एक चिमणी भाग ४था

एका लहान मुलीची गोष्ट आहे.
एक चिमणी भाग ४था
मागील भागावरून पुढे वाचा.

अर्पीताची रोजसारखी सकाळची गडबड चालू होती सकाळी रोहन शाळेत जातांना दूध आणि अंड खाऊन जायचा. डब्यात पोळी भाजी न्यायचा. त्यांच्या शाळेचा नियमच होता. डब्यात पोळीभाजीच आणायची अबरटचबरट आणायचं नाही. अर्पिता लाही ते बरं वाटायचं. महेंद्रसाठी नाश्ता तयार करून त्याचाही भाजीपोळीचा डबा भरल्यावर अर्पिताला आत्ता जरा मोकळा श्वास घेता आला. तिची धावपळ कमी झाली. केतकीला पोहे आवडतात म्हणून अर्पितानी नाश्त्यासाठी मटर घालून पोहे केले होते.

काल आल्यापासून मावशींनी केतकीच्या ताबा घेतला होता.आत्ताही काहीतरी गमती जमती सांगत त्या तिला पोहे भरवत होत्या. काल पासून तिच्या चेहे-यावर हसू उमटत होतं. फक्त दोनच दिवस केतकी नेहमीसारखी हसली नाही बोलली नाही. पण हे दोन दिवस आई बाबा म्हणून अर्पिता आणि महेंद्रला फार कठीण गेले. मालूमावशी आल्यापासून त्यां दोघांना पाठबळ मिळालं. अर्पिताची तंद्री फोन वाजल्यामुळे
तुटली.घाईनी तिनी फोन घेतला फोन केतकीच्या मुख्याध्यापिकांचा होता.

" हॅलो. नमस्कार मॅडम." " नमस्कार कशी आहे केतकी?" "काल रिपोर्ट घेऊन केतकीचे बाबा डाॅ. कडे गेले होते. केतकीच्या शरीरातील हिमोग्लोबीन खूप कमी झाल्यामुळे थकवा येतो आहे असं डाॅ. म्हणाले. आज संध्याकाळी आहारतज्ञाकडे जायचय." " केतकीला आता प्रिलीम देता येणार आहे का?" " डाॅ.नी पंधरा दिवस आराम करायला सांगीतला आहे. औषध आणि योग्य आहार यातून तिचं हिमोग्लोबिन वाढलं की चिंता नाही असं म्हणाले." " ठीक आहे. एक काम करा.तिला बरं नाही त्यामुळे ती प्रिलीम देऊ शकणार नाही असं डाॅ.चं मेडीकल सर्टिफिकेट शाळेत जमा करा. म्हणजे तिची उपस्थिती प्रिलीमला नसली तरी ती बोर्डाची परीक्षा देऊ शकेल."

"हो.पण तोपर्यंत पंधरा दिवसांत ती बरी व्हायला हवी." "होईल बरी काळजी नका करु. तिला बसून पेपर लिहीलं अवघड जाईल असं वाटलं तर आपण लेखनिक घेऊ. त्यामुळे फार ताण घेऊ नका.ते डाॅ.चं सर्टिफिकेट मात्र लवकर जमा करा." " हो करते धन्यवाद मॅडम तुम्ही एवढा धीर दिलात." "आमची शाळा सगळ्याच विद्यार्थ्यांना समजून घेते. पण केतकी आमच्या शाळेची हुशार विद्यार्थिनी आहे.तिची आम्ही काळजी घ्यायलाच हवी.बरं ठेवते फोन." " हो."अर्पिता नी फोन ठेवला.

मुख्याध्यापिकांचं बोलणं ऐकून अर्पिताला खूप बरं वाटलं. तिच्या मनात आलं केतकी किती गुणाची बाळ आहे. घरातच नाही तर शाळेत पण लाडकी आहे. अर्पिता हळूच केतकीच्या खोलीत डोकावली. आजींची गोष्ट संपली होती. त्याचबरोबर मटारपोहेपण केतकीच्या पोटात गडप झाले होते. डोळ्यात आलेलं पाणी अर्पिता नी हळुच पुसलं.


