Login

एक मुखवटा

माणसाचे अंतरंग दाखवणारा, एक मुखवटा.!


एका साध्याशा ढाब्यामध्ये खाऊन झाल्यावर, तो बिल देण्यासाठी उठताच होता; इतक्यात त्याचा पाय कशामध्ये तरी अडकला, आणि तो खाली पडला.

उठत असताना त्याने बघितलं, की टेबलाखाली एक पाकीट पडलं होतं. त्याने ते थरथरत्या हाताने उघडलं. त्यात ₹२,००० च्या १० नोटा होत्या. त्याने आजूबाजूचा अंदाज घेतला, आणि ते पाकीट हळूच त्याच्या पिशवीत सरकवलं.

बिल देण्यासाठी तो घाईघाईने ढाब्याच्या काउंटर वर गेला, त्याने बिल भरलं, आणि वेळ न दवडता बाहेर आला. बाहेर तो त्याच्या घरी जाण्यासाठी भराभरा चालू लागला. अचानक त्याला मागून कोणीतरी आवाज दिला.

त्याने मागे वळून बघितलं, तर तो ढाब्यामधला बिल घेणारा पोऱ्या होता. त्याच्याजवळ येऊन तो मुलगा म्हणाला,

" साहेब, तुम्ही बिल दिल्यानंतर तुम्ही पाकीट काउंटर वरच विसरला होतात. मी तेच घेऊन आलो आहे. हे घ्या.. ", अस म्हणून त्याने ते पाकीट त्याचा हातात दिल.

त्याने पाकीट उघडून बघितलं. पाकिटातील छदामही इकडचा तिकडे झाला नव्हता. त्याने खुश होऊन त्याच्या हातात ₹५० ची नोट सरकवली. पण त्या मुलाने ती घेतली नाही.

" साहेब, याची काहीही गरज नाही. मी माझं चांगल्या नागरिक असल्याच्या नात्याने फक्त एक कर्तव्य केलं. पैसे थोडीच झाडाला लागतात! तुम्ही सुद्धा कुठेतरी काम करूनच तर हे पैसे कमवले असणार. जर कोणाची हक्काची कमाई त्याच्या हातून गहाळ झाली, तर त्याला कस वाटू शकतं, हे समजू शकतो मी. मला काही बक्षिसी नको, लहान तोंडी मोठा घास घेतोय खरा, पण तुम्हालाही कोणाची अशी हक्काची कमाई सापडली, तर तुम्हीही त्याला ती परत करायला विसरू नका. अरे, मी पण बघा लगेच तुमच्याबरोबर बोलत बसलो! भरपूर कामं पडली आहेत. चला साहेब, येतो मी! ", अस म्हणून तो मुलगा निघाला.

तो त्या मुलाच्या पाठमोऱ्या प्रतिमिकडे सुन्न होऊन बघत होता. \"प्रामाणिक दिसणाऱ्या त्याच्या चेहर्या मागील स्वार्थी मुखवट्याला\" चांगलीच चपराक मिळाली होती. मनाशीच काहीतरी निर्धार करून तो जवळच्या पोलीस स्टेशनच्या दिशेने चालू लागला...