एक करार ! भाग - 4

"मग सत्यन दादालाही घेऊन जा सोबतऽऽ." भक्ती पुन्हा नकळत म्हणाली. हे ऐकून सत्यन आणि विश्वा दोघांना?

एक करार !





भाग - 4





मागील भागाचा सारांश 



      



         विश्वराज भक्तीसोबत एक वर्ष लग्नाचा करार करुन तिला अंजलीजवळ घेऊन आला. अंजलीने तिचा स्विकार करुन तिच्या डोळ्यांसमोर त्यांचे विधीवत लग्न करुन दिले. भटजी बुवांनी कन्यादानाला भक्तीच्या आईवडिलांना बोलावले तेव्हा सत्यनने तिचे कन्यादान केले. लग्न आनंदात पार पडले आणि दोघांनी आशिर्वाद घेतला.





आता पुढे -





अंजलीने रमाला गृहप्रवेशाची तयारी करायला सांगितली. रमानेही लगेच तयारी केली. विश्वराज आणि भक्तीला ओवाळण्यासाठी अंजली दाराजवळ उभी राहिली. रमाने त्यांच्या हातात 



ओवाळणीचे ताट दिले.त्या दोघांना ओवाळून तिला माप ओलांडायला लावले. तिने माप ओलांडून गृहप्रवेश केला. रमाकाकूने एका परातीत लाल कुंकवाचे पाणी करुन ठेवले होते. समोर एक पांढरा शुभ्र कपडा खाली अंथरलेला होता. त्यांनी तिला परातीत पाय ठेवायला सांगितले. अंजली सांगत होती तसं ती करत होती. तिच्या पावलांचे ठसे त्या पांढऱ्या शुभ्र कापडावर उतरले होते. गृहप्रवेश झाल्यावर ते घरात असलेल्या देव्हाऱ्यात जाऊन तेथील देवांसमोर नतमस्तक झाले, त्यानंतर तिला त्यांच्या रुममध्ये आराम करायला पाठवून दिले. सत्यनने रुम छान सजवली होती. बेडवरही फुलांचा गालिचा अंथरलेला होता. सर्व रुमभर फुलांचा सुवासिक गंध दरवळत होता. सजावट पाहून ती आनंदित झाली, ती जाऊन बेडवर बसली. तितक्यात तिथे विश्वराज आला, त्याने रुमवर नजर टाकली आणि त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या, तसाच तो बाथरुममध्ये शिरला. फ्रेश होऊन कपडे चेंज करुन बाहेर आला. मग ती फ्रेश होऊन कपडे चेंज करण्याकरिता तिने कपाट उघडले तर तिथे डिझायनर साड्या, ड्रेस, जिन्स, टॉप, नाईट ड्रेस, गाऊन होते आणि तिच्याजवळील कपडेही त्यात ठेवले गेले होते. तिने त्यातील एक नाईट ड्रेस काढला. फ्रेश व्हायला बाथरुममध्ये गेली. फ्रेश होऊन ती बाहेर आली तेव्हा विश्वराज झोपून गेलेला होता. मग ती आईच्या रुममध्ये गेली.





"आईऽ झोपली नाहीस." भक्ती आईजवळ बसत म्हणाली.





"भक्ती बाळा झोपून झोपूनही कंटाळा आलाय गं. झोप नव्हती लागतं, पण तू अजून का जागी आहेस?"





"मला पण झोप नव्हती येत. मी इथेच झोपू तुझ्याजवळ?" भक्ती अंजलीला म्हणाली.





"अगं विशू तुझी वाट पाहत असेल." अंजली म्हणाली.





"कसलं काय? झोपलाय कुंभकर्ण डोंबल वाट पाहणार माझी." ती हळूच पुटपुटली.





"काय म्हणालीस?" अंजलीने विचारले. 





 "तो आरामात झोपलायऽ, बरं आईऽ, मी तुझ्या पायाला तेल लावून चेपून देते."





"नको गं तू आराम कर, सकाळपासून तुझीही धावपळ होतेय. थकली असणार?"





 "तुझी भक्ती काम करताना काही थकत नसते आई." बोलता बोलता तिने वाटीत तेल घेऊन अंजलीच्या पायाला तेल लावून चोळू लागली. हलकी मालिश करत होती. भक्ती खूप गप्पा मारत होती. तिचे कॉलेजचे किस्से रंगवून सांगून अंजलीला हसवत होती. रमाकाकूही त्यांच्यासोबत हसत होत्या. तिच्या गोष्टी ऐकून अंजलीचा डोळा लागला अन् ती गाढ झोपली. मग भक्तीही तिच्या शेजारी झोपून गेली.





विश्वराज सकाळी त्याच्या वेळेवर उठला तर त्याला भक्ती कुठेच दिसली नाही, कुठे गेली? म्हणून त्याने बाथरुम, किचन, गेस्टरुम पाहिली पण ती तिथे नव्हती. तो आईच्या रुममध्ये गेला तर ती आईच्या जवळ झोपलेली होती. 