अर्पितानी मावशींना मुख्याध्यापिका काय म्हणाल्या ते सांगीतलं. त्यावर मावशी म्हणाल्या "छान आहे शाळा. त्यांचही म्हणणं बरोबर आहे. प्रीलिमपेक्षा बोर्डाची परीक्षा महत्वाची. केतकी म्हणाली तरी शाळेत नको पाठवू. उगीच दगदग व्हायची." "मुख्याध्यापिका बाई म्हणाल्या प्रीलीम देता येणार नाही तर ती आजारी आहे असं डाॅ.चं सर्टिफिकेट शाळेत जमा करा. म्हणजे ती अनुपस्थित असली तरी बोर्डाची परीक्षा देता येईल.""ते सर्टिफिकेट त्या डाॅ.कडून महेंद्रला लगेच आणायला सांग " "हो." अर्पिता नी उत्तर दिलं.


दुपारी केतकीचं जेवण झाल्यावर केतकी आत झोपली होती. अशक्तपणामुळे थोडं बोलली, पुस्तक वाचलं किंवा थोडा वेळ बसलं की ती थकून जात होती. आज संध्याकाळी आहारतज्ञांकडे जाऊन आल्यावर त्या सांगतील तसा आहार सुरू केल्यावर केतकीच्या तब्येतीत फरक पडेल हा विचार अर्पिताच्या डोक्यात चालु होता त्यामुळे चहापत्ती न टाकताच नुसतं उकळलेले पाणी कपात गाळून तिने मावशींना चहा म्हणून आणून दिला.

कप हातात घेतल्यावर मावशींना कळलं हे नुसतंच पाणी दिलय चहा म्हणून. तेव्हा अर्पिताच्या चेह-यावरचे भाव बघून त्यांना पण वाईट वाटलं सहाजिकच आहे एवढी दहा पंधरा वर्षांची पोरं अचानक इतकी थकायला लागली तर त्याचा ताण आई म्हणून तिला येणारच. हे मावशी जाणून होत्या म्हणून त्या काही न बोलता उठल्या आणि स्वयंपाक घरात गेल्या.

चहाच्या पातेल्यात त्यांनी कपातील पाणी ओतलं आणि गॅसवर ठेवलं. ते थोडं उकळल्यावर त्यात चहापत्ती घातली. मावशींना चहापत्ती घालतांना अर्पिता नी त्यांना बघीतलं. ती घाईनं स्वयंपाकघरात आली आणि विचारलं " मावशी तुम्हाला चहा आणखी हवा होता का? सांगायचं मी करून दिला असता."

"अगं तू कामात असशील म्हणून नाही सांगीतलं." ".फार कामात नव्हते." अर्पिताचं लक्ष कपाकडे गेलं त्यात आधीच्या चहाचा थेंबही दिसला नाही हे बघून तिला आश्चर्य वाटलं. "मावशी लगेच कप धुतला तुम्ही?" " नाही. अर्पिता तू मला चहा नाही नुसतंच उकळलेलं पाणी दिलं होतं.म्हणून त्यात आता चहापत्ती टाकलीत." " काय!" तिला आपण असं केलं याचं तिला खूपच धक्का बसला.

मावशीनी हळूच तिच्या खांद्यावर थोपटले आणि म्हणाल्या. "अर्पिता मला कळतेय तुझी मन:स्थिती. फार ताण घेऊ नकोस हळुहळू केतकी ची तब्येत सुधारेल. तू फार ताण घेतलास तर तुलाच त्रास होईल.कळतय नं" " हो.पण काय करू मनात सारखे वाईटच विचार येतात. वाटतं केतकी नक्की बरी होईल नं. खूप गुणांची आहे हो माझी केतकी." एवढं बोलून ती रडायला लागते. मावशींनी हळूच तिला जवळ घेऊन थोपटलं आणि तिच्या मनातला कढ बाहेर पडेपर्यंत त्यांनी तिला रडू दिलं .त्यांचेही डोळे पाण्यानी भरून आले.


