एक दिवसाचं गरोदरपण (भाग 3)

बाळ सांभाळत घर सांभाळणे कठीणच

"मुग्धाची प्रेग्नेंसी थोडी नाजूक होती म्हणून तिला डॉक्टरांनी बेडरेस्ट दिली होती. छोटी मोठी काम करू शकत होती पण धावपळ किंवा दगदगीची काम करायला डॉक्टरांनी नकार दिला होता.



"आईबाबा...मला तुमच्याशी थोड बोलायचं आहे." मुग्धा


"काय झालं बेटा..काही काळजीच आहे का? महेश राव काळजीने विचारत होते.


"नाही बाबा..पण मी..जॉब सोडायचा निर्णय घेते आहे. डॉक्टरांनी बेडरेस्ट सांगितली आहे मग ऑफिसची धावपळ पण नको म्हणून मग मी हा निर्णय घेतला आहे. उद्या काय विपरीत घडायला नको म्हणून मी ठरवलं आहे की आता फक्त आपली फॅमिली वर फोकस करावा." मुग्धा थोडी अपराधीपणाने बोलत होती


"अग मग चांगलच आहे की. आम्ही पण आमच्या येणाऱ्या नव्या पाहुण्याचे थोडे कौतुक करू. त्याला छान खाऊ पिऊ घालू." विमलताई तिच्या पाठीवरून हात फिरवत बोलल्या. 


"आई पण... कामावर नाही गेले तर...माझी इन्कम बंद होईल आणि तुम्हाला माहित आहे ना मी माझा पगार आईबाबांना देते. त्यांची थोडी काळजी वाटते म्हणून..." मुग्धा डोळ्यातलं पाणी पुसत बोलली.


"अग तेवढंच ना..हे बघ तू तुझ्या घराच्या भाड्याचे पैसे आईबाबांना देतेस ना तसेच देत रहा आणि मयूरला दर महिन्याला त्यात पाच हजार अजून टाकायला सांगून दहा हजार पूर्ण करून आपण ते त्यांना देत जाऊ. अग तुझे आईबाबा त्याचे पण आईबाबाच की आता." महेश राव मुग्धाला समजावत बोलले.


"पण बाबा.. घरातला खर्च पण असतोच ना! म्हणजे मला पैसे देण्याबद्दल काही नाही पण.."मयूर काही सुचत नाही म्हणून गडबडून बोलत होता.


"आता पण नाही आणि बिन नाही. तुझ ठरल आहे ना आता जॉब नाही करायचा मग आराम कर. मयूर.. तुला जर पैसे द्यायला जमणार नसतील तर काही हरकत नाही आम्ही मॅनेज करू ते. आणि मुग्धा तू आता जास्त विचार करत जाऊ नको स्वतःची काळजी घे." विमलताईनी त्यांचा निर्णय सांगून विषय संपवला. 


"मयूर..तुला नाही आवडल का मी जॉब सोडलेल?" मुग्धा.


"तू निर्णय घेतलास ना..मग आता का विचारतेस? जाऊदे मी झोपतो. मला उद्या महत्वाची मीटिंग आहे. असही तू आता घरीच असणार आहेस. "मयूर तुटक पणे बोलून मुग्धाकडे पाठ फिरवून झोपला.

मुग्धा मात्र मयुरचा विचार करत बरीच रात्र जागी होती. पहाटे साडे पाचला तिला जाग आली ती दारावर पडलेल्या आवाजाने.


"आई..काय झालं?सगळ ठीक आहे ना? एवढ्या सकाळी तुम्ही.."मुग्धा केसांना क्लिप लावत बोलली.



"हो..सगळ ठीक आहे. तू पटकन तयार हो आपण खाली मॉर्निगवॉकला जातोय. हे बघ मी तुझ्यासाठी काल संध्याकाळी कपडे घेऊन आले. ते घाल आणि पटकन तयार होऊन ये. आम्ही दोघे तुझी वाट बघतोय बाहेर." विमलताई हातातली बॅग मुग्धा कडे देत बोलल्या.


मुग्धाने बॅग घेतली आणि आणि खोलून पाहील तर त्यात ट्रॅकपँट आणि टीशर्ट होत. पटकन फ्रेश होऊन मुग्धा बाहेर आली आणि तिघेही वॉकला गेले.


इकडे मयुरला सकाळी लवकर मीटिंगला जायचं होत. रोज दहाला निघणारा मयूर आज सात वाजताच रेडी झाला होता. घरात कोणी नाही बघून त्याने भरभर स्वतः च आवरून घेतल आणि तोंडात थोडी साखर टाकून घरातून निघाला. खाली. येऊन बघतो तर मुग्धा आईबाबांसोबत मज्जा मस्ती करत येत होती.


"अरे मयूर..तू आज एवढ्या लवकर निघालास? महेश रावांनी विचारलं.


"हो बाबा.. मला आज महत्वाची मीटिंग आहे. मुग्धाला माहीत होत म्हणजे.. मी काल रात्रीच सांगितल होत." मयूर खुळचटपणाने बोलला.


" हो,पण एवढ्या लवकर जायचं आहे हे नाही सांगितलस!" मुग्धा 


"त्याच्याशी आता तुझ काय देणंघेणं? आता तू घरीच आहेस ना..!" मयूर तुसडेपणाने बोलला आणि बाईकला किक देऊन निघून गेला.


मयूर... मुग्धा त्याच्याकडे अवाक् होऊन बघत राहिली.


"जाऊदे त्याला. तू चल आत. कामाचं टेन्शन असेल त्याला" विमलताई तिला समजावत बोलल्या.


क्रमशः

@श्रावणी लोखंडे


🎭 Series Post

View all