एक इजाजत.भाग -५३

वाचा फुलण्याआधीच कोमेजलेली एक प्रेमकथा!
एक इजाजत!
भाग -५३

“चंपा हे तुझ्यासाठी! आज खऱ्या अर्थाने तू कोठेवाली झाली आहेस.” तिथून निघण्याआधी त्याने तिच्यावरून पैश्यांचे बंडल फिरवले आणि ते सारे तिच्या हवाली केले.


तो गेला तरीही ती कितीतरी वेळ त्या पैश्यांकडे डोळे विस्फारुन बघत होती. इतका सारा पैसा पहिल्यांदा बघायची तिची पहिलीच तर वेळ होती!

‘एवढा पैसा? एवढा पैसा आपल्याकडे आधीपासून असता तर? तर शरदवर योग्य उपचार केव्हाच झाले असते.’

धनराजने तिच्यावर लुटलेला पैसा बघून तिला शरदची आठवण आली. शरदचे आजारपण दूर करायचे म्हणूनच तर तिला डॉक्टर व्हायचे होते आणि आज डॉक्टर न होताच तिच्यासमोर पैसा पडला होता.


‘पण हे असल्या कामाचे मिळालेले पैसे शरदसाठी वापरायचे नाहीत. कधीच नाही. मी माझ्या शऱ्याला असल्या घाणेरड्या कामातून मिळालेला पैसा कधीच लावणार नाही.’


बेडवरच्या नोटांच्या पुडक्याकडे बघून तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले. स्वतःच्या शरीराची किळस वाटायला लागली आणि रडतच बाथरूम मधल्या नळाखाली ती जाऊन बसली. कितीतरी वेळ ती तिथेच रडत होती. शरीराच्या बदल्यात पैसे देऊन धनराज सेठने तिला शेवटी वेश्या असल्याची जाणीव करून दिली होती.

_______

“चंपाजी, मला माफ करा. आय एम सो सॉरी.” आदी अचानक खुर्चीवरून उठून खाली बसला.

“आदी, उठ. काय करतोस? इथे सगळीजण आपल्याकडेच बघत आहेत.” तिच्या पायाशी बसून अश्रूंचा अभिषेक घालणाऱ्या आदीला उठवण्याचा प्रयत्न करत चंपा म्हणाली.


“चंपाजी, खरंच मला माफ करा. मी तुम्हाला खूप चुकीचे समजत आलो. तुम्हालाच नव्हे तर वेश्याव्यवसाय करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला चूकीचे समजत होतो. तुमच्यासारख्या स्त्रियांमुळे आमच्यासारख्यांची घरे उध्वस्त होतात असे वाटत होते. मात्र आता कळलंय एखाद्या कोवळ्या मुलीला वेश्या बनवण्यासाठी या समाजात धनराज सेठसारखी माणसेच जबाबदार असतात आणि अशा माणसांची समाजात कमी नसते.


खरंतर आजवर धनराज सेठचा मुलगा म्हणून अभिमान असणाऱ्या मला आज स्वतःचीच खूप लाज वाटते आहे. नकळत का होईना मी ही तुमचा दोषी आहे.” त्याच्या डोळ्यातील अश्रू अजूनही थांबत नव्हते.


“नाही आदी, यात तुझा काय दोष? जे माझ्या प्राक्तनात होतं ते घडलं. सुरुवातीला वाईट वाटायचे खरे; पण मी सत्य स्वीकारले आहे. याक्षणी फक्त आनंद एवढाच आहे की दोन वर्षापासून आजवर तुझ्या नजरेत माझ्याबद्दल दिसणारा तिरस्कार कमी झालाय.” त्याचे अश्रू पुसत ती म्हणाली.


“चंपाजी, तुमच्याबद्दलचा केवळ तिरस्कारच कमी झाला नाही तर तुमचा आदर देखील कैक पटीने वाढलाय.” तिचे हात हातात घेत तो म्हणाला.


