एक घर.. आनंदी!

एक छोटीशी लघुकथा
एक घर..  आनंदी!





"मम्मा, आज बिर्याणी बनवशील का गं? "
दहा वर्षाची वेदिका तिच्या मम्माला म्हणजे आर्याला विचारत होती.

"नाही गं वेदू, आज नाही गं जमणार. "

" जा, तू अशीच करते, मला काही खायची ईच्छा झाली की बनवूनच देत नाहीस." वेदू गाल फुगवून बसली.

" अगं, आज बुधवार आहे, कामाचा खूप वर्कलोड आहे, बाळा. आज नाही जमणार."  आर्या तिला समजावत म्हणाली.

"मी नाही जा, मी ना कट्टी आहे तुझ्याशी."  तिचे गोबरे गाल आणखीन फुगले.

 "आज नाही जमलं तरी संडेला मात्र नक्की करणार हं."  ती.

" खरंच? "

 "अगदी खरं!"

"प्रॉमिस?"

" पक्का प्रॉमिस!"
तिने प्रॉमिस केले आणि वेदुची कळी खुलली.

 "येsस" म्हणत ती छोट्या निहारला सोबत घेऊन खाली खेळायला पळाली.

 आर्या मंद हसली.
 किती गोड पोरगी आहे ही, आताच कशी रुसली होती आणि आता कशी फुलली. थोडं मनात वाईटही वाटत होतं, गेल्या दोनचार महिन्यापासून ती मुलांना हवा तसा वेळ देऊ शकत नव्हती.

 `आज नाही जमलं तरी रविवारी बिर्याणी बनवायचीच!´ तिने मनात पक्क केलं.



 आर्या आणि सागरच्या लग्नाला बारा वर्ष झाली. संसाराच्या वेलीवर दहा वर्षांची वेदिका आणि आठ वर्षांचा निहार अशी फुलेही उमलली. घरात सासूबाई आणि हे चौघे. सगळं उत्तम चाललं होतं. सागर आणि आर्या वेगवेगळ्या ठिकाणी जॉबला होते. सकाळी सकाळी कामे, टिफिन मुलांची तयारी सारं आटोपून ती घाईतच सागर सोबत निघायची. ती गेल्यावर घरातील उरलीसूरली कामं, शाळेतून परतलेल्या मुलांकडे लक्ष देणं हे सासूबाईचं काम. आणि त्याही कसली कुरबूर ना करता सगळं करायच्या. ऑफिस आणि घर सांभाळताना होणारी सुनेची कसरत त्यांना कळत होती.


कोविडकाळ सुरु झाला नी इतरांप्रमाणे या दोघांचेही वर्क फ्रॉम होम सुरु झाले. त्यात मुलांच्या ऑनलाईन शाळा त्यांचे होमवर्क, घरातील इतर कामे, आर्या त्रासून जायची. ती घरीच असते पाहून आताशा सासूबाईंनी देखील हळूहळू कामातून स्वतःला बेदखल करण्यास सुरुवात केली.
`त्यांचं वय वाढतंय, उगीच काय राबवून घ्यायचं?´ म्हणून तीच जुपलेल्या बैलासारखी कधी किचन, कधी उष्टी खरकटी, ऑफिसचे काम, मुलांचा अभ्यास ह्यात गुंतलेली असायची. नवाऱ्याने मदत करावी हे अपेक्षित होतं, पण लहानपणापासूनच `घरकाम हे मुलांचे काम नोहे´ हे मनावर पक्के बिंबवलेले. त्यामुळे आर्याची होणारी फरफट सागरला दिसत होती पण तिला काही मदत करावी असा विचार मात्र मनाला कधी शिवला नाही.
काही दिवस बरे गेले नी मग आर्याच्या मनाने काही तक्रार केली नसली तरी शरीर कुरकूर करायला लागलं. ऐन पस्तीशी चाळीशीतच गुडघेदुखी, पाठदुखी सुरु झाली. कधी झोपेचं खोबरं व्हायला लागलं, तर कधी हार्मोन्सचा तोल बिघडून पाळी वेळी अवेळी येऊ लागली तर कधी दोन-दोन, तीन -तीन महिने गायबही व्हायला लागली. मुलावर होणारी चिडचिड ती वेगळीच. सागर आणि तिच्यातील नातेदेखील बिघडायला लागले.

