Feb 29, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

एक निर्णय भाग१

Read Later
एक निर्णय भाग१

एक निर्णय भाग १

-©®शुभांगी मस्के...

अष्टपैलू लेखक करंडक स्पर्धा

पहिली फेरी : कथा मालिका


\"चुकलंच!! चुकलचं तुमचं! तुमचंच काय माझं ही चुकलं\".. "लाडका एकुलता एक मुलगा", म्हणत होतेच.. "सगळं एकट्या मुलाच्या नावे करून, त्याच्या स्वाधिन होऊ नका". थोड काही तरी आपल्या नावे असू द्या, मुलींचा ही, हक्क होताच की.

चांगली स्थळ बघून लग्न करून दिलीत तुम्ही त्यांची. घेणीदेनी, सासरचा मानपान, आळंतपण बाळंतपण सगळं केलंत, काही कमी ठेवलं नाही..

हुशार आणि कर्तबगार आहेत आपले पाचही जावई. कष्टाने उभं केलयं त्यांनी सारं साम्राज्य. दैवकर्म संयोगाने सासुरवाड्या ही छान मिळाल्या पोरींना. पोरी ही गुणाच्या, सर्वांना सोबत घेऊन चालतात. लाडक्या आहेत सासू सासऱ्यांच्या खाऊन पिऊन सुखी आहेत. आपल्या मनाच्या आहेत. खऱ्या अर्थाने सासरच्यांची मन जिंकून घेतलीय पोरींनी.

पण "मुलींची ही काही अपेक्षा असतेच ना? आईवडिलांडून, भाऊ भावजय कडून". तुम्ही तर गेलात मला इथेच एकटीला सोडून, हा "देव तरी कुठे लपलाय" कुणास ठाऊक!!..

दिवस कसे लवकर सरतात नाही, सगळं आत्ता आत्ताच झाल्यासारखं वाटतंय, " आपली नात,रुपाची लेक, मोठी झाली.. लग्न ठरलंय!!".. आनंदात सहभागी, तर दूर पण आहेर आणि नवरीच्या गिफ्टसवरून, हल्ली रोज घरात वाद होतायत.

आज काही असतं थोड थोडकं माझ्या जवळ, किती बरं झालं असतं बरं!.

"आजवरचं आयुष्य गेलं तसं गेलं, तक्रार नाहीच.. पण आता मात्र कठीण जातायत आयुष्याचे पुढचे उरले सुरले दिवस".

वासुदेवरावांच्या हार घातलेल्या फोटोकडे एकटक बघत, पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा, चित्राताईंनी पदराने पुसल्या....

\"चुकलंच!! चुकलचं तुमचं! तुमचंच काय माझं ही चुकलचं\".. पुटपुटतच चित्राताईंनी, जवळ एका स्टूलवर ठेवलेल्या लोट्यातलं पाणी, घटाघटा घशात ओतलं.

हल्ली चित्राताईंसोबत बोलायला घरात कुणीच नसतं.कुणी चुकून ही, फिरकत नाही खोलीकडे.. मग काय, स्वगतात रमतात तासनतास.. भिंतीवरच्या वासुदेवरावांच्या फोटोकडे एकटक बघत, एकट्याच बोलत बसतात.

वासुदेवराव आणि चित्राताई, सुखवस्तू घराण्यातले... गावी शेतीवाडी होती. वासुदेवरावांचे आई वडील आण्णा आणि माई गावीच राहत. वासुदेवरावांना सरकारी नोकरी, नोकरी, तशी बदलीची त्यामुळे या शहरातून त्या शहरात बदली व्हायची.

चित्राताईंना, एकापाठोपाठ दोन मुली झाल्या. रुपा आणि मोनाली त्यांच्या जन्मानंतर मात्र.. घराण्याला वारस हवा यावरून, माई चित्राताईंना अनेक वेळा टोकायच्या.

आपल्या हाती थोडं काय असत ते, पण सांगणार कोणाला. मुलाच्या प्रतीक्षेत, चित्राताईंना पुन्हा तीन मुलीच झाल्या. सूनेकडून मुलाची अपेक्षा काही केल्या मावळत नव्हती. एक एक करत, एकापाठोपाठ पाच मुली, माई आणि आण्णा खूप नाराज झाले चित्राताईंवर..

पाचव्या मुलीच्या,अदितीच्या पाठीवर चित्राताई पुन्हा गरोदर राहिल्या. या वेळी तरी मुलगा व्हायला हवा म्हणून, मग उपास तापास, व्रत वैकल्ये, देवाला नवस... सारं सारं बोलून झालं.

\"देव तरी कुठे लपून बसलाय, कुणास ठाऊक\", चित्राताई स्वतःच्याच नशिबाला कोसायच्या.

"छोट्या लेकरांच देवाला ही ऐकावं लागतं म्हणे", माई म्हणाल्या, कुमरिकेने सूर्याची पूजा केली.. तर फळाला येते. म्हणून मग दररोज, छोट्या अदितीकडून सकाळी उठून सूर्यदेवाला अर्घ्य द्या, गायत्री मंत्र म्हणवून घ्या. वगैरे वगैरे..