संध्याकाळी महेंद्र ऑफीसमधून जरा लवकरच घरी आला. कारण त्यानी आहारतज्ञांची वेळ घेतली होती.तो घरी येईपर्यंत अर्पिता नी केतकीला थोडं खायला दिलं.केतकीला खातांना आजीची गोष्ट होतीच जोडीला. रोहनला मावशींजवळ ठेऊन ते तिघच जाणार होते. "रोहन बाहेर खेळायला चालला आहेस पण लक्षात ठेव मावशी आजी एकटी आहे घरात.आज फार वेळ बाहेर खेळायचं नाही. खेळता खेळता परस्पर मित्रांकडे जायचं नाही.आजीला कोणाची घरं माहिती नाहीत कळलं. " "हो आई कळलं.आजी मी अर्ध्या तासात येईन. आई मी चाललो खेळायला" हे वाक्य रोहन घाईघाईत सॅंडल पायात घालतच बोलला आणि बाहेर पळाला.


महेंद्र,अर्पिता आणि केतकी तिघही आहारतज्ञांकडे आले होते. दोन नंबरनंतर त्यांचा नंबर होता. त्यांचं नाव पुकारल्या गेलं तशी अर्पिता नी केतकीला धरुनच हळुहळू आत नेलं. आता गेल्यावर महेंद्र नी त्यांना नमस्कार केला. " मॅडम मी महेंद्र कर्वे ही माझी बायको आणि ही मुलगी केतकी." "बसा." म्हणाल्या. तिघही बसले. " मॅडम हे केतकी चे रिपोर्ट्स" त्यांनी केतकी चे रिपोर्ट वाचले. तिचं वजन केलं, उंची बघीतली हे सगळं त्यांच्या तक्त्यात लिहून घेतलं. नंतर त्या बोलू लागल्या. "केतकी तू दहावीत आहेस. तुला विज्ञान हा विषय असेल नं" "हो." "यात भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र,आणि जीवशासास्त्र हे विषय असतील" " हो आहेत नं "

"तुला आवडतो का विज्ञान हा विषय." "हो. मला भौतिकशास्त्र थोडं कठीण वाटतं." "होका. बाकीचे दोन विषय सोपे वाटतात." " मला जीवशास्त्र हा विषय खूप आवडतो.." अरे वा! छानच की आज याच विषयावर आपल्याला बोलायचय." "म्हणजे?" "या जीवशास्त्रात मनुष्याच्या शरीररचनेबद्दल सांगीतलं आहे . केतकी तुला पांढ-या पेशी ,लाल पेशी या बद्दल माहिती असेल." "हो. आम्हाला शिकवलय." " मग मला सांग लाल रक्तपेशी बद्दल तुला काय माहिती आहे ?" महेंद्र अर्पिताला कळत नव्हतं हे असे प्रश्न का विचारतात आहेत.


"केतकी तुला आता माहिती असेल की रक्तामध्ये लाल रक्तपेशी, पांढ-या रक्तपेशी आणि बिंबिका असतात.हे रक्ताचे मुख्य घटक आहेत" " हो आम्हाला शिकवलं आहे की. लाल रक्तपेशीमध्ये हिमोग्लोबीन असतं. हिमोग्लोबीनमुळे रक्ताचा रंग लाल असतो" " बरोबर. तसंच हिमोग्लोबीनमुळे प्राणवायू आणि कार्बनडाय ऑक्साईड रक्तात सहज वाहून नेल्या जातं. आपल्या शरीरातील हिमोग्लोबीनचं प्रमाण जर प्रमाणापेक्षा कमी झालं तर पेशींचा लालरंग फिकट होतो."


