एक होता अभिजित - भाग १

It's Story Of Guy Whose Name Is Abhijit



एक होता अभिजित - भाग १


भाग १ - चिंगी

"अरे वाह ! !..काय झ्याक आंबे लागलेत बाळ्या या झाडाला.. चल पटकन बाबुराव येयच्या आत तू आणि गणू मला तुमच्या खांद्यावर चढवा, मी पटकन ते वर लटकलेले अ..एक ,दोन, तीन, चार, पाच ..हा पाच आंबे पटकन तोडून काढतो मग पळत जाऊन खाऊया ईहरीवर.." आभ्या त्याच्या मित्रांना म्हणाला

गण्याच्या खांद्यावर एक आणि बाळ्याच्या खांद्यावर एक असे आपले दोन्ही पाय ठेवून आभ्या वर लटकलेले आंबे एक एक तोडून शर्टाच्या आत टाकत होता ..तेवढ्यात मागून कोणीतरी जोऱ्यात बाळूच्या पाठाडात काठी फेकून मारली.. काठी जोऱ्यात लागली म्हणून बाळू ओरडला मग आभ्या खाली पडल्यामुळे तिघेही मागे उभ्या असलेल्या बाबुरावला बघून टिंगराला पाय चिटकवत दूरवर पळत पळत गेले .. अखेरीस तिघेही विहरीजवळ पोहचले..

"ये आभ्या चल काढ पटकन आंबे ,मला लय भूक लागली राव पळून पळून " बाळू बोलला

"हो हो अभ्या दे बरं पटकन आंबे " गण्या बोलला

" व्हय व्हय देतो की , हातीच्या काही आंबे माझ्या शर्टाच्या आतच पिळले गेलेत वाटतं ,हा बरं झालं तरीही तीन आंबे आजूनबी शाबूत आहेत ,धरा तुमचे एक एक आंबे " अभ्या म्हणाला

हे तिघे मस्त आंबे खात होते तेव्हड्यात तिथे विहरीजवळ मागच्या बाजूला काही छोट्या मुली बाहुला ,बहुलीचं लगीन लावत होत्या..त्यांचा किलबिलाट ऐकून या तिघांनी तिकडे धूम ठोकली..


"अगं राणी हा घे तुझा बाहुला तो काही कामाचा नाही बघ,त्याचे डोळे बघ कसे काळे काळे झालेत .. त्यापेक्षा मी माझ्या बहुलीचं लग्न सुमनच्या बाहुल्या सोबत लावीन..सुमनचा बाहुला कसला गोरा आहे आणि गोड सुद्धा, सुमन हा घे छोटा फेटा आणि घाल त्याच्या डोक्यावर.." चिंगी या दोघींना बोलली

या तिघी बाहुला बाहुलीचं लग्न लावतात, त्या तिघींना आपले हे तीन पोरं चोरून बघत असतात

"गण्या ही चिंगी बोलू लागली की,मला तिला पाहवतच रहावं वाटतं नेहमी " अभ्या बोलला

गण्या : व्हय का ? म्हणजे आमची वहिनी होऊ शकते ही मोठ्यापणी

बाळू : नाय नाय ..तिचा बाप लय खडूस हाय..त्याची पोरगी आशा येड्या गबाळ्याला नाही देणार तो ..

अभ्या : ओय भाड्या, येड्या गबाळ्या कोणाला बोलला रे ,मी ठरवलं तर मोठा ऑफिसर होऊन दाखवन आणि चिंगीला मिळवून दाखवन.

गण्या : होका ? बरं आधी तिच्यासारखे पैकीच्या पैकी मार्क मिळवून तर दाखव.

अभ्या : ठिके या वर्षी सहामाहीला मी वर्गात पहिला येऊनच दाखवतो मग ..


अभ्याने चॅलेंज स्वीकारलं तर होतं पण त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार होती , प्रश्न फक्त मेहनतीचा नसून अभ्यास येयला पण हवा ना ..अभ्याला कळलं नाही की कोणाची मदत घेऊ .. आभ्याचा बाप चित्रकार होता, सगळ्या देवांची हुबेहूब चित्र काढून त्याचे पोस्टर्स, फ्रेम्स विकायचा रस्त्यावर बसून ..

एकदा अभ्याच्या बापाची कलाकुसर बघून एक बंगाली श्रीमंत गृहस्थ खूप भारावून गेले, त्यांनी त्याच्या जवळील काही फ्रेम्स घेऊन एक सर्वात देखणी आणि या कधी कुठे पाहिली नसेल अशी दुर्गा मातेची प्रतिकृती रेखटायला सांगितली आणि चार महिन्यांनी येणाऱ्या नवरात्रीच्या उत्सवात घेऊन जाऊ बोलले ..

