एक भाऊबीज

Animal Also Expresses Their Love

कथेचे शिर्षक: एक भाऊबीज

विषय: दीपावली-उत्सव नात्यांचा

स्पर्धा: गोष्ट छोटी डोंगराएवढी


बस माहेरच्या वाटेला लागल्यावर किर्तीच्या डोळयात अश्रूंची गर्दी व्हायला सुरुवात झाली. आजवर लग्न झाल्यापासून अनेक रक्षाबंधन, भाऊबीज होऊन गेले होते, तेव्हा किर्तीचा भाऊ तिला सासरी घ्यायला जायचा. किर्ती कधीच एकटी माहेरी गेली नव्हती, पण यावेळी तिचा भाऊ तिला न्यायला आला नव्हता. किर्तीच्या डोळ्यातील अश्रू बघून तिच्या शेजारी बसलेल्या काकू म्हणाल्या,

"तू रडते का आहेस? तुला काही त्रास होतोय का?"


यावर डोळ्यातील अश्रू पुसून किर्ती म्हणाली,

"काकू सहा महिन्यांपूर्वी माझा एकुलता एक भाऊ अपघातात हे जग सोडून गेला. माझं लग्न करताना आई एवढ्या लांब मुलगी द्यायला नको म्हणत होती. भावाने माझी पूर्णपणे जबाबदारी त्याच्या खांद्यावर घेतली होती. तो महिन्यातून एकदा मला भेटण्यासाठी माझ्या घरी यायचा. घरातून सकाळी साडेपाचला निघायचा, दोन बस बदलून दहा वाजेपर्यंत माझ्या घरी पोहोचायचा. जेवण करुन, माझी विचारपूस करुन दुपारी अडीच वाजताच्या बसने परतीचा प्रवास सुरु करायचा. आपली बहीण सुखात आहे की नाही? एवढंच बघायला तो यायचा. 


सहा महिन्यांपासून माझ्या घरी माहेरचं कोणीच आलं नाही. मी सगळ्यात लांब असल्याने कोणी येत नाही. आज मला माहेरी जाण्याची अजिबात इच्छा होत नव्हती, पण काल रात्री दादा स्वप्नात येऊन म्हणाला की, "मी नसलो म्हणून काय झालं? सगळं तसचं आहे. तुझं माहेर तुटू देऊ नको. माझ्या मुलांची तू आवडती आत्या आहेस. तू दरवर्षी भाऊबीजेला घरी जात जा, तरचं माझ्या आत्म्याला शांती लाभेल."


मुलांना घरी ठेऊन मी एकटी निघाले आहे. भावशिवाय भाऊबीज कशी साजरी करु हेच कळत नाहीये. भावाच्या आठवणीने नकळत डोळयात पाणी येत आहे. घरी जाऊन मी कोणाला ओवाळू. माझी आई अजून धक्क्यातून सावरली नाहीये. मी डोळ्यातील पाणी थांबवू शकत नाहीये."


काकू पुढे म्हणाल्या,

"मुली रडू नकोस. भावाबहिणीचं नातंच असं असतं. तुझ्या मनातील भावना मी समजू शकते, पण त्या वरच्याच्या निर्णयापुढे आपण काही करु शकत नाही. तुझ्या डोळ्यातील पाणी बघून तुझ्या आईला अजून वाईट वाटेल."


किर्तीचा स्टॉप आल्यावर ती उतरुन गेली. घराकडे बघून तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले. भावशिवाय घर वेगळंच दिसत होतं. किर्तीने मन घट्ट करुन घरात प्रवेश केला. किर्तीचे माहेरचे घर दुमजली होते. वरच्या मजल्यावर तिच्या भावाने पाळलेला कुत्रा त्याचे नाव मोती होता. किर्तीला बघितल्या बघितल्या मोती धावत खाली आला. 


किर्ती तोपर्यंत आईच्या कुशीत जाऊन रडत होती. किर्तीचे वडील दोघींना समजावत होते. मोती डायरेक्ट किर्तीजवळ गेला, तिच्या मांडीवर आपलं डोकं ठेवलं आणि त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले होते. जेवढी किर्ती तिच्या भावाला मिस करत होती, त्यापेक्षा जास्त मोती त्याच्या मालकाला मिस करत होता.


किर्तीचा भाऊ वारल्यावर मोती तीन ते चार दिवस जेवला नव्हता. किर्ती व मोती एकमेकांच्या गळ्यात पडून खूप रडले. मुक्या प्राण्याला सुद्धा भावना असतात, हे यावरुन निर्देशीत होते.


सगळ्यांनी समजावल्यावर किर्ती व मोती दोघेही रडायचे थांबले. फ्रेश झाल्यावर किर्तीने तिच्या भावाच्या फोटोला ओवाळले, तसेच तिच्या भाच्याला तिने ओवाळले. किर्तीच्या हातातील पूजेचे ताट बघून मोती तिच्याजवळ येऊन उभा राहिला. मोती तिला सांगू पाहत होता की, मलाही ओवाळ. मी तुझा भाऊचं आहे.


किर्तीला मोतीचं म्हणणं समजल्यावर तिने त्याला ओवाळले. मोतीच्या डोळ्यात जमा झालेले अश्रू सगळं काही सांगून गेले होते.


किर्ती दर भाऊबीज व रक्षाबंधनाला मोतीला ओवाळू लागली. किर्तीला मोतीच्या रुपात भाऊ मिळाला होता. मोतीला किर्ती व तिच्या भावामधील बॉण्ड माहीत होता, तसेच तिला भावाची उणीव जाणवू नये, म्हणून तो तिच्याकडून हक्काने ओवाळून घ्यायचा.


समाप्त


©®Dr Supriya Dighe