Oct 24, 2021
कथामालिका

एक चिमणी भाग २रा

Read Later
एक चिमणी भाग २रा

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
एक चिमणी भाग २रा
मागील भागावरून पुढे वाचा.

दवाखान्यात येऊन बराच वेळ झाला होता तरी अजून त्यांचा नंबर आला नव्हता. नंबर कधी येईल हे विचारायला महेंद्र रिसेप्शनीस्टपाशी गेला. "मॅडम आम्ही येऊन बराच वेळ झाला.फोनवरून नंबर लावला होता." " आज डाॅ.ना अचानक एक पेशंट सिरीयस झाल्यामुळे होम व्हिजीटला जावं लागलं. डाॅ. ती व्हिजीट संपवून आत्ताच दवाखान्यात आलेत.तीन पेशंटनंतर तुमचा नंबर आहे." महेंद्रनी अर्पिताला उशीर होण्याचं कारण सांगीतलं.

खुर्चीवर बसल्या बसल्या रोहन कंटाळला होता.केतकीला इतका वेळ बसून त्रास व्हायला लागला.होता. ती आईच्या खांद्यावर डोकं ठेऊन डोळे मिटून बसली होती.महेंद्र आणि अर्पिता दोघांनाही केतकीच्या सुकलेला, थकलेला चेहरा बघवत नव्हता. पण इलाज नव्हता. दवाखान्यात सगळे आजारी असतात म्हणूनच येतात. त्यात माझ्या मुलीला अगोदर तपासा असं कसं म्हणणार. चौघेही नंबर येण्याची वाट बघत बसून होते.


एकदाचं केतकीचं नाव पुकारल्या गेलं आणि अर्पितानी केतकीला उठवलं.बसून बसूंन थकल्यामुळे केतकीला झोप लागली होती. तिला पकडून हळुहळू चालवत अर्पिता नी तिला डाॅ.च्या केबीनमध्ये नेलं. डाॅ.म्हणाले " तिला तिथे काॅटवर झोपवा मी तपासतो." अर्पितानी केतकीला केबीनमधील काॅटवर झोपवलं. डाॅ. केतकीला तपासू लागले. तपासून झाल्यावर ते म्हणाले. "आपण काही टेस्ट करू. तिला ताप नाही तरी थकवा आहे." " हो डाॅ. दोन दिवसापासून ही अशीच आहे.विशेष काही खात नाही."अर्पिता डाॅ.ना म्हणाली. "हं.पण तिनी जेवायला हवं नाहीतर हा थकवा वाढेल.तिला जे आवडतं ते करा.जेवढं खाईल खाऊ द्या. हिचं हिमोग्लोबीन तपासुन घेऊ. ते जर खूप कमी झालं तर असा थकवा येतो.आपण आणखी काही टेस्ट करू. मी लिहुन देतो."

"आत्ताच हिला असं होतंय का नेहमी होतं?" डाॅ.नी विचारलं.
"तसं मधून मधून कधीतरी म्हणते थकवा वाटतोय.आजकाल ती शाळेच्या ग्राऊंडवर पण खेळायला जात नाही."अर्पिताच म्हणाली. " मग हिमोग्लोबीन केलच पाहिजे. लाल रक्तपेशींमधील हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे त्वचेचा मुळ रंग बदलतो. मला तुमच्या मुलीची त्वचा पांढरट दिसते आहे. आणि त्वचापण ओघळल्यासारखी, निस्तेज वाटतेय." डाॅ.बोलले.


डाॅ.नी काय सांगीतलं हे दोघांनाही कळलं नाही. महेंद्र म्हणालाही "मला कळलं नाही डाॅ. तुम्ही काय बोललात." त्यावर डाॅ.म्हणाले " तुम्ही रिपोर्ट घेऊन या मग तुम्हाला सविस्तर सांगतो." "ठीक आहे." एवढं बोलून महेंद्र उठला पाठोपाठ अर्पिता उठली आणि हळूच केतकीला काॅटवरुन खाली ऊतरवलं. चौघेही दवाखान्याच्या बाहेर पडले.

