एक इजाजत.भाग-४७

वाचा फुलण्याआधीच कोमेजलेली एक प्रेमकथा!
एक इजाजत!
भाग -४७

“बरी होईपर्यंत ही इथेच राहील आणि माझ्या परवानगीशिवाय तिला कुठेच जाता येणार नाही. लक्षात ठेवा.” त्याने तिच्याकडे एक नजर टाकली आणि पुढे काही न बोलता तो तिथून निघून गेला.


“काय गं मुली? नाव काय तुझं?” दाईमाँ प्रेमाने विचारत होती.

तो प्रेमळ स्वर ऐकून रत्नाला वच्छीची आठवण झाली. हिवरेवाडीहून निघताना ती किती काळजी करत होती हे आठवले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले


“नाव काय गं? मराठी कळते ना?” दाईमाँचा पुन्हा प्रश्न. मात्र त्या प्रश्नावर ती काहीच उत्तरली नाही.


“बरं ते सोड. जेवणात काय घेशील?”

या प्रश्नावर मात्र रत्नाने तिच्याकडे विस्मयाने पाहिले. खाण्यामध्ये अशी कुणी तिची मर्जी विचारण्याची ही पाहिलीच वेळ असावी. तिने यावरही काहीच उत्तर दिले नाही आणि नजर दुसरीकडे वळवली.


“शांता, हिच्यासाठी डाळभात घेऊन ये आणि तू गं आधी थोडी कॉफी घे. पावसाने पार भिजली होतीस. कॉफीने तेवढंच बरं वाटेल.” दाईमाँने तिच्यासमोर कॉफीचा कप ठेवला.


नजर दुसरीकडे असली तरी डोळ्याच्या कोनातून तिच्याकडे पाहत रत्नाने कप जवळ ओढला आणि थरथरत्या हाताने पकडून ओठाला लावला. गरम गरम कॉफी पोटात जाताच तिला थोडे बरे वाटले.


“मी.. मी कुठे आहे?” बोलण्यासाठी तिच्या ओठांची हालचाल झाली.


“म्हणजे? तुला काहीच ठाऊक नाही? अगं तू मुंबईत आहेस आणि आता धनराज सेठच्या बंगल्यावर आहेस.”


“धनराज?”


“धनराज नव्हे गं, धनराज सेठ! आणि अशी पहिल्यांदा ऐकल्यासारखं काय बघतेस? रात्रभर त्यांच्यासोबतच होतीस की तू. बरं हे जेवण उरकून घे आणि त्यानंतर ही गोळी खा. सेठ सांगून गेलेत.”


तिच्यासमोर ताट ठेवून दाईमाँ परत गेली. भूक तर लागली होतीच पण एवढ्या उंची भांड्यामधून जेवायला रत्नाला अवघडल्यासारखे वाटत होते. कसेतरी चार घास खाऊन तिने ताट बाजूला केले आणि गोळी घेऊन परत निजली.


आपण मुंबईत आहोत; पण नेमके कुठे ते तिला कळत नव्हते. इथून पळून जायचं तर कुठे जायचं हा प्रश्न होता आणि मुख्य म्हणजे अजूनही तिच्यात तेवढी शक्ती आली नव्हती.


मऊ मऊ बेडवरचे मऊ मऊ ब्लॅंकेट अंगावर घेऊन ती झोपायचा प्रयत्न करू लागली. दाईमाँ म्हणाली होती की रात्रभर ती त्या सेठबरोबर होती पण रत्नाला काही आठवेना. जेवढं आठवत होतं त्यावरून तरी गजा आणि दिनकरने तिच्यावर केलेला अत्याचार आणि नंतर मदतीसाठी विचारणारा हा सेठ एवढंच तिला आठवत होते. रात्र कधी सरली अन् दिवस कधी उगवला? अंगावरची तिची फाटकी कापडं जाऊन ही साडी कशी आली..? तिला काही म्हणजे काहीच आठवत नव्हते.


एवढं मात्र कळून चुकलं होतं की हा सेठ म्हणजे कुणीतरी मोठी व्यक्ती आहे आणि कदाचित त्याच हृदय देखील मोठं आहे म्हणून तर त्याने तिला मदतीचा हात पुढे केला होता.


