एक दुपार मंतरलेली .१

"What happened that afternoon?" Written in two parts... if you are interested to know..then please continue reading..!

अव रमाकाकी काय करत व , चालन मायी आई बलवत हाय , धावतच आलेली हिरुबाई म्हणाली , 

कुट व , आं कुट मनत हाय , काय मायीत ,

पुढ बोलशीन ? का अटकले बोल तुये घशातच ,

अव काकी दम लागला न व मले , हिरु म्हणाली

मंग कोन सांगतल होत तुले धावाच , ताडासारखी वाढली न रस्त्यान धावत सुटते , 

थे सोड व काकी ,

चाल मायवाली माय तुले बोला साटी बोलावते घरी ,

मी का रिकामी हाव का , 

तुयी माय कावून नायी आली इकड बोला साटी ,

अव तिले भेटल्यावर मंग म्हणजो , माय डोस्क कायी खावू नको ,

मले जे सांगतल तुले निरोप द्याच थे दिल , याच असन थ ये , हिरुबाई रागानी म्हणाली ,

बर चाल होय पुढ येतो मी आणी काकी न्हाणीत हात धुवून कंम्बरेला खोचलेला पदर काढून डोक्यावर घेत हिरुबाईच्या घराकडे गेली , 

गावातल्या एका वेटाळ्यात राहणार्‍या आणी नात्यातच असणार्‍या लक्ष्मीबाईंची हिरुबाई मुलगी , 

जवळ जवळ दहा बारा घरांचा वेटाळा { मोहल्ला } हे सगळे एकमेकांचे नातेवाईक , 

थोडी थोडी शेती घरी पण तेवढ्याने नाही भागायचे मग दुसर्‍यांच्या शेतात ही कामाला जायच्या बाया , 

रमाकाकी लक्ष्मीबाईच्या घरी आली , 

काव बाई कावून बलावल तडकाफडकी ,

हे पोरगीत जशी माया गचांडीवरच{मानेवर } बसली होती ,

हो काव ! आता माय कावून व बाई तू अशी हास , हिरुची आई हिरुला म्हणाली ,

तशी हिरु तोंड वाकडे करुन बाहेर गेली , 

जावू दे तिले , मी का म्हनतो , ऊद्या च्या कामाच कस , हिरु ची आई म्हणाली ,

आॅ ! काव बाई मले हेच बोलासाटी बलावल का तुमी ?

तुमी कावुन नायी आल्या घरी बोला साटी ? रमाकाकी कंटाळून म्हणाली ,

अव म्या हिरुले म्हटल होत काकी येत नसन त मले सांगजो , मी येतो तिच्या घरी , 

हे पोट्टी ना भल्ली बाजींदी{ खोटारडी} हाय व बाई , 

रांधता रांधता { स्वयंपाक }आनल माय मले इकड ,

अस करा ऊद्यापासन माया वावरात { शेतात } निदांले{ गवत , तन काढायसाठी } या , आठ दिसाच काम हाय , काकी म्हणाली , 

माय बाई अव तेच त बोलाच होत ,

मंगाशीच सरपंच आला होता , 

त्यायच्या वावरात बाया लागतीन म्हणे , 

त्यायले म्हनल म्या , 

रमाबाईकड जाच हाये म्हनून , 

पन लयच मांग लागला थो त मंग मी जातो तिकडे निंदाले आन हिरुबाईले पाठवतो तुयाकड निंदाले , 

आन थे सदाच्या दोन पोरी येतीन , चालन ना रमा ? 

तिकडच झाल का मंग येतो ना तुया वावरात , लक्ष्मीबाई म्हणाल्या , 

बर बाप्पा बरच हाय , काय करता आता , तुमी आल्या असता त लौकर झाल असत ना मायवाल काम , 

पर्‍हाटीले युरीया टाकाचा हाय मंग , रमाकाकी म्हणाली ,

होव ना माय सरपंचाच झाल का तुयाकडच कामाले येतो पाय मंग , लक्ष्मीकाकी अजीजीने म्हणाली ,

बर चला मी जातो , रांधांच तसच टाकून आल्ती ह्या हीरी पायी , रमाकाकी ऊठत म्हणाली ,

बर जाय मंग , 

रमाकाकी घरी आली स्वयंपाक केला मुलांना , काकांना वाढून दिले , आणी लक्ष्मणकाकांना म्हणाली ,

अव आयकता का , 

हं बोल , 

निंदन हाय ऊद्या , बाया कमी हात , तीन पोरी घेवून जातो वावरात , 

बर पन माय ,,, येन होनार नायी वावरात , 

तू पावून घे , ते सेनट्रिंगच काम कराच रायल सायबा कडच , त्यासाटी जा लागते ऊद्या पायटीच , आठ रोज मले येळ नायी , घरी याले ही येळ होईन , 

माय जेवली का व ? 