"हिमोग्लोबिन कमी होण्याचा तुमच्या त्वचेवर काय परिणाम होतो. हिमोग्लोबिन कमी झाल्याचे ओळखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे लक्षण कोणतं? हे सांगीतलं तुम्हाला,?" " नाही हे नाही सांगीतलं" "हिमोग्लोबीन खूप कमी झालं की माणसाच्या त्वचेत बदल होतो. लाल रक्तपेशींमधील हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे त्वचेचा मुळ रंग बदलतो. त्वचा पांढरट दिसू लागते आणि त्वचा ओघळल्यासारखी, निस्तेज दिसू लागते."

" केतकी तूच बघ तुझ्या हाताकडे. हाताची त्वचा तुला बघता येईल. कशी दिसतेय तुझी त्वचा?" " जरा पांढरी वाटतेय." "होन .ती का तशी झाली?" " हिमोग्लोबीन कमी झाल्यामुळे." "अगदी बरोबर. हिमोग्लोबीन कमी असलं म्हणजे असं होतं. आता तुला थकवा का येतोय ?" " माहित नाही." " तुला कुठला मोठा आजार झाला नाही तरी का थकवा येतो आहे हे सांगते तुला."

"केतकी आपल्या शरीरात जर हिमोग्लोबीनचं प्रमाण कमी झालं तर आपल्या शरीरातील प्राण वायू कमी होतो. प्राणवायू जर कमी झाला तर कोणतंच काम माणूस सहजपणे करू शकत नाही. कारण कोणतंही काम करण्यासाठी जी ऊर्जा लागते ती कमी प्रमाणात असलेल्या हीमोग्लोबीनमुळे आपल्या शरीराला ते काम पूर्ण करण्यासाठी मिळत नाही. त्यामुळे कोणतंच काम आधीसारख आपण करु शकत नाही. तुझ्या आता लक्षात आलं असेल की तुला थकवा का येतो थोडावेळ पुस्तक वाचलं तरी. तू थकत असशील. होनं" " हो " केतकी बोलली.


"केतकी तू दहावीला आहे. दोन महिन्यात तुझी बोर्डाची परीक्षा आहे पुढे तुझं करीयर आहे हे सगळं करायचं तर मग आत्ता आपण काय करू शकतो?" " मॅडम माझ्या शरीरातील हिमोग्लोबीनची पातळी वाढवावी लागेल.""एकदम बरोबर. तुला डाॅ. नी औषध दिली आहेत पण त्याबरोबर आहारातून कसं लवकर हिमोग्लोबीन ची पातळी वाढवता येईल. हे बघू.

हिमोग्लोबिनच्या कमतरतेने होणारे रोग टाळण्यासाठी योग्य आहार आणि फॉलिक आम्ल, लोह आणि प्रथिने यांचा आहारात योग्य आणि पुरेसा समावेश असणे आवश्यक आहे. मी तुला आहार लिहून देते तसा तू घे .हां चार्टपण देते त्यात जे प्रश्न विचारलेत त्याची उत्तर द्यायची. हां चार्ट दोन तीन दिवसानी भरायला लाग. आहार आधी सुरू कर."


"केतकीच्या आई मी जो आहार सांगीतला आहे त्याचं काटेकोरपणे पालन करा.चार्ट भरणं सुरू केल्यावर एकही दिवस त्यात लिहायला विसरायचं नाही. केतकी ही तुझी जबाबदारी.सध्या तिला काही दिवस शाळेत नका पाठवू.जरा थकवा जाऊ द्या. मग पाठवा." "बरं"अर्पिता म्हणाली.

