एक चित्र नव्या आयुष्याचे

आयुष्याच चित्र परमेश्वर चितारतो. पण , कधी कधी रंग कोणी वेगळेच भरतात.
कथेचे नाव : एक चित्र नव्या आयुष्याचे
विषय : " आणि ती हसली"
फेरी : " राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा "

आज सकाळी उठायला थोडा उशीरच झालेला तिला .कशीबशी पटपट सगळी कामे उरकून घेतली अन् सासूबाईंना येते असं सांगून गडबडीतचं घरातून निघाली.
रेल्वे सुटली तर पुन्हा बस स्टॉपकडे पायपीट करावी लागेल शिवाय वेळ होणार तो वेगळाच म्हणून तिने झपाझप पावलांचा वेग वाढवला .

ती तिच्याच विचारांच्या तंद्रीत चालली होती.
वेगाने चालत असल्याने तिचे कुरळे केस ही भुरभुर उडत होते. काय करणार वेणी घालायला ही फुरसत मिळाली नव्हती आज.
म्हणून नुसतेच क्लच केले होते . भिरभिरणारे केस जर थोडेसे का असेना मुक्त ठेवू शकत होती मग मनाला का मुक्त होऊ देत नव्हती?
कदाचित ती वेगळी होती. भराभर चालल्याने आता तिला श्वास लागत होता नि कपाळावर घर्म बिंदू ही साचू लागलेले .
चेहरा थोडा ओढलेलाच होता. पण , चेहऱ्यावर असं हलकेच स्मित आणून लपवून टाकायची ती .
ऑफिसचा वर्कलोड , सासूबाईंचे टोमणे ,घरी आकाश सोबत एकाच गोष्टीवरून होणारे रोजचे वाद ,त्यातून होणारी भावनिक घुसमट , अती विचाराने जडलेला निद्रानाश आणि प्रत्येक वेळेस हुलकावणी देणारे मातृत्वाचे सुख .....
याचं सगळ्या गुंतागुंतीत ती पुरती अडकली होती.
खचली नव्हती पण दमली मात्र नक्कीच होती. कारण, प्रश्न भरमसाठ आणि उत्तरे क्वचितच मिळायची.

कदाचित नियती अशीच असते बहुदा , म्हणून तिने ते स्वीकारलं होतं.
रेल्वेचा भोंगा वाजला तशी तिची तंद्री तुटली आणि ती भानावर आली. रेल्वे प्लॅटफॉर्म वरून निघण्याची वेळ झाली होती.
आणि ही अजून बाहेरचं ...
मग काय पी. टी.उषा च अंगात संचारली तिच्या....

पायऱ्यांवरून पळतच तिने स्टेशनच्या आत पाय टाकला . रेल्वे आता हळूहळू निघत होतीच . क्षणभर तिला वाटले आता रेल्वे सापडत नाहीच म्हणून तिने अजून थोडा वेग वाढवला . या नादात नकळत तिची समोरून येणाऱ्या एका मुलीला धडक बसली आणि त्या मुलीच्या हाती जे काही होतं ते प्लॅटफॉर्म वर पडलेल्या डबक्यात साचलेल्या पाण्यात पडलं. ती मुलगी काही बोलली नाही पण तिची मैत्रीण मात्र म्हणाली ," अरे ,काय दिसतंय की नाही हो, जरा बघून चालत जा ना , वाट लागली आता " हे ओझरतं कानी पडले.

घाईघाईत ती फक्त त्या मुलीला " सॉरी ,सॉरी" इतकंच म्हणू शकली.
आणि पटकन रेल्वेत चढली.
"हुश्श ....अवनी मिळाली मिळाली बाबा एकदाची रेल्वे तुला " ती मनातच म्हणाली.
इतक्यात तिचा फोन वाजला .
उचलताच पलीकडून ," अवनी , आलीस ना ?" तिची मैत्रीण राधा तिला विचारत होती.
" हो, हो ..आहे आहे " असं बोलतच अवनी ने
एक क्षण रेल्वेच्या दारातून बाहेर डोकावून पाहिले तेंव्हा ती ज्या धडकली होती ती मुलगी पाण्यात पडलेली तिची कागदे गोळा करण्यात व्यग्र होती आणि तिची मैत्रीण अवनी कडे बघत रागारागाने काहीतरी पुटपुटत होती.
कदाचित तिलाही काहीतरी सुनावत होती.