काका गवंडी होते ठेक्यानी काम घ्यायचे मग घरच्या चार एक्कर शेतीचे काम रमाकाकीच सांभाळायची ,

नायी ना तुमच्या मायच कायी खर हाय का , बसतात पोट्ट्या सोट्यासंग मजाक करत , लाईट खाली बसल्या हाईत , बलावल्या शिवाय थोडी येतीन , काकी म्हणाली ,

जाय मंग बलाव आठ वाजत हाय , मी झोपतो मले सकाळीच जाच हाय , म्हणून काका झोपले , 

रमाकाकीने मुलीला म्हंटले ,

जाय बर बाई बुढीले बलाव जेवाले , सकायी मले जा लागते वावरात , 

हाव म्हणत मुलगी गेली लाईट खाली{मोहल्ल्यातला मध्यस्थळी असणारा स्र्टिटलाईट } जिथे आजी लहान मोठ्या मुलीं मुलां सोबत गप्पाटप्पा करत बसली होती ,

तिच्या बोलण्याने ती सगळ्यांचे मनोरंजन करायची ,

हिरुपण तिथेच बसून होती , 

मोहल्ल्याच्या मधोमध रिकामी जागा होती , 

गप्पाटप्पा करायला सगळे तिथेच जमायचे ,

रात्रीतर हमखास ऊशीरापर्यंत गप्पा चालायच्या त्यात जुन्याकाळच्या गप्पा सांगून आज्जी सगळ्यांना हसवायची , आज्जी तुले आई जेवाले बलावते , 

थांब व भूरे बसन इथं , हिरु तिला खाली बसवत म्हणाली , ती गोरी होती म्हणून तिला भूरी म्हणायचे ,

तिचे नाव मंदा होते ,

नाय व आज्जी पयले गोठ पूरी कर मंग जाजो घरी , हिरु ने म्हंटले ,

होव माय हिरे सांगतो ना , गोठी सांगू सांगू माया जीव जाऊ दे , मरता मरता ही गोठ सांगीन आज्जी म्हणाली ,

तश्या सगळ्याच हसल्या , 

अव बोलन व आज्जी मंग त्या नाव घेतल काव , 

होना माय सार्‍या बाया आपआपल्या नवर्‍याचे नाव घेत होत्या मलेयी येका बाईन नाव घ्याच म्हतल मंग म्या म्हतल , 

" वाकडी तिकडी बाभूय 

तिले हिरवा हिरवा पाला

सखाराम मेला त 

तुकाराम केला " ,

सगळे हसायला लागले , तशी मिरा तिच्या आईला म्हणाली आई व तू घे बर नाव , आज्जी ही तिला म्हणाली , घेन व नवर्‍याच नाव , का त्याच्या पैशावर मजाच करत , 

आता बाई , बुढी सारखत मले येत नायी पन घेतो येक , 

मीराची आई म्हणाली ,

" गजाननाच्या फोटुले हार घालतो वाकून तुया बापाच नाव घेतो बुढीचा मान राखून " , सगळे एकदमच हसायला लागले ,

तिकडून जानकी आज्जी आली , बाई सार्‍या गावात पायल माय बुढ्याले , काय मायीत कुट जाऊन बसला ?

अव येईन ना कायले गेली पाहाले ! सरु आज्जी म्हणाली ,

तिकडून जानकी आज्जीचा बुढा आला , मस्त हात मागे स्वतःच्या कंबरेवर धरुन जानकी आजीला म्हणतात , 

कोनाची गोठ चाल्ली ! 

आता माय , तुमी कुटून आले वं , दिसलेई नायी बाई ! 

ती तोंडाला पदर लावुन दचकून म्हणाली , 

ईतच त होतो , म्हशीच्या गोठ्याजोळ बसलो होतो , 

मायबाई सार्‍या गावात ढुंढाले गेल्ती ना मी ! 

अन तुमी ईथच होते ?