“लहानपणापासून मी अगदी एकलकोंडा होतो. मम्मा पप्पांची सततची भांडणं, चिडचिड यामुळे माझं बालपण पार करपून गेले. पप्पा गरीब घरातील होते. मम्माचा त्यांच्यावर जीव जडला आणि पैशांच्या बळावर त्यांच्याशी तिने लग्न केले. आज आमची जी कंपनी आहे ना ती माझ्या आजोबांची म्हणजे मम्माच्या वडिलांची आहे.

एकुलती एक मुलगी म्हणून आजोबांनी मम्माच्या साऱ्या इच्छा पूर्ण केल्या. एका गरीब मुलाला आपला जावई बनवलं. पप्पा हुशार होते, महत्वकांक्षी होते. जिद्दीने ते कंपनीचे नाव पुढे चालवत होते. परंतु मम्मा मात्र संशयी आणि हेकेखोर वृत्तीची होती. श्रीमंतीत वाढलेली, त्यात एकुलती एक. त्यामुळे पप्पावर तिने कायम हुकूम गाजवला. त्यांना कायम स्वतःच्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करत केला. त्यामुळे त्यांच्यामधील प्रेम आटून नात्यात हळूहळू दुरावा येत गेला. परिणामी त्यांच्यावरील मम्माची पकड सैल झाली. मात्र त्यामुळे पप्पा या थराला जातील असे तिला कधीच वाटते नव्हते.


पप्पांचा मी लाडका होतो म्हणून मग तिला त्यांचा राग यायचा आणि मग ती जास्तीत जास्त वेळ माझ्यासोबत घालवायचा प्रयत्न करू लागली. तिची शॉपिंग, किटीपार्टीज.. सर्वत्र ती मला सोबत घेऊन जाऊ लागली. मी मोठा होऊ लागतो तसं मला तर सगळ्या गोष्टींचा कंटाळा येऊ लागला आणि मग मी तिच्यासोबत बाहेर जाणे टाळू लागलो.


पप्पा तर काय? आठवड्याच्या आठवडे बाहेर असायचे. मम्माचे तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये बिझी असणे, पप्पांचे सारखे बाहेर वावरणे यामुळे माझ्याकडे लक्ष द्यायला त्या दोघांनाही वेळ मिळत नसे. त्यामुळे मी अगदी एकटा पडायला लागलो. एकांतात मी कित्येक वेळा रडलो असेल याची गणतीच न केलेली बरी.


चंपाजी खरं सांगू? ज्या मायेच्या स्पर्शाने तुम्ही आज माझे अश्रू पुसलेत ना तो स्पर्श माझ्या मम्माकडून मला शेवटचा केव्हा लाभला हे मला आठवत देखील नाही. या क्षणी मला काय वाटतं हे सांगू?” आपल्या मनातील भावनांची वाट मोकळी करत तो म्हणाला.


“काय?” तिने कापऱ्या स्वरात विचारले. श्रीमंत लोकांच्या अशा समस्या ती पहिल्यांदाच ऐकत होती.


“काश तुम्ही माझी आई असता तर? मघाशी ज्या मायेने तुम्ही मला स्पर्श केला. तो स्पर्श मला कायम लागला असता.” बोलता बोलता त्याचे डोळे पुन्हा भरून आले.

“आदी, वेडा आहेस तू. एक वेश्या कधी आई होऊ शकते होय?”


“का नाही? अहो तुमची ती कमली? ती तर आई झालीच की.”

“कमलीचे आईपण वेगळं होतं रे.” तिची झालेली फरफट बघून तर असं आईपण कधी आपल्या वाट्याला येऊ नये असं वाटायचं. “ ती उदास होऊन म्हणाली.

“फरफट?”

“फरफटच. दुसऱ्याने मस्त मजा लुटायची आणि त्याचं बीज आपण आपल्या उदरात वाढवायचं, हा कसला न्याय? कमली खुळी होती त्यापेक्षा ती पार एकटी पडली होती. ती हे काम करून विटली होती. आईवडिलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शरीराचा रोजचा लिलाव तिला नकोसा झाला होता. त्यामुळे आपल्या बाळाला घेऊन तिला दूर कुठेतरी निघून जायचे होते.पण हिंमत मात्र होत नव्हती..” ती भूतकाळात हरवत म्हणाली.


