

सेवानिवृत्त झालेच होते. आता फक्त दीपक कामाधंद्याला लागला की झालं.एवढीच एक आशा त्यांना होती. रडत पडत का होईना, दीपक इंजिनिअर झाला. त्याच्या वर्गातच, सोबत शिकलेली दिव्या. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं, आणि मन जुळली आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला...

लाडाकोडात वाढलेला दीपक, त्याच्या मनाविरुद्ध आजवर काहीच झालं नव्हतं, पुढे ही होणार नव्हतं. अखेर घरच्यांच्या संमतीने दीपक आणि दिव्याच लग्न झालं.

दिव्या, आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती. भरल्या कुटुंबात जुळवून घेणं एवढं सोप्प होणार नाही. ही कल्पना सर्वानाच होती. पाचही मुलींची लग्न झाली होती, त्यामुळे दिव्याला फार काही दडपण येणार नाही. पाचात सहावी म्हणत, चित्राताई दिव्याची लेकीप्रमानेच काळजी घ्यायच्या...

लग्नानंतर सुरवातीच्या दिवसात चित्राताई बऱ्याचदा माई आप्पांसाठी म्हणून त्यांची काळजी घ्यायच्या दृष्टीने जास्तीत जास्ती, गावीच रहायच्या.

आल्या गेल्याचा फार भार, दिव्यावर त्या टाकत नसत. दिवाळी, राखी सोडली तर, फार कुणी एका वेळी माहेरी येत नसल्याने कुटुंब मोठ तरी, जाणवतं मात्र नव्ह्त.

माई आप्पा निवर्तले आणि एकुलते एक असलेले वासुदेवराव, थोडी थोडकी वडीलोपार्जित शेती, आता त्यांच्या नावावर झाली होती.

सेवानिवृत्तीनंतर लाखोच्या घरात पैसे ही मिळाले होते. थोडी फार दोघांचं निभवेल एवढी, दर महिन्याला पेन्शन ही होती. कर्मधर्मसंयोगाने म्हातारपण सुखात जाणार हेच अपेक्षित होत.

सहा ही लग्न तशी तोडीस तोड पार पाडली होती. देणंघेणं, मानापानात त्यांनी काहीच कमी ठेवलं नव्हत. पोरी आपल्या आपल्या घरी सुखी होत्या. सगळचं स्थिरस्थावर झालं होत.

दिव्या दीपकला दोन मुलं झाली. नाव चालवायला घराण्याला वारीस मिळाल्याने, घराचं पुन्हा एकदा गोकुळ झालं होत. वासुदेवरावांचा दीपक आणि दिव्यावर जीव ओवाळून टाकायचच तेवढं बाकी उरलं होतं.

"वडिलोपर्जित प्रॉपर्टीत मुलींचा समान हक्क" अशा आशयाच्या बातम्या, आजकाल पेपरमध्ये दररोज यायच्या. मुली मुलांमध्ये वडिलांच्या प्रॉपर्टीवरून वादविवाद... पेपर मधल्या जाहिराती वाचून ते आजकाल जास्तीच अस्वस्थ व्हायचे.

आज बहीण भावंडांमध्ये प्रेम आहे, पण पुढे जाऊन बहिणींना लोभ सुटला तर!! आपल्या पाच ही मुली आपल्या थोड्या थोडक्या प्रॉपर्टीतल्या हिस्स्यासाठी हट्टाला पेटल्या तर..

"वडिलांनी स्वकष्टाने मिळवलेल्या प्रॉपर्टीवर, मुलींचा समान हक्क" असं झालं तर मग, आपल्या लेकाजवळ पाच पोरींना वाटता वाटता काहीच उरणार नाही.

माई म्हणायची तेच खरं, की काय?" "याचसाठी केला होता का अट्टहास, मुलाचा !" दिपकच्या प्रेमापोटी, हल्ली वासुदेवराव विचारातच मग्न असायचे.


दीपक एका कंपनीत नोकरी करायचा, नऊ ते पाच नोकरीत आता काही त्याच मन रमायचं नाही. अखेर नोकरी सोडून व्यवसाय टाकण्याचा त्याने निर्णय घेतला. त्यासाठी त्याला आता पैश्याची जुळवाजुळव करावी लागणार होती.

दीपकला व्यवसाय टाकून देण्यासाठी वासुदेवरावांनी पुत्रप्रेमापोटी गावातली वडिलोपार्जित शेती विकायला काढली.

शेती विकण्याचा निर्णय पाच ही मुलींना आवडला नव्हता. पण कशाला उगाच त्यांच्या संसारात ढवळाढवळ करा, त्यामुळे, निर्णयात कुणीच हस्तक्षेप केला नव्हता. गावातली शेती चांगल्या किमतीत विकल्या गेली होती.

दीपकने कमरा घेऊन, हार्डवेअर आणि मटेरियल सप्लायरचा व्यवसाय सुरू केला. मोठी महागडी, आलिशान कार खरेदी केली.

हळुहळू , दीपकचा व्यवसायावर बऱ्यापैकी जम बसत होता. दिव्या पण इंजिनिअर झालेली होतीच. दोन मुलांच्या जन्मानंतर तीने ही नोकरी सुरू ठेवली. घरी पोरांना सांभाळायला चित्राताई होत्याच त्यामुळे, दिव्यासाठी नोकरी करणे सहज शक्य होते. तिला फार काही तारेवरची कसरत वगैरे करावी लागतं नव्हती.
-©®शुभांगी मस्के...


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//