एक डेट.. अशीही!

Anu and Ajinkya are college lovebirds. But today after 10 years of marriage, will the things be same between them?

समोर उघडलेला ईमेल पाठवून अनुने हातातल्या घड्याळाकडे बघितलं. साडे पाच वाजत आले होते. आज लवकर निघायचं ठरवलं होतं तरी उशीर झालाच होता. नवीन काही काम अंगावर पडायच्या आधीच तिने कॉम्प्युटर बंद केला आणि ती निघाली. आजचा दिवस खास होता. आज तिच्या आणि अजिंक्यच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्त काहीतरी खास करायचं असं तिने ठरवलं होतं. रेवा आणि रवीश शाळेतून त्यांच्या आज्जीकडे जाणार होते. ते दोघं रात्री घरी परत येईपर्यंतचा वेळ फक्त अनु आणि अजिंक्यचा होता. मुलं झाल्यापासून त्या दोघांना निवांतपणा असा मिळालाच नव्हता. ऑफिसची कामं, मुलांचा अभ्यास, त्यांच्याशी खेळणं यात दिवसाची रात्र कधी व्हायची याचंही भान त्यांना नसायचं. आणि असंच बघता बघता त्यांच्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाली. 'खरंच दहा वर्ष झाली आमच्या लग्नाला? दिवस किती भराभर पुढे गेलेत.' अनु बसमध्ये बसली तेव्हा स्वतःशीच विचार करत होती. कॉलेजमध्ये तिच्या मागेमागे फिरणारा अजिंक्य तिच्या डोळ्यासमोर आला. इंजिनीरिंगला दोघं एकाच कॉलेजला होते. अजिंक्य अनुला दोन वर्ष सिनिअर होता. कॉलेजच्या पहिल्या दिवशी अनु तिचा वर्ग शोधत चुकून त्याच्या वर्गात जाऊन पोहोचली. अजिंक्य म्हणजे कॉलेजची जान आणि शान. कॉलेजमध्ये आलेलं नवं पाखरू बांधून त्याचा खोडकर स्वभाव त्याला शांत बसू देईना. त्याच्या एका खुणेवर अख्खा क्लास उठून "गुड मॉर्निंग टीचर" ओरडला. घडल्या प्रकाराने अनु काही क्षण गांगरली पण तिने लगेच स्वतःला सावरलं, "स्वतः झोपेतून उठल्यावर कायम सकाळच असते असं नाही, गुड आफ्टरनून म्हणा!" हातातल्या घड्याळाकडे बघत ती ठसक्यात म्हणाली. तिचा तो बिनधास्तपणा बघून अजिंक्य त्या क्षणापासून तिचा दिवाना झाला.

त्यानंतर दोन दिवसांनी अजिंक्य तिच्या क्लासमध्ये आला आणि सगळ्या नजरा त्याच्या दिशेने वळल्या. तो ऐटीत चालत जाऊन अनुच्या बाजूला बसला. त्याचा खट्याळ चेहरा, त्यावरचं मिश्किल हास्य आणि बोलके डोळे बघून अनुने त्याला लगेच ओळखलं.

"गुड मॉर्निंग म्हणायला आलायस का?", त्यांच्यावर खिळलेल्या नजरांची पर्वा न करता अनु म्हणाली.

"हो, म्हणजे आलो होतो गुड मॉर्निंग म्हणायला पण आता आलोच आहे तर बाकीही बोलू शकतो आपण." तिच्याकडे बघत मिश्कीलपणे हसून तो म्हणाला. 

"हो बोलू की. पण इकडे? मला वाटलं  कुठेतरी बाहेर घेऊन जाशील मला. ह्या सगळ्यांसमोर काय बोलणार?" तिने उलट प्रश्न केला. तो ऐकून अजिंक्यने सगळ्या क्लाससमोर तिचा हात धरला आणि तिला बाहेर घेऊन गेला. झालेला प्रसंग बघून सगळी मुलं शिट्ट्या मारायला लागली आणि मुली कुजबुजायला लागल्या. पण अजिंक्य आणि अनु त्या आधीच तिकडून सटकले होते. पुढची कॉलेजची वर्ष कशी गेली दोघांनाही कळलं नाही. अजिंक्य कितीही उनाड असला तरी अभ्यासातही हुशार होता. दोघांचे इंजिनीरिंगचे विषय सारखे असल्यामुळे अभ्यास, असाइन्मेंट्स, प्रोजेक्ट्स सगळं ते एकत्रच करायचे. बघता बघता अजिंक्यचं शिक्षण संपलं. त्याला लगेचच चांगली नोकरीही मिळाली. अनुचं शेवटचं वर्ष चालू असतानाच एक दिवस तिला आणि अजिंक्यला बाईकवर फिरताना अनुच्या वडिलांनी बघितलं. ती घरी आली तेव्हा घरात युद्धजन्य परिस्थिती होती.

