Oct 24, 2021
कथामालिका

एक चिमणी भाग ३ रा

Read Later
एक चिमणी भाग ३ रा

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..


एक चिमणी भाग ३रा
मागल्या भागावरून पुढे…

महेंद्र रिपोर्टस घेऊन दवाखान्यात पोचला होता. त्याचा नंबर यायला वेळ होता. तेवढ्यात त्याने अर्पिताला फोन करून आपण दवाखान्यात पोचलो हे सांगीतलं. नंबर येईस्तोवर महेंद्रच्या डोक्यात बरेच विचार आवर्तनं घेत होते. त्या आवर्तनात तो असा गुंतला की रिशेस्पनीस्टने दोनदा त्याचं नाव पुकारलं तरी त्याला ऐकु आलं नाही. शेवटी ती महेंद्रच्या जवळ येऊन म्हणाली "महेंद्र कर्वे तुमचा नंबर आलाय."तो गडबडिनं उठला आणि आत केबिनमध्ये शिरला. "नमस्कार डाॅ. हे रिपोर्ट्स " असं म्हणत महेंद्र नी रिपोर्ट्स डाॅ.च्या. समोर ठेवले. " बसा तुम्ही," डाॅ.म्हणाले. "हो बसतो " म्हणत महेंद्र खुर्चीवर बसला.


रिपोर्ट बघून झाल्यावर डाॅ. म्हणाले. " तुमच्या मुलीला जो थकवा येतो आहे त्याचं कारण तिच्या शरीरातलं हिमोग्लोबीन बरंच कमी झाल्यामुळे येतोय. मानवी शरीरात रक्तातील लाल पेशींमध्ये हिमोग्लोबिन असतं. हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक असतं. हेम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिनं. हिमोग्लोबिन कमी होणं म्हणजे रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होणं.

हिमोग्लोबिनमुळे रक्तातील ऑक्सिजनचा शरीराला पूरवठा केला जातो. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा येतो."

"डाॅ. हिमोग्लोबीन प्रमाण खूपच कमी झालंय का?" "हो म्हणून तर तुम्हाला त्याची माहिती दिली. मी औषध देतो पण रोजच्या आहारातून हिमोग्लोबीन प्रमाण वाढवता आलं तर चांगलं. तुम्ही खूप वेळेवर घेऊन आलात आणखी काही दिवस उशीर केला असता तर खूपच स्थिती खराब झाली असती."डाॅ.म्हणाले.


"डाॅ.माझी केतकी बरी होईल ना?" " हो.नक्कीच बरी होईल तुम्ही काळजी करू नका. मी एका आहार तज्ञांचा तुम्हाला नंबर आणि पत्ता देतो. त्यांना हे सगळे रिपोर्ट दाखवा आणि मुलीला सोबत घेऊन जा. त्या तिचे रिपोर्ट्स बघून आहार काय घ्यायचा ते सांगतील. शक्य झाल्यास महिनाभर तिला घरीच आराम करु द्या. हां घ्या त्याचा पत्ता आणि नंबर."
"बरं." एवढं बोलून डाॅ.नी दिलेली चिठ्ठी घेऊन महेंद्र केबीनच्या बाहेर पडला.


पार्किंगमध्ये जाऊन बाईक स्टार्ट करून तो घरी निघाला. बाईकबरोबर त्यांच्या डोक्यातले विचारही स्टा्र्ट झाले.
एकदम हिमोग्लोबीन कमी होण्याचं काय कारण असावं गाडी चालवताना त्यांच्या डोक्यात हेच विचार चालले होते. अर्पिता सगळ्या भाज्या करते. मुलं कार्ल्याची भाजी सुद्धा खायचे.तरी असं का व्हावं. उद्याची वेळ घेऊन आहार तज्ज्ञाकडे जायला हवं. आता उशीर नको करायला् हे वर्ष तिचं दहावीचं आहे या विचारात असताना त्यांच्या नकळत त्याच्या गाडीची दुस-या गाडीला ठोस बसली तसा तो भानावर आला.