एवढा चांगला सुखाने चाललेला संसार आणि त्यात अचानक मिठाचा खडा पडावा तसे तिला वाटू लागलं. रोजच्या तक्रारी, रोजच्या कुरबूरी, त्यामुळे आता रोजच डोळ्यातून आसवं गळायला लागली. वर्क फ्रॉम होम करून नवऱ्याचं पोट सुटायला लागलं आणि आर्या मात्र सुकल्यासारखी दिसू लागली.

मागच्या शुक्रवारी कामानिमित्त म्हणून सुधा, सागरची मैत्रीण त्यांच्या घरी आली. ती त्याची कलीग होती, शिवाय कॉलेजची मैत्रीण. आधीपासून घरी येणेजाणे सुरु होतेच त्यामुळे सागरसोबतच आर्याशी सुद्धा तिचे मैत्रीचे नाते होते. आर्याला त्या अवस्थेत बघून ती चाटच पडली. सागर इकडे फुगत चाललाय आणि ही अशी का दिसतेय? याचं तिला आश्चर्य वाटलं, तसे तिने बोलून पण दाखवले पण आर्याने ते हसण्यावारी नेलं. दोन तीन तास तिथे घालवल्यावर मात्र सुधाला परिस्थिती काय आहे हे समजायला वेळ लागला नाही. आर्याची काही तक्रार नव्हतीच, म्हणून सुधादेखील काही बोलली नाही पण परत जाताना मात्र रविवारी सगळ्यांना आपल्या घरी जेवणाचे अगत्याचे निमंत्रण द्यायला विसरली नाही. आणि सागरच्या आईलापण सोबत येण्याचे पक्के प्रॉमिस घेऊनच ती गेली.

दोन दिवसावर रविवार उजाडला. थोडा चेंज म्हणून आर्याला जावेसे वाटत होते. सुधाआँटी वेदू आणि निहारची पण आवडती, तेही लगेच तयार झाले. सासूबाई हो नाही करत होत्या, पण तिला प्रॉमिस केलेलं, म्हणून मग त्यांनीही होकार दिला.


सुधाच्या घरात सुधा, तिचा नवरा पियूष आणि बारा वर्षाचा मुलगा प्रणव असे त्रिकुट होते. सासूबाई लॉकडाउनपूर्वीच लेकीकडे गेल्या आणि तिथे तिची छोटी मुलं, म्हणून मदतीसाठी तिथेच राहिल्या.

सागरचे कुटुंब तिथे पोहचल्यावर प्रणव सगळ्यांसाठी पाणी घेऊन आला. ती छोटीशीच गोष्ट, पण आर्याला लगेच सुधाचा हेवा वाटला. तिच्या घरात तिने हे कधी अनुभवलेच नव्हते. गप्पा टप्पा झाल्यावर जेवणासाठी सुधा पानं घेऊ लागली तशी सासूबाईनी आर्याला इशारा केला. आर्याही ईशारा समजून सुधाला मदत करायला उठली. पण सुधाने तिला बसवलं. तोवर पियूष स्वयंपाकघरातून भांडी घेऊन आला, प्रणवने सुद्धा ग्लास वाटी, पाण्याचा त्यांब्या टेबलवर आणून ठेवलं.जेवण वाढतांना देखील पियूष तिला हवी ती मदत करत होता. सागर हे सगळं न्याहाळत होता. जेवणानंतर बडीशेप तोंडात टाकता टाकता सासूबाई टेबल पुसणाऱ्या पियुषला म्हणाल्याच,
" असू द्या हो पियूषराव, किती कामं करता? अशाने आमची सुधा पुरीसारखी फुगेल हो आणि सोबत बिचाऱ्या प्रणवला पण कामाला लावलत. लेकराला तरी सोडा."
त्यावर पियूष केवळ मंद हसला.