अवनी स्वतः लाच विचारू लागली
" महत्वाचं तर नव्हतं ना काही ? हे देवा , आता तिच्या दुःखा च कारण मला बनवू नको बाबा ". अवनीला त्या मुलगीचा विचार करून वाईट वाटू लागलं.पण,
जशी रेल्वे वेग पकडून धावू लागली तसे अवनीच्या मनात इतरं दुसरे विचार वेग धरू लागले.

इकडे प्लॅटफॉर्म वर पाण्यात पडून खराब झालेल्या आपल्या चित्रांकडे बघून वर्षा स्तब्ध झाली होती. एकतर किती मेहनतीने तिने ती काढलेली. पुन्हा काढता येतील ही पण ....
आता मिळणारी संधी ? ती परत मिळेल? कसेबसे वेळात वेळ काढून तिने ती चित्रे काढली होती. त्यासाठी किती खस्ता काढल्या होत्या ते आठवूनच तिच्या डोळ्यांत आसवं दाटली. पण , पुन्हा तिने ती तिथेच रोखली. आपल्या नशिबात काही चांगल होऊच शकत नाही असं म्हणून तिने ती भिजलेली कागद आणि भिजलेलं मन घेऊन घरच्या रस्त्याला चालू लागली.

"वर्षा , तू ठीक आहेस ना? त्या काकू पण ना , लोकं इकडे तिकडे बघून का चालत नाहीत ग ? आता काय करायचं ? " वर्षाची मैत्रीण निशा तिला विचारत होती.
पण ,वर्षा एकही शब्द बोलायच्या मनःस्थितीत नव्हती .जर मी गप्प बसली तर ही निशी काय थांबणार नाही, त्या काकूंचा उद्धार करत बसेल म्हणून वर्षा म्हणाली ," अरे , त्या गडबडीत होत्या पण आपण तर नव्हतो ना , आपल ही लक्ष न्हवतच कदाचित म्हणून झाली असेल धडक , सोड ना आता".

" हो हो ,सोडून दिले बरं का मॅडम ,तुला लय सज्जनांचा पुतळा बनून राहायचं आहे ना तर रहा ,पण चूक त्यांची होती हे मात्र मान्य कर की बाई , कधीतरी स्वतःसाठी विचार कर ना , तुझ्यासाठी ही संधी महत्वाची होती ना ग " निशा राग करत करत थोडी भावनिक झाली.
कारण ,तिला वर्षाच्या स्वप्नांबद्दल चांगलच माहिती होतं.

चालता चालता वर्षा थांबली आणि तिला म्हणाली ," हे बघ निशा ,हा विषय इथेच थांबव , आधीच त्यासाठी घरी मामीने तांडव केलं होतं. आजीला सुद्धा नको नको ते बोलल्या होत्या . तसेही पुढचा सगळा खर्च झेपणार नव्हताच. मीच ते पाऊल टाकायला नको होतं. माणसानं अंथरूण पाहून पाय पसरावे हेचं खरं.माझ्यासारख्या गरिबांनी तर नाहीच नाही आणि हो तुझ्या साठी मी इथपर्यंत आले ना ,मैत्रीची शप्पत देऊन पुन्हा मला गळ नको घालू ,प्लीज ".

" असं काय बोलते राव तू , तुझी कला अशीच वाया घालवणार का ? मला मनापासून वाटतं ग तुझी कला जगासमोर यावी. पण ..." निशा तिला समजावण्याचा प्रयत्न करत होती पण वर्षाने तिच्या मनाची समजूत घालून घेतली होती त्यामुळे तिला समजवण्याचा काही उपयोग नव्हता.

