एक होती परी

It's About Marathi Badbadgite

एक होती परी ,तिला सापडली दोरी, दोरी होती लांब लांब, जवळच होता खांब खांब, दोरी बांधली खांबाला, परी लागली चढायला, दोरी तुटली कचकन, परी पडली धप्पकन...
हे बालगीत आठवते? एक काळ होता कि लहान मुलांसाठी अशी बरीच बालगीते होती...
चांदोमामा चांदोमामा भागलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का? निंबोणीचे झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी...मामाच्या वाड्यात येऊन जा, तूप रोटी खाउन जा, तूपात पडली माशी चांदोबा राहिला उपाशी.. हे ऐकेपर्यंत मुले जेवत नसत..
मनीच्या कुशीत लपलय कोण ,इटुकली पिटुकली पिल्ले दोन, मिचमिच डोळे टिल्ले कान, माउची पिल्ले गोरीपान.. हे ऐकून आईच्या कुशीत शिरायची..
त्यांना शरीराचे अवयव वेगळे शिकवायची गरज नव्हती.. करंगळी, मरंगळी मधले बोट चाफेकळी या मधून आपोआप त्यांना कळत जायचे..
एक होते झुरळ, ते चालत नव्हते सरळ, बसमध्ये चढले, तिकीट नाही काढले, बुटात जाऊन लपले,घरी जाऊन पोचले...
एक होता खेकडा, चालायचा वाकडा,गणिताशी त्याचा छत्तीसचा आकडा या अशा गाण्यांमधून प्राण्यांशी ओळख व्हायची..
आमचे लहानपण तरी विहीणबाई उठा आता उठा, शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा, लहान माझी भावली हि अशी छान छान गाणी ऐकण्यात गेली. आता तर हि गाणी कुठे ऐकूही येत नाहीत. सध्या बहुतेक मुलांना twinkle twinkle माहीत असते पण चांदोबा लपला झाडीत हे माहित नसते. Rain rain go away पाठ असते पण येग येग सरी, माझे मडके भरी आठवत नाही.. ringa ringa roses वर गोल फिरतात पण गोल गोल राणी, इतके इतके पाणी हे थोडेसे old fashioned वाटते..
रवी गेला रे सोडून आकाशाला ह्या अंगाईगीतावर न जाणे कितीतरी पिढ्या झोपल्या आहेत.. आज हे गाणे कितीजणांना आठवत असेल ती हि शंकाच आहे.. मला English गाण्यांबद्दल किंवा शिक्षणाबद्दल काही आकस नाही कारण तो एक वेगळाच विषय आहे.. पण आपली ही बडबडगीतं आपण जर जपली तरच ती पुढच्या पिढीपर्यंत जाणार ना? मग थोडीशी आपल्या मातृभाषेतील गाण्यांची माहिती नवीन पिढीला सुद्धा करूून देेऊया.मला इथे जेवढी लिहिता आली तेवढी मी लिहिली आहेत.. तुम्हाला जर अजून आठवत असतील तर नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई