एक करार ! भाग -6

"यू कॉल मी मॉम. बरोबर ना." अंजली भक्तीला टाळी देत म्हणाली आणि त्याला दुसरा धक्का बसला.

भाग - 6

  सकाळी नाश्ता करुन लवकरच ते फार्महाऊस साठी निघाले. गाडीतही तिची चटरपटर चालूच होती.

"हिची गाडी बंद पडत नाही का?" विश्वाने प्रश्नार्थक नजरेने सत्यनला विचारले. त्याने हसून मान डोलावून नाही म्हटले. 

आता पुढे - 

      बाहेर छान गार वारा सुटला होता. डोळ्यांना छान हिरवी वनराई दिसत होती, त्यामुळे मन प्रसन्न होत होते. दोन तीन तासांच्या प्रवासानंतर ते फार्महाऊसवर पोहचले. गेटमधून आत गेल्यावर मोठे घर, घर कसले बंगलाच होता. बाहेरच एक पांढऱ्या संगमरवर दगडाचा केलेला वॉटर फाऊंटन, आजूबाजूला मोठमोठी झाडे,आत गेल्यावर जुन्या आणि आधुनिक पद्धतीचा वापर करण्यात आलेला होता. बंगला खूपच सुंदर दिसत होता. भक्ती तर भलतीच खुश झाली होती. ते सर्व गाडीतून खाली उतरले तसे कमला आणि मंगल धावत अंजलीजवळ आले.

"कशा हाय ताईसाहेब?" मंगल,कमला तिला नमस्कार करत म्हणाले.

"मी ठीक आहे दादा, तुम्ही दोघं कसे आहात?" अंजली त्या दोघांना म्हणाली.

"ही भक्ती विशूची बायको, लग्न जरा घाईगडबडीत झालं म्हणून कळवता नाही आलं." अंजली त्यांची भक्तीशी ओळख करुन देत म्हणाली.

"भक्ती हे माझे मंगल दादा आणि कमला वहिनी, आपल्या फार्महाऊसची देखरेख करतात. जेव्हा आपल्याकडे काहीच नव्हते, तेव्हाही यांनी आपली साथ सोडली नव्हती. आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत हे दोघंही." तशी भक्ती त्या दोघांच्या पाया पडायला खाली वाकली.

"हे काय कराताय बेटाजी." मंगल भक्तीला अडवत म्हणाला.

"आशिर्वाद घेतेय काकाजी." भक्ती म्हणाली आणि त्या दोघांच्या पाया पडली. मग विश्वानेही त्या दोघांच्या पाया पडल्या. आपल्याप्रती इतके प्रेम, आदर पाहून मंगल आणि कमलाचे डोळे भरुन आले.

"आई, किती सुंदर आहे हे. " ती इकडे तिकडे फिरत बघून म्हणाली.

"तुला आवडल न?" अंजली.

"भयंकर आवडलं आपल्याला." ती खुश होत म्हणाली. 

आत आल्यावर फ्रेश होऊन सर्व बाहेर आले. तर कमलाने आज पंचपक्वान्न बनवले होते. जेवण झाले, तसे भक्तीने अंजलीला गोळ्या औषधी देऊन आराम करायला भाग पाडले आणि अंजली लगेच तयार झाली. भक्ती अंजलीचे पाय चेपून देत होती, त्यातच तिला झोप लागली. दुरुनच विश्वा त्यांच्याकडे पाहत होता. स्पेशली भक्ती आल्यापासून आईला किती जपतेय हे तो पाहत होता. विश्वा बाहेर निघून गेला. अंजली ही गाढ झोपली मग भक्ती तिच्या रुममध्ये निघून गेली. रुममध्ये येऊन तिने फोन लावला.

"हॅलो संजू काम कसं चालू आहे. सर्व डन ना, ती एलिना फर्नांडिसचं काम झालं का?"

"नाही,असं कसं म्हणता, लवकरात लवकर मला काम झालेल पाहिजे. मी येईल लवकरच ओके. बाय." म्हणून ती मागे वळली तर मागे विश्वा दरवाजाला टेकून तिच्याकडेच बघत होता. ती गोंधळली.

"काय मग?" त्याने भुवया वरती करत विचारले.

"कुठे काय,काहीच नाही." ती भोळा चेहरा करत म्हणाली अन् लगेच बाहेर निघून गेली.तो रुममध्ये येऊन त्याचे काम करत बसला.

"बरं झालं त्याला संशय आला नाही." ती मनातच म्हणाली.

"कोणाशी बोलत होती ही, हा संजू कोण आहे?" ती गेल्यावर विश्वा विचारात पडला होता. ती बाहेर गेली आणि कमला सोबत बाहेरचा मागचा परिसर सगळीकडे फिरुन आली. कमला तिला आजूबाजूची माहिती देत होती. मध्येच विश्वाच्या लहानपणीचे किस्से सांगत होती. भक्ती मन लावून सर्व ऐकत होती. त्यांना मूलबाळ नव्हते विश्वाला ते पोटच्या पोरापेक्षा जास्त माया लावत होते.अंजलीने किती प्रेमाने माणसांना जवळ केले होते. अंजलीचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि तिला भरुन आलं आणि घळाघळा तिच्या डोळ्यांतून अश्रू बाहेर पडले.

"तू अशी रडलीस,कमजोर पडलीस तर विशूला आणि ताईला कोण सांभळणार?"