वर्षा आणि निशा शेजारी शेजारी ...
निशा वर्षा पेक्षा मोठी होती . वर्षाचे आई वडील दोघेही नव्हते. आजी , मामा शिवाय दुसरे नातेवाईक ही कुणीच नाही.
तशात मामा ही वर्षभरापूर्वी देवाघरी गेला होता. त्याचेही खापर मामीने तिच्यावरच फोडलं होतं. परिस्थिती ही बेताचीच . त्यामुळे वर्षा सातवी पर्यंत कशी बशी शिकली.तेही आजीमुळे. पण , मामीची वर्तणूक बघून वर्षांनेच आपल पुढचं शिक्षण नाईलाजास्तव बंद केलं आणि मामी ला दुसऱ्यांच्या घरची धुणी भांडी करायला मदत करू लागली.

पण ,म्हणतात ना, कला जात- धर्म ,गरिबी - श्रीमंती बघून येत नाही .ती कुणाच्याही अंगी असू शकते.अगदी तसेच वर्षा कडे चित्रकलेचा गुण आला होता.
लहान वयातच तिची चित्र काढण्याची क्षमता मात्र थक्क करणारी होती.
फक्त तिला चांगल्या मार्गदर्शकाची गरज होती.
शाळा तर सुटली होती त्यामुळे तिची गुणवत्ता
ही अशीच कोपऱ्यात पडून राहिली होती.
जिच्या आयुष्याची दिशाच नव्हती तिच्या कलेला कुठून मार्गदर्शक मिळणार ?

पण ,एक दिवस निशाला चित्र जमत नव्हत अन् सहजच वर्षा ने ते चित्र तिला काढून दिले. शाळेत ही त्या चित्राच कौतुक झालं.
तेंव्हा निशाला तिच्यातली गुणवत्ता कळाली होती.
ती मुद्दामून तिला चित्र काढायला लावे.
चित्र काढताना तिची एकाग्रता आणि उत्सुकता निशाच्या नजरेतून सुटली नव्हती.

निशाच्या मनात तिच्यासाठी काहीतरी करायला हवं असं वाटायचं . तिने तिच्या बाबांनाही सांगितल होतं .
पण , वर्षाचा स्वाभिमानी स्वभावही निशाला चांगलच ठाऊक होता.
लहान वयातच तिचे विचार परिस्थितीने प्रौढ झाले होते.
ती कुठलीही मदत घेऊ इच्छित नव्हती.
परोपकार , सहानुभूती तिला आवडत नव्हती.
त्यात तिची मामी तिला या सगळ्यापासून दूर ठेवत होती.
उगाच काहीतरी कारण काढून तिला बोल लावायची.

म्हणूनच , निशाने तिच्या नकळत काही चित्रे काढून घेतली आणि आपल्या पप्पांच्या मदतीने जिल्ह्यातल्या एका प्रख्यात चित्रकार कडे पाठवली. त्यांनाही ती आवडली.
त्यांनी एका एक्झीबिशन साठी बोलवलं होत आणि सोबत त्यांनी सांगितलेली काही चित्रेही काढून आणायला लावली होती. मामीची समजूत घालून ,कसबस कामातून वेळ काढून ,
वर्षाने चित्र काढली होती. निशा आणि वर्षा तिकडे चालल्या होत्याच की , आज प्लॅटफॉर्म वर अवनीची धडक बसून सगळी मेहनत पाण्यात गेली होती.

इकडे ऑफिसमध्येही अवनीला राहून राहून प्लॅटफॉर्म वरची मुलगी आठवत होती.
कशात लक्ष लागत नव्हते.राधानेही विचारलं तेंव्हा तिने सकाळचा प्रसंग सांगितला.

राधा म्हणाली ," अग,इतकं काय मनाला लावून घेते ,तू मुद्दाम थोडी ना धडकली ? आणि तुला वाटतंय तसे महत्वाचं ही काही नसेलच .तुझी ओव्हर थिंकिंग बंद कर जरा ..ओके ."

अवनी उसणे हो म्हणाली पण ,राहून राहून तिला ती मुलगीच आठवत होती.