“ह्यालाच मदत मागून आपण काही करू शकलो तर?
पोलिसात जाऊन गजा, दिनकर आणि अण्णासाहेबांवर गुन्हा दाखल केला तर?” तिचे डोळे लकाकले; पण क्षणभरच!


पोलिसात जाणे म्हणजे छोटी गोष्ट नाही हे तिला ठाऊक होते. खुद्द अण्णासाहेबांवर गुन्हा दाखल करणे म्हणजे स्वतःसोबत आई आणि बाबाला रस्त्यावर आणणे होय याचीही तिला जाणीव झाली. आणि पोलिसांना सांगायचं तरी काय? स्वतःवर बलात्कार झालाय म्हणून सांगायचं?


बलात्कार..!

हा शब्द ऐकून तर आईच स्वतःचा जीव देईल. हातावर पोट असणाऱ्या लोकांचे त्यांचे शील हाच काय तो एकमेव दागिना असतो आणि त्यावरच त्या लफंग्यांनी दरोडा घातला हे वच्छी कुठे सहन करू शकली असती?


‘प्रकाश.. प्रकाशकडे जायचं का? आपल्यावर जे गुजरलंय ते त्याला सांगायचे का?’ तिच्या मनात पुन्हा एकदा आशा निर्मान झाली आणि लगेच मावळली देखील.


हे असले शरीर घेऊन त्याच्यासमोर जायची हिंमत तिच्यात नव्हती आणि गेलीच तरी तो स्वतःच्या वडिलांविरुद्ध आपली साथ देईल याची तिला शाश्वती नव्हती. मनाची झालेली कोंडी आणि गोळ्यांचा डोळ्यावर होवू लागलेला अंमल.. रडता रडता ती केव्हा झोपी गेली तिला समजलेच नाही.

__________


“चंपाजी, मी काय बोलू? मला शब्दच फुटत नाहीयेत. तुमच्या सोबत जे घडलं ते फार फार वाईट होतं.” तिच्या हातावर हात ठेवत जड स्वरात आदी म्हणाला.


गोदाकाठच्या एका रेस्टॉरंटमध्ये दोघे कॉफी घ्यायला म्हणून थांबले होते. बाहेर दाटत आलेला अंधार या क्षणी त्याला चंपाच्या आयुष्यातील अंधारापेक्षा कैक पटीने उजाळलेला वाटला. किमान या अंधाराचा काळा रंग घालवायला गोदामाईच्या काठावर दिव्यांची रोषणाई तरी होती;पण चंपाच्या आयुष्यतील तो काळा रंग? तो दूर सारायला कुठलीच रोषणाई कामी येणार नव्हती.


“वाईट.. चांगलं.. आता कसलेच ताळमेळ बांधायचे नाहीत रे मला. पण हा असा पाऊस बघितला की जखमांचे व्रण पुन्हा ताजे होवू लागतात. दरवर्षी.. पावसाच्या दरदिवशी!” डोळ्यात ओल घेऊन ती खिन्न हसली.


“चंपाजी..” त्याचा स्वर हलला. तिच्या हसण्यामागची व्यथा आता कुठे त्याला कळू लगली होती.


“पप्पा तुम्हाला मुंबईत घेऊन आले होते, मग त्यांनाच मदत मागून तुम्ही तुमच्या गावी का नाही परतलात? त्या अण्णांचे गावात वजन होते हे खरे असले तरी पप्पांच्या नावाचे वलय देखील काही कमी नव्हते. त्यांनी त्यांचे नाव वापरले असते ना तर अण्णा आणि त्यांचे साथीदार आज जेलमध्ये खडी फोडत असते.” तो म्हणाला.


“मदत आणि तिही धनराज सेठची?” ती मोठ्याने खळखळून हसायला लागली.


तिच्या हसण्याचा आवाज आणि त्याची जादू एवढी होती की आजूबाजूच्या काही नजरा तिच्यावर खिळल्या. हसता हसता डोळ्यातील मोती गालावर येऊन थांबले.


“चंपाजी.. इतकं हसण्याइतपत हे फनी नव्हतं.”


“सॉरी आदी. पण मला असं अचानक हसू आलं त्याच काय करू ना?” ओठावर हात ठेवत तिने दुसऱ्या हाताने टिश्यूने गालावरचे थेंब टिपून घेतले.

