एक करार ! भाग - 7

"कारल्याला कारलचं आवडणार नं.ती हळूच म्हणाली पण त्याला हे ऐकू गेले. तो गालात हसला आणि रुममध्ये गेला.
भाग -7 


मागील भागात 

"यानेच उशीर केला मला आणायला. मी तरी काय करु?" भक्ती विश्वाकडे हात दाखवत म्हणाली. विश्वा दोघींना न्याहळत होता. खासकरून भक्तीला, ती आल्यापासून आई जास्तच खुश राहत होती. थोड्यावेळापूर्वी तो तिच्यावर रागवला होता. आता तिला सॉरी म्हणायचे होते याचाच विचार तो करत होता आणि ती तर त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हती.

आता पुढे -

विश्वा विचार करत असतानाच सत्यन त्याच्याजवळ आला.

"काय रे काय झालं इतका काय विचार करतोय?" 

"ते मला भक्तीला सॉरी म्हणायच होतं." विश्वा.

"का?" सत्यन विचारले.

"कारण मी खूप बोललो, तिला हर्ट केलं."विश्वा.

"बरं मग कसली वाट पाहतोय." सत्यन.

"तिचीच वाट पाहतोय ती तर पाहतही नाहिये माझ्याकडे." विश्वा चेहरा पाडत म्हणाला.

"कशी पाहणार तुझ्याकडे, तू दुखावलं आहे तिला आणि रागाच्या भरात खूप काही बोलून जातो त्यात तुला काही दिसत नाही. "सत्यन.

"काय करु सत्या?" विश्वा सत्यनकडे पाहत म्हणाला.

"ते तुझं तू पहा, मी काहीच नाही करु शकत." सत्यन बोलून निघून गेला. सगळ्यांशी हसून बोलणारी भक्ती, त्यानंतर त्याच्याशी बोलली नाही आणि त्याच्याकडे पाहिले देखील नाही. जेवण झाल्यावर तो रुममध्ये तिची वाट पाहत बसला पण ती आलीच नाही. वाट पाहता पाहताच त्याला झोप लागली अन् तो झोपून गेला. खूप उशिरा ती रुममध्ये आली तर तो झोपला होता, मग फ्रेश होऊन तिने मलम घेतला आणि थोडा सैलसर असा ड्रेस घातलेला होता. तिने दोन्ही दंडांना हळूवार मलम लावला. दंड चांगलाच लाल झाला होता. उशी घेऊन ती सोफ्यावर जाऊन झोपली.
सकाळी नेहमीच्या वेळी तो उठला तर त्याला बेडवर भक्ती दिसलीच नाही तो उठून त्याने बाजूला पाहिले तर ती सोफ्यावर झोपलेली होती.

"बेडवर सुद्धा आली नाही ती, माझा खूप राग आला वाटतं." तो स्वतःशी म्हणाला. तो तिच्याकडे पाहत होता आणि पटकन उठून तिच्याकडे गेला, कारण भक्ती सोफ्यावरुन पडत होती. त्याने लगेचच तिला दोन्ही हातांवर उचलून बेडवर झोपवलं. अशातच त्याचं लक्ष तिच्या दंडावर गेलं, तर त्याला तो दंड लाल झालेला दिसला. त्याला जास्तच गिल्ट येऊ लागले होते. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिर झाली. रेखीव भुवया, लांब तरतरीत नाक, लाल डाळींबच्या दाण्यासारखे लाल चुटूक ओठ तो क्षणभर पाहतच राहिला. पाहता पाहता तो तिच्या ओठांच्या जवळ आला होता. त्याच हृदय तेज गतीने धडधड करत होत. कसेबसे त्याने मनाला आवरले आणि बाहेर निघून गेला. थोड्यावेळाने भक्ती उठली तर तिला ती बेडवर दिसली अन् कपाळावर आठ्या आणून ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली आणि फ्रेश व्हायला निघून गेली. फ्रेश होऊन अंजलीला भेटली. त्यांच्यासोबत नाश्ता केला, त्यांना गोळ्या दिल्या. दोन तीन दिवस भक्तीने अंजलीच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आणि सगळ्यांचा निरोप घेऊन परत मुंबईला रवाना झाले. या दिवसात सतत बोलणारी ती एकदाही त्याच्याशी बोलली नाही. त्याने ही खूप प्रयत्न केले. सॉरी कार्ड लिहून ठेवले तर तिने ते डस्टबिन मध्ये फेकले. फुल देवून झाले पण काहीच नाही. तिला चॉकलेट्स आणले तर तिने ते सगळ्यांना वाटून दिले. राग तर कधीच गेला होता, पण दाखवायचा नव्हता ना भक्ती मॅडमला. भक्ती त्याच्यासोबत बोलत नसल्यामुळे त्याच्याशी भांडत नसल्यामुळे त्याला अस्वस्थ वाटत होते. त्यात तिचं दोन तीन वेळा संजूशी बोलणे ऐकून त्याला \"संजू कोण आहे? तिचा कोण? मित्र की प्रेम करते? कोणी का असेना, असंही एक वर्षापर्यंत ती आपल्या सोबत आहे नंतर ती निघून जाईल. पण मी इतका विचार का करतोय तिचा? कारण मला ती आवडायला लागली की प्रेम करतोय तिच्यावर? का अस्वस्थ होतंय मला ती बोलत नाहीये तर? का मी तिच्यामागे घुटमळतोय.\" असे भलतेसलते प्रश्न निर्माण होत होते. या प्रश्नाने त्याला जास्तच अस्वस्थ होत होते.