"नक्कीच ही जादूगरीण आहे." तो मनात म्हणाला. त्याने दरवाजा ओढून त्याच्या बेडरुमच्या आत जिमसाठी रुम काढली होती. तिथेच जिमचे साहित्य आणि बाथरुमही होते. तो तिथेच त्याचे रुटीन वर्कआऊट करत होता. भक्ती उठली आणि एक क्षण वाटलं आपण कुठे आहे? पण समोर आईचा प्रसन्न चेहरा पाहून तिच्या लक्षात आले की, कालच तिचं लग्न झाले आणि ती या घरात आली.





"गुडमॉर्निंग भक्तीऽऽ" अंजलीने भक्तीच्या कपाळावर किस केले.





"गुडमॉर्निंग आई." ती आईला मिठी मारत म्हणाली.





"आई, मी आवरुन लगेच येते." म्हणत ती तिच्या रुममध्ये गेली.





"हा कुठे गेला खडूसकुमारऽऽ?" ती रुमभर नजर फिरवत म्हणाली.





"गेला असेल उडत मला कायऽऽ?" तिने तिचे खांदे उडवले आणि कपडे घेऊन ती बाथरुममध्ये गेली. तिने तिचा चष्मा काढून ड्रेसिंग टेबलवर ठेवला आणि ती बाथरुममध्ये फ्रेश व्हायला गेली. विश्वा फ्रेश होऊन बाहेर आला. ती ब्लाऊज आणि पेटीकोट घालून बाहेर आली आणि त्याला पाहून किंचाळली.





"आऽऽ" 



विश्वराज तिच्याकडे एकटक बघत होता. पाण्याचे तुषार तिच्या केसांत तिच्या पाठीवर गळ्यावर येत होते. त्याचं असं पाहणे तिला अस्वस्थ करत होते.





"मी रुम लॉक केली होती, मग तू आत कसा आलास? तुला काय लाज लज्जा शरम आहे की नाही. मुलींच्या रुममध्ये असं आत येऊ नये. इतकेही मॅनर्स नाहीत." ती चिडून म्हणाली तेव्हा तो भानावर आला.





"इतक्या मोठ्याने कशाला गळा काढतेस गं? ..माझे मॅनर्स कशाला काढते? तू कपडे घालून यायला पाहिजे होतं, यात माझी काय चूक?" तो तिच्याजवळ येत म्हणाला.





"आत मध्ये साडी कशी नेसू मूर्खा, म्हणून बाहेर आले. बाहेर आल्यावर रमाकाकूला आवाज देऊन त्यांच्याकडून नेसून घेऊ. त्याअगोदरच तू आत आला. आत येण्याआधी नॉक तरी करत जा, ही रुम माझीही आहे." भक्ती ठसक्यात म्हणाली.





"म्हणजे माझ्याच रुममध्ये यायला मी तुला विचारावं." तो आणखी एक पाऊल पुढे आला तशी ती मागे सरकली. तो पुढे आल्याने तिला काय बोलावे हे सुचत नव्हते. आता त्याला तिची मस्ती करायची लहर आली. तो पुढे जाऊन तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढले. त्याच्या अचानक ओढल्याने ती त्याच्या खूप जवळ आली. त्याच्या थंडगार स्पर्शाने तिच्या अंगावर काटा आला, शरीरावरचे लव ताट झाले, तिचे हार्टबिट्स वाढले, श्वास फुलले होते. तिच्या पोटात काहीतरी ढवळाढवळ होत होती पण काय तिला समजत नव्हते. त्याच्या अशा कृतीने ती पूर्ण गोंधळली होती. तिने खाली नजर झुकवली. त्यालाही तिचं गोंधळणं आणि तिची वाढलेली धडधड ऐकू येत होती. त्याने तिच्या चेहर्‍यावर फुंकर मारली आणि ती त्याच्याकडे पाहायला लागली तसा तोही तिच्या चॉकलेटी ब्राऊन डोळ्यांत पुरता हरवला होता. चष्म्याच्या आड लपलेले तिचे सुंदर मृगनयनी डोळे तो आता कुठे पाहत होता. तिच्या डोळ्यांवर असलेल्या दाटसर पापण्यांच्या उघडझापने त्याचे हदय बंद पडते की काय असे त्याला वाटत होते. दारावरच्या टकटकने दोघेही भानावर आले. रमाकाकूने बाहेरुन आवाज दिला. तिने त्याला जोर लावून ढकलले. तो बाजूला झाला आणि बाहेर निघून गेला. भक्ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती. 'काय होत हे?' ती विचार करत होती. रमाकाकू आत आल्या. त्यांनी भक्तीला छान साडी नेसून दिली. पूर्ण तयारी झाली तशी त्यांनी तिला काजळाचा तिट लावला. तितक्यात अंजलीही आली. त्यांनी तिच्या कपाळावरुन हात फिरवून कडाकडा बोटे मोडली. तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तिच्या हातात एक खानदानी हार आणि बांगड्या ठेवल्या. तिला ते घालायला सांगितले. रमाकाकूने तिला घालून दिले. त्या भरलेल्या दागिन्याने तिच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकली. 





