Oct 24, 2021
कथामालिका

एक चिमणी भाग १ला

Read Later
एक चिमणी भाग १ला

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

एक चिमणी

आकाश काळंभोर झालं होतं आणि गार वाराही सुटलेला होता.बघता बघता टपोरे पावसाचे थेंब अंगणात नृत्य करू लागले. साथीला ढगांचा मृदंगही वाजू लागला होता. पावसाचं नृत्य आणि ढगांचं मृदंग वादन केतकी भान हरपून बघत होती आणि ऐकत होती. केतकी खिडकीजवळ असलेल्या पलंगावर बसून हे मनोहारी दृष्य आसुसलेल्या नजरेनी बघत होती थंडगार वा-याच्या झुळकीनं तिच्या अंगावर शहारा आला.

ते थंड वारं तिला सहन होत नव्हतं.तरी ती खिडकी बंद करायला उठली नाही. पुर्वी अश्या पावसात केतकी खूप भिजायची ती आणि तिचा लहान भाऊ रोहन पाण्यात खूप दंगामस्ती करायचे. केतकीनं मागे वळून बघीतले. दुस-या पलंगावर तिच्या मावशी आजींना गाढ झोप लागली होती. म्हणून इतक्यावेळ त्या आल्या नाहीत खिडकी बंद करायला. मावशी आजी खुप आवडायची केतकीला आणि रोहनला पण.

रोज रात्री जेवण झालं की मावशी आजी आधी मुलांचा गृहपाठ झाला की नाही ते विचारायच्या.मग त्यांच्या धमाल गोष्टींचा तास सुरू व्हायचा. आजी अभीनय करून गोष्ट सांगायची. आजी सत्तर वर्षांची असली तरी वाघोबा,मनी माऊ सारखी रांगत, वाघोबाची डरकाळी फोडत गोष्ट सांगायची. केतकी आणि रोहन तिचे खास प्रेक्षक असायचे.अर्पिता आणि महेन्द्र म्हणजे केतकीचे आई-बाबा काम करता करता या नाटुकल्यांचा आनंद घ्यायचे.

अर्पिता आणि महेन्द्रला मावशींचा फार आधार वाटायचा. मावशींना तीन मुलं आणि दोन मुली होत्या.दोन दोन महिने महिने प्रत्येकाकडे राहायच्या.नव-याची पेन्शन होती.त्यांचा खर्च फार नव्हता. हल्ली सगळी कडे सराईतासारखा वावरणारा मधूमेह आणि उच्च रक्तदाब दोघांनाही मावशींनी आपल्या शरीरात येऊ दिलं नाही. जिथे असतील तिथे नेमानी व्यायाम करणं, फिरणं, घरातही हवी ती मदत करणं यामुळे त्यांचं स्वास्थ्य उत्तम होतं वाचनही भरपूर होतं.रोजचा पेपर पूर्ण वाचायच्या.


बाजूच्या खोलीत अर्पिता कपड्यांच्या घड्या करीत होती त्याच वेळी तिच्या लक्षात आलं की बाहेर खूप वारं सुटलेला आहे आणि पाऊसही येतो आहे ती केतकीच्या खोलीत गेली खोलीत थंडगार वारं येत होतं पण केतकी काहीतरी गुणगुणत होती. तिची एक छान लय लागलेली होती तिच्या तोंडून कवितेच्या ओळी बाहेर पडत होत्या.हे बघून अर्पिताला खूप आनंद झाला. तिच्या जवळ जाऊन अर्पिता म्हणाली" चिमणे आज किती छान बोलतेस तू "यावर केतकी म्हणाली "हो ना. आई आज खूप दिवसांनी काहीतरी सुचलं बघ. आई तु माझी वही आणि पेन आणतेस?" " हो आणते नं." अर्पिता वहीपेन घ्यायला गेली आणि उत्साहात महेंद्रला फोन लावला.