“..इतका सारा पैसा?” धनराज खोलीतून बाहेर गेल्यावर कमली आत येत पैश्यांच्या नोटाकडे बघत म्हणाली.


“चंपा, तू का रडतेस? अगं एवढा पैसा पाहुन तर तू आनंदी व्हायला हवीस. असं वाटतंय, सेठने तुला आठवड्याभरासाठी बुक करून टाकलीय. तुझ्या सेवेवर तो खुश झालाय म्हणायचा.” नुकत्याच बाथरूममधून आलेल्या तिचे लाल डोळे बघून कमलीने डोळे मिचकावत विचारले.

“अशा कामातून मिळालेल्या पैशासाठी मी आनंदी होवू?” ती हुंदका देत म्हणाली.

“ही रक्कम थोडथोडकी नाहीये. शेतात दिवसभर राबराब राबूनही तुझे आईवडील एवढे पैसे कमाऊ शकले असते?” तिचे डोळे पुसत कमली.


“हे पैसे शीलाआंटीला द्यायचे आहेत का?” रत्ना.. नव्हे आता कायमची झालेल्या चंपाने कमलीला विचारले.

“ना रे. त्याने तर तुझ्याकडे येण्यापूर्वीच तिला पैश्यांची बॅग सुपूर्द केली होती. हा पैसा केवळ तुझा आहे. तुझ्या कष्टाचा.”


“मग कमली हा पैसा तू ठेव. तुला आणि तुझ्या बाळासाठी.”

“पगली हैं क्या तू? ये तेरा हैं।”

“कमली, हे जग सोडून दे गं तू. खूप वाईट आहे हे सगळं. बाळ झालं ना की तू इथून निघून जा.” चंपा काकूळतीने म्हणाली.


“इथे रहायला कोणाला मजा वाटते? पण एकदा इथे आल्यावर की निघणं खूप किचकट असतं चंपा. तुला कितीदा सांगू?” ती डोळे पुसत म्हणाली.


“ते मला काही माहित नाही. हिंमत केलीस तर सगळं ठीक होईल. तुझ्या बाळावर या वस्तीची सावली पडायला नको असं वाटतंय गं. समजा तुला मुलगी झाली आणि तिही तुझ्यासारखी सुंदर झाली तर? तर तिलाही असाच एखादा धनराज आपली वासना मिटवायला सोबत घ्यायचा.”


“चंपा.. असं नको गं बोलू. माझं लेकरू असलं काम नाही करणार.” तिचा हुंदका जोरात बाहेर पडला.


“तेच सांगतेय ना मी कमली. आजपासून माझ्या कमाईचा एक हिस्सा माझ्यासाठी आणि उरलेला तुझ्या बाळासाठी. जोवर तू इथून बाहेर पडून दुसरं काही काम शोधत नाहीस तोवर तू माझी जबाबदारी.” चंपाने बेडवरच्या सगळ्या नोटा तिच्या हातात कोंबल्या.


“चंपा, इतका जीव नको गं लावू. तुला पुढे त्रास होईल.आपल्या कोठीवरचा नियम तुला ठाऊक आहे ना..”


“चांगलंच ठाऊक आहे गं. तुझ्याशी नातं नाहीच जोडत नाहीये मी. तुझ्या बाळाशी तर जोडू शकते ना? आणि तसेही आता मला कुठलाच त्रास होत नाही. ना शरीराच्या वेदनेचा अन् ना ही मनाच्या वेदनेचा.

का ठाऊक आहे? कारण माझ्यातील त्रास करून घेणारी रत्ना उन्मळून गेलीये आता मी केवळ चंपा उरलेय, चंपा.. शीलाआँटीच्या कोठीवरची एक सुंदर ललना!
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****

🎭 Series Post

View all