Feb 23, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

एक दाहक अनुभव...

Read Later
एक दाहक अनुभव...

एक दाहक अनुभव…

ते साल होतं…१९९७ आणि तारीख होती १८ मे…

आजही १८ मे ही तारीख आली की माझ्या काळजात धस्स होतं.

त्यादिवशीचा अनुभव … नाही माझ्यावर आलेला प्रसंगच तसा होता.

१८ मे च्या आधी २ मे ला आमचं इंदोरला जाण्याचं रिझर्व्हेशन झालं होतं.

मुलांना उन्हाळी सुट्ट्या होत्या म्हणून इंदोर फिरायला जाणार होतो.पण यांना स्कुटी चालवताना अंधारी आली.त्यामुळे घाबरून आम्ही १५ तारखेच्या रात्रीच्या बसचं तिकीट काढलं.मुलं खूप खूष होती.

आम्ही फार कमी फिरायला जायचो.माझे हे सतत त्यांच्या पहिल्या बायकोबरोबर म्हणजे LIC बरोबरच रमायचे.मीपण रागाने कधीच म्हणायचे नाही आपण कुठे जाऊ. ही इंदोर ट्रीप मुलांनी हट्ट केल्यामुळे ठरली.

पंधरा तारखेला निघालो.रात्री मध्ये धाब्यावर जेवलो.घरून डबा नेला तरी मुलांना धाब्यावर जेवायचं असायचं मग मीही विचार करायचे फिरायला निघालो आहे तर करूया मजा.नवरोबा खिसा सैल करायला तयार आहे तर कशाला उगीच नको…नको करत संकोच करायचा.नाही बाई असली नाटकं नाही जमत आपल्याला.

एकदाचे धाब्यावरुन पेटपूजा करून निघालो आणि घाटात गाडी आल्यावर ती बंद पडली. ड्रायव्हर तिला चालू करायचा प्रयत्न करत होता.पण बस…ती जाम दूरूस्त होत नव्हती. काही केल्या तिचं ह्रदय धडधडेना. सगळे प्रवासी बसमधून खाली उतरले.

ब-याच वेळाने बस सुरू झाली कसंबसं खांडव्यापर्यंत ड्रायव्हरने बस आणली. तिथे सगळ्यांना उतरवून नागपूर स्टेशनला कळवलं. आम्ही सगळे प्रवासी खांडवा बस स्टेशन वर इकडे तिकडे बसलो.

LIC वाले फार चतुर असतात. यांनी बसस्टॅंडवर असलेल्या पोस्टात जाऊन पोस्टमास्तरशी हवापाण्याच्या गप्पा केल्या. नंतर हळूच सांगितलं माझ्या बायकोच्या पायाचं प्लॅस्टर आत्ताच सुटलं आहे आणि मुलं लहान आहेत. तुमच्या घरी तिघांना बसवलं तर चालेल का? LIC ने चांगलंच इंप्रेशन पाडलं होतं पोस्टमास्तरवर. त्याने लगेच एका नोकराबरोबर आम्हाला त्याच्या घरी पाठवलं.

आम्ही घरी पोचलो पण माझा मुलगा फार दंगेखोर असल्याने मी डोळ्यात तेल घालून बसले होते.

बस दुरुस्त झालीच नाही.शेवटी आलेल्या दुस-या बसमध्ये आम्ही इतके प्रवासी जिथे जागा मिळेल तिथे बॅगा कोंबाव्या तसं स्वतःला कोंबलं. मुलगा बसच्या इंजीनवर असलेल्या टिनाच्या झाकणावर बसला. तिथूनच बहूधा त्याचं इंजीनाशी नातं जोडल्या गेलं असावं. कसेतरी एकदाचे इंदोरला पोचलो.

****

 

<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-1833083458777660"
     crossorigin="anonymous"></script>
<ins class="adsbygoogle"
     style="display:block; text-align:center;"
     data-ad-layout="in-article"
     data-ad-format="fluid"
     data-ad-client="ca-pub-1833083458777660"
     data-ad-slot="1434809209"></ins>
<script>
     (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
</script>

ज्यांच्याकडे उतरलो ती माझी मानलेली नणंद आहे. घरात शिरल्यावर हुश्श…झालं.
प्रवासातील अडचणींचा पाढा वाचून झाला मग त्यावर परीसंवाद झाला.निष्कर्श काहीच निघाला नाही. गप्पा करता करता जेवण छान गेलं.रात्री झोपही छान लागली.

*****

दुसरा दिवस उजाडला आणि ठरलं आज कुठेतरी बाहेर जाऊ.ओंकारेश्वर बघायला गेलो. नंतर हातमागावर साड्या कसे विणतात ते बघायला गेलो.घरी आल्यावर माझा उजवा पाय दुखायला लागला.

आदल्याच वर्षी म्हणजे १४जुलै१९९६ ला माझा पाय घोट्याच्या तिथे दोन्हीकडून झिलपी कापल्यासारखा कापल्या गेला होता. राॅड घालण्याऐवजी कमरेपर्यंत प्लॅस्टर लावलं. चार महिने पलंगाशी मैत्री झाली. माझ्या ऊश्याखालची जागा म्हणजे मुलांच्या महत्वाच्या गोष्टी ठेवण्याची तिजोरी होती. लहान मुलांना आईशिवाय सुरक्षीत जाग कोणती सापडणार!

त्या दिवशी खूप फिरल्यामुळे माझा पाय चांगलाच दुखत होता त्यामुळे झोपही लागत नव्हती.माझी तगमग सुरू होती.तेवढ्यात पहाटे हे आले आणि म्हणाले

" मीना बहुतेक मला हार्ट अटॅक आला आहे."

हे ऐकताच मी ताडकन उठून बसले बघीतले तर यांच्या चेह-यावरून हातावरून घाम गाळत होता. मी लगेच नणंदेला उठवलं. तिच्या मिस्टरांनी त्यांच्या डाॅक्टरांना फोन केला.त्यांनी हे डायबेटिस पेशंट असल्याने ग्लूकोज द्यायला सांगीतलं.ग्लूकोज दिलं पण यांची अस्वस्थता थांबली नाही. डाॅक्टरांनी लगेच दवाखान्यात आणायला सांगीतलं.

नणदेचे मिस्टर कायनेटीकवर यांना बसवून हळूहळू डाॅक्टरांच्या घरी घेऊन गेले कारण सकाळचे सहा वाजले होते. डाॅक्टर यांच्या फोन मुळे उठले होते.

घरून डाॅक्टरांकडे नेल्यावर यांना काय झालं आम्हाला दोघींनाही कळलं नाही पण मला हार्ट अटॅक आल्या सारखी लक्षणं दिसायला लागली. नणंद घाबरली. मी सरळ उठून तिच्या घरातील देवासमोर जाऊन उभी राहिले.हात जोडून म्हटलं

" देवा मी तुला साकडं घालत नाही.मला ते पूर्ण करण्याचं लक्षात रहात नाही. तू जो निर्णय देशील तो मान्य आहे .आर या पार मी स्वीकारायला तयार आहे पण दोघांनी काही पुण्य केलं असेल तर ते एकत्र करून माझ्या नव-याला वाचवता आलं तर वाचव."
शांतपणे डोळे मिटून उभी होते.दहा मिनीटानी हळुहळू माझं शरीर सैल पडलं.
तेव्हाच नणंदेला फोन आला " वहिनीला घेऊन दवाखान्यात ये.

आम्ही दोघी मुलांना घेऊन निघालो.मुलगा पहिलीत तर मुलगी केजी वन मध्ये होती.

घरून यांना घेऊन दवाखान्यात पोहचेपर्यंत काय घडलं हे तिच्या नव-याने म्हणजे अशोकने सांगीतलं होतं पण तिने मला सांगितलं नाही. मी खोदून खोदून विचारून ही सांगत नव्हते.मी तिला म्हटलं

" नीता नागपूरला दादाला कळवायला हवं."

" तू नको कळवू मी कळवते." नीता

"तू कळवलं तरी माझा आवाज ऐकल्याशिवाय दादा वहिनीच्या जीवाला शांतता मिळणार नाही. तू मला फोन करायला घेऊन चल." शेवटी ती घेऊन गेली दादा आणि माझ्या भाचीचा नवरा लगेचच रात्रीच्या बसने निघाले.