"काय गं, हे करायला पाठवलं होतं का तुला कॉलेजला? तरी मला वाटत होतंच, एवढा वेळ कसं कॉलेज असतं तुझं, रोज यायला उशीर होतो तुला. पण मला आपलं वाटलं, लेक सगळं विसरून अभ्यास करतेय. तर तुझी ही थेरं चालू होती का?" अनुची आई आल्याआल्या तिच्यावर बरसली. अण्णांकडे बघायची तर अनुची हिंमतही होत नव्हती. जगात त्यांच्या व्यतिरिक्त ती कोणालाच घाबरत नव्हती. तिला शांतपणे उभं असलेलं बघून अण्णा उठून तिच्यासमोर आले.

"हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबलं पाहिजे. कोण आहे तो मुलगा? त्याला सांगून टाक ह्यापुढे तुझ्यापासून लांब राहायचं नाहीतर गाठ माझ्याशी आहे. माझी पोरगी म्हणजे कोणी अशी तशी नाही की फिरवून सोडून दिली. काय सांगतोय मी अनु, ऐकतेयस ना?" त्यांचा आवाज ऐकून अनुचं उरलेलं अवसान पण गळालं. रडत रडत ती तिच्या खोलीत गेली आणि तिने अजिंक्यला फोन केला. तिचा तसा रडवेला आवाज ऐकून अजिंक्य तडक तिच्या घरी आला अन त्याने अण्णांकडे तिचा हात मागितला. बराच वेळ अण्णांशी बोलून तो निघाला. अनुला तिच्या आईने दामटवून आत बसवलेलं. अजिंक्य गेल्यावर अण्णा आत आले, "चांगला मुलगा निवडला आहेस. मला हेच बघायचं होतं की मुलीच्या वडिलांचा आवाज चढल्यावर पण त्याचं प्रेम टिकतं का. माझा तुमच्या नात्याला काहीच आक्षेप नाही." 

अण्णा तिकडून गेल्यावर अनुने स्वतःशीच विचार केला, 'अण्णांना पण गुंडाळून ठेवलं वाटतं ह्याने, गोडबोल्या कुठला.' पण असाच होता तिचा अजिंक्य.

कसल्यातरी आवाजाने अनु भानावर आली. तिची बस ट्रॅफिकमध्ये अडकली होती. स्वतःच्याच विचारात हरवल्यामुळे तिला वेळेचं भान राहिलं नव्हतं पण तिला ऑफिसमधून निघून जवळ जवळ एक तास होत आला होता. तिच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही कारणास्तव प्रचंड ट्रॅफिक होतं. अनुने वैतागून घड्याळ बघितलं. साडेसहा वाजून गेलेले. 'ओह गॉड, आज उशीर होणार मला घरी पोहोचायला. मी अजिंक्यला प्रॉमिस केलेलं आज वेळेत येईन. ह्यावरून तो चिडला माझ्यावर तर त्याची समजूत काढणं पण कठीण होईल. आधीच किती दुरावा आलाय आमच्यात.' तिने स्वतःशीच विचार करत फोन अनलॉक केला आणि त्यावर अजिंक्यचा नंबर शोधला. काही क्षण तिची बोटं त्या नंबरवर घुटमळली, तेवढ्यात तिच्या फोनची बॅटरी संपल्याने तो बंद झाला. चरफडत तिने फोन बॅगमध्ये ठेऊन दिला. 'कठीण आहे माझं, हेच अजिंक्याकडून झालं असतं तर किती चिडले असते मी. आणि आज मी स्वतःच फोन चार्ज करायला विसरलेय.' अनुने स्वतःशीच विचार केला. बाहेर पावसाची रिपरिप चालू होती, त्यामुळे वातावरणात थोडा गारवा आला होता. आसपासच्या हॉर्न्सची किंवा गोंगाटाची परवा न करता अनुचं मन पुन्हा भूतकाळात हरवलं. 