ओशाळवाणं होऊन तो त्या माणसाला साॅरी म्हणाला. तोही ओके ठीक आहे. असं होतं कधी-कधी असं म्हणाला आणि महेंद्र ला आश्चर्यच वाटलं. त्याला वाटलं होतं की आता हा माणूस भांडणार आपल्याशी. पण तसं काही घडलं नाही. असंही होऊ शकतं यावर कितीतरी वेळ महेंद्रचा विश्वास बसत नव्हता. त्याचवेळी अर्पिताचं वाक्य त्याला आठवलं ती म्हणाली होती डोक्यात विचार घेऊन गाडी चालवू नका. महेंद्रनी मान झटकली आणि गाडी सुरू केली.


अगदी हळू गाडी चालवत महेन्द्र घरी पोचला. गाडी पार्क करून तो फ्लॅट पाशी पोहचला आणि तो बेल वाजवणार तेवढ्यात त्याला घरातून मालूमावशीचा आवाज आला आणि त्याच्या लक्षात आलं अरे हिला स्टेशनवर घ्यायला जायचं होतं. तो दवाखान्यात जाण्याच्या विचारात मालुमावशीला स्टेशनवर घ्यायला जायची गोष्ट तो पार विसरुन गेला होता. पुन्हा त्याला ओशाळल्या सारखं झालं. त्याने बेल वाजवली. अर्पितानी दार उघडलं. आत शिरल्या शिरल्याच तो मावशीला म्हणाला "मालूमावशी साॅरी मी दवाखान्यात जाण्याच्या नादात. तुला घ्यायला स्टेशनवर यायचं आहे हे विसरूनच गेलो. मला अनंतानी सांगीतलं होतं."

"चालतं रे. एवढा काही गुन्हा केला नाहीस तू. मला तुझा पत्ता तोंडपाठ आहे. वय सत्तरीच्या वर असलं तरी टुणटुणीत आहे. आणि इतर म्हाता-यांसारखी बावळट पण नाही." एवढं बोलून मावशी स्वतःशीच हसल्या." "तसं नाही ग पण अनंतानी सांगून ठेवलं होतं" "अरे कशाला एवढ्या छोट्या गोष्टींवर विचार करतोय. चेहरा बघ कसा दिसतोय. मी रिक्षा केली आणि सरळ घरी आले.आता वेळ न दवडता डाॅ.काय म्हणाले ते सांग"

" हो सांगतो. केतकीच्या शरीरात हिमोग्लोबीनची पातळी खूप कमी झाली आहे असं डाॅ. म्हणाले. त्यासाठी औषध दिलय पण डाॅ म्हणाले आहारतज्ञाकडून योग्य आहार लिहून घ्या. औषधांपेक्षा रोजच्या आहारातून हिमोग्लोबीन तसंच इतर व्हिटॅमीन्स प्रोटीन वाढवा. तिच्या शरीराला योग्य ते खायला द्या. तिला आवडतं तेच फक्त नाही द्यायचं चौफेर आहार ठेवायचा."


"आता कोणत्या आहारतज्ञाकडे जायचं?" अर्पितानी विचारलं "सुषमा पाटणकर म्हणून आहारतज्ञ आहेत त्यांचा फोन नंबर आणि त्यांच्या क्लिनीकचा पत्ता डाॅ. नी दिला आहे. ऊद्या सकाळी त्यांना फोन करतो. ऊद्याचीच वेळ घेतो." "केतकीला घेऊन जावं लागेल?" अर्पिता नी विचारलं "हो. डाॅ.म्हणाले त्यांना केतकीला तपासू द्या. हे रिपोर्ट्स त्यांना दाखवा."