" चार्टर्वर माझा नंबर आहे दर आठवड्यनी या चार्टचा फोटो काढून मला पाठवायचा. त्यावरून मी तुझ्या आहारात हवा असेल तर फेरबदल करीन. हे काम केतकी तूच करायचं आईवर हे काम सोपवायची नाही." " हो डाॅ. मीच करीन" केतकी म्हणाली."निघू आम्ही" अर्पितानी विचारलं."हो." डाॅ.म्हणाल्या.

तिघही केबीनबाहेर आले. संतोष उभाच होता. केतकीच्या तब्येतीमुळे महेंद्र संतोषलाच बोलवत असे. ओळखीचा होता त्यामुळे यांचं दवाखान्याचा काम होईस्तोपर्यंत तो थांबत असे. थांबण्याचे पैसे घ्यायचा नाही. कारण महेंद्र आणि त्याची खूप जुनी ओळख होती.

अर्पिता हळुहळू केतकीला घेउन रिक्षा जवळ आली. त्यात तिला हळूच बसवलं.मग दोघही बसले आणि घरी निघाले. आज दोघांच्याही डोक्यावरचा ताण थोडा कमी झाला होता. केतकीच्या थकवा येण्याचं कारण त्यांना कळलं होतंच पण आज ते कारण आपण योग्य आहार घेऊन दूर करू शकतो. खूप घाबरण्यासारखं नाही.हे कळलं.

तिघही घरी आले.मालू मावशी त्यांची वाटच बघत होत्या.घरात शिरताच मावशींनी विचारलं" लिहून दिला आहार ?" " हो.अग त्यांनी केतकीला इतकं छान समजाऊन सांगीतलं. तिला जीवशास्त्र हा विषय आहेनं त्यात काय असतं असं विचारून हळुहळु तिला हिमोग्लोबीनचं महत्व काय?ते कमी झालं की कसा त्रास होतो. ते वाढवायचं कसं हे इतकं छान सांगीतलं." महेंद्र बोलला.

"सुरवातीला आम्हाला वाटलं हे काय विचारताय आहेत.पण त्या प्रश्नां मधुन केतकीला सगळं महत्व सांगीतलं." अर्पिता म्हणाली. यावर केतकी बोलली " आजी मला त्यांनी चार्ट भरायला दिला आहे. दर आठवड्याला तो लिहीलेल्या चार्ट भरून त्याचा फोटो त्यांना पाठवायचा आहे." " होका.मग आमची चिमणी त्यांनी सांगीतल्याप्रमाणे वागणार नं? त्यांनी सांगीतला तसा आहार घेणार नं? चीडचिड नाही नं करणार?"

"नाही आजी मी सगळं करीन.मला दहावीची परीक्षा द्यायची आहे. नाश्ता, जेवण, झोप सगळ्यांसाठी आजी तुझी गोष्ट हवी." मावशी आजी लगेच म्हणाल्या" आपकी बातें हमारे सर आंखोपर." म्हणून हसू लागल्या.

"मी खिचडी करते लगेच." अर्पिता म्हणाली."अगं खिचडी तयार आहे." "" कशाला दगदग केलीत." " आई मी आणि आजींनी मिळून खिचडी केली. मी हेल्प केली आजीला. पापड्यापण तळल्या." "होका. तळल्या आजीनी पोटात कोणाच्या गेल्या" असं म्हणत महेंद्र रोहनच्या पोटाला गुदगुल्या करून लागला. सगळ्यांना हसायला आलं.

खूप दिवसांनी म्हणजे किती तर फक्त चार दिवसांनी कर्वेंच्या घरात हास्याचे फवारे उडाले होते. आत्तापर्यंत केतकीचं आजारपण म्हणजे खूप गंभीर आहे असं दडपण त्यांना आलं होतं. आहार नीट घेतला की केतकी ची तब्येत चांगली होईल हे लक्षात आल्याने सगळ्यांच्या मनावरचा ताण कमी झाला.
----------------------------------------------------------
क्रमशः. पुढचा भाग परवा वाचा.
लेखिका...मीनाक्षी वैद्य.


🎭 Series Post

View all