अभ्याचा बाप गरीब होता ,दिवसभर काबाडकष्ट करून आभ्याला शाळेत घातलं होतं त्याने, त्यामुळे बापाजवळ ट्युशनचा अट्टहास आभ्या करू शकत नव्हता .. काय करावं काय करावं परीक्षेत चांगले मार्क्स कसे मिळवावे यासाठी त्याला काही सुचेना.. म्हणून त्याने शेवटी चिंगीला विचारलं
" अगं चिंगी ऐक ना , रोज शाळा सुटल्यावर माझा थोड्यावेळ अभ्यास घेशील का ? मला यावेळेस लय मार्क्स मिळवायचे आहेत ,त्या बाळ्याने मला चॅलेंज केलं आहे.. म्हणून मी मार्क्स मिळवून दाखवणार " आभ्याने चिंगीला विचारलं ..

" हो घेईल की अभी मी तुझा आभ्यास, पण फक्त कोणी पैंज लावली म्हणून नको आभ्यासात लक्ष घालूस,आभ्यास मनापासून कर मग तुला नंतर माझीही गरज नाही पडणार "चिंगी आभ्याला म्हणाली

दिवसामागून दिवस जात होते, चिंगी रोज आभ्याचा आभ्यास घेत होती .. कधी कधी ती तिच्या गोड आवाजात पुस्तकातील कविता वेगवेगळ्या चालीमध्ये आभ्याला म्हणून दाखवत होती.. दोन चिमुकल्या मुलांमध्ये चांगलं मैत्रीचं नातं तयार झालेलं ..

इकडे आभ्याचा बाप देखील महागातले वेगवेगळ्या रंगाचे नमुने विकत आणून दुर्गामातेचे मोठे पोस्टर बनवत होता ..आभ्या रोज त्या पोस्टर सोबत रात्री गप्पा मारून चिंगीबद्दल बोलायचा..

परिक्षा जवळ आली, आता आभ्याला जेवायची देखील मुभा नसायची ,रात्र रात्रभर जागून पोरगं पुस्तकं वाचायचं.. आपलं पोरगं इतकं आभ्यास करतय हे बघून त्या बापाच्या डोळ्यात पाणी येयचं पण पोरासाठी वाट्टेल ते करायचं म्हणून त्या देवीच्या चित्रात जीव ओतून मातेची प्रतिकृती तयार करत होता..

परीक्षा संपल्या निकालही लागला ,मेहनत केली म्हणजे आपल्या चांगल्या कर्माचं फळ नक्की मिळतच ,अभिजित पाटील हा वर्गात प्रथम आला होता .. स्वतः वर्गात दुसऱ्या नंबरला येऊन नाराज न होता उलट अभी पहिला आला म्हणून चिंगी खूप खुश होती .. परीक्षा संपली आणि मॅडमने एका आठवड्याने येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या आधी गॅदरिंग समारंभ जाहीर केला..

या कार्यक्रमाचे औचित्य साधून आभ्याने चिंगीला एक चित्रपटातील वेगवेगळ्या गाण्यांचे बोल असलेले पुस्तक आणून दिले..

अभ्या : यातील कोणतंही एक गाणं तू येणाऱ्या समारंभात म्हणावं अशी माझी इच्छा आहे

चिंगी : गाणं आणि मी ? नको रे बाबा ,हसतील लोकं माझ्यावर

अभ्या : काही हसत नाही, इतक्या सुंदर सुंदर कविता म्हणतेस मग गाणं तर नक्कीच येणार तुला..ते काही नाही तू गाणं नक्की म्हणायचं

आभ्याच्या हट्टापायी चिंगी गाणं गायला तयार झाली, तिने त्या आठवड्यात एक गाणं पूर्ण पाठ केलं..

आता आपल्या समोर येत आहे अबोली पाटील उर्फ इयत्ता पाचवी मध्ये शिकणारी आपली लाडकी चिंगी

चिंगी माईक जवळ आली आणि तिच्या गोड आवाजात गाणं म्हणू लागली..

"रंगबावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा
कुंदकळ्यांना वेलींना सांगा रे सांगा
हे भास होती कसे, हे नाव ओठी कुणाचे
का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे
मला वेड लागले प्रेमाचे "

"नादावला, धुंदावला, कधी गुंतला जीव बावरा
नकळे कसा कोणामुळे सूर लागला मनमोकळा
हा भास की तुझी आहे नशा, मला साद घालती दाही दिशा
मला वेड लागले प्रेमाचे"


त्याच शाळेच्या बाजूच्या रस्त्यावरून चिंगीचा बाप जात होता, आपल्या पोरीच्या शाळेचा कार्यक्रम सुरू आहे हे पाहण्यासाठी तो शाळेच्या गेटमधून आत आला ..आत आल्यावर पाहतो तर काय.. हे असलं गाणं आपली पोरगी गातेय हे त्याच्या पुरूषप्रधान विकृतीला पटलं नाही म्हणून रागारागात स्टेजवर जाऊन चिंगीचा कान पकडून तिला घरी नेऊ लागला

" अहो काय झालं ? हिला का असं बळजबरीने नेत आहात ? किती सुंदर गाणं म्हणत आहे तुमची मुलगी " चिंगीच्या शाळेतील शिक्षिका बोलल्या

" व्हय का.. सुंदर गाणं ? अहो तुम्हाला लाजा वाटत नाही का असली प्रेमावरील गाणी माझ्या चिमुरड्या पोरी कडून म्हणून घेताय ..शाळा आहे की कॉलेज आहे हे ? ही असली थेरं माझ्या डोक्याला पटत नाही.. थांबा आता हिची शाळाच बदलवून टाकतो " चिंगीचा बाप बोलला ..

बिचारी चिंगी रडत रडत जात होती, जाताना दूरवर उभा असलेल्या आभ्याकडे केविलवाणी होऊन बघत होती.. चिंगीला असं पाहून आभ्याला खूप वाईट वाटलं ,पण तो तरी काय करणार चिंगीचा बाप तसाच होता खडूस.. त्याच्यासमोर कोणाचं काहीच चालत नाही..

गेले दोन तीन दिवस झाले चिंगी शाळेत येत नाही शिवाय घराजवळ देखील दिसत नाही म्हणून मन घट्ट करून आभ्या तिची आभ्यासाची वही देयची म्हणून चिंगीच्या घरी गेला तेव्हा तिचा बाप ओरडला त्याच्यावर बोलला की, " चिंगी आता इकडं राहत नाय, तिला दिलं तिच्या आत्याकडे मुंबईला पाठवून, तिकडंच शाळेत जाईल ती आता "

आभ्याला खूप तुटल्याहून तुटल्यासारखं वाटलं, एवढूसा जीव तो ..ज्याने पहिल्यांदा कोणावर तरी प्रेम केलं होतं.. सगळ्यांसारखं त्याचही पहिलं प्रेम अपूर्ण राहिलं..
मुलाच्या जातीने रडत नसतात हे असं सतत आईकडून,मित्रांकडून ऐकलं होतं त्याने त्यामुळे न रडता तसाच घरी आला ..रात्रभर त्या देवीच्या चित्रासमोर बसून का असं केलं देवीने त्याच्यासोबत .. हे चिडत, हिरमुसत विचारत होता.. पण पोस्टरच ते ,काय बोलणार ? शेवटी त्याला राग येऊ लागला त्या पोस्टरचा, म्हणून त्याने बाजूला असलेले सगळे रंग उधळले त्या पेंटिंगवर आणि मग झोपी गेला..

सकाळी आभ्याचा बाप पाहतो तर ते पोस्टर सगळं विद्रुप झालेलं होतं ,त्याला काय करावं सुचत नव्हतं .नेमकं आजच ते बंगाली गृहस्थ पेंटिंग घेयला येणार होते म्हणून तसाच शून्यात एकटक बघत बसून डोक्याला हात लावला त्याने ..ते बंगाली गृहस्थ येऊन गेले, जाता जाता त्याच्या बापाला चार पाच शिव्या देऊन गेले ,देवाच्या कार्यात नीट लक्ष न देता त्यांचा हिरमोड केला आभ्याचा बापाने असं त्यांना वाटलं म्हणून नाही नाही ते सुनावून गेले ते आभ्याच्या बापाला.. पैसे कमावण्याची सोन्याची संधी हुकली शिवाय शेजारी पाजारी अपमान झाला ते वेगळंच म्हणून आभ्याच्या बापाला हे सहन नाही झालं आणि तो तसाच पळत सुटला आणि वेगात येणाऱ्या गाडी समोर जाऊन उभा राहीला...हे सगळं आभ्याच्या डोळ्यादेखत झालं ..

किती विचित्र प्रसंगांना आभ्याला सामोरं जावं लागलं, आधी चिंगी म्हणजे पाहिलं प्रेम गमावून बसला आणि आता जिता जागता बाप केवळ आभ्याच्या एका चुकीमुळे होत्याचा नव्हता झाला .. आता मात्र आभ्या स्वतःचं रडणं नाही थांबवू शकला.. खूप रडला तो .. त्याची आई आणि तो असंच जग राहिलं होतं आता..

पुढे काय होईल आभ्यासोबत ?? वाचत रहा ..
एक होता अभिजित..फक्त आपल्या ईरावर..

क्रमश:..



🎭 Series Post

View all