एक बेट मंतरलेलं (भाग -९) #मराठी_कादंबरी

Horror island story. Horror Marathi kadambari. Story of college friends.

एक बेट मंतरलेलं (भाग -९) 

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
*****************************
दोघं परत जाण्यासाठी फक्त पाठीमागे वळले होते आणि नम्रता एकदम घाबरली होती.

"ती बाहुली बघ प्रवीण! मी तुला सांगितलं होतं ना ती आपला पाठलाग करतेय... बघ... ती तिकडे लांब कुठेतरी पडली होती आणि कॅम्प पर्यंत कशी आली?" नम्रता त्याचा हात घट्ट धरून त्या बाहुली कडे बोट दाखवून म्हणाली. 

"ऐक..  ऐक... तू आधी शांत हो... बस इथे.." तो तिला खांद्याला धरून तिथल्या ओंडक्यावर बसवत म्हणाला. 

तिला तिथे बसवून त्याने पाण्याची बाटली बाहेर काढली आणि तिला पाणी दिलं. थोडावेळ असाच गेला. 

"आता बरं वाटतंय का?" त्याने विचारलं. 

"हो... पण, अरे ती बाहुली..." नम्रता बोलत होती. तिला मध्येच तोडत तो बोलू लागला; "बघ एकदा तिकडे.. कुठे आहे बाहुली? तिथे काहीच नाहीये..." 

नम्रता ने सगळीकडे नजर फिरवली. तिला मगाशी ज्या झाडाच्या बाजूला बाहुली दिसली होती तिथे आता काहीच नव्हतं! तिचं डोकं आता भणभत होतं. 

"मला तुझ्याशी बोलायचं आहे. अरे मला हे अमन दादा आणि श्वेता ताई काही बरे वाटत नाहीयेत. म्हणजे आपल्याला ते दोघं भेटल्या पासून असं मला वाटतंय... आई ला सुद्धा तेच वाटलं होतं म्हणून तर तेव्हा तिने लगेच परवानगी दिली नव्हती. एवढंच नाही तर काल रात्री सुद्धा ते दोघं काहीतरी बोलत होते.... या मुलांना अजून दोन दिवस सांभाळलं पाहिजे! ही मुलं धीट आहेत म्हणून आपण त्यांना त्या कामासाठी निवडलं आहे असं काहीतरी बोलत होते रे ते.... मला यात काहीतरी गडबड वाटतेय. असं त्यांचं काय काम आहे हे सुद्धा आपल्याला अजून माहीत नाहीये. आपल्याला सावध राहावं लागणार आहे." नम्रता ने काळजीने त्याला सगळं काही सांगितलं. 

तिचं बोलणं ऐकून तो सुद्धा तिच्या बाजूला बसला. नम्रता एवढं सांगतेय त्यात तिने काल अमन आणि श्वेता च बोलणं ऐकलं आहे असं म्हणतेय म्हणजे आता सावध राहायला लागणार हे प्रवीण ला समजत होतं. 

"नमु! बघ... मला आहे तुझ्यावर विश्वास! आपण आजच छडा लावू या प्रकरणाचा! आत्ता पुन्हा सगळ्यांकडे जाऊ.. बराच वेळ झाला आहे आपल्याला इथे येऊन. चल..." तो ओंडक्यावरून उठत म्हणाला. 

"हो चल... आणि प्रवीण! प्लीज मी धागा बांधला आहे तो काढू नकोस हातातून... दुसरी गोष्ट त्या दोघांच्या कधीच डोळ्यात नको बघुस.. मला तर ते हिपनोटाईज करणारे वाटतायत.." नम्रता म्हणाली. 

"बरं..." तो हसत म्हणाला. 

दोघं आता पाणी आणि फळं घेऊन सगळे होते तिकडे निघाले. यावेळी जवळ जवळ पळतच ते तिकडे गेले. 

"काय रे किती वेळ लावला? आम्हाला काळजी वाटत होती..." श्वेता त्या दोघांना येताना पाहून म्हणाली. 

"हो ताई... ते पाणी भरताना सांडलं म्हणून पुन्हा भरून फिल्टर करत ठेवलं आणि आलो ना म्हणून उशीर झाला... सॉरी." प्रवीण म्हणाला. 

पण, मयुर ला सगळं माहीत असल्याने तो गालातल्या गालात हसत होता! सगळ्यांनी तिथे बसून खाऊन घेतलं. आणि थोडावेळ झाडाच्या सावलीत छान गवतावर सगळे पहुडले. 

"तुम्ही चौघे थांबा... आम्ही आलोच... मोबाईल ला नेटवर्क येतंय का बघतो... म्हणजे तुमच्या घरी एकदा खुशाली कळवली की त्यांना सुद्धा काही टेंशन नाही राहणार ना.." अमन म्हणाला. 

