एक दुर्गा अशीही

एक दुर्गा अशीही

दुर्गोत्सवाचे दिवस होते. दुर्गोत्सव म्हटला की सर्वत्र उत्साहाचे वातावरण. आमच्या गावी सुद्धा मंडळाची दुर्गा देवी बसल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. सकाळपासून साधारण दहा वाजेपर्यंत लाऊड स्पीकरवर भक्तीगीतं सुरू असायची. आमच्या शाळेपासून जवळच दुर्गादेवी बसली होती. मात्र सामाजिक भान ठेवून शाळेच्या वेळेमध्ये कोणीही लाऊड स्पीकर लावत नव्हते.


आमची शाळा नुकतीच गावालगतच्या शाळेच्या नवीन बिल्डिंगमध्ये शिफ्ट झालेली होती. आजूबाजूला नयनरम्य वनराईने समृद्ध असा परिसर. शाळेची वेळ अकरा ते पाच. पावणे अकरा वाजले. सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनी, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका हजर झाले. प्रार्थनेची घंटी झाली. सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी रांगेत उभे राहिले. बँड पथकावर राष्ट्रगीत सुरू होणार तोच एक स्त्री मोठमोठ्याने ओरडत थांबा थांबा साप म्हणत धावत आली. ती इतकी जोरात ओरडत होती की काय झाले हे कोणालाच कळेना. ती स्त्री वायु वेगाने मुलांच्या रांगेत घुसली. सर्व मुलांना बाजूला केले. त्या स्त्रीने एक भला मोठा साप झाडावरून उडी घेताना पाहिला होता. व तो साप विद्यार्थ्यांच्या दिशेने येत होता. थोडा जरी वेळ झाला असता तर बँडच्या आवाजात कदाचित तिचा आवाज ऐकूही आला नसता. एक दुर्गा बनून तिने आम्हा सर्वांचे रक्षण केले. एव्हाना  सर्व विद्यार्थी व आम्ही सर्व बाजूला होऊन गेलो होतो. तो भला मोठा साप वायू वेगाने सरसर करीत दिसेनासा झाला.


ती स्त्री शाळेच्या जवळच एका झोपडी वजा घरात राहत होती. तिच्या बोलण्यावरून आम्हाला कळले की तिला शाळेची प्रार्थना खूप आवडते म्हणून ती पाहत उभी होती. आणि अचानकपणे झाडावरून पडत असलेला साप तिने पाहिला होता. नंतर त्या सापाला शोधून सर्पमित्राच्या स्वाधीन करण्यात आले. सर्पमित्राकडून कळले की तो एक विषारी जातीचा साप होता. नंतर मात्र कधीही त्या परिसरात विद्यार्थ्यांना सापाचे दर्शन झाले नाही.


एक दुर्गा अशीही, की जिच्यामुळे फार मोठा अनर्थ टळला. नमस्कार त्या स्त्री रूपातील दुर्गा देवीला.

धन्यवाद.