"अहो रिक्षा आणता का? मी हळुहळू केतकीला खाली आणते." " अगं संतोषला मी थांबवून ठेवलंय.हाॅल्टींग चार्ज देऊ त्याला." " बरं झालं त्याला थांबवलत. केतकी फारच थकली आहे.सगळे केतकीच्या चालीनी हळुहळू रिक्षा पाशी आले. रिक्षात बसले तसं संतोष नी विचारलं "दादा काय म्हणाले डाॅ.?" " काही टेस्ट करायच्या आहेत बघू." महेंद्र म्हणाला यावर संतोषने धीर देत म्हटले " काही होणार नाही दादा .तुम्ही घाबरू नका." यावर लगेचच अर्पिता म्हणाली "संतोष तुझ्या तोंडात साखर पडो. तू म्हणतोस तसंच होऊ दे.". संतोषनी रिक्षा सुरू केली आणि महेंद्रच्या घराच्या दिशेनी वळवली.


दवाखान्यातून येऊन अर्धा तास झाला असेल. केतकीनी तर आल्या आल्याच पलंगावर अंग टाकलं. डाॅ.नी तिला आवडतं ते खायला द्या म्हणालेत. केतकीला साबुदाण्याची खीर फार आवडते.तर आज ती करुया असं अर्पिताच्या मनात आलं कारण ही खीर रोहनलाही आवडते. पण घरात साबूदाणा थोडाच आहे अर्पिताच्या लक्षात आलं तसं ती महेंद्रला म्हणाली "अहो घरात थोडाच साबुदाणा आहे. आणून देता का? केतकीसाठी खीर करते." "हो आणून देतो.तिला आवडतं ते सगळं सांग घेऊन येतो.आवडीचं असेल तर चार घास खाईल तरी. पोरीच्या चेह-याकडे बघवत नाही." हे बोलतांना महेंद्रचाच चेहरा हताश झाल्यासारखा झाला. त्याचा असा चेहरा बघून तिला गलबलून आलं. तिला महेंद्रला आणि केतकीला दोघांनाही सांभाळायचं होतं. तिने महेंद्रला सामानाची यादी दिली. पिशवी घेऊन तो घराबाहेर पडला.

दुसरा दिवस ऊजाडला.केतकीच्या टेस्ट करायच्या होत्या.महेंद्रनी जवळच्या लॅबमधील माणसाला घरीच रक्त घ्यायला बोलावलं होतं.तो मगाशीच रक्त घेऊन गेला होता. संध्याकाळपर्यंत रिपोर्ट मिळणार होते. केतकीला रक्त देण्यापुरतंही बसवत नव्हतं तेव्हा तिची स्थिती बघून लॅब टेक्नीशीयन म्हणाला. "तुला बसवत नसेल थकवा वाटत असेल तर तू झोप मी रक्त घेतो." केतकला मनातून खूप बरं वाटलं झोप सांगीतल्यामुळे. तिला खरच बसवत नव्हतं.काल थोड्यावेळ रोहनशी बसून लुडो गेम खेळत होती तर एकदम तिच्या अंगाला थरथर सुटली. तिला समजेना काय होतंय. अचानक ती पलंगावर पडली.रोहननी घाबरून आईला हाक मारली.अर्पितानी घाईनी खोलीत येऊन बघीतले तर ती पलंगावर पडली होती झोपली नव्हती.अर्पिता चटकन केतकी जवळ गेली.

