सर्वसाधारणपणे सर्व चोरांचा दिवस रात्री सुरू होतो. तसा क्ष चा सुद्धा व्हायचा. आठवड्याचे २ दिवस तो त्याचे लक्ष हेरायला बाहेर पडायचा. अर्थातच, त्या वेळी काळोखी रात्र असायची. सगळीकडे शांतता असायची, आणि अशा वातावरणात क्ष ला त्याचे सावज शोधायला पुरेसा वेळ मिळायचा. क्ष ची सुद्धा एक विशेषता होती. तो कधीही माणसे असलेल्या घरी चोरी करत नसे. तो जिथे चोरी करायचा, तेथील व्यक्ती एकतर कोठेतरी बाहेर गेलेली असायची, अथवा ते घर खूप दिवसांपासून बंद असायचं. म्हणजेच क्ष ला असं घर आवडायचं, जे त्या काळात निर्मनुष्य असेल.
त्या रात्रीसुद्धा क्ष चा दिवस रात्री १२:०० ला सुरू झाला. त्याने नेहमीप्रमाणे त्याचे सावज हेरून ठेवलेच होते. हातात नेहमीच्या हत्यारांची पिशवी घेतली, ती पिशवी सॅकमध्ये ठेवली, सॅक पाठीवर लटकवली, आणि निघाली स्वारी चोरी करायला. या सर्वात तो स्वतःच्या घराला कुलूप लावायला विसरला नाही. नाहीतर नंतर अस व्हायला नको, की चोराच्या घरातच चोरी झाली. चोर चोर मौसेरे भाई हे कितीही खर असलं, तरीही कोणत्या चोराला स्वतःच्या घरी चोरी झालेली आवडेल!
त्याच्या आजच्या टार्गेटकडे पोहोचल्यानंतर त्याने अजिबात आवाज न करता बंगल्याचे लॉक तोडले, आणि तो आत घुसला. अपेक्षेप्रमाणे आत कोणीही नव्हते, होता तो प्रचंड काळोख. पण या कामामध्ये क्ष एवढा तरबेज झाला होता, की त्याचे डोळे अंधाराला लगेच सरावायचे. डोळ्यांवरील ताण कमी झाल्यावर त्याने वस्तूंची देखरेख करायला सुरुवात केली. हव्या त्या गोष्टी जमा करून झाल्यानंतर त्याने त्या त्याच्या सॅक मध्ये भरल्या, नि तो परत जायला निघाला.
पायऱ्यांवरून खाली उतरताना अंधारामुळे तो अचानक कोणत्यातरी गोष्टीला अडखळला, त्याचा तोल गेला, आणि आधार घेण्यासाठी त्याने हात पुढे केला. त्याचा हात स्विचबोर्डला लागला, आणि हॉलमधील लाईट चालू झाला. कोणाला पुसटशीही शंका येऊ नये म्हणून तो लाईट बंद करायला जाणार, तेवढ्यात त्याची नजर समोरच्या भिंतीवर पडली. त्या भिंतीवर एक फोटो टांगला होता. तो बघून क्ष ने तात्काळ स्वतःला थांबवले. क्षणाचाही विलंब न करता गोळा केलेले सर्व सामान समोरच्या टेबल वर गोळा करून ठेवले.
थोड्या वेळासाठी क्ष शांत झाला होता. त्याने घरात शोधाशोध केली, आणि एक कागद आणि पेन हुडकून काढला. त्यावर काही लिहिले. तो कागद त्याच टेबलवर ठेवला. आणि परत एकदा त्या फोटोकडे बघितले. लाईट बंद केली, आणि ज्या मार्गाने आला होता, त्या मार्गाने परत गेला.
त्याच दिवशी पहाटे, त्या घराचे मालक घरी परत आले. तुटलेले कुलूप पाहून त्यांना धक्का बसला. आधीच खूप मोठा धक्का त्यांनी सहन केला होता. त्यात हे बघून त्यांना काही सुचनासेच झाले. सुन्न मनाने आणि बधिर पावलाने ते घराच्या आत आले. काही वेळ तसेच अंधारात बसल्यानंतर त्यांनी लाईट चालू केला, आणि त्यांना धक्काच बसला. घरातील सर्व किमती वस्तू, दागिने, कपडे टेबलवर एकत्र ठेवले होते. आणि त्या वस्तूंवर एक चिट्ठी ठेवली होती.
मोठ्या उत्सुकतेने त्यांनी ती वाचायला सुरुवात केली. त्यांना समजत नव्हतं, की हा कोण चोर आहे, ज्याने चोरी करायच्या उद्देशाने सर्व माल तर गोळा केला, पण तसाच ठेवून परत गेला, वर त्यावर चिट्ठीही लिहिली.
आदरणीय सर, तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, की हा नक्की कोण इसम आहे, ज्याने चोरीचा माल गोळा केला, पण चोरी न करताच परत गेला. वर जाता जाता एक चिट्ठीही सोडून गेला..
सर.. तुम्ही मला ओळखत नाही.. तसा मी सुद्धा तुम्हाला ओळखत नव्हतो.. काही वेळापूर्वी.. तर, तुम्हाला सांगायचं, तर मी एक चोर आहे.. एक अट्टल चोर. चोरी करणं, हे माझे आवडते काम आहे. इतर लोकांची जशी डॉक्टर, वकील अशी प्रोफेशन असतात, तसं, चोरी करणं हे माझं प्रोफेशन आहे.