"ओके... नेटवर्क आलं तर आम्हाला पण बोलाव हा दादा!" समृध्दी म्हणाली. 

ते दोघं हो म्हणून तिथून निघून गेले. यात नम्रता ला सतत ते खोटं बोलून गेले आहेत असं वाटत होतं. ती त्याच विचारात बसली होती. तर मयुर प्रवीण ला त्याने नम्रता ला कसं प्रपोज केलं हे विचारून विचारून हैराण करत होता. हे दोघं तिथे गेले होते तेवढ्या वेळात त्याने समृध्दी ला सुद्धा याबद्दल सांगितलं होतं म्हणून ती सुद्धा त्याच्या मस्तीत सामील झाली होती. 

"मी आलेच पाच मिनिटांत." नम्रता म्हणाली आणि तिथून उठून जाऊ लागली. 

"ए... लाजली लाजली...." समृध्दी म्हणाली. 

पण, ती श्वेता आणि अमन चा पाठलाग करायला गेली होती. त्यांच्या न कळत व्यवस्थित अंतर ठेवून ती झाडाचा आडोशाने त्यांचा पाठलाग करत होती. ते दोघं त्या चांगल्या जागेपासून दूर चालले होते. इथे हिरवळ होती तर तिकडे पूर्ण सुकलेली झाडं आणि गवत! इथे आधी पेक्षा चांगल्या बाहुल्या होत्या तर तिकडे खूपच किळसवाण्या! अगदी नम्रता ला जेव्हा प्रवीण ने बाहुली दिली तेव्हा जसा भास झाला होता तश्या! ते सगळं दृश्य बघून नम्रताचे श्वास जलद झाले होते. तिच्या हृदयाची धडधड वाढली होती! पण, तरीही हिम्मत करून ती त्यांच्यावर लक्ष ठेवून होती. या ठिकाणी तर पडीक घरासारखं सुद्धा काहीतरी होतं. तिथे पोहोचताच श्वेता आणि अमन त्यांच्या खऱ्या रूपात आले होते. मोठी मोठी सडलेली काळी कुळकुळीत मध्येच तुटलेली नखं, शरीरावर जखमा आणि घोगरा कर्णकर्कश्श आवाज! नम्रता हे सगळं बघून बिथरली. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता हे असं काही असू शकेल. आपल्या सोबत असणारी ही दोघं खरी अशी  असतील असं वाटत सुद्धा नव्हतं. त्यांचं हे रूप बघून तिच्या तोंडून किंचाळी निघणार होती पण, दोन्ही हात तोंडावर दाबून तिने कसंबसं स्वतःला सावरलं होतं. 

"बोल... आता काय करायचं? परवा आमावस्या आहे. रात्री यांचा बळी द्यायचा आहे. उद्या यांना कैद करावं लागेल." श्वेता म्हणाली. 

"हो... हे बघ इथे सगळी तयारी करून ठेवली आहे. त्यांना उद्या आपण फिरायच्या बहाण्याने आणू आणि कैद करून ठेवू.... पण, एक लक्षात ठेव त्यांना उद्या सूर्यास्तानंतर इथे आणावं लागेल... आपली शक्ती तेव्हा वाढलेली असेल... त्यातूनही त्या नम्रता पासून सावध राहिलं पाहिजे... ती तर आपल्याकडे सतत संशयाने बघत असते... आपण तिला स्पर्श सुद्धा करू शकत नाहीये..." अमन थोडा रागाच्या सुरात म्हणाला. 

"तिला तर बघून घेऊ नंतर... तिचे सगळे बाकीचे मित्र अडकले की ती पण अडकेल... एकटी काय करणार ती आपलं? हा... हा.. हा.." श्वेता खूप मोठ्याने हसली. 

तिचं ते हास्य एवढं भयानक होतं की, नम्रता ची थोडी हालचाल झाली आणि कोणीतरी झाडामागे आहे हे त्या दोघांच्या लक्षात आलं. नम्रता ने पटकन स्वतःला सावरलं आणि तिथे तिथलीच एक बाहुली ठेवून ती दबक्या पावलांनी दुसरीकडे गेली. श्वेता आणि अमन तिथे नक्की कोण आहे हे बघायला आले... तर तिथे बाहुली त्यांना दिसली. पण, त्यांचा असाच थोडी विश्वास बसणार होता! अमन नी काहीतरी जादू केली आणि त्याच्या हातातून ती बाहुली खाली उडी मारून उभी राहिली. ती बाहुली सजीव झालेली पाहून नम्रता ने दबक्या पावलांनी तिथून पळ काढला! 