सकाळी उठून, छोटीशी अदिती, सूर्याला अर्ध्य द्यायची. ताईने शिकवलेला गायत्री मंत्र. बोबड्या बोलीत सूर्याकडे पाहून म्हणायची..

"शरीर आहे रे हे, रबर सुद्धा ताणला की तुटतो". तूच का असा, हट्टाला पेटलास. वंशाला दिवा दे की रे बाबा, चित्राताई देवाला साकडं घालून घालून थकल्या होत्या.

मुलींवर त्यांचा जीव होताच. वंशाला दिवा हवा, पोराच्या हट्टापायी.... आपल्या मुलाचं दुसरं लग्न ही लावून द्यायला, माई मागेपुढे पाहणार नाही, हे ही त्यांना माहिती होत.

यावेळी मात्र देवाने त्यांच ऐकलं. चित्राताईनी यावेळी एका गोंडस मुलाला जन्म दिला. वंशाला दिवा मिळाला होता. माई आप्पांनी बाळाचं नाव " दीपक" ठेवलं.

एरवी, गावाताल्या घरातून माई आप्पांचा पाय निघायचा नाही. चित्राताईंच्या पाच ही बाळंतपणात.. चित्रे, माझ्याच्याने होत नाही बाई काही..म्हणत जबाबदरीपासून अंग काढून घेणाऱ्या माईंना, चित्राने यावेळी मुलाला जन्म दिल्याचं कळताच. माई गावावरून दुसऱ्या बसने, बाळाला बघायला आल्या आणि दीपकच्या जन्मानंतर बऱ्यापैकी येत जात राहिल्या.

चित्राताईंच्या गरोदरपणात आणि बाळंतपणात, चौदा पांढरा वर्षाच्या मोठ्या मुलींनी, रुपा आणि मोनालीने घरातली सगळी जबाबदारी एकाद्या मातब्बर गृहिणीसारखी निभावली होती.

कधी नातींसाठी ग्रॅमभर न आणणाऱ्या माई आप्पांनी, नातवासाठी सोन्याची घडणावळ असलेला, चांगला तोळ्याभऱ्याचा गोफ दिपकच्या गळ्यात घातला होता.

"माई, मला गं !". मला पण पाहिजे, अशी गळ्यात चैन... छोटया अदितीने, दिपकच्या गळ्यातल्या चैनला हात लावला, तशी आजी जोरात खेखसली...

"हो तिकडे", पहिलेच डाका घालायला आल्या आहात माझ्या लेकाच्या घरावर. "तुमची शिक्षण, लग्न करता करता आणि चोराचे घरं भरता भरता".. काही उरणार आहे का? माह्या नातवासाठी कुणास ठाऊक? ..

"चोराचं घर म्हणजे गं माई!" निरागसपणे रूपाने विचारलं.. आव माय, चोराचं घर म्हणजे!! आत्ता तूले कसं सांगू.. "तुमच्या लग्नात नाही का, गोफ घ्या, अंगठी घ्या, दागदागिने, लग्नाचा खर्च.. बरबादीच नाही का पैशाची", माई बोलली...

बाळा वासू... आपली रुपी झालीच, नाही का बरं चौदाची.. दोन चार वर्षात, अठराची झाली का उजवून टाक पटकन.. एका मागे एक येतील, पोट्टया लग्नाले. अंगापायाले चांगल्या जब्बर हायत!

आजकाल पोर खूप चवना करत्यात, नंतर त्रास होण्यापेक्षा लवकर लवकर उरकवून मोकळा हो रे बाबा!!

कपाळावर आठ्या आणतं, लेकाची म्हणजे (वासुदेव ची) आपल्याला किती चिंता आहे, माई बोलून दाखवायच्या.

एक दिवस, आईचं ऐकत गप्पच बसलेल्या नवऱ्याकडे पाहून, चित्राताई मध्येच बोलल्या, " काही काय हो माई, हुशार आहे पोरी, अभ्यासात कामात" "चांगल्या शिकून सवरून आपल्या पायावर उभ्या झाल्या की नंतरच लग्न करु आम्ही पोरींच"..

"बघा बरं, मला सातवा महिना लागला, आणि डॉक्टरांनी आराम सांगीतला". तीन महिने झाले, पोरींनी घर सांभाळल.. तेही शाळा त्यांचा अभ्यास सांभाळून.

सून पोरींच्या बाजूने बोलल्याच आप्पांना, मुळीच आवडलं नव्हतं. त्यांनी वासुकडे डोळे वटारून पाहिलं.

"खाणारी तोंड वाढलीत आता.. पगार पाणी पाहून, सार करा म्हणजे झालं". पाच पाच पोरींवर सारच लुटून देणार असाल तर कठीण आहे. काही उरणार आहे का ह्या पोटासाठी? पोरी पोरी करून पोरी कोणाच्या होत नस्त्यात. समजलं का वासू? आप्पा बोलले.

आई वडिलांच्या शब्दांचा मान आणि आजवर कधीच विरोधात एक ही शब्द न बोलण्याच्या संस्कारात वाढलेल्या वासुदेवरावांनी, डोळ्यांनीच चित्राताईंना गप्प बसण्याचा इशारा केला...आणि वडिलांच्या होकारात होकार भरला..