"किती सुंदर दिसतेय माझी गोडुली." अंजली म्हणाली, तशी ती गोड अशी लाजली.





"बघ रमा, माझी गोडुली कशी लाजते?" अंजली हसत म्हणाली. तिने खालचा ओठ बाहेर काढून गालही फुगवले. भक्तीला तसे पाहून अंजलीला हसायला आले. त्यांनी तिचे एक हाताने गाल ओढले आणि दुसऱ्या हाताने नाक ओढले.





"आईऽऽ" भक्ती लटक्या रागाने म्हणाली.





"चल आता भटजी बुवा वाट पाहत आहे." अंजली म्हणाली. त्या तिघीही रुमच्या बाहेर आल्या. बाहेर हॉलमध्ये पुजेची सर्व तयारी झाली होती. पहिल्यांदा अंजली, रमा बाहेर आल्या त्यांच्या मागे भक्ती येत होती. त्या दोघींच्या मागे असल्याने विश्वाला ती दिसत नव्हती आणि तो तिला इकडून तिकडून पाहण्याचा प्रयत्न करत होता,त्याची ही धडपड अंजलीला, रमाला आणि सत्यनला समजत होती आणि ते त्याला पाहून गालातल्या गालात हसत होते. त्या दोघी बाजूला झाल्या आणि विश्वाला भक्तीचा चेहरा दिसला, त्याच्या हृदयाचा ठोकाच चुकला.





"आऽई गंऽ!" त्याच्या तोंडून अस्पष्ट असे शब्द निघाले. नकळत त्याचा हात त्याच्या हृदयावर गेला. आज वेगळच काहीतरी होतयं पण काय हे त्याला ही समजत नव्हते ,ती त्याच्याजवळ येऊन पुजेला बसली. भक्तीने देवाला नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद दिला. मग सर्वांच्या जोडीने पाया पडले. जेवण करतांना अंजलीने विश्वाच्या हातात एनव्हलप दिले.





"काय आहे यात?" तो गोंधळून म्हणाला





"ओपन करू पहा." अंजली म्हणाली आणि त्याने उघडून पाहिले.





"मी अजिबात जाणार नाही."तो अंजलीला म्हणाला.





"अरे जाऊन या तुम्ही." अंजली म्हणाली.





"जाऊन ये की तू ?" भक्ती नकळत म्हणाली.





"एकटा जाऊन काय करणार आहे तो" अंजली म्हणाली.





"मग सत्यन दादालाही घेऊन जा सोबतऽऽ." भक्ती पुन्हा नकळत म्हणाली. हे ऐकून सत्यन आणि विश्वा दोघांनाही ठसका लागला. भक्तीने दोघांनाही पाणी दिले. त्यांना बरं वाटायला लागले.





"तुमच्या हनिमूनमध्ये मी काय करणार आहे?" सत्यन म्हणाला.





"क्कायऽऽ हनिमूनऽऽ" आता भक्तीला जोरात ठसका लागला. अंजलीने भक्तीला पाणी दिले.





'ह्या डुक्करसोबतऽऽ हनिमूनला जाण्यासाठी मला कायऽ वेड लागलयं का? अजिबात नाही.' ती पाणी पिता पिता विचार करत होती.





"हो बाळा तुम्हाला आठ दिवसानंतर पॅरिसला जायचं आहे." अंजली म्हणाली.





"आई कसं शक्य आहे हे? मी तुला एकटीला सोडून कुठेही जाणार नाही." भक्ती 





"आम्ही कुठेच जात नाहीये." विश्वराज.





"विशूऽऽ" आईने त्याला हाक मारली.





"नाही आई आता काहीच नाही, सर्व तुझ्या म्हणण्यानुसार केले आहे. यात तुझी खूप दगदग झाली आहे. आता काहीच नको. आम्ही तुला सोडून कुठेही जाणार नाही." तो ठामपणे म्हणाला.





"विश्वा, आत्ताच तर तुमचं लग्न झालयं हेच दिवस असतात रे सोबत फिरण्याचे, एकमेकांना ओळखण्याचे,समजण्याचे." अंजली त्याला समजावत म्हणाली.





भक्ती आणि विश्वराज हनिमूनला जाण्यास तयार होतील का? काय असेल निर्णय? पाहूया पुढच्या भागात.



क्रमश ..



धनदिपा 



टिम अहमदनगर 






🎭 Series Post

View all