रेल्वेतून स्टेशनवर उतरल्यावर तिची पावले त्याठिकाणी रेंगाळली .ती पुन्हा भेटेलच इकडे तेंव्हा मनापासून माफी मागून नुकसान भरपाई करून देऊ असं मनाशी ठरवलं तेंव्हा कुठे तिचे मन शांत झालं.
आणि पुन्हा तिची पावले तिच्या दुनियेकडे
वळली.
घरी आल्यावर नेहमीसारखं आपलं आवरून ती रूम मध्ये गेली.

आकाश आणि तिचा रात्रीचा संवाद म्हणजे वादविवादच . प्रेम करणे तर दूरच .
का कुणास ठाऊक आज तिला वाटतं होत आकाशने मिठीत घ्यावं . तिच्या मनात डोकावून बघावं.
पण ,ते शक्यच नव्हतं.
आकाशलाही थोड जाणवत होतं . तरीही मनाला आवर घातला आणि तो झोपी गेला.
दोघेही प्रेमासाठी आसुसलेले तरीही तरसत बसलेले.
निव्वळ एकाच गोष्टीवर अडून राहिल्याने .
लग्नाला पंधरा सोळा वर्ष होऊनही अंगणात लहान मुलांचं बागडणं नव्हतं की आवाज नव्हते. घरी फक्त धुसफुसच असायची.
सगळं करून झालं होतं ..पण उपाय मिळाला नाही .
मात्र नात्यात दुरावे नक्कीच आले होते.

दुसऱ्या दिवशी रेल्वे स्टेशनवर अवनीची नजर तिला शोधत होती.पण ,ना ती दिसली ना तिची मैत्रीण.
अवनीच मन खट्टू झालं.

दोन चार दिवस असेच गेले .एके दिवशी निशा तिला वाटेत भेटली.
अवनीला बघून ती थोडी रागेच भरली होती.
पण , अवनीने स्वतःहून त्या दिवसाबद्दल माफी मागितली. आणि वर्षाने तिला दमच दिला होता त्यामुळे निशाने शांततेत घेतलं.

अवनीने निशाला विचारलं ," ती दुसरी मुलगी कुठं आहे ?"
तेंव्हा निशा म्हणाली ," वर्षा ना ..."
अवनीला तिचं नाव आता कळलं ..वर्षा...

सांगू की नको करत निशाने तिच्याबद्दल अवनीला सगळं सांगितलं.
ते सगळं ऐकून अवनी स्तब्धच झाली.
आणि आपल्या एका चुकीमुळे तिची संधी हुकली म्हणून वाईट वाटले.
तिला वर्षाला भेटायची खूप इच्छा झाली होती.
पण , निशाने विचार केला, घरी घेऊन गेलो तर वर्षाची मामी उगाच गोंधळ घालेल म्हणून तिने मी तुमची तिच्याशी भेट घालून देईन असं सांगितल्यावरच अवनी शांत झाली.

घरी आल्यावर अवनी नेहमीपेक्षा थोडी शांत शांतच होती. आकाशला ते प्रकर्षानं जाणवलं.
रुममध्ये आल्यावर त्याने खिडकीतून बाहेर बघत बसलेल्या अवनीच्या खांद्यावर हात ठेवला.
अवनी दचकली. पण , आकाशला पाहून आश्चर्यचकित झाली आणि सुखावली ही.
नकळत त्याच्या मिठीत शिरली.
त्याने काय झालं एवढं विचारायची फुरसत तिने हमसून हमसून जे घडलं ते सांगितलं.
आकाश काहीच बोलला नाही. अवनीच्या
डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते.
आकाशने ही तिला मुक्त होऊ दिले . आणि वर्षाची सर्वतोपरी मदत करून तिचं ध्येय तिला साध्य करण्यास मदत करू अशी हमी ही दिली.
आकाशचे बोलणें ऐकून अवनी खूप खुश झाली .
बऱ्याच दिवसानंतर मनातून रीती होत होती.
पण , तिच्याही नकळत ती ,ना जाणो कित्येक रात्रीच्या विरहानंतर आकाशला बिलगली होती.