सकाळचा नाश्ता, दोन्ही वेळेचा स्वयंपाक, घरातली कामं, बारा चौदा वर्षाच्या, रुपा आणि मोनाली जबाबदारीने करतच होत्या. माई फक्त थोडा थोडका हातभर लावायच्या.

"ऐका, ए पोरींनो", लेकरू चांगलं बाळसल पाहिजे, चांगली तुपात सोजी भाजत जा. आईसाठी मेव्याचे लाडू बनवायचेत तर खारका कुटा, काजू, किसमिस, डिंक तळा, खसखस, कणीक भाजा... आजी बसल्या बसल्या ऑर्डर सोडायची आणि बिचाऱ्या पोरी, आजीने सांगितल्याप्रमाणे सगळं करायच्या.

थकायच्या पण सांगायची बिशाद नव्हती. एक दिवस, आप्पांनी गावावरून आणलेली.. गावरान पपई माईने कापली, दहा बारा फोडी केल्या.

माई, पोरींना पण द्या हो एक एक फोड.. गोड आहे चांगली, चित्राताईंनी आपल्या प्लेटमधली एक फोड, छोट्या अदितीच्या हाती दिली...

"अव माय.. तू खात जा!", पपई खाल्ल्याने दूध वाढते, घराण्याचा वारस शोभला पाहिजे माह्या दीपक.

"पोरीबाळीने पपई नाही खाव जास्ती, गरम होते". सासूबाईंच्या बोलण्यावर मनात इच्छा असून ही, प्लेट मधल्या, पपईची एक एक फोड उजागिरीने, पोरींच्या हाती द्यायची हिम्मत, चित्रताईंची झाली नव्हती..

आजी, आजोबांच्या प्रेमाला आजवर पारख्या असलेल्या पाचही नाती. छोट्या भावावर आजी आजोबांच्या प्रेमाची होत असलेली बरसात भरल्या डोळ्यांनी अनुभवत होत्या..

रुपाली, मोनाली समजदार होत्या.. मुलामुलीत.. माई अप्पा करत असलेला भेदभाव, त्यांना कळत होता. राग ही यायचा त्यांना.. पण कधी काळी आजी आजोबांना उलट सुलट उत्तर दिलं तर, "मायचे संस्कारच तसे" म्हणत माई चित्राताईंच्या संस्काराला गालबोट लावायची..

पाह्य रे बाबा... वासू, अस शिकवलं तुह्या बायकोने पोरीले.. म्हणत, आजी वासुदेवरावांचे कान भरायची आणि मग सगळं खापर चित्राताईंवर फोडलं जायचं, सगळा राग चित्राताईवर निघायचा..

आईची होत असलेली गळचेपी बघून, मग काय!! रुपा आणि मोनाली काही बोलायच्याच नाही. माई कधी एकदा गावाला जाते ह्याची वाट बघत बसायच्या.

माई आप्पा गावाहून आले की, काही तरी कारणावरून माई बाबांचे कान भरणार आणि बाबा आईवर चिडणार, हे नेहमीचाच झालं होत.

तिसरा आणि चवथा नंबरची मुलगी.. समिधा आणि अनिका अभ्यासाबरोबरच खेळात ही खूप चांगल्या होत्या.. समिधा बुद्धिबळसारखा कठीण खेळ खूप छान खेळायची. अनिका बॅडमिंटनमध्ये नेहमीच अव्वल असायची...

दरवर्षी शाळेतच काय पण जिल्हा स्तरिय स्पर्धा ही दोघींनी गाजवल्या होत्या. अनेक गोल्ड मेडल आपल्या नावावर दोघींनी केली होती.

हॉलमधल्या शोकेसमध्ये असलेल्या, बक्षीस, मेडल, ट्रॉफ्या दोघींनी स्वतःच्या मेहनतीने मिळवल्या होत्या..सगळे त्यांच्या खेळातल्या कामगिरीबरोबरच, त्यांच्या अभ्यासातल्या यशाचं ही कौतुक करायचे.

माई आप्पा कधी आले तर, समिधा अनिका आपली मिळवलेली बक्षीस मोठ्या कौतुकाने दाखवत.. माई मात्र नाकमुरडे मारायची.

"इथे नका उजेड पाडू तुमचा.. तिकडे जाऊन तुमच्या सासरी काय तो उजेड पाडा पोरिनो".. माईना नातींच काही एक कौतुक नव्हत.


पोरींना फार काही कळत नसलं तरी, चित्राताईंना एका पाठोपाठ झालेल्या पाच मुली यावरून घालूनपाडून बोलण्याची एक ही संधी त्या सोडत नव्हत्या

चित्राताईंना या सगळ्याचा खूप राग यायचा, त्रास ही व्हायचा. या सगळ्यात माझा आणि माझ्या मुलींचा काय दोष? पण डोळ्यातलं पाणी, आवंठा गिळून चित्राताई गप्प बसायच्या.
-©®शुभांगी मस्के...ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//