त्यांचं लग्न होऊन वर्ष झालं होतं आणि एक दिवस असाच पाऊस पडत होता. रात्रीचे आठ वाजून गेले होते तरी अजिंक्य घरी आला नव्हता म्हणून अनु काळजीने येरझाऱ्या घालत होती. तिने बरेचदा त्याला फोन करायचा प्रयत्न केला पण त्याचा फोन बंद होता. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. अनुने धावत जाऊन दार उघडलं. दारात चिंब भिजलेला अजिंक्य उभा होता. अनु त्याच्यावर ओरडणार तेवढ्यात त्याने गरमा गरम बटाटे वडे तिच्या समोर धरले. "ट डाssss.. हे आणायला थांबलो म्हणून उशीर झाला." केसांवरचं पाणी उडवत आत येताना अजिंक्य म्हणाला. आता येताना त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले.. नेहमीप्रमाणेच. 

"तू कॉलेज रोडला गेलेलास? कसला भारी आहेस रे तू अन्या. मला पाऊस पडायला लागल्यापासून हेच वडे खावेसे वाटत होते. तुला कसं कळलं?" अनु तोंडात वडा कोंबत म्हणाली. 

"मला माहितीच आहे तू किती भुक्कड आहेस ते. आणि ए हावरट, मी येईपर्यंत संपवू नकोस हां, आलोच मी फ्रेश होऊन." म्हणून अजिंक्य आत जायला निघाला तेवढ्यात त्याला थांबवून डोळे मिचकावत अनु म्हणाली, "अन्या, मला अजून काय करावंसं वाटतंय माहितेय?" 

"सिरिअसली? मी लगेच बाईक काढतो." म्हणून तो काढलेले शूज परत घालायला लागला. 'मी काहीच न बोलता कसं कळतं ह्याला माझ्या मनातलं?' अनुने स्वतःशीच विचार केला. मोजून ५ मिनिटांनी दोघं भर पावसात बाईकवरून फिरत होते. त्यांच्या आवडीची जुनी गाणी म्हणत. दोघांनी जाऊन टपरीवर कटिंग चहा प्यायला, पुन्हा जाऊन कॉलेज जवळचा वडापाव खाल्ला आणि तिकडून दोघं त्यांच्या आवडत्या स्पॉटवर गेले.. त्यांच्या कॉलेजमागच्या टेकडीवर. ह्या टेकडीवर त्यांच्या असंख्य आठवणी होत्या. लग्न झाल्यावर पण दोघं बरेचदा तिकडे फिरायला जायचे. कधी भविष्याचं प्लॅनिंग करायला तर कधी भूतकाळातल्या आठवणीत रमायला. दोघं घरी आले तेव्हा अजिंक्य वेगळ्याच मूड मध्ये होता. चिंब भिजलेल्या अनुच्या थंडीने आरक्त झालेल्या गालांवर त्याने ओठ टेकवले. त्याच्या स्पर्शाने लाजलेली अनु त्याच्या मिठीत विरघळली.  

काही महिन्यांनी रवीशचा जन्म झाला आणि पाठोपाठ चार वर्षांनी रेवाचा. त्या दोघांच्या मागे धावताना अनु आणि अजिंक्यला दिवस कमी पडायचा. पण त्यातही त्यांनी त्यांचं नातं कधीच बदलू दिलं नाही. जबाबदाऱ्या अंगावर पडल्या तरी दोघांनी त्या वाटून घेतल्या. त्याचा ताण त्यांच्या नात्यावर येऊ नाही दिला. कधी अनुला ऑफिसवरून यायला उशीर झाला तर अजिंक्य मुलांना जेवायला घालून झोपायला घेऊन जायचा. तर कधी अजिंक्यला उशीर झाला तर अनु मुलांचा अभ्यास संपवून त्यांच्याशी खेळत बसायची. मुलांमुळे एकमेकांबरोबर फार वेळ घालवता येत नसला तरी त्यांच्यातलं प्रेमाचं आणि महत्वाचं म्हणजे मैत्रीचं नातं कधीच बदललं नाही. कधी कधी खटके उडायचे पण अनुला कसं मनवायचं ते अजिंक्यला चांगलंच माहिती होतं. भांडण झाल्यावर झोपायला जाताना तिला आपल्या मिठीत घेऊन तो म्हणायचा, "अनु कसली कचाकचा भांडतेस गं तू? ती रेवा पण तशीच करायला लागली आहे बरं का आता. परवा रवीशला लाटण्याने मारत होती. तिच्या नवऱ्याची मला आत्तापासूनच काळजी वाटते गं." चिंतेत बुडाल्याचं नाटक करत अजिंक्य म्हणायचा आणि अनु सगळा राग विसरून हसायची, "भांडण काय मी एकटीच करते का अन्या? तू पण कसं बोललास मला? खडूस कुठला."

