एक कळी जी कधी फुललीच नाही

एक अस्वस्थ कथा
        
तुझी आणि माझी ओळख चित्रांवरून झाली. खरं म्हणजे कोणाच्या फेसबुक मध्ये जाऊन त्याचे मित्रं, फोटो, त्याच्या पोस्ट किंवा कॉमेंट्स पाहणं म्हणजे एखाद्याच्या घरात न विचारता घुसून सामानाची उचका पाचक करण्या सारखं अपराधी वाटतं मला. पण कुणास ठाऊक,तुझं अकाउंट कसं सापडलं माहित नाही. पण तुझ्या पोस्ट अशा जगावेगळ्या होत्या की मी स्वतःला रोखू शकलोच नाही. कधी या शतकातल्या तर कधी मागच्या शतकातील कलाकारांच्या कलाकृतीच्या पोस्ट असायच्या तर कधी अचानक एखादी सुंदरशी कविता असायची. कधी विचार करायला लावणारा लेख. तर कधी काही अंतर्मुख करणारे कोटेशन. खरं तर हे असं पाहणं योग्य नव्हतं. पण माझं अकाउंट उघडलं की न कळत तू नवीन काय पोस्ट टाकली असेल याच्या बद्दल उत्सुकता असायची. आणि खरोखरच रोज काहीतरी नवीनच असं काही असायचं की तुझ्या पोस्ट मध्येच तुझ्या उच्च अभिरुचीचा प्रत्यय यायचा. न कळत एखादी मंद वाऱ्याची झुळूक यावी किंवा अचानक धुंद  सुगंधाची लाट यावी, किंवा वेड लावणाऱ्या कवितांनी मनाला मोहून टाकावं असं या प्रखर वास्तववादी जगात जगता जगता होऊन जाई. मग हे रोजचच झालं. तुझ्या न कळत तुझ्या पोस्ट वाचून पाहून समृद्ध होणं नेहमीचच झालं.

तुझ्या बद्दलची माहिती जी तू फेसबुक वर टाकलेली होती. त्या वरून कळत होतं की तूलाही पेंटिंगची आवड होती. तू गावच्या कोणत्यातरी आर्ट कॉलेज मध्ये फाईन आर्टस चा कोर्स करत होती.

वयाने तू माझ्य मुलीच्याच वयाची,  पण न कळत आपण फेसबुक वर कधी फ्रेंड झालो कळलंच नाही. वयाचा प्रश्न कुठे निर्माण झालाच नाही. सारखं कला आणि कविता या बद्दलच बोलणं असायचं. अगदी सोप्या शब्दात तू चित्राचं एखादी कविता समजावून सांगावी असं रसग्रहण करून सांगायची की चित्रं डोळ्यांनी दिसायच्या ऐवजी मनाने अजून खोलवर दिसायला लागायचं. त्याचे रंग अजूनच काळजाला जाऊन भिडत.तुझ्या समजावून सांगण्याने चित्रं एक कविताच बनून जाई.

आठवतं का तूला तू एकदा राजा रविवर्मा आणि मुळगावकर यांच्या चित्रांमधील स्त्रीयांमधील फरक  समजावून सांगितला होता.तू म्हणाली होती की तुम्ही जरा बारकाईने बघा, चित्रकार झाला तरी रविवर्मा  शेवटी एक राजाच होता.त्याच्या अवती भवती असणाऱ्या स्त्रिया या राजघराण्यातल्या, फारशी कष्टाची सवय नसलेल्या, श्रीमंतीच तेज असणाऱ्या पण शारीरिक दृष्टीने थोड्या कमजोरच असणार, आणि चित्रातही त्या तशाच दिसणार, त्या उलट मुळगावकरांच्या चित्रातल्या स्त्रिया कष्ट करणाऱ्या, त्यामुळे सुदृढ दिसतात. त्या मुळे रविवर्माने काढलेली शकुंतला राजस्त्री वाटेल आणि मुळगावकरांची शकुंतला सुदृढ आश्रम कन्या वाटेल. हा फरक तू दाखवल्या वर दिसायला लागला. चित्रं बघता बघता वाचता यायला लागली.

मधेच तू  कधी कविता पाठवायची. मधेच रंगांबद्दल एव्हढं रंगून बोलायची की त्या वेळी रंग आणि तू एकच होऊन जायचीस. तूला तेंव्हा वेगळं अस्तित्वच नसायचं. तू स्वतः काढलेली चित्रं पण एक वेगळाच इतिहास असायचा. त्या चित्रांमध्ये तू कुठं तरी कोणत्या तरी रंगाच्या छटेत असायचीच असायची.

मी एकदा तुला विचारलं
तुझा आवडता रंग कोणता ग.
तू म्हणालीस, असं कधीच नसतं. प्रत्येक रंगाच स्वतःच एक वेगळं अस्तित्व असतं.व्यक्तिमत्व असतं. एक जरी रंग नाहीसा झाला तर सगळा समतोलच बिघडतो. नुसती कल्पना करा इंद्रधनुष्यातला एखादा रंग तुम्हाला कमी करायला सांगितला तर कोणता कमी कराल. आणि खरं सांगू का, आईला कशी सगळी मुलं आवडती असतात तसेच मला सगळेच रंग आवडतात.
नंतर स्वतःशीच बोलल्या सारखं बोलली की,
तरी देखील प्रत्येकाचा स्वतःचा म्हणून  एक आवडता रंग असतो. तो रंग आयुष्यात सापडण्या साठीच प्रत्येक कलावंताची धडपड सुरु असते. गंम्मत म्हणजे तो रंग कधी कधी आपल्या मनातच असतो.आणि तो कुठेही सापडतो.

