एक इरकल घ्या ना गडे अंतिम भाग

शेवटी इरकल मिळाली तीही वांगी कलर

एक इरकल घ्या ना गडे अंतिम भाग

लक्ष्मी रोडवरील त्या प्रचंड गर्दीत बायकोच्या मनासारखी साडी शोधायचे दिव्य सुहास पूर्ण करेल का? चला पाहूया.


अश्विनी म्हणाली,"इरकल दाखवा. नवीन पॅटर्न दाखवा."

तसे समोरचा सेल्समन म्हणाला,"आमच्याकडे नेहमी फ्रेश आणि नवे पॅटर्न असतात. तुम्हाला कशी दाखवू?"


सुहास विचारात पडला,"साडी ह्या विषयात एवढे सखोल ज्ञान येते कुठून?"

पण जास्त डोके न लावता तो दुकानातील हिरवळ पाहू लागला.

तेवढ्यात अश्विनी म्हणाली,"अहो,हा कांदा कलर कसा आहे?"

तो प्रश्न ऐकून कांदा कापल्यावर येईल तसे सुहासच्या डोळ्यात हसून पाणी आले. तरीही हसू दाबून त्याने बोटांचा मोर केला.

तेवढ्यात अश्विनी म्हणाली,"त्यापेक्षा हा गाजरी छान दिसेल नाही."

त्यावर सेल्समन म्हणाला,"ताई,हा कैरीचा हिरवा दाखवू का?"

असे संवाद चालू होते.

गाजरी, आमासुली,आंबा,मिरची अशी नावे ऐकून सुहासला आपण मंडईत उभे आहोत असे वाटू लागले.

त्याने क्षीण प्रयत्न करत म्हंटले,"आशू,वांगी कलर."

तेवढ्यात अश्विनी म्हणाली,"हा रंग बघा."

सुहासला वाटले आता फायनल. पण परत त्यात ही डिझाईन नको.

असे दोन तास झाल्यावर अश्विनी म्हणाली,"चल,इकडे नाहीत चांगल्या साड्या."

सुहासला कुठेतरी पळून जावे वाटले. दुकानदार बिचारा तसाच स्थितप्रज्ञ.


दुसऱ्या दुकानात परत रंगांची उजळणी झाली. शेवटी वांगी रंगाच्या पाच शेड त्याने दाखवल्या.

तेवढ्यात सुहास दुसरीकडेच पाहत होता.

ते पाहून अश्विनी ओरडली,"अहो,ह्यातील एक फायनल करा."

आता हा प्रश्न सोडवणे महाकठीण. तरीही त्याने एका साडीवर बोट ठेवले.

अश्विनी म्हणाली,"रंग छान आहे. पण काठ बघ किती मोठा आहे."

सुहास मनात म्हणाला,"मलाच विहिरीच्या काठावरून खाली ढकल."

तेही दुकान डावलून तिसरीकडे मोर्चा निघाला.

तिकडे गेल्यावर समोरच लावलेली पैठणी पाहून अश्विनी ओरडली,"अय्या,अशीच चंद्रकळा हवी होती मला. जाऊबाई किती भाव खायच्या त्यांच्या साडीवर."

सुहास मध्ये म्हणाला,"अग पण इरकल घ्यायची होती ना?"

तेवढ्यात नवरा हा अशावेळी दुर्लक्षित घटक ह्या नियमाला जागून तिने सेल्समनला विचारले,"दादा,ती चंद्रकळा कितीला आहे?"

तसे तो म्हणाला,"काकू,तो मॉर्डन प्रकार आहे. तुम्ही पारंपरिक पहा ना!"

ते ऐकून सुहासला प्रचंड हसू फुटले.

तशी अश्विनी नाक मुरडत म्हणाली,"काही नको,इथल्या साड्या बघ किती जुन्या वाटतात. चल दुसरीकडे."

असे करत शेवटी तथास्तुमध्ये पोहोचले.

तिथे गेल्यावर मात्र सुहासने सूत्रे हाती घेतली,"आम्हाला रेशमी इरकल आणि वांगी कलर दाखवा."

अश्विनी काही बोलायच्या आत वांगी कलरचा ढीग समोर आला. हो नाही करत करत शेवटी एक साडी पसंद झाली.

ती घेऊन बाहेर पडताना अविनाशने फोन केला,"बाबा,बाहेर खाऊ नका. घरी मी आणि श्वेताने बेत केलाय."

इकडे अश्विनी तुळशीबागेत महापुरात घुसली. मग चप्पल, पर्स,कानातले,गळ्यातले अश्या आठ दहा पिशव्या दोन्ही हातात. घामेजलेला चेहरा, विसकटलेले केस अशा अवतारात सुहास बाहेर आला.

जाताना अश्विनी म्हणाली,"सुहास,बांगड्या राहिल्याचं."

सुहास शांत गाडी चालवत होता आणि अश्विनी पमिला फोन करून साडीवर शिवायच्या ब्लाऊजचे डिझाईन ठरवत होती.


तब्बल पाच तास तंगडतोड केल्याने सुहास वैतागला होता.

घरात शिरताच तो म्हणाला,"अवी,काय बनवले आहे. लवकर आण."

अविनाश बाहेर येत म्हणाला,"मस्त मसाले भात आहे. तुम्हाला आवडतो तसा वांगी घालून."

सुहासने वांगी नाव ऐकले आणि डोक्याला हात लावून खाली बसला.

तेवढ्यात एफ एम वर गाणे लागले. मला घ्याल का हो राया एक शालू बनारसी.

गाणे ऐकताच श्वेता आणि अविनाश खो खो हसायला लागले.


तर साडी डे निमित्त दोन कथा कल्पना सुचल्या होत्या. त्यातील इरकल कथेला प्रचंड प्रतिसाद लाभला. आता ही कथाही तुम्हाला आवडली तर नक्की सांगा.

©® प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all