आकाश हळूहळू तिच्यावर आपल्या प्रेमाचं पांघरूण घालत होता. नि अवनी त्याच्यात विसावत होती.
आणि या प्रेमाच कारण होती " वर्षा".
जिच्या नुसत्या ओझरत्या जाणीवेने आकाश नि अवनी अलगद एकरूप झाले होते.

त्या दोघांनी एकमेकांच्या मनात डोकावुन बघितलं . आणि नजरेची भाषा जाणली.
एक नवा किरण सापडला होता. वर्षाच्या रूपाने.. कित्येक दिवसानंतर अवनीला आकाशच म्हणणं पटलं.

आता फक्त वर्षा त्यांच्या आयुष्याचं अंगण मायेने ,प्रेमाने भिजवेल का याची वाट त्यांना पहावी लागणार होती.

ठरल्या प्रमाणे दोन दिवसांनी सुट्टीच्या दिवशी निशा वर्षाला घेऊन अवनीच्या घरी आली. अवनी आणि आकाशचे वर्षा बद्दल आधीच बोलून झालं होतं. आपल्या आईलाही त्याने समजाऊन सांगितलं तेंव्हा त्या कचवचत का असेना तयार झाल्या.
आज वर्षा सोबत याविषयी अवनी बोलणार होती आणि तिकडे आकाश वर्षाच्या घरी तिच्या आजी , मामीसोबत ..
आधी तिच्या घरच्यांची परवानगीही महत्वाची, मग वर्षाच मत त्यांना जाणून घ्यायचं होतं.
म्हणून आकाश तिकडे गेला होता.

वर्षाला थोडा अवघडल्यासारखं वाटतं होतं.
निशा सोबत होती तरी संकोच वाटतं होता.
वर्षाला पाहताच अवनीच्या डोळ्यात मायेचा उमाळा दाटून आला. वर्षाने सहज अवनी कडे दृष्टिक्षेप टाकला तेंव्हा तिलाही ते जाणवलं . पण ,कदाचित आपला भ्रम असू शकतो म्हणून तिने ते विचार सोडून दिले

अवनीची वर्षा सोबत कसं बोलावं ?काय बोलावं? याची उजळणी करून झाली होती. तरीही आता प्रत्यक्ष बोलताना तिच्या कंठातून शब्द फुटत नव्हते जणू.

तिच्याकडून होकाराची जास्त अपेक्षा नव्हती पण ,नकार पचवू शकू का आपण ? हेचं मनात घोळत होतं.

वर्षा आणि निशाला नाश्ता ,चहा देऊन झाल्यावर अवनी त्यांच्याजवळ येऊन बसली.
तिने बोलायला सुरुवात केली.
" वर्षा ..... त्या दिवसासाठी खरचं खूप सॉरी .मी थोडी माझ्याच तंद्रीत होते . तुझी मेहनत ही वाया गेली माझ्यामुळे...... "

अवनीचे असे बोल ऐकून वर्षा अजूनच अवघडली. कदाचित अशा आपुलकीची तिला सवय नव्हती म्हणून असेलही.
पण , अवनी तिला सॉरी बोलतेय आणि ती आपल्या आईच्या वयाचीच जरा कमी. हे बघून तिचं तिलाच रूचल नाही.
त्यामुळे अवनी चे बोलणें मधूनच तोडत वर्षा म्हणाली ," काकू ....तुम्ही सॉरी बोलावं इतकं काही नाही हो . कदाचित माझ्या स्वप्नांचा योग वास्तवाशी जुळणार नसेलच म्हणून तसे घडले ही असेल. जे होणार होतं ते झालयं ,माझी काही तक्रार नाहीय ओ तुमच्याबद्दल ,प्लीज तुम्ही सॉरी नका बोलू हो.तुम्ही मला आई सारख्याच , आई कडून कोण माफी मागून घेतं का?"

वर्षाचे हे विचार ऐकून निशा आणि अवनी दोघीही स्तब्ध झाल्या.

