एक इरकल घ्या ना गडे भाग 1

साडी खरेदीची धम्माल गोष्ट

एक इरकल घ्या ना गडे


अश्विनी ये ना...... टिंगडींग टिंगडींग टिंगडींग. गाणे वाजत असतानाच इकडे अश्विनी पोळ्या भाजताना तव्यापेक्षा जास्त तापली होती.


तिने किचनमधून जोरात आवाज दिला,"बंद कर ते गाणं अविनाश."

आईचा आवाज येताच श्रावणबाळ गाणे बंद करायला गेला.

तेवढ्यात सुहास ओरडला,"खबरदार जर गाणे बंद करुनी जाल पुढे."

ते ऐकून अविनाश खांदे उडवत म्हणाला,"करा काय करायचे ते. मी चाललो आंघोळीला."

इकडे सुहास हळूच किचनमध्ये डोकावला. पोळ्या करायची गती आणि तव्यावर आपटले जाणारे उलथने पाहून अंदाज अनुभवी नवरा लावू शकतो.

सुहासने गेल्या चोवीस तासात आपण काय काय केले याची तपासणी केली. त्यामध्ये अश्विनीला राग येईल असे काही सापडेना.

आता समोरून तुला काय झाले? असे विचारायचे म्हणजे वाघिणीच्या तोंडात मुंडके देण्यासारखे होते.

तरीही त्याने एक प्रयत्न केला,"आशू, काल डब्याला दिलेली भाजी छान झाली होती बर का."

झाले,तव्यावर पाणी पडून तडतडावे तशी अश्विनी म्हणाली,"पोळी भाजी बनवणारी बाई एवढीच किमंत उरलीय माझी ह्या घरात."


तेवढ्यात दहावीला असलेले कन्यारत्न उठून आले,"आई,डबा झाला का?"

अश्विनी आता करदावत म्हणाली,"कार्टी बापावर गेलीय. आई फक्त खाणे पिणे घालायला पाहिजे असते."


गरम वातावरण पाहून सुहास आणि श्वेता हळूच बाहेर पडले.


तर मंडळी,हे आपले नायक - नायिका. सुहास आणि अश्विनी. एकेकाळचे लव बर्डस.

गंमत जंमत धुमाकूळ घालत होता तेव्हाच्या काळातले बर. उंच,गोरा आणि हुशार सुहास. बोलघेवडा आणि मित्रांत प्रचंड लोकप्रिय.


त्याउलट अश्विनी. नाकासमोर चालणार. आपण आणि आपल्या दोन मैत्रिणी एवढेच विश्व असणारी.

सुहासला अजूनही कॉलेजचा पहिला दिवस आणि त्या दिवशी दिसलेली अश्विनी आठवली की तो अश्विनी ये ना गाण्यावर नाचू लागतो.

तर एक बोलका आणि एक अबोल असणारे दोघे एकरूप झाले. सुखाचा संसार चालू झाला.

अधून मधून काही वादळे येत. तसेच आजचे वादळ आले होते. फक्त त्याचे कारण मात्र अज्ञात होते.


सुहास टेबलवर नाश्ता करायला बसला. अश्विनी काही न बोलता पोह्यांची बशी आणि चहा एकत्र आपटून निघून गेली. याचा अर्थ मामला गंभीर होता.

आता नक्की कारण काय असेल? ह्याचा शोध घ्यायला हवा.

अश्विनी अविनाशला नाश्ता घेऊन गेली तेवढ्यात त्याने आवाज दिला,"आई, पमा मावशीचा फोन आहे."

अश्विनी म्हणाली,"विसरलेच होते. पमीला फोन करायचा. आण इकडे फोन."

सुहास कान टवकारून बसला. पमी मावशी म्हणजे पद्मिनी सुहासची लाडकी मेहुणी. अश्विनी बोलत नसेल तेव्हा हक्काची लागू पडणारी मात्रा.

सुहास कानात प्राण आणून फोन ऐकू लागला.

अश्विनी फोन घेऊन म्हणाली,"पमे,बोल ग! काय म्हणतेस?"

तशी अश्विनी बोलायला लागली,"मी काय बाई,फक्त पोळी भाजी करण्यापुरती."


असे बोलून अश्विनी आत किचनमध्ये जाऊन बोलू लागली. आता पमीला फोन केल्याशिवाय कळणार नव्हते. तेव्हा दुपारी पमीला फोन करायचा असे ठरवून सुहास बाहेर पडला.


अश्विनी गुपचूप पद्मिनिबरोबर बोलू लागली,"तुला सांगते पमे,माझी कोणाला कदर नाही. सुहास नुसता नावाला माझ्याबरोबर असतो. मी असले काय आणि नसले काय."


पद्मिनी म्हणाली,"तायडे थांब,काय झाले ते नीट सांग.सुहास काही असे नाहीत."


तशी अश्विनी भडकली,"काही सांगू नकोस त्याच. पूर्वी मी त म्हणाता ताकभात ओळखत असे. आता मी परवा चार वेळा म्हणाले स्वातीच्या नवऱ्याने तिला किती सुंदर रेशमी इरकल घेऊन दिली. तर फक्त हं एवढेच बोलला."


पद्मिनी हसून म्हणाली,"अग मग सांग की त्याला तुला साडी हवीय."


अश्विनी त्यावर रडत म्हणाली,"मीच सगळ सांगायचं मग त्यात काय मजा राहिली."

सुहासला अश्विनीच्या मनातले कळेल का? इरकल खरेदी होईल का?

©®प्रशांत कुंजीर

🎭 Series Post

View all