एक होता अभिजित : अंतिम भाग

It's A Story Of Guy Whose Name Is Abhijit


एक होता अभिजित - अंतिम भाग

सत्य घटनेवर आधारित..

गोष्ट लग्नानंतरची..

अभिजीत आणि अवंती दृष्ट न लागावी अशी जोडी. दिसायला छान,कमवता, कामात नीट व्यवस्थापन असलेला असा हा अभिजित आणि तशीच त्याची नाजूक, सालस, सांसारिक गृहिणी बायको म्हणजे अवंती.

अभिजित आणि त्याची आई नेहमी अवंतीच्या मनाचा विचार करायचे, तिला काय हवं नको याची ते सतत काळजी घेयचे. अवंती तब्येतीने नाजूक आहे म्हणून तिच्यासाठी खास वेगळं एक लिटर दुध असायचं, गावरान साजूक तूपही जेवणात असायचं..पोरीला जास्त कामं नको म्हणून धुणं, भांडी करायला एक वेगळी बाई देखील ठेवलेली ..थोडक्यात काय तर सुनेला मखरात बसवायचं बाकी होतं फक्त . एकदा अवंतीने गाडीच्या स्टेअरिंग वर हात ठेवला मग काय महाशय अभिजितने ती नाही नाही म्हणत असताना देखील तिला गाडी शिकवलीच. आता अवंती हवं तेव्हा घरची गाडी घेऊन सासूबाई सोबत मॉल्स, सिनेमा आणि मंदिरात जायची .

शरीरसुखा पेक्षा अवंती आणि अभिजीतचं नातं हे एकमेकांच्या मनाशी होतं ,अभिजीतला काय हवं नको ,काय खायला आवडतं काय नाही याची अवंती पुरेपूर काळजी घेयची ..

लग्नाला साधारण चार महिने झाले होते आणि आता अवंतीच्या सासूबाईला तीर्थ यात्रेला जायचं म्हणून तयारी सुरू होती.सोबत सगळी औषधं,चिवडा, लाडू ,कपडे सगळं अवंतीने बॅगेत भरलं . अभिजित आणि अवंतीने त्यांना निरोप दिला , आता काही दिवस फक्त हे दोघेच घरात असणार होते म्हणून दोघे अगदी खुश होते .हवं तेव्हा,हवं तिथं रोमान्स त्यांना करता येणार होता.

दुसऱ्या दिवशी दिवसभर ऑफिसची कामं संपल्यावर अभिजितने घरी जाताना एक मस्त लाल कलरचा वन पिस ड्रेस बायकोसाठी घेतला .घरी आला तर दाराला कुलूप होतं ,अवंती इतक्या रात्री कुठं गेली म्हणून त्याने तिला कॉल केला तर फोन स्विच ऑफ आलेला ,त्याच्याकडील चावीने त्याने दरवाजा उघडला आणि काही वेळ वाट पाहिली त्याने अवंतीची, त्याला वाटलं गाडी घेऊन कुठंतरी गेली असेल जवळपास ,तर येईल पुन्हा पण ती आलीच नाही ..त्याला खूप टेन्शन आलेलं ,रातोरात शेजारीपाजारी चौकशी केली ,तिच्या माहेरी फोन केला तर त्यांचाही फोन बंद लागत होता.. नंतर रीतसर पोलीस कम्प्लेट केली आणि मग घरी सगळी तपासणी करताना पोलिसांना कळून आलं की घरातील सगळी दागिने, सोनं, पैसे आणि गाडी घेऊन अवंती आणि तिचे आई वडील लंपास झालेले...

अभिजित त्या धक्क्यातून कधी सावरेल की नाही माहीत नाही ..


हल्ली बहुतांश घरी एकाच विषयावर चर्चा सुरू असते म्हणजे ज्यांच्या घरी तरुण मुलं आहेत , हो मुलंच बरं का मुली मुद्दाम बोलत नाहीये कारण गर्भपात, अर्भक हत्या असे एक ना अनेक "मुली नको वंशाचा दिवा हवा" या कारणामुळे लोकांनी मुलींची संख्या घटवली आणि मग आता मुलांची संख्या जास्त प्रमाणात वाढल्यामुळे या सगळ्या मुलांसाठी मुलींच प्रमाण खूप कमी झालं आहे ..त्यामुळे तरुण मुलाच्या लग्नासाठी आई वडील ,नातेवाईक खूप ठिकाणी ओळखी पाळखीने अतोनात प्रयत्न करत असतात..आणि मग जर हा निर्णय चुकीचा ठरला तर ?..काय होईल त्या मुलाच्या किंवा मुलीच्या आयुष्याचं ?..याचा कोणी विचार केलाय का ,म्हणून हे कथानक लिहायचा अट्टहास मी धरला आणि हो ही सत्यघटना आहे अहमदनगर मधील श्रीरामपूर या गावातील.

समाप्त..

🎭 Series Post

View all