वर्षाच्या तोंडून आपल्यासाठी आईसारखी ही उपमा ऐकून अवनीच हृदय ममतेने भरून आलं.
तिलाही तेच मांडायच होतं . पण ,आपसूकच ते वर्षा बोलून गेली.

आतापर्यंत कसं बोलू यासाठी शब्दांची जुळवाजुळव करत बसलेल्या अवनी ला वर्षाची अनामिक हाक ऐकू येताच तिने वर्षा जवळ जाऊन तिला मिठीच मारली.
वर्षा भांबावली आणि निशा ही.

"आता काय म्हणालीस तू मला ? आईसारखी ना मी ..मग तुझी आई बनवशील मला ? माझी मुलगी होऊन कायमसाठी माझ्याजवळ राहशील "? अवनीने भावनातिवेगाने मनातलं तिच्यासमोर उलगडून ठेवलं.

वर्षाला तिच्या कुशीत खरचं मायेची उब जाणवली. पण ,अचानक तिच्या आयुष्यात असे काही वळण येईल असं तिने कल्पिले ही नव्हतं.

जी स्थिती वर्षाची, तीच स्थिती निशाची ही.
तिलाही वाटलं नव्हतं की , ज्या सुखापासून वर्षा आजपर्यंत वंचित होती.
तिच्या डोळ्यात जे चित्र तिला दिसत होतं ते आज प्रत्यक्ष समोर अवतरले आहे असंच निशाला वाटलं. तिला आनंदच झाला.
पण ,वर्षा हे सगळं मान्य करेल?
साधारण १४-१५ वय असलेली वर्षाच्या मनाला ही भावनिक साद कळेल का ?

वर्षाला काय बोलावं ते सुचत नव्हत . तिच्या नेत्रातून अखंड सरी कोसळत होत्या .
आणि तिच्या ओलाव्यात अवनी भिजत होती.

तोच दारातून तिची आजी आणि आकाश आत आले.
आजीला पाहताच वर्षा आजीच्या कुशीत शिरली.
आजीला समजलं.
"वर्षा बाळा ....आज खऱ्या अर्थाने तुला आई बाबा मिळणार आहेत ,तू त्यांचा स्वीकार करावा असं मला तरी वाटतं. तुझ्यामुळे अवनी आणि आकाश पूर्णत्व पावतील , तुझं अस्तित्व ही सगळ्यांना जाणवेल.आणि हे बघ उगाच मनाचा गोंधळ करून घेवू नको.ते कुठल्या सहानुभूतीने किंवा उपकार म्हणून तुला आपलेसे करत नाहीयेत बरं का .फक्त आणि फक्त ममताच आहे ग त्यांच्या ठायी".

वर्षाला सगळं कळतं होतं पण असं अचानक समोर आलं त्यामुळे तिला निर्णय घ्यायला जड पडत होत. तरीही तिला अवनी आणि आकाश यांच्या मायेची ओढ वाटतं होती.

तिने काढलेली चित्रे जरी पाण्यात पडली असली तरी तिच्या आयुष्याचे चित्र नव्याने रंगवण्यास आकाश आणि अवनी रंग घेऊन उभे होते.
अवनी ने करुण भावनेने वर्षाकडे पाहिलं
तशी वर्षा तिच्या मिठीत शिरली.
"आई" इतकंच तिच्या तोंडातून बाहेर पडलं.

ती हाक ऐकण्यास अवनी इतकी वर्ष तरसली होती. तिने प्रेमाने वर्षाच्या कपाळी आपले ओठ टेकवले आणि दोघीही आनंदाश्रूत चिंब भिजत होत्या.

हे बघून तिथे उपस्थित सगळीच गहिवरली होती. आजीही नातीचे सुख बघून भरून पावली.

" तुम्ही दोघीच अशा बिलगून रडणार आहात काय ? पण , लक्षात ठेवा आकाश शिवाय दोघीही अपूर्णच आहात हा " आकाश ही त्यांच्याजवळ येत म्हणाला तसं वर्षा रडत रडत हसली आणि त्याच्या मिठीत शिरली.

©®मृणालिनी
इचलकरंजी , कोल्हापूर.