"अहो आजी, हे ना आमचं टीमवर्क आहे. रोजच असते." तिच्या प्रश्नाचे उत्तर प्रणवने दिले.

"म्हणजे रे दादा?"   वेदू आणि निहारला ऐकण्याची घाई झाली.
"मला आठवलं,पपांच्या ऑफिसमध्ये टीमवर्क असते, ते नेहमी सांगत असतात. " छोटा निहार डोकं खाजवून म्हणाला.
" पण त्याचा इथे काय संबंध?"  सासूबाई.

"त्याचं काय ना काकू, ऑफिसमध्ये एखादा प्रोजेक्ट एका ठराविक कालावधीत पूर्ण होणं अपेक्षित असतं, जर तसं नाही झाले तर वाट लागलीच म्हणून समजा. म्हणून मग त्या प्रोजेक्टच्या संदर्भात तिथल्या प्रत्येक मेंबरवर एक विशिष्ट जबाबदारी दिली जाते. त्याने त्याचे ते काम योग्यरीतीने पार पाडणे एवढीच अपेक्षा आणि बदल्यात पगार!"
सुधा त्यांच्या गप्पात सामील होत म्हणाली.

"हो गं, बरी आठवण झाली. शाळेमध्ये असतांना आम्ही मैत्रीणी अशीच कामं पार पाडायचो. कुणी फळा पुसायचे, काही झाडू मारायच्या, काही चटई उचलून ठेवायच्या." सासूबाई बालपणीच्या आठवणीत रमल्या.

पियूषने तो मुद्दा उचलून धरला.
"हो ना, पण तेव्हा कुणाकडून कसली अपेक्षा नसायची. ऑफिसमध्ये काम केल्यावर पगाराच्या स्वरूपात आम्हाला मोबदला मिळतो, पण शाळेतल्या तुमच्या टीमवर्कला काही मिळायचं का हो? "   तो.

" नाही हो, आम्ही हे सगळं आमची शाळा, आमचा वर्ग आणि बाईंची शाबासकी मिळावी म्हणून करायचो."  सासूबाई.

"आम्हीही आमच्या घरात तेच करतो काकू. घर म्हणजे एकट्या स्त्रीचे नसते ना? आम्हीही त्याच घरात राहतो ना, मगं तीच का दिवसभर घाण्याला जुम्पल्यासारखी काम करत राहणार? त्यातून ऑफिसचे काम असतेच की. म्हणून मग आम्ही घरातदेखील टीमवर्क सुरु केलंय. सकाळी सुधाने झाडू मारला तर मी लादी पुसणार. मी भांडी घासली तर प्रणव ती धुणार. कपड्यांसाठी बाई आहेच. स्वयंपाकपण आम्ही मिळूनच करतो. मी भाज्या चिरेल, ती फोडणी देते. तिने पोळ्या लाटल्या तर मी शेकतो. कुकर तर प्रणवच लावतो. हे सगळं आम्ही आवडीने करतो बरं. एकत्र काम केल्याने एकमेकांसोबत वेळही घालवता येतो आणि मुख्य म्हणजे आमची तिघांची बॉण्डिंग मस्त वाढलीय हं आता."

पियूष भरभरून बोलत होता, इकडे मात्र सगळ्यांच्या डोळ्यापुढे घरात राबराब राबणारी आर्या येत होती.

"आमच्याकडे तर असं काही होतच नाही, सगळी कामं तर मम्माच करते."  निरागसपणे निहार म्हणाला.

"मग मम्माच्या टीममध्ये तू जॉईन हो, तुला बघून आपोआप ग्रुपमेंबर वाढतील बघ. "  त्याच्या केसातून हात फिरवत सुधा म्हणाली.

"आणि जास्त कामं नाही केली तरी कुणी पुरीसारखे फुगत नाही बरं का,  उलट तोच वाचलेला वेळ व्यायामाकडे दिला तर आपणही मेंटेन्ड राहतो."   पियुष सासूबाईंना म्हणाला.