"कोणाचा विचार करतोय भक्तीचा?"
"हो." तो नकळत बोलून गेला आणि लगेच भानावर येऊन त्याने सावरले.

"ते .. म्हणजे .. ते .. मी हा विचार करतोय की आई खुप खुश आहे ना भक्ती आल्यापासून." विश्वा अडखळत म्हणाला.

"हो मावशी एकटीच तर खूश आहे. तू कुठे खूश आहे ती तर तुझ्याशी भांडत असते." सत्यन त्याच्या चेहर्‍यावरचे हावभाव वाचण्याचा प्रयत्न करत होता.

"ती तर बोलतही नाही आणि भांडतही नाही माझ्यासोबत." तो चेहरा पाडत म्हणाला.

"म्हणून बारा वाजलेत चेहऱ्यावर मग सरळ जाऊन बोल की, तुझ्याशिवाय करमत नाही प्रेमात पडलोय तुझ्या." सत्यन.

"असं काही नाहीये." विश्वा नजर चोरत म्हणाला.

"मग तू का अस्वस्थ होतोस? का लक्ष लागत नाहीये तुझं? का विचार करतोय इतका? फार्महाऊसवर तिच्यासोबत मॅच खेळलास, कधी नव्हे तू हसायला लागलास. सर्वांसोबत वेळ घालवतोय नाहीतर नुसतं काम आणि काम हेच तुझं जग होतं." सत्यन त्याच्या नजरेला नजर देत म्हणाला. तितक्यात विश्वाचा फोन वाजला आणि बाहेर निघून गेला. फोन वर बोलून झाल तसं तो पुन्हा विचारात पडला .

\"खरचं मी प्रेमात पडलोय का तिच्या? सत्या जे बोलतोय ते बरोबरच बोलतोय.\" यावेळी त्याच्या मनाने प्रश्नाच बरोबर उत्तर दिले आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरले.

"काय मग भेटलं का उत्तर ?" त्याला एकटाच हसत असताना पाहून सत्यनने विचारले.

"हो भेटलं माझं उत्तर मला." विश्वाने हसतच सांगितले आणि सत्यनने त्याला आनंदाने मिठी मारली.

****

सकाळी भक्तीचा मोबाईल वाजला, तेव्हा ती बाथरुममध्ये होती. फोन वाजतोय म्हणून तो टेबलजवळ गेला. त्याला स्क्रिनवर संजू हे नाव दिसले. ते पाहताच त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या.

"या संजूला हिच्याशिवाय चैन पडतं नाही का? या संजूच काहीतरी करायलाच पाहिजे." मनाशी काही ठरवतो आणि ऑफिससाठी तयार होऊन बाहेर न्यूजपेपर वाचत बसतो मग भक्ती ही तयार होऊन बाहेर आली . अंजलीला नाश्ता दिला आणि डायनिंग टेबलवर त्याच्यासाठी नाश्ता लावत होती. तिच्या बांगड्याच्या आवाजाने तो न्यूजपेपर ठेवून वर बघतो, तर तिने आज पिंक अँड व्हाईट फ्लॉवर प्रिंट असलेला चुडीदार ड्रेस घातला होता. केस पिन मध्ये अडकवून बाकीचे मोकळे सोडलेले, एका हातात बांगड्या आणि एका हातात तिचं नेहमीच घड्याळ, चॉकलेटी डोळ्यात बारीक अशी काजळाची रेघ ओढलेली,दाटसर पापण्या, ओठांवर हलकी पिंकशेड लिपस्टिक लावलेली. तो तर तिच्याकडे एकटक बघतच राहिला. हृदय एकदम जोराने पळत होते. भक्तीने स्वतःला वाढले आणि अंजलीसोबत गप्पा मारत खाऊ लागली. विश्वा तर खातांनाही मध्ये मध्ये तिच्याकडे पाहत होता. तिही डोळ्यांच्या कड्यातून त्याला पाहत होती. सरळ सरळ पाहायच नव्हते ना त्याला, रागवली होती ना ती, त्याचे पूर्ण लक्ष तिच्याचकडे होते, ती बोलत असताना तिच्या ओठांची मोहक हालचाल त्याला वेड लावत होती.

"आईऽऽग्गं" तो हृदयावर हात ठेवत हळूच म्हणाला. 

" हूँ , बोल ना विशू, काय म्हणतोय, काय झालं, काही त्रास होतोय का?" अंजली विश्वाला काळजीने  म्हणाली.