" अगं अर्पिता तू यावेळी कसा काय फोन केलास केतकी ठीक आहे ना?"अर्पिता या वर बोलली "हो ठीक आहे आज पावसाळ्याच्या दिवसात तिला छान कविता सुचली ती गुणगुणते म्हणून मी तुला फोन केला तर ठेवते मी फोन असं म्हणून त्यांनी फोन ठेवला आणि वही घेऊन ती केतकीच्या जवळ आली केतकी कविता गुणगुणत होती आणि अर्पिता लिहून घेत होती.

\"थेंब टपोरे ग अंगणात आले
डोळ्याचे भान ग घेऊनी गेले.
काळ्याकाळ्या नभाची सोडुनिया साथ
आवेगानी दयेच्या कवेत शिरले.
पावसाची ओटी धरेनी घेतली.
तृषार्त होती आता तृप्त झाली.
थेंब टपोरे अंगणात आले.
डोळ्याचे भान घेऊनी गेले.\"
तिच्या तोंडून या कवितेच्या ओळी ऐकताच कावेरीच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले.

केतकी ला पाऊस लहानपणापासून आवडायचा लहानपणी पावसात मनमुराद नाचणारी केतकी गेले दोन महिने घरात अडकून  पडल्यासारखी झाली आहे अर्पिता भानावर आली घाईघाईने तिने खिडकी बंद केली केतकी नाराज झाली पण काहीच बोलली नाही तिला माहिती होतं की आईने खिडकी का बंद केली टॉवेल अलगद तिचे अंग पुसले "बाळा थरथरते आहेस ग केवढं गार गार वारा अंगावर घेतलं" " हां" केतकी नं फक्त हुंकार भरला "चल जरा पडतेस का दमली असशील." अर्पिता ने विचारले " नाही ग आई आज उलट खूप आनंद झालाय मला पावसाचं नृत्य बघून आई तुला कशी वाटली माझी कविता?" केतकीनं विचारलं." खूप छान. खूप दिवसांनी शब्दांचा नाद तुझ्या मनात गुंजला ." "हो ना आई मला वाटतं…" " काय वाटतं ग?"

"जाऊ दे काही नाही."केतकीच्या चेहरा थोडा रडवेला दिसला. अर्पिताला केतकीचं दु:ख कळत होतं. दीड महीना झाला या गोष्टीला घडून तेव्हापासून केतकीचं शाळेत जाणं बंद झालं होतं. तिच्या मैत्रीणी दर रविवारी केतकी बरोबर अभ्यासाला येत. आठवड्याभराचा गृहपाठ चौघी मिळून करत.केतकीला अजिबात तिच्या आजाराची आठवण होऊ देत नसत. गणित, विज्ञान आणि मराठी हे तीन विषय केतकी चे खूप आवडते होते. मैत्रीणींना ती त्या तीन विषयातील अडचणी सोप्या भाषेत समजाऊन सांगत असे.

मैत्रीणींच्या आईशी अर्पिता बोलली होती. दर रवीवारी मुलींना आमच्याकडे पाठवाल का असं विचारलं होतं. सगळ्या हो म्हणाल्या कारण केतकी आणि त्या मैत्रीणी पहिलीपासून एकाच वर्गात होत्या. केतकी खूप हुशार आहे आणि आजारामुळे ती शाळेत जाऊ शकत नाही हे त्यांना माहिती होतं. केतकी पूर्वी केवढी दंगामस्ती करायची रोहनशी. आता सगळंच बंद झालं. अर्पिता नी एक दीर्घ उसासा सोडला.