“खरं तर यात तुझा दोष नाहिये. तुला सांगू? धनराज सेठना भेटल्यावर काही वेळेपूरतेका होईना मलाही तुझ्यासारखेच वाटू लागले होते. ही व्यक्ती मला मदत करू शकेल असं जाणवायला लागलं होतं. पण माझा विश्वास मात्र परत एकदा चुकीचा ठरला.”


“म्हणजे?”


“म्हणजे? म्हणजे दुधाने तोंड पोळलं तर ताकसुद्धा फुंकर मारून पितात हे मला कळलंच नव्हतं रे आणि जेव्हा कळलं तेव्हा वेळ निघून गेली होती..” ती पुन्हा भूतकाळातील आठवणीत परत जात म्हणाली.


…तो मऊशार बिछाना, अंगावरच मऊमऊ ब्लॅंकेट.. गोळीच्या अंमलामुळे रडता रडता ती कशी झोपी गेली कळलेच नव्हते. डोळ्यावर चढलेली गाढ झोप आणि विचारांच्या राक्षसांनी डोळ्यांचा घेतलेला ताबा.. घडून गेलेला प्रसंग स्वप्न बनून पुन्हा छळू लागला. भीतीने गारठलेली आणि त्या गारव्यात देखील अंगभर घाम फुटलेली ती दचकून जागी झाली.


“सोडाऽऽ सोडा मला.”

केवढ्याने किंचाळली ती. प्रत्यक्षात मात्र ओठातला आवाज ओठातच विरला होता. जड झालेले श्वास आणि वाढलेली हृदयाची कंपने.. क्षणभर ती कुठे आहे हे तिला आठवत नव्हते. किळसवाणे वाटून बाटल्या देहावरून ती पुन्हा पुन्हा हाताने झिडकारत राहिली.


काही वेळाने डोळ्यासमोर दाटलेल्या अंधारात तिला प्रकाशाची किरणं दिसू लागली. खोलीतील मंद उजेडात तो मऊ मऊ बिछाना आणि अंगभर साडी बघून आपण इतका वेळ स्वप्नात होतो याची जाणीव झाली आणि तिला पुन्हा रडू कोसळले.


आताचे हे स्वप्न असले तरी प्रत्यक्षात हे सारे घडले होते हे ती कुठे विसरू शकत होती. आपले शरीर बाटले आहे ही भावना अधिकाधिक तीव्र होवू लागली आणि तिने मनात एक निर्धार केला.


‘सपाऽऽक’

तिच्या गालावर पुरुषी हाताची एक जोरदार चपराक बसली आणि चेहरा लपवून ती हुंदके देऊन रडू लागली.


“तुझा जीव तुला इतका अप्रिय वाटतोय का की या धनराज सेठच्या बेडरूममध्ये तू आत्महत्येचे पाप करावेस?” धनराज तिला गदागदा हलवून विचारत होता.


जेव्हा तो बंगल्यातील त्याच्या खोलीत प्रवेशला होता तेव्हा रत्ना बेडवर स्टूल ठेवून त्यावर उभी होती आणि भिंतीवरच्या पंख्याला बेडशीटच्या सहाय्याने स्वतःला फासावर लटकवण्याच्या तयारीत होती. तिच्या पायाखालचा स्टूल सरकायला आणि धनराजला आत यायला एकच गाठ पडली. तिला त्या अवस्थेत बघून धावतच त्याने तिच्या पायांना विळखा घातला आणि बेडशीटची गाठ सैल होऊन ती त्याच्या अंगावर कोसळली.


तिचे कृत्य बघून त्याच्या मस्तकात एक कळ उठली आणि तिरिमिरीत त्याने तिच्या गालावर जोरात चपराक हाणली.


‘धनराज सेठच्या बंगल्यावर एका तरुणीचा गळफास लावून मृत्यू!’

अशी बातमी जर उद्या मीडियापर्यंत पोहचली असती तर? तर त्याचा व्यवसाय पार शून्यावर येऊन ठेपला असता आणि ते त्याला कुठे परवडले असते? व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर झालेले त्याचे नुकसान त्याने कसे भरून काढले असते? पळभरात हे सर्व विचार त्याच्या डोक्यात झंझावाताप्रमाणे फेर धरू लागले आणि त्याचीच परिणती म्हणून रत्नाच्या गालावर त्याचा हात उमटला.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****

🎭 Series Post

View all