"खरयं तुमचं काकी मला स्ट्राँग रहायला हवं." ती डोळे पुसत म्हणाली आणि उठून अंजलीच्या रुममध्ये चहा घेऊन आली. अंजलीने चहा घेतला. मग ती विश्वाच्या रुममध्ये त्याला उठवायला गेली, तर तो झोपलेला होता. ती त्याच्याजवळ उभी राहिली .

"झोपलाय तर किती शांत वाटतोय न हा, नाहीतर नुसती मै मै चालू असते याची." ती हळूच म्हणाली.

"माझी मै मै चालू असते का तुझी ?" विश्वा डोळे उघडून तिच्याकडे पाहत म्हणाला.

"तू जागा होता म्हणजे?" भक्ती एक हात कंबरेवर ठेऊन म्हणाली.

" हो." तो हसत म्हणाला.

"चहा पिण्यासाठी बाहेर येतो नं, तुझ्यासाठी सरप्राईज आहे." म्हणून ती निघून गेली आणि विश्वराज फ्रेश होऊन बाहेर आला. 

बाहेर सत्यन, विश्वा चहा पित गप्पा मारत बसले होते की, भक्ती त्याच्या मागे येऊन उभी राहिली. तिने ब्ल्यू टॉप आणि जीन्स घातली होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. डोळ्यांत एक चमक होती. साध्या अवतारातही ती सुंदर दिसत होती. तो तिच्याकडे पाहतच राहिला. तीही त्याच्याकडे पाहत होती. भक्ती बाजूला झाली तसे त्याचे डोळे मोठे झाले आणि चेहर्‍यावर मोठ्ठी स्माईल आली. त्याच्यासमोर त्याची आई जीन्सटॉप आणि डोळ्यांवर गॉगल लावून उभी होती. तो आश्चर्याने पाहत होता.

"आई." विश्वाने आवाज दिला.

"यू कॉल मी मॉम. बरोबर ना." अंजली भक्तीला टाळी देत म्हणाली आणि त्याला दुसरा धक्का बसला.

"ओ माय माय मासी यू लुकिंग सो ब्युटीफूल." सत्यन ही त्यांच्याच अंदाजात अंजलीला मिठी मारत म्हणाला.

"आई खूप गोड दिसतेय." विश्वराज मिठी मारत म्हणाला. 

"अजून एक सरप्राईज बाकी आहे." असं म्हणत तिने शिट्टी वाजवली आणि एक बाईक तिच्यासमोर उभी राहिली. अंजलीपुढे जाऊन बाईक वर बसली आणि तिच्या मागे भक्ती बसली. अंजलीने बाईक स्टार्ट करुन निघाली.विश्वा तर पाहतच राहिला अंजली गेली त्या दिशेने, त्याने पटकन दुसरी बाईक घेतली. तो आणि सत्यन गाडीवर बसून त्यांच्यामागे गेले. विश्वाला भक्तीचा भयंकर राग येत होता. सत्यन त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होता.अंजली सराईतपणे गाडी चालवत होती. एक राऊंड मारुन ते घरी आले. अंजली खूप खूश होती. तो आनंद तिच्या चेहर्‍यावर दिसत होता. विश्वा पटकन भक्तीचा हात जोरात खेचून तिला बाजूला घेऊन गेला.

"तुला काही अक्कल आहे का? आईची कंडीशन माहितेय न तुला तरीही तू घेऊन गेलीस. तिला काही झालं असतं, तर मी तुला सोडलं नसतं." तो तावातावाने बोलत होता. दंडावरची पकड घट्ट झाली होती. तिचा हात दुखायला लागला होता.त्याचा त्रास भक्तीच्या चेहऱ्यावर दिसत होता.

"आहऽ हात सोड माझा दुखतोय." ती कळवळली. लगेच तिच्या डोळ्यांत अश्रू आले. त्याला तिचे अश्रू दिसले अन् हाताची पकड सैल झाली. ती त्याचा हात झटकून निघून गेली. तोही निघून गेला.

"आई तू बरी आहेस ना?" विश्वा अंजलीजवळ येऊन काळजीने म्हणाला.

"हो विशू मी ठीक आहे. खूप फ्रेश वाटतयं मला." अंजली उत्साहात म्हणाली. भक्ती चेहरा व्यवस्थित करुन स्माईल करत आली.

"थँक्य यू बाळा, मला खूप इच्छा होती अशी मस्त बाईक चालवायची पण कधी वेळच मिळाला नाही." ती हसून भक्तीला म्हणाली. ती हसली आणि तिच्या समोर येऊन बसली. हे ऐकून तर विश्वाला अपराधी वाटत होते. रागाच्या भरात तिला दुखावले होते.

"तू खुश ना बस्स ! अपुन को फिर क्या चाहिए." ती तिच्या अंदाजात म्हणाली. विश्वाच्या चेहऱ्यावर हलकेच हसू पसरले. अंजलीने भक्तीचा चेहरा ओंजळीत घेतला आणि कपाळावर ओठ ठेवले. 

"तू लवकर का नाही आलीस?" अंजलीने भक्तीला विचारले.

"यानेच उशीर केला मला आणायला. मी तरी काय करु?" भक्ती विश्वाकडे हात दाखवत म्हणाली. विश्वा दोघींना न्याहाळत होता, भक्ती आल्यापासून आई जास्तच खुश राहत होती. थोड्यावेळापूर्वी तो तिच्यावर रागवला होता. आता तिला सॉरी म्हणायचे होते याचाच विचार तो करत होता आणि ती तर त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हती.

बघूया विश्वराज तिला सॉरी कसा म्हणतो?

क्रमश ...

©® धनदिपा

टिम अहमदनगर 

🎭 Series Post

View all