केतकीचं आईकडे लक्ष गेलं. "आई काय झालं?" अर्पिता केतकी जवळ आली आणि म्हणाली "काही नाही झालं काग?" " मग तू डोळे का पुसते आहेस?" अर्पिता फक्त हसली. "आई माझ्यामुळे तुला नि बाबांना त्रास होतो हे कळतं मला.बाबांना दोन ठिकाणी काम करावं लागतं.. बाबा आजकाल मनमोकळेपणानी मला भेटतच नाही ग. खूप विचारात असतात." केतकी रडू लागली तशी अर्पिता नी पटकन तिला पोटाशी घेतलं."रडू नको बाळा.तुझ्या तब्येतीमुळे ते विचारात असतात.नंतर ऑफीसला जाता येताना किती ट्रॅफिक लागतो त्याने पण थकतात.पण याचा खूप विचार तू नाही करायचा. तब्येतीवर आणखी परीणाम होईल. आम्ही दोघं आहोतन."हळूच तिच्या डोक्यावर थोपटत अर्पिता बोलली.

केतकीला जरी ती असं म्हणाली तरी तिला आणि महेन्द्र ला एवढा पैसा आणायचा कुठून हा प्रश्न होता. .केतकीच्या उपचार म्हणजे तिचा आहार होता त्यात जे काही एरवी घरात नसणा-या गोष्टी होत्या त्या घ्यायला  खर्च यायचा.दोन ठिकाणी कामं करूनही सगळा खर्च जाऊन हातात जेमतेम पैसे ऊरायचे. दीड महिन्यांपूर्वी हसणारी,दंगामस्ती करणारी केतकी आज घरात कोंडल्यासारखी झाली आहे.तरी ती थोडीशी मस्ती,बैठे खेळ रोहनशी खेळायची. आपल्या आजाराचं दडपण तिनी रोहनला कधी येऊ दिलं नाही.रोहन केतकी पेक्षा तीन वर्षांनी लहान आहे. तोही तसा समजूतदार आहे. त्याचं लहानपणा पासूनच केतकी शिवाय पान हलायचं नाही.

अर्पिताचं मन दोन महिने मागे गेलं.तिला तो दिवस आठवला.त्यादिवशी शाळेतून आल्यावर केतकी नी दप्तर फेकून समोरच्या खोलीतल्या दिवाणावर स्वतःला झोकून दिलं.त्या आवाजांनी अर्पिता बाहेर आली. तिला पलंगावर केतकी अस्ताव्यस्त पडलेली दिसली.तिनी शाळेचा गणवेश काढला नव्हता, पायातले बूट काढले नव्हते. अर्पिता जवळजवळ ओरडलीच."केतकी हे काय बूट गणवेश काही न काढता का अशी झोपलीस ऊठ चल.कपडे बदल हातपाय धू मग झोप.तशी ही झोपेची वेळ नाहीच मुळी."


"आई प्लीज मला झोपू दे.खूप थकवा आला आहे.ताकद नाहीत अंगात."केतकीचा केवीलवाणा चेहरा बघून अर्पिताला वाईट वाटलं आपण आवाज चढवल्यामुळे.तिनी हळूच तिच्या पायातील बुट काढले.आणि तिच्याजवळ बसली.अंगात ताप आहे का बघीतले.ताप नव्हता. "ताप नाही बाळ तुला मग थकवा कशांनी आला?" " माहित नाही.शाळेतच खूप थकवा वाटत होता.येतांना बसमध्ये प्रणालीच्या मदतीनी चढले." "काय ? तुला बसमध्ये स्वतःहून चढता नाही आलं?" " नाही." बरं झोप थोड्यावेळ बरं वाटेल.ऊद्याही असंच वाटलं तर जाऊ डाॅ.कडे.अर्पिता हे बोलतच होती तेवढ्यात केतकी झोपलीसुद्धा. अर्पिताला तिच्या थकव्याचं आश्चर्य वाटलं. त्याच्या मागचं कारण तिला कळलं नाही.आज महेंद्र घरी आला की सांगायचं ठरवलं.