त्यावर त्यांनी मान डोलावली. "खरं आहे, हा विचार कधी मनात आलाच नाही. आम्ही केलं, आता सुनेने करावे एवढेच मनात ठेवलं. यापुढे असं नाही होणार, आमच्या घरातसुद्धा आता टिमवर्क असेल हो."  त्या म्हणाल्या.


तिकडून आल्यापासून आर्याच्या घरातले वारे थोडेफार का होईना, पण बदलले. सागर आणि सासूबाईबरोबर मुलंही थोडीफार मदत करायला लागलीत.



आणि आज बुधवार, वेदिकाने बिर्याणीचा हट्ट धरला पण ऑफिसच्या वर्कलोडमुळे आर्याला काही जमलं नाही. शनिवारी मात्र रात्री झोपतांना तिने सागरला आठवण करून दिली, `उद्या सकाळीच चिकन, बिर्याणी मसाला, बासमती तांदूळ आठवणीने घेऊन ये´ म्हणून.

त्याने रविवार उजाडताच चहा घ्यायच्या आधीच आठ वाजता सगळे साहित्य घेऊन आला. ती रविवार म्हणून जरा उशिराने उठली. गॅसवर चहा ठेवत नाही तोच अचानक पाठीत एक कळ उठली. अगदी वाकता बसताही येईना. 
सिंकमधील भांडी, ओट्यावरचे चिकन तिच्याकडे आ वासून बघत होते, पण ती काहीच करू शकत नव्हती. वेदिकाचा हसरा चेहरा दिसला आणि तिलाच रडायला आले. सागरला तिची अवस्था कळत होती, तिला पेनकीलर देऊन जबरदस्तीने बेडवर परत पाठवले. पाठीला हलकी मालिश करून दिली सोबत तिथून अजिबात हलायचं नाही अशी सक्त ताकीद देऊन तो किचनमध्ये आला.

मम्माला तसं बघून मुलांची तोंड हिरमुसली. तो त्यांच्यासाठी दूध घेऊन गेला नी दूध पिऊन झाल्यावर त्यांना म्हणाला, "काय टिमवर्क करायचं ना? " मुलं लगेच तयार झाली.
सासूबाईनी थोडी पूर्वतयारी करून दिल्यावर सागरने यू ट्यूब बघून बिर्याणी बनवायला सुरुवात केली. वेदुने घरात झाडू मारला, निहार लादी पुसायला लागला. सगळ्यांचे आवरल्यावर सासूबाईंनी कपड्याचे मशीन लावले. बिर्याणीचा सुगंध घरभर दरवळत होता.
आर्याचे दुखणे थोडे कमी झाले होते, ती आपलं आवरून घरात काय पसारा झाला असेल या कल्पनेने बाहेर आली तर घर अगदी लख्ख आणि सगळी कामं आटोपली होती.


जेवायला बसल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता.
"किती छान आवरलंय तुम्ही सगळ्यांनी मिळून, तेसुद्धा किती लवकर. थँक यू!" पहिला घास आपल्या मुलांना भरवत ती म्हणाली.

"अगं, सगळी टीमवर्कची कमाल!"

सासूबाई म्हणाल्या तसे घरभर बिर्याणीच्या सुगंधाबरोबर आनंदाचा सुवास दरवळला!


                ******समाप्त ******

घर केवळ एकट्या स्त्रीचेच असते का? नाही ना, मग त्या घरातील कामे तिनेच करायला हवीत हा अट्टहास कशासाठी?

घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती.
तिथे असावा प्रेमजिव्हाळा, नकोत नुसती नाती.

असे  आनंददायी घर हवे असेल तर एकमेकांबद्दल प्रेम, आदर, जिव्हाळा यांच्यासोबत टीमवर्कही असेल तर?
तर ते घर नक्कीच हसरे होईल. तुम्हाला काय वाटते? नक्की सांगा. ही छोटीशी कथा आवडली तर कमेंट करा आणि फबी पेजवर like करा.
माझे इतर लेख वाचण्यासाठी तुम्ही मला फॉलोदेखील करू शकता. धन्यवाद!