"केतकी बाळा काय होतंय. "बोलतांनाच अर्पितानी केतकीचे पाय वर उचलून तिला पलंगावर नीट झोपवलं.अर्पिता तिच्याजवळ बसली."बेटा काय होतंय. चक्कर आली का?" केतकी नी नाही म्हणून मान डोलावली. " रोहन अचानक काय झालं ताईला ? तू मस्ती केलीस तिच्याशी." " नाही आई मी काही नाही केलं. ताई पलंगावर बसून माझ्याबरोबर लुडो खेळत होती." रोहनचा चेहरा घाबरलेला होता. त्याच्याकडे बघून अर्पिताला किव आली.तिनी पटकन जवळ घेतलं " रोहन बेटा घाबरु नको तू काही केलं नाही. माझ्या लक्षात आलं ताईला काय झालं. ताईला खूप थकवा आहे नं. त्यात थोड्यावेळ ती तुझ्याशी बसून लुडो खेळली नं त्यांनी ती आणखीन थकली. म्हणून पडली.तुझ्यामुळे काही झालं नाही. पण आता ताईला झोपू द्यायचं.झोपल्या झोपल्या पण ती आणि गेम खेळू शकते.तसं केलं तर ती थकणार नाही कळलं?" एवढ्या वेळात रोहनच्या डोळ्यातून गंगायमुना वाहणं सुरू झालं होतं.


त्यांचे डोळे पुसत हसतच अर्पिता म्हणाली " अरे वेड्या रडतोस काय? तुला ताईची किती काळजी आहे मला माहिती आहे. तू तिला त्रास देणार नाहीस हेही माहिती आहे.पण आता कोणताही गेम खेळायचा असेल तर ताई झोपून खेळेल." हे बोलतानाच अर्पिताचं केतकीकडे लक्ष गेलं.केतकी केव्हाच झोपी गेली होती. अर्पिता नी केतकीच्या अंगावर पांघरुण घातलं तिच्या चेहे-यावरून हलकासा हात फिरवला आणि तिच्या गालाची हळूच पापी घेतली.अर्पिता रोहनला घेऊन हळूच खोलीबाहेर गेली आणि खोलीचं दार जरासं ओढून घेतलं.


"अहो रिपोर्ट घेऊन तुम्हीच झालं का डाॅ.कडे." "का ग" महेंद्रनी विचारलं."केतकीला कशाला त्रास द्यायचा.रिपोर्ट बघून ते सांगतील. डाॅ.पुन्हा केतकीला तपासतील असं वाटतं नाही मला. तिथे बसून रिक्षात बसून आणखी थकून जाईल ती." अर्पिता बोलली." ठीक आहे मी बोलतो डाॅ.शी. जर ते म्हणाले की केतकीला आणायची गरज नाही तर मी ऑफीसमधून परस्पर रिपोर्ट घेऊन दवाखान्यात जाईन."
" हो तसंच करा." " केतकी काय खाणार म्हणाली आत्ता. ती खायची इच्छा नाही म्हणाली तरी तिला थोडंसं खायलाच लाव." महेन्द्रनी अर्पिताच्या निक्षून सांगीतलं. "हो.कणकेचा गूळ घालून शीरा आवडतो तिला. मी आत्ता शीराच करते. बघते किती खाईल." अर्पिता स्वयंपाकघरात जाता जाता केतकीच्या खोलीत डोकावली तर ती जागी होती.अर्पितानी तिच्याजवळ जाऊन विचारलं "बेटा तुला कणकेचा शीरा आवडतो नं मी करतेय तू खायचा बरं. डाॅ.नी सांगीतलं आहे थोडं तरी खाल्ली पाहिजे. केतकीनी नुसती मान डोलावली.


"रोहन कुठे आहे ?" केतकी नं विचारलं."अगं तो शाळेत गेला.आज त्याची युनीट टेस्ट आहे." " माझी पण युनीट टेस्ट असेल." " तू काळजी करू नकोस सध्या अभ्यास आणि शाळेची.आधी तब्येत महत्वाची कळलं. मुख्याध्यापिका वाळुंजकर बांईंशी बोलले आहे मी. त्या कदाचित तुला भेटायला सुद्धा येतील." तिच्या गालाची पापी घेत अर्पिता बोलली.केतकीने हळूच मान हलवली. अर्पितानी शी-याचं नाव घेताच केतकीच्या डोळ्यात चमक आली.ती बघून अर्पिताला मनातून खूप बरं वाटलं. केतकीच्या गालावर थोपटत अर्पिता शीरा करायला गेली.