रोहन खेळून आला आणि त्याची ताई गणवेश न बदलताच झोपलेली दिसली. त्याला आश्चर्य वाटलं. त्यानी एकदा तिला हाका मारली. त्याचा आवाज ऐकून अर्पिता बाहेर आली. "शू...रोहन ताईला झोपू दे.तिला बरं वाटतं नाही.तू चल आत हातपाय धू. खेळून आलास माती लागलीय कपड्यांना कपडे बदल हातपाय धूवून स्वयंपाकघरात ते." रोहन नी आज्ञाधारकपणे मान हलवली.एरवी हातपाय धुताना त्याची गाण्यांची विविधभारती चालू असायची. मोठमोठ्यानी गाणी म्हणायचा त्या तालात हातपाय धुणं चालायचं. पण ताईला बरं नाही तर रोहन नी अजीबात गाणी म्हटली नाही. भरभर हातपाय धूवून तो स्वयंपाकघरात टेबलाजवळ येऊन बसला. आज अर्पिता नी भेळ केली होती.भेळ बघून रोहनचे डोळे चमकले. "ऐ…" अगदी हळू आवाजात म्हणून त्यानी आपला आनंद व्यक्त केला.

रात्री महेंद्र घरी आला.रोजच त्याला घरी येईपर्यंत दहा वाजायचे. आल्यावर त्याचा चेहरा थकून गेलेला असायचा. दिवसभर त्याला खूप दगदग व्हायची. त्यात ट्रॅफीक लागला मग काही विचारू नका. मिरवणुका,मोर्चे लग्नाच्या वराती .या लोकांची हौस होते पण इतर लोकं वैतागतात ट्रॅफीक जाम होतो त्यामुळे.आज घरी आला तर त्याला केतकी गणवेशासह बाहेरच्या खोलीतल्या दिवाणावर झोपलेली दिसली. त्यानी खुणेनीच अर्पिताला विचारलं काय झालं. "केतकीला थकवा वाटतोय म्हणून झोपली आहे" असं अर्पिता नी सांगीतलं.

महेंद्रलाही आश्चर्य वाटलं.त्याने जवळ जाऊन ताप आहे का बघीतले.."ताप तर नाही.मग थकवा अशांनी आला?" "तेच कळलं नाही मला.शाळेतून आल्यावर खाल्लसुद्धा नाही."
"एक काम कर.ऊद्या तिला शाळेत पाठवू नाही.ऊद्या आराम करू दे.परवा जाऊ दे शाळेत.परवापण शाळेतून आल्यावर आजच्या सारखा थकवा आला तर डाॅ.कडे घेऊन जाऊ."

"काही खाल्लपण नाही." अर्पिता म्हणाली. " आता झोपमोड नको करू तिची. तिला इथेच झोपू दे. मी इथे सोफ्यावर झोपीन. रात्री उठलीच तर लक्ष राहील." महेंद्र म्हणाला." नको सोफ्यावर अवघडून झोपू नका.आज इथे अवघडून झोपाल आणि उद्या ऑफीसमध्ये काम सुचणार नाही. मी झोपते इथे. तुम्ही आत झोपा. तुम्ही फ्रेश होऊन या मी अन्न गरम करते." एवढं बोलून अर्पिता स्वयंपाकघरात गेली.आणि महेंद्र फ्रेश व्हायला गेला.

काल न जेवताचा केतकी झोपली.त्यामुळे बराच वेळ बाहेर सोफ्यावर अर्पिता जागी होती आणि आतल्या खोलीत महेंद्रही जागा होता..दोघही थकले होते पण झोप त्यांच्या डोळ्यात शिरायला तयार नव्हती.असं एकदम काय झालं असेल याचाच दोघं विचार करत होते.ताप नाही तरी थकवा कसा आला हे कोडं त्यांना उलगडत नव्हतं. मधून मधून कितीदा अर्पिता नी केतकी कडे येऊन बघीतले.तिच्या चेह-यावरुन अलगद हात फिरवला तरी तिला जाग आली नाही.हे बघून अर्पिताला रडू आलं हुंदका दाबून धरत ती सोफ्यावर येऊन बसली.