"काही नाही असं वाटतं माझं हृदय बंद पडणार." तो एकनजर भक्तीकडे बघत म्हणाला.

"विशू, आधी डॉक्टरांना दाखवून ये बरं." अंजली पुन्हा काळजीने म्हणाली.

"आई त्याची डॉक्टरीन बघत नाही त्याच्याकडे मग दुखणारच नं." विश्वा मिश्किल हसत म्हणाला. भक्तीला तर खूप हसू येत होतं, पण तिने चेहरा निर्विकार ठेवला होता.

"आई, माझ्याकडे हार्टसाठी हेल्दी फूड आहे. मी आलेच हं ." म्हणून ती किचनमध्ये गेली. आणि पटापट तिने हात चालवून ट्रे मध्ये घेऊन आली आणि त्याच्या समोर ठेवले.

"काय आहे हे?" त्याने झाकलेल्या डिशकडे पाहत विचारले. तिने त्या पॉटवरचे झाकण बाजूला केले तर तिथे हिरवा पदार्थ दिसला. एका ग्लासमध्ये ग्रीन ज्यूस होते.

"काय बनवलं बाळा तू ?" अंजलीने विचारले.

"आई, माझी एक मैत्रीण हृदय तज्ञ आहेत तिनेच सांगितलं होतं मला, हा कारल्याचा ज्यूस, कारल्याचा हलवा आणि हे कारल्याचे पराठा." ती एक एक वस्तू दाखवत म्हणाली. विश्वाने सर्व पाहून डोळेच मोठे केले.

"इतकं मी नाही खाऊ शकत तू ही खा थोडं." विश्वा भक्तीला म्हणाला .

"माझ हृदय एकदम ठिकठाक आहे. मला नाही याची गरज ते तुम्हीच खावा आणि हे जर खाल्ले तरच माफी मिळणार." ती हसत म्हणाली. त्याने एक सुस्कारा सोडला.
त्याने खायला सुरवात केली. तो खात होता आणि भक्ती त्याला डोळे मोठे करुन पाहत होती. भक्तीला वाटत होते, त्याची मज्जा येणार तो खाणार नाही. पण तो कुरबूर न करता चेहरा वाकडातिकडा न करता खात होता आणि तिच्याकडे स्माईल देत खात होता त्यात तिला त्याचा जास्तच राग येत होता. तिने मनातच कपाळावर हात मारुन घेतला.

"फिनिश. छान झाले होते सर्व पदार्थ, पुन्हा बनवशील." त्याने सर्व संपवले. तिला हसतच म्हणाला.

"कारल्याला कारलचं आवडणार नं." ती हळूच म्हणाली पण त्याला हे ऐकू गेले. तो गालात हसला आणि रुममध्ये गेला.

"आई याने कसं काय संपवलं?" तिने अंजलीला विचारले. तिला अजूनही आश्चर्य वाटत होते.

" मुळात तो कारले आवडीने खातो. तेही कच्चे." अंजली म्हणाली आणि तिनेच ते खाल्ले असे वाटू लागले आणि तिने तोंड वेडवाकडे केले. तिला पाहून आई हसायला लागली.

"कडू कारलं यॅकऽऽ." त्या विचारानेच तिला मळमळायला लागले.
 ती वर धावतच गेली. ती बेसिनजवळ जाऊन ओकली.

\"मला नुसता विचार आला तर उल्टी झाली याने तर खाल्लं, मानलं पाहिजे याला.\"

"पूर्ण खाऊन तुझी अट पूर्ण केलीय मी, तर आता माफी मिळायला पाहिजे." विश्वा तिच्यासमोर येत म्हणाला.

"ठीक आहे केलं माफ." ती म्हणाली.

"मी इतकं कडू खाल्लं तर मला काही स्वीट मिळायला पाहिजे नं." तो तिच्याकडे मिश्कीलपणे हसत म्हणाला.

"ठीके आणते मी खाली जाऊन." ती म्हणाली आणि जायला वळली तर त्याने तिचा हात पकडून जवळ ओढले तिने त्याच्या छातीवर हात ठेवले.

"मला हे स्वीट हवयं." तो तिच्या गालावर आणि ओठांवर बोट फिरवत म्हणाला. त्याच्या जवळ ओढल्याने तिचं हृदय स्पीडने धावत होत. तो जवळ आला की फुलपाखरे पोटात येऊन नाचायला लागली होती. आता ही त्यांचा भांगडा चालू होता. ती मूर्तीसारखी उभी राहून टकमक पाहत होती. तिला काहीच कळत नव्हते. त्याने गालावर हलकेच ओठ टेकवून तो खाली निघून गेला तरी ही मूर्ती सारखी डोळे वटारुन बघतच होती.फोनच्या रिंगने ती भानावर आली तोपर्यत विश्वा ऑफिसला निघून गेला होता.

क्रमश ...

©®धनदिपा
टिम अहमदनगर



🎭 Series Post

View all