" नीता घर ते दवाखाना यांमध्ये काय घडलं ते मला सांग. तू काहीतरी लपवते आहेस." शेवटी हिम्मत करून तिने सांगीतलं.

घरुन डाॅक्टरकडे गेल्यावर डाॅक्टरांनी यांना तपासले ईसीजी काढला. ईसीजीमध्ये मासीव्ह हार्ट अटॅक दिसला. डाॅक्टरांनी लगेच त्यांच्या दवाखान्यात न्यायला सांगीतलं. अशोकने यांना गाडीवर बसवलं यांचा एक हात पकडून धरला.

डाॅक्टरांनी लिफ्ट उघडी ठेऊन स्ट्रेचर खाली तयार ठेवायला सांगून ते घरून लगेच निघाले.

अशोक यांच्याशी गाडी चालवताना सारखा बोलत होता.अचानक यांचा हात त्याच्या हातून निसटून ते खाली कोसळले.अशोकने लगेच कायनेटिक उभी करून यांना माऊथ टू माऊथ रेस्परेशन दिलं आणि छातीवर विशिष्ट पद्धतीनं दाब दिला कारण हे डेड झाले होते. हे करता करता अशोक जोरजोरात हेल्प हेल्प असं ओरडत होता. जाॅगींग करणा-या दोन मुलांना ऑटोरिक्षा आणायला सांगीतली. रिक्षात त्या मुलांबरोबर यांना बसवत असताना हे जीवंत झाले. रिक्षावाल्याने विमानाच्या वेगाने रिक्षा पळवली.

दवाखान्यात लिफ्ट उघडी होती स्ट्रेचर तयार होतं. रिक्षा दवाखान्यात पोचताच यांना चपळाईने स्ट्रेचरवर ठेऊन ICU मध्ये नेलं. तिथे गेल्या गेल्या इंजेक्शन दिलं.यांना लगेच उपचार मिळावे म्हणून अशोकने त्याचं क्रेडिट कार्ड दवाखान्यात ठेवलं कारण त्या दिवशी रविवार होता आणि ए.टी.एम. ची सोय नव्हती.

ICU तील डाॅक्टरांनी यांना इंजेक्शन दिलं आणि शाॅकचं मशीन उलगडून ठेवलं तेवढ्यात मोठे डाॅक्टर तिथे आले आणि त्यांच्यासमोर पुन्हा अटॅक येऊन हे डेड झाले.

त्यांना लगेच शाॅक देण्यात आले.एकदा दिला उपयोग झाला नाही. दुस-यांदा दिला…तिस-यांदा दिला…चौथ्या शाॅकने हे जीवंत झाले तेव्हा दोन्ही डाॅक्टरांच्या जीवात जीव आला.पण चोवीस तास काहीच सांगू शकत नाही.नातेवाईकांना बोलावून घ्या असं सांगण्यात आलं.

अशोकला डाॅक्टर म्हणाले
" तुमच्या पेशंटची लाईफ लाईन स्ट्राॅंग आहे म्हणून शाॅक मशीन उलगडून ठेवलेलं होतं.बरेचदा हे मशीन ऊलगडतानाच पेशंट जातो."

हे सगळं ऐकून मी सुन्न झाले नाही.माझ्या डोक्याचं काम सुरू झालं.मधल्या काळात माझा मेंदू बधीर झाला होता.आतून वाटतं होतं की खूप विचीत्र घडलंय पण ते कोणी मला सांगत नव्हतं ते कळत नव्हतं तोवर मेंदू बधीर झाला होता.

चोवीस तास काहीच सांगू शकत नाही असं डाॅक्टर म्हणाले पण बारा तासांतच हे खाऊपिऊ लागले.

त्यानंतर कोणी हार्ट अटॅकने गेल्याचं कळलं की मी अस्वस्थ व्हायचे.

१८ हे ही तारीख तर आजही अस्वस्थ करते खरंतर आता हे नाहीत.२५ मे २०२० मध्ये गेले. पण एक विचार मनात येतो तेव्हा जर माझी विनंती देवाने ऐकली नसती तर…?
यांना बोनस लाईफ दिलं नसतं तर…?
__________________________
लेखिका…मीनाक्षी वैद्य
 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//