महेंद्र पण दोन तीनदा उठून बाहेर आला होता. थोडावेळ अर्पिताजवळ बसला. म्हणाला "अगं घाबरू नकोस ऊद्या पण तिची हीच अवस्था राहिली तर डाॅ.कडे लगेच जाऊ." "अहो अशी अवस्था तिची कधी नव्हती झाली.सर्दीपडसं झालं की थोडाफार ताप यायचा तेव्हा जेवायची नाही.पण आजच हे वेगळंच वाटतंय.सर्दी नाही ताप नाही तरी थकवा कसा? इतका थकवा की तिला जेवावसंही वाटलं नाही." नको विचार करू फार झोप."एवढं बोलून महेंद्र आत गेला. शेवटी केव्हातरी दोघांनाही झोप लागली.


सकाळी अर्पिता दचकून जागी झाली.घाईनी उठून केतकी पाशी आली.हळूच तिला हरवलं हाक मारली,"केतकी बाळा कसं वाटतंय?" केतकी नी नाईलाजानी डोळे उघडले आणि म्हणाली."आई थकल्यासारखे वाटतंय." तिचा केविलवाणा चेहरा बघून अर्पिताला मनातून भडभडून आलं. अर्पिता तिच्याशेजारी बसली आणि चेह-यावरून हात फिरवू लागली.
तेवढ्यात महेंद्र उठून बाहेर आला. "काय आमची राणी कशी आहे?" " छान नाही वाटत." "थकवा वाटतोय अजून?" " हो." " ठीक आपण सकाळीच डाॅ.कडे जाऊ." "बाबा तुमचं ऑफीस आहे नं" " अगं मी रजा घेतो आज." हसत म्हणाला.

"दहा वाजले की फोन करून नंबर लावतो आणि त्या रिसेप्शनीस्टला विचारतो किती वेळानी येऊ.तसं जाऊ.तू तोंड धूवून थोडं खाऊन घे बेटा." केतकी नी मान डोलावली. अर्पितानी तिला अलगद उचलून उभं केलं.हळुहळू चालवत बेसीन पर्यंत नेले.तिची हालत बघून महेन्द्र नी पटकन खुर्ची आणली."यावर बसून तोंड धू केतकी.फार वेळ उभी नको राहु थकवा आहे नं." केतकी खुर्चीवर बसली.


"अर्पिता आपला चवथा नंबर आहे.अर्ध्या तासांनी या म्हणाली.मी ऑफीसमध्ये सांगीतलं आहे आज येणार नाही म्हणून." महेंद्र म्हणाला." हो माझं झालंच आहे.रोहनलापण आज शाळेत नाही पाठवलं." "का?" महेंद्रला आता कळलं की रोहन इतका आरामात का आहे. "अहो आपल्याला उशीर झाला तर तो कुठे थांबेल.एकटा घरी नको. आजकाल दिवस फार वाईट आलेत.आणि केतकीला दवाखान्यात नेल्यावर त्यालाही चैन पडणार नाही.त्यापेक्षा बरोबरच घेऊन जाऊ." "ठीक आहे त्यालाही घेऊन जाऊ.मी संतोष रिक्षेवाल्याला फोन केलाय येईल दहा मिनीटात.सगळी तयारी झाली नं.""हो सगळं घेतलंय." "केतकी साठी पाण्याची बाटली घेतलीस?" " हो. " " अरे आला बघ रिक्षा.चला." सगळे घराच्या बाहेर पडले. अर्पितानी केतकीला धरुन नेलं रिक्षापर्यंत.महेंद्र घराला कुलूप लावुन आला तोवर तिघं रिक्षात बसले होते.

रिक्षा दवाखान्याकडे निघाली.

क्रमशः: पुढचा भाग परवा वाचा.

लेखिका… मीनाक्षी वैद्य.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now