"हो, माझं पण चुकलंच जरा. पण मध्येमध्ये भांडणं झालेली चांगली असतात गं. प्रेम वाढतं त्याने. नुसतं मिळमिळीत नको वाटतं." तिच्याकडे प्रेमाने बघत अन्या म्हणाला की त्याचे ते बोलके डोळे बघून आज इतक्या वर्षांनीही अनुच्या काळजाचा ठोका चुकायचा. तेवढ्यात रेवा किंवा रवीश येऊन अनुला हाताला धरून घेऊन जायचे आणि जाता जाता अजिंक्य तिच्या कपाळावर ओठ टेकवून म्हणायचा, "अनु, आय लव्ह यु!" 

"ओ मॅडम! उतरायचं नाही का तुम्हाला, तुमचा स्टॉप आलाय." बसच्या कंडक्टरच्या आवाजाने अनु पुन्हा एकदा भानावर आली. शेवटी एकदाचा तिचा स्टॉप आला होता. बसमधून उतरून अनु त्यांच्या बिल्डिंगच्या खाली आली तेव्हा समोरच्या फुलांच्या टपरीवर ठेवलेला टवटवीत गुलाबाचा गुच्छ तिला दिसला. गुलाब म्हणजे अजिंक्यचा आवडता, त्यामुळे अनुच्या प्रत्येक वाढदिवसाला गुलाबाचा गुच्छ हा ठरलेला असायचा. 'आज आपण घेऊन जाऊ फुलं आणि अन्याला सरप्राईज देऊ', स्वतःशीच विचार करत अनुने फुलं विकत घेतली. पैसे देताना तिने हातातल्या घड्याळाकडे बघितलं, आठ वाजत आलेले. नेहमीपेक्षा उशीरच झाला होता तिला घरी पोहोचायला. पैसे देऊन ती लगबगीने बिल्डिंगमध्ये शिरली. लिफ्टमध्ये शिरताना तिने पटकन एक नजर अन्याच्या नेहमीच्या पार्किंग स्पॉटवर टाकली, त्याची बाईक तिकडेच उभी होती. नकळत अनुच्या चेहऱ्यावर स्माईल आलं.

घराचं दार उघडून आत आल्याआल्या अजिंक्यचा हसरा चेहरा तिला दिसला. चेहऱ्यावरून तरी वैतागलेला वाटत नव्हता तो. "अन्या, आय एम सो सॉरी रे, वेळेतच निघालेले मी पण खूप ट्रॅफिक लागलं त्यामुळे अडकले. आणि मग हे घ्यायला थांबले म्हणून उशीर झाला. तुला खूप वेळ वाट बघावी लागली का?" त्याला समोरच्या खुर्चीवर बसवून त्याच्यासमोर गुलाबाचा गुच्छ धरत अनु म्हणाली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली आणि पाठोपाठ मुलांचा आवाज आला. अनुची आई मुलांना घेऊन आली होती. आल्याआल्या रेवा येऊन अनुला बिलगली. तिने आलटून पालटून अजिंक्यकडे आणि अनुकडे बघितलं, "आई, तू बाबाचा फोटो खुर्चीवर का ठेवला आहेस?"

"तुला कसा कंटाळा आला की तू दुसरीकडं जाऊन बसतेस, तसाच बाबाला पण येत असेल ना, म्हणून मी त्याचा फोटो इथे आणून ठेवला." डोळ्यातलं पाणी रेवापासून लपवत अनु म्हणाली. तरी अनुच्या आईला ते दिसलंच. रेवा तिच्या रूममध्ये निघून गेल्यावर त्या अनुला म्हणाल्या," मुद्दामच आज राहायला आले इकडे, आजच्या दिवशी तुला एकटं नको ठेवायला म्हणून." त्यांनी अनुच्या खांद्यावर हात ठेवला. अनुने आलेला हुंदका खूप कष्टाने अडवला, 'अन्यासमोर मी रडलेलं त्याला नाही आवडणार.' 

