एक करार ! भाग -2

"सत्या, बघ ना आई कशी वागतेय ती समजून घेत नाहीये. मला त्या भानगडीत पडायचचं नाहीये यार." "मग ठीक आहे,

भाग -2





 मागील भागात- 





     विश्वराज हॉस्पिटलला जात असतांना मध्येच तिचे आणि त्याचे जोरदार भांडण झाले. सत्यनने मध्यस्थी करून भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. हॉस्पिटलमध्ये त्याची आई बेडवर पडलेली होती. आई त्याच्यासोबत अवाक्षरही बोलली नाही. तिने तोंड फिरवून घेतले. जावळे अंकलने त्याच्यासमोर पेपर्स ठेवले. त्याने ते पेपर वाचले आणि त्याला टेंशन आले. डॉक्टरांनी त्याच्या आईला खूश ठेवायचे सांगितले .







आता पुढे -



             \"विश्वराज अंजली अभ्यंकर\" हा आपल्या कथेचा नायक. अंजली इंड्रस्टीयलचे मालक. अवघ्या तीन ते चार वर्षात तो देशातील नंबर वन वर आला होता. अंजली त्याची आई तिला कॅन्सर झाला होता, अगदी शेवटची स्टेज होती. त्या थोड्याच दिवसांच्या सोबती होत्या आणि हे त्यांनाही माहिती होते. पुढचे जितके आयुष्य मिळेल ते त्यांनी मनमुराद जगायचे ठरवले होते.



 विश्वराजसमोर त्यांनी लग्नाची अट ठेवली होती, कारण त्यांना विश्वराजची काळजी होती. आपल्यानंतर विश्वराज एकटा राहू नये, त्याच्यावर भरपूर प्रेम करणारी,त्याला सांभाळणारी अशी एखादी व्यक्ती त्याच्या आयुष्यात असावी, असे त्यांना मनोमन वाटत होते. सत्यन,आईशिवाय या जगात त्याचे कुणीही नव्हते. विश्वराजचे लग्न होऊन त्याला सुखी संसारात पाहून त्या डोळे मिटायला मोकळ्या होणार होत्या. त्यांच्यासमोर खूप संकटे आले पण त्यांनी कधी हार मानली नव्हती. विश्वराजच्या बाबांनी त्यांचा विश्वासघात केला आणि ते वेगळे झाले. विश्वराजने लहानपणापासूनच आईचा संघर्ष, होणारा त्रास आणि एकट्यात रडतांना पाहिले होते, म्हणून तो कोणालाच लग्नाची कमिटमेंट द्यायला तयार होत नव्हता. त्याच्यामागे मुलींची रांग होती,पण त्याने कोणालाच भाव दिला नाही. त्याची क्लासमेट रिचा त्याच्यावर फुल्ल फिदा होती. तिने त्याला प्रपोज केले, पण त्याने स्पष्ट नकार दिला होता.तो तिला फक्त मैत्रीण म्हणूनच पाहत होता. त्याने तिच्यासोबत बोलणेही कमी केले होते.





 आईला दोन दिवस झाले घरी येऊन पण ती अजूनही विश्वराज सोबत बोलली नव्हती.





"सत्या, बघ ना आई कशी वागतेय ती समजून घेत नाहीये. मला त्या भानगडीत पडायचचं नाहीये यार."





"मग ठीक आहे, जे चालतयं ते चालूदे, जिवंत असेपर्यंत मावशी तुझ्याशी बोलणार नाही आणि ते घरही विसर."





"काय बोलतोस तू ?" विश्वराज चिडून म्हणाला.







"त्यांना खूश ठेवायचं असेल तर तूला हे करावंच लागेल." असे बोलून तो बाहेर पडला. 



विश्वराज विचार करत बसला. नंतर त्याने सत्यनला बोलावून त्या दोघांमध्ये गंभीर चर्चा झाली.





*******



  एक गाडी तिच्याजवळ थांबली. आतून सत्यन बाहेर आला.





"हाय भक्ती." सत्यनने तिला हसून ग्रीट केले.





"हाय." ती हलके हसत म्हणाली. 





"तुम्ही त्या माकडतोंड्या सोबत होते ना?" सत्यन गालात हसला. 





\"बरं झाले त्याला आणले नाही.\" तो मनातच म्हणाला.





