एक मिठी अशीही

Unsuccessful Love Story

पाहता क्षणीच ती त्याला आवडली होती.. कॉलेजच्या जीन्स, टॉप्स मध्ये पंजाबी ड्रेस घालून आलेली ती odd man sorry girl out वाटत होती.. थोडीशी घाबरलेली,थोडी धास्तावलेली.. बॅग सांभाळायच्या नादात ओढणीचा विसर पडलेली.. तो तर फिदा झाला होता तिच्यावर.. त्याचाही कॉलेजचा पहिलाच दिवस होता. पण त्याचे सगळेच मित्र त्याच्या सोबत असल्याने तो एवढा काही घाबरलेला नव्हता.. तिला पाहून पहिल्यांदाच त्याने देवाची मनापासून प्रार्थना केली, कि ती ही त्याच्याच वर्गात असू दे.. आणि चक्क चक्क देवाने प्रार्थना ऐकली.. ती त्याच्याच वर्गात होती.. अगदी पहिल्याच बाकावर प्रोफेसरांच्या समोर बसलेली.. देव आहे जगात याची प्रचिती आल्यामुळे तो खुश झाला होता. मग काय, पुढचे अनेक दिवस एकच चाळा.. तिच्याकडे बघणे... 

        आधी त्याला ती अबोल , माणूसघाणी वाटली होती. कारण ती कोणाशीच बोलायची नाही.. ती आणि तिची पुस्तके. ना कँटीन ना बाकी काही.. लायब्ररीत मात्र रोज जाताना दिसायची.. त्या लायब्ररीयनशी जेव्हा ती हसून बोलायची याच्या ह्रदयात कळ यायची.. पण हो, ती अबोल नव्हती.. खूप बोलायची पण तिच्या नवीन झालेल्या मैत्रीणींशी.. बहुतेक सगळ्यात जास्त आणि जोरात तिच हसत असावी.. तिचे ते खळखळून हसणे पहातच राहावे असे त्याला वाटे. हळूहळू सगळा वर्ग एकमेकांशी बोलू लागला होता पण गल्लीत शूर असलेला हा सिंह तिच्यापुढे बोलायला मात्र घाबरत होता. त्याच्या मित्रांनासुद्धा आता अंदाज येत होता.. पण चिडवाचिडवी सुरू झाली नव्हती.. अशीच दोन वर्षे गेली.. ती जे विषय घेणार आहे ते विषय शोधून काढण्यासाठी किती पापड बेलावे लागले त्याचे त्यालाच माहित.. पण आता एक झाले होते.. वर्गात कमी मुले असल्यामुळे त्यांचे बोलणे थोडे वाढले होते. तिच्या मैत्रीणींनी वेगळे विषय घेतल्यामुळे परत ती एकटी असायची.. पण आधीचा नवखेपणा त्यात नव्हता.. एक दोनदा धीर करुन त्याने तिला लायब्ररीत तुझ्यासोबत येऊ का म्हणून विचारले, पण त्यावर तिचे काहीच उत्तर न आल्याने तिचा अंदाज येत नव्हता.. त्याचे मित्र त्याच्या पाठी लागले होते, विचारून बघ.. पण नकार असेल तर आहे ती मैत्री पण संपेल या भितीने तो विचारत नव्हता.. तिच्यात पण खूप बदल होत होते.. आधी फक्त अभ्यासू असणारी ती आता वेगवेगळ्या गोष्टीत भाग घेत होती, तिथे चमकत होती. नवीन नवीन ग्रुप जॉईन करत होती. हा मात्र आधी होता तिथेच होता.. 

    तिच्यात एक बदल मात्र झाला नव्हता. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती एका वहीत काहीतरी लिहीत असायची.. कोणाला म्हणजे कोणालाच त्या वहीला हात लावू द्यायची नाही.. 'हे कॉलेजचे शेवटचे वर्ष.. आता नाही विचारले तर आयुष्यात पुढे संधी मिळेल कि नाही माहित नाही..' मित्रांनी भरपूर समजल्यावर त्याला पटले.. एका ऑफ लेक्चरला जेव्हा ती पाठच्या बाकावर बसून लिहायला गेली तेव्हा अख्खा वर्ग ठरवल्याप्रमाणे तिथून निघून गेला...