"ठीक आहे." अर्पिता म्हणाली." महेंद्र अर्पिता घाबरू नका आहार योग्य त-हेनी घेतला की सगळं छान होईल. मी आलेय नं" असं म्हणून मावशी हसल्या. " मावशी मला वाटलं आधी कशाला तू एवढी धावपळ केलीस.पण तुला बघीतलं आणि खरच मला दहा हत्तींचं बळ आलं. आई-बाबा होते तोवर काही वाटायचं नाही. "बोलता बोलता महेंद्रचा आवाज रडवेला झाला.

"अरे पण ही मावशी आहेनं तुझ्यामागे ठाम उभी. म्हणून तर आले न लगोलग. माय मरो नि मावशी जगो हे माहिती आहे नं तुला. चल आता फार विचार करु नको." थोडावेळ थांबून मावशी म्हणाल्या "हे बघ महेंद्र नेहमीसाठी एक गोष्ट लक्षात ठेव. आजारी माणसाच्या भवती जी माणसं असतात नं त्यांनाही ताण येतो हे कबूल आहे पण तेच ताणाखाली राहिले तर आजारी माणसाला सकारात्मक ऊर्जा कोण देईल. आजारी माणसाची विचारशक्ती खुंटलेलीच असते. पण आजूबाजूच्यानी आपली विचारशक्ती शाबूत ठेवायला हवी नं तेव्हाच आजारी माणूस आजारातुन बाहेर येईल."

"हो कळतंय पण तरीही ताण येतोच." महेंद्र दु:खी स्वरात म्हणाला. यावर मावशी लगेच म्हणाल्या "आता लवकर झोप. दोन दिवसापासून तुझी झोप झालेली नाही.त्यामुळे थकवा आहे म्हणून असं बोलतोय. केतकीला थकवा का येतो आहे याचं कारण कळलं आता आपल्याला. आता ताण घ्यायचा नाही. त्या थकव्याला दूर पळविण्याचा आपण प्रयत्न करायचा. म्हणजे त्या आहारतज्ञ जो आहार सांगतील तसा केतकीला द्यायचा. चल जेवायची वेळ झालीय." " हो. मी हातपाय धुवून येतोच." महेंद्र फ्रेश व्हायला आत गेला.

जेवणी आटोपल्यावर आजी केतकी आणि रोहनला गोष्ट सांगू लागल्या. त्या गोष्टी ऐकताना रोहन तर खिदळत होताच पण आज केतकीच्या चेह-यावरही हसु दिसत होतं. ते बघून महेंद्र अर्पिता दोघांनाही बरं वाटलं.आज त्यांची चिमणी चक्क दोन दिवसानंतर हसली होती. दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं. केतकीकडे बघून महेंद्र बोलला "डाॅ.च्या औषधाबरोबर मावशीरूपी औषध आलंय आता मला चिंता नाही. आता खूप लवकर केतककीला बरं वाटेल." " हं" अर्पिता नी यावर फक्त हुंकार भरला.

मावशी आजीची गोष्ट बराच वेळ चालणार होती. हे दोघांनाही माहिती होतं. त्या तिघांच्या गोष्टींच्या काल्पनिक जगात व्यत्यय नको म्हणून दोघंही जरावेळ खोलीच्या बाहेरच थांबले.पण ही गोष्ट लगेच संपणार नव्हती.काल्पनिक असली तरी आत्ताच्या क्षणी ती गोष्ट आणि त्या गोष्टीतला जग खरं होतं. महेंद्र अर्पिता निश्चिंतपणे झोपायला गेले. केतकी आणि रोहनच्या डोळ्यात आजींनी गोष्टीरूपी रथामधून झोपेला बोलवलं आणि मुलं गाढ झोपी गेली. मावशी आजींनी दोघांच्याही चेहे-यावरून प्रेमानी हात फिरवला.आणि देवाचा जप करायला देवघरात गेल्या.