त्यावर सुंदर आज्जी लगेच म्हणाली , 

" बुढ्याले जेवा साठी 

सारी ढुंढली काशी

आन बुढा बसला होता 

म्हशीच्या ढुंगणा पाशी " 

सगळे लेकर पोट धरुन धरुन हसले ,

आव माय हे बुढी हो का कोन हो , 

मानूस अन लेकराय समोर कश्या गोठी करते माय ,

जानकी आज्जी आणि आजोबा हसतच घराकडे गेले ,

चालाहो पोट्यांनो , चाला झोपाले , 

मीराची आई नाटकी रागाने म्हणाली ,

जाता जाता बाब्या आज्जीला म्हणाला , 

आजी व जाता जाता येक शेवटच होवून जावूदे , 

आज्जीला तर तेच पाहीजे होते , 

ती वळून त्याच्याकडे बघत म्हणाली , 

मीरी न घातला घाघरा

माय नाव सुंदरा 

थुतर{ चेहरा }काय पायत माय बाब्या

जान झोपन बांदरा { माकड }

आन जावो सासूबाई जेवा आन झोपा , 

मीराची आई हसतच म्हणाली ,

तसे सर्व लेकर ऊठून हसतच आपआपल्या घरी गेलेत .

दुसर्‍या दिवशी ठरल्या प्रमाणे हिरु , मीरा आणी मंगला रमाकाकी बरोबर शेतात निंदन करायला गेल्या , त्यांचे छान हसत बोलत निंदन सुरु होते , दोन वाजता मिल मधल्या भोंग्याचा आवाज आला तश्या सगळ्याजणी जेवायसाठी बसल्या , जेवणे झालीत थोड्या वेळाने हिरु मी जाऊन येतो म्हणत लघवीला गेली , तिकडून आल्यावर निंदन सुरु झाले पण अचानक हिरु चुप झाली , बाप्पा काय झाल व हिरु कावून बोलत नायी , कुलुप लावल का तुया तोंडाले , 

मिरा म्हणाली ,

पण ती काहीच बोलली नाही , 

अचानक ती आपले खुरपे खाली टाकून रमाकाकी जवळ आली , 

रमा काकी ओणवी होऊन निंदन करत होती , 

तिला जवळ आलेली बघून ,

काकी म्हणाली , कावून पोट्टे जिवावर आल काव काम , 

पण तिला प्रतिसाद न देता झटकन काकीच्या पाया जवळ बसून तिचे पाय पकडलेत , 

डोळे गच्च मिटलेत आणी जोरजोराने ओरडायला लागली , काकी काकी व , 

थे पाय न व मले बलवत हाय ,

कोन तुले बलवत हाय , काकी हसून म्हणाली ,

अव काकी माया हात धरुन ओढत हाये नाव मले , 

चाल म्हंतो त्याच्या संग , 

अव काकी मले पकड ,

थो पाय मले ओढत हाये , 

काकी तर पार घाबरुन गेली ,

पण ऊसणे अवसान आणून तिला म्हणाली ,

अव पोरी नाटक कायले करत ,

कोन हाय इथ , कोनीच त नायी हाय , 

चाल ऊट बर ,

थो काय काकी तुया बाजूलेच त ऊभा हाय , 

माया हात पकडत हाय ना व काकी मले सोडू नको , 

थो घेऊन जाईन मले , डोळे घट्ट बंद करुन हिरुने काकीचे पाय ही घट्ट पकडून ठेवलेले होते , 

तिचा अवतार बघून आता मात्र दोन्ही मुली आणी काकी घाबरल्याच , 

त्यांनी मोठमोठ्याने आवाज देत शेजारच्या शेतातील लोकांना बोलावले ,

दोन तीन माणसे धावतच तिथे आलीत , त्यातील एक काका म्हणाले ,

काय झाल वयनी ,

पाहा ना बाप्पा ही पोरगी कशी माये पाय पकडून हाये , सोडतच नायी हाय , 

तिचा अवतार त्यांनी पण बघीतला , 

वयनी कुट गेली होती ती , 

त्या निंबाच्या झाडाखाली लघवीले गेली होती , मीरा म्हणाली , अस्स बराबर हाये ,

मान डोलावत ते काका म्हणाले , 

मग त्यांनी जवळ असलेल्या चरवी मधून पाणी घेऊन तिच्या चेहर्‍यावर शिंपडले , 

आणी हनुमान चालीसा म्हणायला लागले तशी हळूहळू ती शांत झाली मग डोळे ऊघडून इकडे तिकडे घाबरुन बघायला लागली आणी म्हणाली ,

गेला थो माणूस काकी , 

हाव का व , मग काकीने काम थांबवले आणी तिला घेऊन घर गाठले , 

क्रमशः

🎭 Series Post

View all