तुमच्या घरी सुद्धा मी चोरी करण्यासाठीच आलो होतो. मी जवळजवळ तुमच्या घरातुन बाहेर पडायच्या बेतात होतो, पण तेवढ्यात माझ्याकडून अनावधानाने हॉलचा लाईट चालू झाला; आणि त्याच दिवशी मला समजले, की मी किती मोठा गुन्हा करत आहे.
नाही सर, मी चोरीबद्दल बोलत नाहीए. त्या तर मी अगणित केल्या आहेत, मोजवायला बसलो तर दिवस अपुरा पडेल. हो, चोरी करणे हा गुन्हा आहे, पण माझ्यालेखी ते माझे काम आहे.
आतापर्यंत मी खूप ठिकाणी चोरी केली आहे. कोणी खूप मोठा राजकारणी आहे, कोणी ऍक्टर आहे, कोणी उद्योगपती आहे, कोणी व्यापारी आहे. पण आज जेंव्हा तुमच्या मुलाचा आर्मी युनिफॉर्म मधील हार घातलेला फोटो बघितला, तेंव्हा दोन मिनिटं मन सुन्न झाले.
सर.. तुमचा मुलगा.. माझ्याएव्हढाच असेल ना.. किंवा माझ्याहून थोडासा मोठा. मी मुद्दामून "असेल ना" असा उल्लेख करतोय, "होता ना" असा नाही. कारण असे लोक फक्त पृथ्वी सोडून जातात.. त्यांचा देह सोडून जातात.. परंतु आपल्या मनात नेहमी अमर असतात...
सर, माझे आजोबा पण आर्मीमॅन होते. लहानपणापासूनच "राष्ट्र प्रथम" ही शिकवण घरात होती. वडील सुद्धा आर्मीत भरती झाले. मलासुद्धा जायचे होते, पण... नशीब खूप वाईट गोष्ट आहे साहेब.. त्यावर विसंबूनही राहता येत नाही.. विश्वासही दाखवता येत नाही.. आणि अविश्वासही दाखवता येत नाही.
दर सुट्टीत काही दिवसांसाठी तरी वडील घरी यायचे.. या वर्षीसुद्धा येतील असे वाटले होते. पण.. वडील येण्याच्या ऐवजी फक्त एक बातमी आली. एक अशी बातमी, जिने एका क्षणात मला पितृछायेपासून पोरके केले. या धक्क्याने कोलमडून शेवटी आईसुद्धा... असो!
मी अजूनही खुप मेहनत करायला तयार होतो सर. पण मी खूप जोरात वास्तवाच्या जमिनीवर आदळलो होतो. आणि परत उभं राहण्यासाठी मला कोणीतरी आधाराचा हात देणं खूप गरजेचं होतं.. एक छोटीशी मदत, आणि मी माझ्या स्वप्नांच्या मागे दौडत सुटलो असतो..
सर, या जगात जर एक माणूस मदतीचा हात देत असेल ना, तर बाकीचे नव्यांणव जण पाय खेचायला बसलेले असतात; कडू आहे, पण सत्य आहे सर.. आणि दुर्दैवाने मला मदतीचा हात देणारा कोणी भेटलाच नाही सर.. भेटले, ते फक्त पाय खेचणारे. आणि त्याचाच परिणाम तुम्हाला दिसतोय सर..
आज तुमच्या मुलाचा फोटो बघितला, आणि मन नकळत भूतकाळात गेलं. याच युनिफॉर्मची आस धरली होती मी कधीकाळी.. याच ठिकाणी पोहोचणं स्वप्न होत माझं. पण ते पूर्ण नाही होऊ शकलं.. मी तर जवळपासही नाही पोहचू शकलो. या जगात जगण्याचा जो सोप्पा रस्ता मला वाटला, तो मी निवडला..
सर्वसामान्य माणस आत्ता काम करू शकत आहेत, कारण कोणीतरी आहे, जो त्यांच्यावरची सर्व संकटे स्वतःवर घेण्याची धमक बाळगतो. कोणीतरी आहे, जो सामान्य माणसे आणि संकटांच्या मध्ये अभेद्य भिंत बनून उभा आहे. आणि अशा व्यक्तीच्या घरी मी चोरी करावी.. ती ही केवळ काही शुल्लक रुपड्यांपाई..
तुमच्या मुलाच्या बलिदानाची साक्ष ठेऊन सांगतो सर, आज पासून मी चोरी सोडली. आजपासून मी सुद्धा काहीतरी काम करून जगणार. कारण सर मी कितीही वाईट चोर असेन, कितीही अट्टल दरोडेखोर असेन, पण मी देशद्रोही नाही.
तुम्हाला वाटत असेल ना, की काय वेडा आहे हा माणूस.. हो सर, आहे मी वेडा.. पण आता चोरी करणं एकदम बंद. आत्तापर्यन्त मी एवढा पैसा नक्की कमावला आहे, की एखादा छोटा व्यवसाय करू शकेन. अर्थातच, ज्या वेळी माझ्याकडे प्रमाणिकतेचे पैसे येतील, तेंव्हा मी या चोरीच्या पैशाची भरपाई सुद्धा करेन..
खूप वेळ घेतला ना तुमचा.. चला.. येतो.. आता दुसऱ्या धंद्याचा पण विचार करायचाय ना.. Changing profession is not a simple thing you know...
पत्र संपले. त्या गृहस्थाने डोळे पुसत पुसत त्याची बॅग काढली.. आणि नुकताच त्याच्या मुलाला मिळालेला \"मरणोत्तर विरचक्र\"चा पुरस्कार न्याहाळत राहिला.