"मला थोडं बोलायचं आहे?"





"बोला."





"इथे नको, रेस्टॉरंटमध्ये जाऊया."





"ओके." ती त्याच्या सोबत गाडीत बसली आणि ते एका रेस्टॉरंट मध्ये गेले. तिथे ते एका प्रायव्हेट कॅबिनमध्ये गेले. त्याने आधीच बुक केले होते.





 "हंऽ बोला." तितक्यात वेटर ऑर्डर घेण्यासाठी आला.





 "काय घेणार तू?"





"काहीच नाही."





"प्लिज काहीतरी ऑर्डर कर."





तिने एक आले घातलेला कडक चहा आणि खारी ऑर्डर केली. तो वेटर सत्यन कडे पाहू लागला अन् सत्यन वेटरकडे. सत्यनने त्याला कोल्ड कॉफी आणि चहा खारीची ऑर्डर दिली. पोटात तर कावळे, उंदीर सर्वच मारामारी करत होते, पण सध्या तिने चहा खारी मागवली. सकाळ पासून फिरुन फिरुन जाम वैतागली होती. सकाळच्या चहावर तिने तो दिवस कसाबसा काढला होता. चहा खारी खाऊन ती त्याच्याकडेच पाहत होती. त्याने लांब श्वास भरला आणि बोलायला सुरवात केली.





"भक्ती, तू प्रॉब्लेम मध्ये आहेस हे मला माहिती आहे,घर नाही की नोकरी नाही. सध्या तू कुठे राहते ते ही मला माहितीये. नोकरी व घर शोधतेय आणि इतक्या मोठ्या शहरात घर सहजासहजी मिळत नाही. माझ्याकडे तुझ्यासाठी एक ऑफर आहे."





"कोणती?"





"तुला माझ्या मित्रासोबत लग्न करावं लागेल."





"कायऽऽ?"





"हो, तेही करार पद्धतीने."





"क्कायऽ!" ती मोठ्याने ओरडली. प्रायव्हेट कॅबिनमध्ये असल्यामुळे तिचा आवाज बाहेर गेला नव्हता, पण त्याच्या कानाच्या पडद्यांना त्रास झाला असणार, कारण तो कानावर हात ठेवून त्रासिक चेहर्‍याने तिच्याकडेच पाहत होता.





"डोकंबिकं फिरलंय का तुमचं? की घेऊन आलात?काहीही बडबड करताय, मी काय तसली मुलगी वाटली का? वर्षभर ठेवा नंतर द्या हाकलून. तसंही तुमच्या सारख्या मोठ्या लोकांना नात्याची किंमत कशी कळणार?स्वार्थासाठी नात्याला पणाला लावणारे तुम्ही लोक काहीही करु शकता. तुम्हाला नात्यांची किंमत काय कळणार? ते तर आमच्या सारख्या अनाथांना कळते.ज्याच या जगात कुणीच नाही.आई ,बाबा,भाऊ, बहिण, कुणीच नाही." बोलतांना तिचा कंठ दाटून आला होता. महतप्रयासाने तिने डोळ्यांतील अश्रू डोळ्यातच लपवले.





"स्वार्थच आहे आमचा, पण त्या बदल्यात मरणाऱ्या माणसाची इच्छा पूर्ण करुन त्यांना काहीवेळ आनंद देऊ शकतो. माझ्या मावशीची शेवटची इच्छा आहे की, तिच्या मुलाने लग्न करावं, पण त्याला लग्न करायचं नाही आणि आईला दुखवायचे ही नाही."







"का नाही करायचे लग्न?"







"आहे पर्सनल."







" तसा वगैरे आहे की काय तुमचा मित्र? "





 "तसा म्हणजे कसा?"





"इम्पोर्टेड ,गे वगैरे आहे की काय? म्हणून लग्नाला नाही म्हणतोय."





"ये माझी आई तसं काही नाहीये. तो तसा नाही."





"आणि आईला हे कराराचे माहिती पडले तर?"





"आम्ही काहीच सांगणार नाही तिला आणि कोणालाही सांगू देणार नाही."





 "पण तुम्ही मलाच का सांगताय? हे तर कुणीही करु शकते?एखादी नाटकातील मुलगी द्वारे तुम्ही हे नाटक करु शकता. मीच का?"