     तो तिच्यासमोर जाऊन उभा राहिला.. अचानक त्याला समोर पाहून ती घाबरली, तिच्या हातातली वही खाली पडली. तिला संधी न देता त्याने ती उचलली. वर्गात दोघांनाच बघून ती गोंधळली...

"मला तुझ्याशी बोलायचे आहे". तो

" माझे लग्न आधीच ठरले आहे.." ओठ घट्ट मिटून ती म्हणाली..

"अच्छा, म्हणजे तुला आधीच माहित होते , मला काय बोलायचे आहे.."

ती गप्प राहिली.. काय करायचे हे सुचत नव्हते.. सहज चाळा म्हणून त्याने वही उघडली...'फक्त तू' अशी सुरुवात करून त्यात अनेक चारोळ्या लिहिलेल्या होत्या.. त्याने उत्सुकतेने वाचायला सुरुवात केली. तिचे हे रूप त्याला नवीन होते. तिनेही त्याला अडवले नाही. प्रत्येक चारोळीत त्याचे नाव कुठेतरी गुंफलेले दिसत होते.. वाचता वाचता त्याच्या डोळ्यातून पाणी आले.. ती सुद्धा न रडण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला जमत नव्हते..

" काहीच नाही होऊ शकत?" त्याने शेवटचा प्रयत्न केला..

" माझ्या घरातल्यांनी त्यांना शब्द दिला आहे ."

" आजच्या काळात तू हे सगळे मानतेस?"

" तो मुलगा, त्याचे घरातले सगळे चांगले आहेत.. माझ्या आईवडिलांनी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल ना.."

" आणि तुझ्या मनाचे काय?"

ती खिन्नपणे हसली.." मला माझ्या आईवडिलांना दुखवायचे नाही. माझ्या ताईने पळून जाऊन लग्न केले. खूप दुखावले होते आईबाबा. तिचा नवराही चांगला नाही. त्याच तिरीमिरीत त्यांनी माझे लग्न ठरवून टाकले. माझी पदवी मिळाली कि लगेच लग्न.."

" पण तिच्या गुन्ह्याची शिक्षा आपल्याला का? मी खरच सुखात ठेवीन तुला. मला कसलेही व्यसन नाही. कॉलेज झाल्यावर वाटल्यास पुढे शिकायला न जाता मी बाबांचा बिझनेस जॉईन करीन..मग तर चालेल?"

" तुझ्या आईबाबांना आवडेन मी सून म्हणून?"

तो थोडा थांबला. त्याला आठवले त्याच्या आईच्या अटी. बाबांना त्यांच्या सर्कल मधली हवी असलेली सून..

"मला थोडा वेळ दे.. मी काढीन त्यांची समजूत.." 

" म्हणजेच तुला खात्री नाही.. दोघांच्याही आईवडिलांना मान्य नसलेले लग्न करण्यात काय मजा?"

" पण मला आयुष्य तुझ्यासोबत काढायचे आहे." तो व्याकुळतेने म्हणत होता..

" आपल्या मनासारखे सगळेच होत असते तर जगात देव राहिला नसता. सोड जाऊ दे मला. तू सोडून मला जे आयुष्य जगायचे होते ते मी या पाच वर्षांत जगून घेतले आहे.. पुढे काय होईल काय माहीत?"

ती निघणार , तेवढ्यात त्याने तिचा हात धरला..." आपल्या सुरूच न होता संपलेल्या प्रेमासाठी एक गोष्ट मागू?" त्याने विचारले..

'सर्वच द्यायची इच्छा आहे रे...' 

" एकदा फक्त एकदा मिठीत येशील?"

आईवडील, कॉलेज, ठरलेले लग्न, होणारा नवरा सगळे विसरून ती त्याच्या मिठीत गेली.....

ते जेव्हा एकमेकांपासून बाजूला झाले तेव्हा दोघांचेही खांदे ओले झाले होते.. तिच्यापासून दूर होत तो म्हणाला..."बस दुआमें याद रखना....."






सारिका कंदलगांवकर

 दादर मुंबई