महेंद्रला त्यांच्या मावसभावाचा अनंताचा फोन होता."बोल अनंता कसा आहेस?" " मी ठीक आहे.आईला आत्ता ट्रेनमधे बसवितो आहे. जमलं तर स्टेशनवर ते घ्यायला." " अरे अचानक कशी काय येतेय?" " अचानकच ठरलं परवा तुझी शीलूआत्या आईला देवळात भेटली तेव्हा तिनी सांगीतलं केतकीला बरं नाही टेस्ट करायला सांगीतल्या आहेत तेव्हापासून तिनी घोषा लावलाय.मी महेंद्र कडे जाते मला ट्रेनमध्ये बसवून दे.म्हणून आज ट्रेनमध्ये बसतोय.बर केतकीच्या सांगीतलेल्या टेस्ट केल्या का?"

" हो आज सकाळी टेस्ट केल्यात. त्या माणसाला रक्त घ्यायला घरीच बोलावलं होतं.कारण केतकी गाडीवर बसू शकणार नाही आणि लॅबमध्ये गर्दी असेल तर तिथेही बसू शकणार नाही. म्हणून त्याला घरीच बोलावलं होतं.संध्याकाळी रिपोर्ट मिळतील. मग जाईन डाॅ.कडे बघू डाॅ.काय म्हणतात. पण मावशींनी कशाला एवढी दगदग करून यायचं?" " तुला माहितीये नं तिचा स्वभाव. तुझी आई आणि माझी आई सख्ख्या बहिणी.दोघींचे स्वभाव सारखेच. मी तिला ट्रेनमध्ये बसवून देतो.तू उतरवून घे." " ठीक आहे चालेल." महेंद्र नी फोन ठेऊन अर्पिताला हाक मारलं."अगं आज संध्याकाळपर्यंत मालूमावशी येईल.आत्ता अनंताचा फोन होता"


"स्वयंपाक तयार आहे का?जेवायला येऊ का?" "हो या."
महेंद्र जेऊन डबा घेऊन ऑफीसला जायला निघाला.निघतांना म्हणाला "मी ऑफीसमधून परस्पर रिपोर्ट घेऊन दवाखान्यात जाईन. मघाशी मी डाॅ.बरोबर बोललो. ते म्हणाले तुम्ही एकटेच या रिपोर्ट घेऊन.तिला नका आणू. त्यामुळे रिपोर्ट घेऊन मीच जाईन. मला घरी यायला वेळ लागेल. केतकी झोपली का?"
"हो तिचं मन रमवतच तिला खायला घातलं अर्धी वाटी शीरा खाल्ला आहे.थोड्यावेळानी पुन्हा विचारीन. आणि हो गाडी हळू चालवा. डोक्यात केतकी ची काळजी घेऊन गाडी चालवू नका." अर्पिता म्हणाली.

" तू नको म्हटलस तरी माझ्या डोक्यात विचार चालूच राहणार.एवढी मोठी मुलगी अचानक थकायला लागली तर तिचे बाबा म्हणून मन सैरभैर होणारच नं..तरी तू माझी काळजी करू नकोस.चल निघतो." " अहो मला कळतंय हे सगळं. काल केतकी म्हणत होती एकदम काय झालं असेल मला ? खूप मोठ्ठा आजार नसेल झाला नं? तिला तर मी समजावलं पण कुठेतरी माझं मन घाबरलय. आता रिपोर्ट आल्याशिवाय काहीच कळू शकत नाही" बोलता बोलताच अर्पिताच्या डोळ्यात पाणी आलं.महेंद्रनी तिच्या खांद्यावर हळूच थोपटलं आणि म्हणाला " घाबरू नको.तो वर बसलाय नं परमेश्वर तो आपल्याला खुप दु:खात टाकणार नाही." एवढं बोलुन महेंद्र जीना उतरून गाडीपाशी आला.डोक्यावर हेल्मेट चढवून गाडी स्टार्ट करून तो सोसायटीच्या फाटकातून बाहेर पडला.
--------------------------------------------------------------
क्रमशः पुढील भाग परवा वाचा.
लेखिका...मीनाक्षी वैद्य.
-------------------_---------------------------------------

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now