"कारण तू नाटक करणार नाही.जर अनोळखी आजींसाठी तुझ्या डोळ्यांत पाणी येऊन तू त्यांना तुझ्या कॉलेजची फी देऊ शकते, तर इथे तर तुला एक आई मिळेल." तो तिचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होता.







" तसं तुझं नुकसान काहीच नाहीये. तुझी सर्व जबाबदारी माझी. तुझ्या कॉलेजची फी मी भरणार आणि तुला आईचं प्रेम ही मिळेल." ती विचार करत होती. सत्यनने तिला बरोबर इमोशनल केले.





"कोण आहे तो मित्र?"





"तू ओळखतेस त्याला."





"तो माकड !" तिने डोळे मोठे करत विचारले. सत्यनने मान हलवून होकार दिला. 



"त्या खडूस, रागीट रेड्यासोबत लग्न. मी नाही हा, सॉरी हं. "



तिने तिची पर्स उचलली आणि निघायला लागली.





"त्याच्या आईची शेवटची इच्छा." सत्यन चेहरा पाडत म्हणाला आणि ती जागीच थांबली.





"ओके."





"पण माझ्यास काही अटी आहेत."





"बोल न."





"ते म्हणजे आमच्यात नवरा बायकोसारखे संबंध नसणार. तुम्हाला कळलं ना मला काय म्हणायचे आहे."





"हो कळलं मला, यू डोन्ट वरी तो तसा काही करणार नाही. त्याला ही हे नकोय."





" मग ठीक आहे, पण त्या घुबडाला माहिती आहे का?"





"सिरीयसली घुबड?"





" मग काय आहेच त्याचे डोळे तसे घुबडासारखे,त्यालाही अंधारात दिसतं ना." ती हसत म्हणाली आणि सत्यनने मनातच कपाळावर हात मारुन घेतला.





"त्याला हे माहिती नाही की, ती मुलगी तू आहेस, पण तो मला नाही म्हणणार नाही याची मला खात्री आहे."





"उद्या सकाळी नऊला तयार रहा मी येईल."





"ठीक आहे." म्हणून ती निघून गेली.





  आता वेळ होती त्याला सांगण्याची, तो लगेच विश्वराजकडे निघाला.





"विश्वा, तू म्हटल्याप्रमाणे मी शोधली. हा घे तिचा बायडोटा आणि फोटो." तो एक एनव्हलप विश्वाकडे देत म्हणाला. त्याने तो एनव्हलप घेतला आणि टेबलच्या ड्रॉवर मध्ये ठेवून दिला.





"विश्वा, आधी पाहून तर घे."





"नको तू पाहिली आहेस ना म्हणजे झालं. तुला पसंत मग मलाही पसंत."





"तरी पण तू पाहून घे." त्याने तो एनव्हलप बाहेर काढला. त्याने नाव वाचले.





नाव - भक्ती रणदिवे.





"रणदिवे कुठे तरी ऐकलयं रे, पण आठवत नाहीये." विश्वराज.





"ऐकलं असेल कुठे तरी." सत्यन.





वय - 22





शिक्षण - बी कॉम.





उंची - पाच फूट सहा इंच. 





रंग -  





रक्तगट - 





आवड - … .





"इतकं मी नाही वाचत रे." विश्वराज.





"ठीक आहे पण फोटो तर एकदा बघून घे."





त्याने फोटो हातात घेऊन पाहिला .





"हि मारकुटी म्हैस." तो चिडून म्हणाला.





"नाही हा, पाहिलंस नं तू त्यादिवशी कशी अंगावर धावून येत होती ती." तो आठवत म्हणाला.





\"ती म्हैस हा रेडा दोघांची जोडी मस्तच आहे.\" तो ओठातच पुटपुटला.





"काही म्हणालास का?" विश्वराजने भुवया उंचावून विचारले.





"नाही काहीच नाही." सत्यन हलकं हसत म्हणाला.





विश्वराज लग्न कराराला तयार होईल का? रणदिवे हे नाव त्याने कुठे ऐकले आहे? अंजली भक्तीचा स्विकार करेल का? हे जाणून घेऊया पुढच्या भागात ..



क्रमश ..



©® धनदिपा 



टिम -अहमदनगर


🎭 Series Post

View all