एक दुर्गा अशीही...

एकत्र कुटुंब असल्याने अनिताला खूप काम करावं लागत असे. तिला लग्नाआधी इतक्या कामाची सवय नसूनही ती आनंदाने सर्व काम करायची. दिर आणि सासऱ्यांसोबत तिचा जास्त संवाद होत नसे पण आपल्या सासूला तिने आईच मानलं होतं.


स्पर्धा : गोष्ट छोटी डोंगराएवढी

विषय : एक दुर्गा अशीही



एक दुर्गा अशीही





एकत्र कुटुंब असल्याने अनिताला खूप काम करावं लागत असे. तिला लग्नाआधी इतक्या कामाची सवय नसूनही ती आनंदाने सर्व काम करायची. दिर आणि सासऱ्यांसोबत तिचा जास्त संवाद होत नसे पण आपल्या सासूला तिने आईच मानलं होतं. दोघींमध्ये चांगली मैत्रीही होती. तिचा नवराही तिला मनासारखा मिळाला होता. दृष्ट लागण्याजोगा संसार सुरू होता. तिच्या लग्नानंतर दोन वर्षांनी तिच्या दिराचे लग्न झाले. नवीन सून घरात आली. दोघी जावा बहिणींसारख्या एकमेकींना सांभाळून घ्यायच्या. त्याचवेळी अनिताने गोड बातमी दिली. घरातले वातावरण आनंदी होते.
पण अनिताला पाचवा महिना सुरू असतानाच 
तिच्या नवऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. हे डोंगराएवढं दुःख तिला पेलवेनास झालं. तेव्हा तिच्या सासूने तिला धीर दिला. पण तिच्या दिराचा स्वभाव काही चांगला नव्हता. तो तिचा खूप तिरस्कार करायचा. कोणत्या ना कोणत्या कारणावरून तिला त्रास द्यायचा.
 या सगळ्यात दहा वर्ष उलटले. तिचा दिर अजूनही तसाच वागत होता. ह्याबद्दल त्याच्या बायकोने त्याला जाब विचारला तर तिला त्याने खूप मारले. त्यामुळे तीही दुर्लक्ष करू लागली.

काही दिवसांनी तिची सासू जगाचा निरोप घेत गेली. त्यामुळे ती अजूनच एकटी पडली. तिचा दिर आता तिला अजूनच त्रास देऊ लागला. पण तरीही तिने सहन केले. पण एकदा अनिताच्या गैरहजरीत तिच्या दिराने तिच्या मुलाला खूप मारले. हे मात्र अनिताला सहन झाले नाही. तिने जोरात त्याच्या कानशिलात भडकावली. नंदांना बोलावून घेतले आणि जमिनीच्या वाटण्या केल्या. 

तिने आपल्या वाट्याला आलेल्या शेतात मतीच घर बांधलं. आणि तिचा दहा वर्षांचा मुलगा घेऊन ती तिथे राहू लागली. ती जमीन बऱ्याच वर्षांपासून पडीत होती. त्या जमिनीत पीक घेणं एकट्या बाईला खूप कठीण होतं. पण ती अजिबात खचली नाही. उलट पुन्हा जिद्दीने उभी राहिली.
 
   शेतीची कामं वेळच्या वेळी होण्यासाठी भांडवलाची गरज पडत असल्याने ती दुसऱ्याच्या शेतात मजुरी करू लागली. दुसरीकडे मुलाच्या शिक्षणाकडेही तिने दुर्लक्ष होऊ दिले नाही. हे सर्व करत असताना तिला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. 

वर्ष पुस्तकाच्या पानासारखे उलटत गेले. तिचं शेत आणि आयुष्य दोन्हीही बहरले. आपल्या मुलाला तिने चांगले शिक्षण दिले. त्याचबरोबर त्याला मातीवर प्रेम करायला शिकवले. मातीच्या घरात पांढरा वर्ष राहिल्यानंतर तिने कर्ज न काढता स्वतःच्या कष्टाच्या पैशाने स्वतःचा बंगला उभा केला. 
आज संपूर्ण गावात एक आदर्श शेतकरी म्हणून अनिता ओळखली जाऊ लागली.
अनिताने तिच्या वाटेत येणारे दुःख, अडचणी, एकटेपणा, पोरकेपणा या सगळ्या राक्षस रुपी संकटांच्या छातीत त्रिशूळ खुपसत पराभवावर मात केली.
अशी आहे अनिता
 
शेतीतल्या मातीतली,
एक दुर्गा अशीही...

समाप्त...
लेखन : कोमल पाटील