मला क्षणभर तुझा त्या रंग समाधीचा हेवा वाटला. नंतर काळजी पण वाटली की तुझं या वास्तव जगात कसं होणार.

कुठं तरी तुझ्या मनात स्वप्न होतं. मुंबईला यावं. जे. जे. स्कुल ऑफ आर्ट पाहावं, जहांगीर आर्ट गॅलरीत स्वतःच्या चित्रांचं प्रदर्शन भरवावं. स्वप्नच स्वप्न.
किती बोलणं व्हायचं. चित्रांबद्दल बोलता बोलता आपण कधी कधी कधी स्वतः बद्दल बोलायची.त्या मुळे एकमेकांना न भेटताच तू मला खूप जवळची आणि ओळखीची वाटायला लागली. तुझ्या मनाचे कंगोरे, कानाकोपरा चांगलाच परिचित झाला.

मुबईतला काळाघोडा फेस्टिवल म्हणजे कलावंतांना एक पर्वणी.तो नुकताच सुरु झालेला होता. तुला तो एकदा पाहायचा होता म्हणून मी तुला आमंत्रण दिलं.तू मुंबईला कधीच आलेली नव्हती. त्या मुळे मी तुला घ्यायला स्टेशनंवर आलो होतो. आपली ओळख होऊन चार पाच वर्ष झाली असतील. पण प्रत्यक्षात मी तुला आजच भेटणार होतो. गाडी आली. मी तुला पाहिलं. तू मला पाहिलं.तसं फोटोंमुळे आपण एकमेकांना ओळखतच होतो. त्या मुळे हसण्यात ओळख पटली.जशी माझ्या मनात प्रतिमा होती. तशीच तू होतीस. नाजूक, अशक्त पण कणखर स्वभावाची. कशालाही न घाबरणारी. 
अगोदर जेवण करू या, नंतर फेस्टिवल पाहू असं सांगून मी तुला हॉटेल मध्ये नेलं. तुझं नाजूक नाजूक पणे जेवणं पाहात बसलो. म्हटलं, तुझ्या वयाच्या मुलीने कसं दणकून खायला पाहिजे. तू मंद हसलीस. मग फेस्टिवल पाहायला गेलो. भान हरपून तू सगळं पहात होतीस.
बऱ्याच वेळाने तू म्हणालीस.
मला आता जायला हवं. माझ्या परतीच्या गाडीची वेळ झालीय. अच्छा पून्हा भेटू कधीतरी.
उगाचच कुठं तरी हळवं झाल्या सारखं वाटलं. म्हटलं मला तुझी आठवण म्हणून एक चित्र हवं आहे.
कोणतंही घ्या.पण ते घ्यायला तुम्हाला घरी यावं लागेल.
तुला सगळ्यात जे आवडतं ते दे.
मग तुम्ही घरी या. बुद्धाचं ज्ञानप्राप्ती झाल्या नंतर चंद्र प्रकाशात काढलेलं, माझं सगळ्यात जास्त आवडतं पेंटिंग. तुम्ही घेऊन जा.
नक्की येईल मी.
आणि तू निरोप घेऊन गाडीत जाऊन बसली.

झालं. नंतर तुझं रुटीन सुरु झालं.माझं रुटीन सुरु झालं. अशीच तू भेटत राहिली चित्रांमधून. कवितांमधून.
अचानक एक दिवस तुझं लग्नाचं  आमंत्रण आलं. तुझा नवरा मुंबईचाच राहणारा होता. त्या मुळे तूला तर आनंदच झालेला. तू मुंबईला येणार राहायला म्हणून मलाही आनंद.
पण काय झालं कुणास ठाऊक, तुझ्या लग्नाला येणंच जमलं नाही.तू वाट बघत होतीस म्हणे. पण मनात असूनही खरंच नाही जमलं.

तू मुंबईला आलीस. संसाराला लागली. संसारात रमलीस. तुला मी नेहमी एकदा नवऱ्याला घरी घेऊन यायचं आमंत्रण द्यायचो. तू आता सासुरवाशीण झाली होती. नुसतं हसायची. येण्याचं प्रॉमिस दयायची.
तुझा वाढदिवस म्हणजे शुभेच्छांचा पाऊस आणि रंगवेड्या कलावंतांचा महोत्सव.  मी न विसरता शुभेच्छा टाकल्या फेसबुक वर.

दुसऱ्या दिवशी सकाळीच तुझ्या धाकट्या बहिणीचा रडत रडत फोन आला, काका, ताईने काल रात्री गळफास लावून आत्महत्या केली.....माझ्या बाबांना आणि लग्ना नंतर तिच्या नवऱ्यालाही तिचं हे चित्रं काढणं वगैरे पसंत नव्हतं. रंग हाताळायला नाही मिळायचे त्या मुळे तिचा खूप कोंडमारा होई. त्या वेळी तिला तुमचा खूप आधार वाटायचा. लग्नाच्या आधी तुम्हाला भेट द्यायला तिने एक चित्र काढलं होतं. ते चित्रं ती तुम्हाला स्वतःच्या हाताने भेट देणार होती. ते चित्रं तुम्ही घेऊन जा.

सगळं सुन्न झालंय. काय झालं असेल बरं.की असे अचानक एका सुंदर चित्रातील रंगच नाहीसे होऊन जावेत. आणि सगळी संगती नष्ट होऊन जावी.

एखादी व्यक्ती तुम्हाला आयुष्यात एकदाच भेटते आणि कायमचा चटका लावून जाते. अशी ही माझी छोटीशी मैत्रीण होती. तिनं काढलेलं चित्र अजून माझी वाट बघतंय. पण माझीच पावलं जड झालीय. डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्यातून अंधुक पणे  दिसतो ज्ञान प्राप्ती झालेला बुद्ध आणि अवकाशात उगवलेला चंद्र.