केतकी आणि रोहन या दोघांची मालू आजीशी छान गट्टी जमली होती. या आधी मुलांनी मालू आजीला बघीतले होतं पण कुठल्यातरी लग्नसमारंभात. मुलांना आत्ता सारखी एवढी ओळख मालूआजीशी नव्हती. महेंद्र मात्र नेहमीच मुलांना आणि अर्पिताला मालू मावशीच्या बरोबर घालवलेल्या दिवसांच्या आठवणी सांगायचा. त्या आठवणींमुळे मालु आजी जेव्हा प्रत्यक्षात भेटली तेव्हा केतकी आणि रोहनला आजी बरोबर पटकन रुळायला मदत झाली.

मावशीचा अनंता महेंद्र एवढाच होता. दोघांची फार गट्टी होती. दर उन्हाळ्यात दोघं भेटायचे. महेंद्र कधी मालू मावशीकडे जायचा तर कधी अनंता महेंद्र कडे यायचा. एकुण काय महेंद्रची आणि अनंताची ऊन्हाळ्याची सुटी मजेत जायची.


मालूमावशीचं वैशीष्ट्य हे होतं की ती महेंद्र आणि अनंताच्या बरोबरीच्या वयाची होऊन गप्पा मारायची. त्यांच्या पिढीतले शब्द पटकन आत्मसात करायची आणि ते वापरायची पण. म्हणून महेंद्रला ती कधी मावशी न वाटता मैत्रीणीच वाटली. आत्ताही ती तेवढ्याच तन्मयतेनी केतकी आणि रोहनच्या वयाची झाली त्यांच्या जगात रमली. म्हणूनच केतकी आणि रोहनच्या चेह-यावर आनंद दिसतो. रोहननी तर त्याच्या शाळेत मालुमावशी बद्दल खूप काही सांगीतलं होतं.


महेंद्र अर्पिताला म्हणाला "अगं मालू मावशी मला आणि अनंतालाही अशीच गोष्ट सांगायची. तिची गोष्ट म्हणजे आम्हाला अमृत वाटायचं. मालू मावशी आल्यामुळे खरच मला खूप धीर आला. मालू मावशी पहिल्यापासूनच फार धीट आहे. आता बघ नं या वयात कोणाची सोबत न घेता एवढा प्रवास करून आली. मनातून खरच खूप बरं वाटलं. आई गेल्यापासून असा पाठींबा नाही मिळाला ग. पण आज मात्र मला आई आल्यासारखीच वाटतेय." बोलता बोलता महेंद्रच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. त्याच्या मनात आईची आठवण तीव्र झाली.


अर्पिता हळुवारपणे त्यांच्या केसातून हात फिरवत म्हणाली "आता मालू मावशी आल्यात नं आता फार ताण घेऊ नका. ऊद्या एकदा आहारतज्ञाकडे जाऊन आलो की तिचं मी सगळं सांभाळेन. बाकी आजीच्या गोष्टी, आजीची बडबड तिचं टाॅनिक झालंय. आहाराबरोबर तेही तिची तब्येत ठणठणीत करतील. आता शांत झोपा ऊद्याऑफीस आहे नं."

"हं.अर्पिता थोडं डोकं चेपतेस का? विचारानी डोकं दुखायला लागलं." "हं चेपते. पण आता विचार न करता जरा देवाच़ नाव घ्या.मी डोकं चेपतेय तोवर झोप लागेल." महेंद्र हसला आणि त्यानी डोळे मिटले. अर्पिता डोकं चेपता घेता अंगाई गीत पण म्हणत होती. तिचा साधा असलेला नवरा आज तिचं छोटं बाळं झाला होता. अंगाई गीत ऐकता ऐकता महेंद्रला झोप लागली. तशी अर्पिता ही हळूच बाजूला झाली.
-----------------------------------------------------------
क्रमशः पुढील भाग परवा वाचा.
लेखिका...मीनाक्षी वैद्य.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now