"अनु, तीन वर्ष होऊन गेली अजिंक्यला जाऊन. आता तरी दुसऱ्या लग्नाचा विचार कर. तुझं आणि मुलांचं अख्ख आयुष्य आहे अजून तुझ्यासमोर. सगळं एकटीने कसं करणार आहेस?" तिची आई काळजीने म्हणाली. जेवण झाल्यावर मुलं झोपायला गेल्यावर दोघी बोलत बसल्या होत्या.

"आई, आजच्या दिवशी तरी हा विषय नको ना प्लिज. आणि मी तुला सांगितलंय ना, आयुष्यातल्या एका नात्याची जागा भरून काढायची म्हणून नवीन नातं बनवायचं हे मला नाही पटत. माझं आणि अन्याचं नातं वेगळंच होतं. एकमेकांबरोबर जो काही वेळ आमच्या नशिबात होता तो आम्ही खूप भरभरून जगलो. सोन्यासारखी दोन पोरं दिली त्याने मला. आयुष्यभरासाठी पुरतील एवढ्या आठवणी आणि प्रेम दिलं. दुसऱ्या कोणत्याही नात्यासाठी त्या आठवणी माझ्या आयुष्यातून काढून टाकायला मी आज तरी तयार नाहीये." अनु खिडकीतून बाहेर बघत म्हणाली. तिची आई गप्प बसली.

"मी आणि मुलं खुश आहोत आई, खरंच! तू कधीतरी मला रडत कुढत बसलेलं बघितलं आहेस का? आमचं चांगलं चाललंय की. अजिंक्य असा अचानक गेल्यामुळे आता माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे.. त्याच्याही वाटेचं आयुष्य भरभरून जगायची!" अनु म्हणाली. तिच्या आईचे डॊळे पाणावले होते. तिच्या डोक्यावरून हात फिरवून त्या झोपायला निघून गेल्या.  

अनु एकटीच खिडकीत उभी होती. अजिंक्यचा फोटो अजूनही खुर्चीतच होता. तिने जाऊन तो फोटो हात घेतला आणि जवळच्या खुर्चीत बसली. त्याच्या त्या बोलक्या डोळ्यांमध्ये बघत! "सॉरी अन्या, आपली डेट अर्धवटच राहिली यार. वाटलं होतं आजचा दिवस आपला आहे, मस्त पूर्वीसारख्या गप्पा मारू, कटिंग चहा पीत जुन्या आठवणींमध्ये रमू. पण खरं सांगू, मलाच खात्री नव्हती की असं तुझ्याबरोबर एकटं रहाणं मला जमेल का. तू गेल्यानंतर एकटं राहायची भीतीच वाटते मला. सगळ्या आठवणी एकदम अंगावर येतात रे. तुला असं निश्चल, शांत बघणं सहन नाही होत मला. तुला जाऊन तीन वर्ष होऊन गेली तरी मन अजून मानतच नाही. आजही घरी यायला उशीर होणार असेल तर हात नकळत फोनवर तुझा नंबर शोधतात, घराखाली तुझी बाईक बघितली की वाटतं घरात शिरल्यावर तू मुलांशी खेळत बसलेला दिसशील, पाऊस पडत असताना दारावरची बेल वाजली की वाटतं तू हातात बटाटे वडे घेऊन उभा असशील आणि मला बघून नेहमीसारखाच माझ्या कपाळावर ओठ टेकवून आत येशील. खुप आठवणी आहेत रे.. पण त्या फक्त आठवणीच आहेत. तू का नाहीयेस? मी तुझ्यावर खूप चिडले आहे हां. मला असं एकटं सोडून गेलास म्हणून. पण मला माहितीये, तुझ्या तोंडून पुन्हा 'आय लव्ह यु अनु!' ऐकलं ना, की लगेच जाईल तो राग. चल, आता झोपायला जाते नाहीतर रेवा यायची मला शोधत बाहेर. जिथे असशील तिथे खुश रहा. आणि आमची काळजी नको करुस. तुझी अनु करेल सगळं मॅनेज!" अनुने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि ती अजिंक्यचा फोटो घेऊन टेबलापाशी आली. त्याच्या फोटोवरून प्रेमाने हात फिरवून तिने त्याच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवले, "अन्या, आय लव्ह यु!" अजिंक्य फोटोतून तिच्याकडे बघून हसत होता. जणूकाही त्याचे बोलके डोळेही तिला हेच सांगत होते..!

समाप्त...!