एक दिवसाचं गरोदरपण..(भाग १)

बाळ सांभाळत घर सांभाळणे कठीणच
"मुग्धा.. शर्टला इस्त्री करून ठेव माझ्या..मी आंघोळीला जातोय." बेडवरून उठून बाथरूममध्ये जाता जाता मयूर बोलला.

"हो करते. एका बाजूला चपाती शेकवत आणि दुसऱ्या बाजूला भाजी मधे चमचा फिरवत मुग्धा उत्तरली.
शेवटच्या दोन चपात्या शेकवून तिने तवा उतरवून शेगडी खाली सरकवला आणि त्यावरच चहाचा टोप गरम करायला ठेवला.

"मयूर... कुठलं शर्ट इस्त्री करायचं आहे? मुग्धा इस्त्रीची वायर प्लगइन करत विचारते.

"येलो वाला घे आणि ब्लू पँट ला पण कर ग.. आज महत्वाची मीटिंग आहे."मयूर


"बर..."मुग्धा कपाटातून मयुरने सांगितलेलं कपडे काढून इस्त्री करायला घेते.
*********
मुग्धा आणि मयूर दोघांचं लव्ह मॅरेज. शाळा ते कॉलेज दोघांचा प्रवास एकत्रच झाला होता. शाळेतल्या छोट्या छोट्या भांडणातून मैत्री आणि मैत्रीतून प्रेम इथपर्यंतचा प्रवास वेगवेगळ्या अडचणींनी भरलेला होता. त्यावर मात करत आपल्याला हवी असलेली गोष्ट दोघांनी पण जिद्दीने मिळवली आणि घरच्यांकडून लग्नासाठी होकार पण त्यांनी त्यांच्या कर्तृत्ववाने मिळवला. गंमत म्हणून ज्या प्रेमाच्या आणाभाका दोघांनी अल्लड वयात घेतल्या त्याच आणाभाका घरच्यांना आणि देवाला साक्षी मानून सात वचनात एकमेकांना बांधून घेत बोलल्या गेल्या.
स्वतःच्या कमाईतून दोघांनी घर घेतल होत पण वेगवेगळं आणि त्यांनी घेतलेली घर भाड्याने देऊन ती आईबाबांसोबत राहत होते कारण मयूर एकुलता एक होता.

मुग्धा पण तिच्या आईवडिलांची एकुलती एक लाडकी होती. दोघेही त्यांच्या घराचे भाडे त्यांच्या आईवडिलांना देत होते आणि यात मयूर च्या घरच्यांचा काहीच आक्षेप नव्हता.
लग्न झालं आणि दिवस सरत होते. नव्याची नवलाई खूप मस्त वाटली पण नंतर परीक्षा होती ती संसाराची. सासू भेटली होती ती अगदी आईप्रमाणे समजावून सांगणारी आणि मन मोकळं बोलता येणारी. सासरे म्हणजे एकदम गमतीदार व्यक्तिमत्व. एखादी गोष्ट जर समोरच्याला सांगून पटत नसेल तर कृतीतून समजावण्यात एकदम पटाईत आणि तरी नाही समजल तर खडसावून सांगण्यात त्यांचा कोणी हात धरूच शकत नव्हत.

लेक सासरी कशी नांदते हे बघण्यासाठी एकदिवस अचानक सुधाताई लेकीच्या सासरी आल्या. दारावरची बेल वाजली म्हणून मयूरने दार उघडलं.

"या या...मी आता तुम्हालाच फोन करणार होतो. हे बघा.. तुमच्या लेकीने काय केलं आहे." मयूर दारातूनच बोलत होता पण त्याचे शब्द ऐकून सुधाताई आणि त्यांचे घरवाले थोडे घबरलेच. काही न बोलता आत जात बघतात तर त्या एकदम अवाक् होतात. लेकीला अस बघून त्यांच्या डोळ्यात पाणीच येत.
क्रमशः
@श्रावणी लोखंडे.



🎭 Series Post

View all