"नमु? अगं किती घाम आला आहे तुला.... घाबरलेली पण दिसतेय तू... काय झालं?" समृध्दी ने तिला घामाघूम झालेलं आणि पळत येताना पाहून विचारलं. 

"थांब! थांब! तू बस आधी इथे... आणि पाणी घे..." मयुर तिला तिथल्या दगडावर बसवत म्हणाला. 

तोवर प्रवीण ने तिच्यासाठी पाणी आणलं. तिने घटाघटा पाणी पिलं आणि बोलू लागली; "ते.. तिकडे...." 

तिचा आवाज कापत होता. ती खूपच घाबरलेली दिसत होती. प्रवीण ने नक्की काहीतरी मोठं घडलं आहे हे ओळखलं. 

"चला आपण कॅम्प वर जाऊ... तिकडे बोल नम्रता काय झालं ते... चला..." प्रवीण म्हणाला. 

"अरे पण असं अचानक गेलो तर श्वेता ताई आणि अमन दादा काळजीत पडतील ना..." समृध्दी म्हणाली. 

"येऊ थोड्यावेळात... चल लवकर..." तो म्हणाला. 

सगळे पुन्हा कॅम्प वर जाऊ लागले. नम्रता ने तर जवळ जवळ पळवत सगळ्यांना तिथे नेलं. 

"आपण अडकलो आहोत... अरे ती श्वेता ताई ताई नाहीये...  आणि अमन दादा पण दादा नाहीये...." ती बोलत होती. 

"म्हणजे? अगं नीट काहीतरी सांग ना..." मयुर म्हणाला. 

"मी... मी आत्ता त्या दोघांचा पाठलाग केला. अरे ते दोघं माणसंच नाहीयेत.... पिशाच्च आहेत ती...." नम्रता रडत रडत म्हणाली. 

"काय? नम्रता उगाच काहीही बोलू नकोस यार... तुला माहितेय आपण या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही ठेवत... काहीही काय मस्करी करतेय..." समृध्दी म्हणाली. 

"नाही समृध्दी... मी खरं सांगतेय... खरंच... मी त्यांना माझ्या डोळ्याने पाहिलं आणि त्यांचं बोलणं पण ऐकलं आहे... परवा आमावस्या आहे... आपला बळी देणार आहेत ते!" ती रडत रडत पोट तिडकिने सांगत होती. 

प्रवीण ने सुद्धा त्या सगळ्यांना नम्रता ने त्याला जे सांगितलं होतं ते सांगितलं. शेवटी आता सगळ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न होता म्हणून आता इथून पळून जायचं सगळ्यांनी ठरवलं. पण, त्यांचं हे बोलणं मागून येऊन त्या दोघांनी ऐकलं होतं. 

"आमचं सत्य तर तुम्हाला उद्या समजणार होतं पण, असो... आज समजलं आहे तर बरंच आहे... बघूया आता कोण वाचवतंय तुम्हाला..." श्वेता तिच्या मूळ रूपात येऊन म्हणाली.

तिचं हे रूप बघून सगळेच घाबरले. सगळे एकमेकांचा हात घट्ट धरून, एकमेकांना चिकटून डोळे गच्च मिटून उभे होते. या बेटावर  पॅरा नॉर्मल अॅटिविटी होत असतात ही अफवा आहे समजून आपण इथे आलो हेच आपलं चुकलं असं सगळ्यांना आता वाटत होतं. त्या दोघांच्या मूळ रूपात येताच आता त्या बेटावरच्या सगळ्या बाहुल्या त्यांच्या अवती भोवती जमल्या होत्या. त्या आता सजीव माणसा सारख्या चालत होत्या, बोलत होत्या! प्रवीण ने नम्रता ला दिलेली बाहुली सुद्धा त्यांच्यात आली होती. ती बाहुली पण नम्रता ने जेव्हा हातातून बॉक्स सोडलं होतं तेव्हा तिला जशी दिसली होती तशीच दिसत होती. 

"ही बाहुली? ही तर मी नम्रता ला दिलेली... अशी का दिसतेय? किती छान होती ही...." प्रवीण गोंधळून म्हणाला. 

त्याचं हे बोलणं ऐकून ते दोघं मोठमोठ्याने हसले. त्यांचं ते रूप बघून आपण पुरते यात अडकलो आहोत याची जाणीव सगळ्यांना होत होती. 

"हे आमचं सैन्य आहे... तुम्ही कितीही पळायचा प्रयत्न केला तरी आता तुमची सुटका नाही... हा... हा... हा...." अमन जोर जोरात हसून म्हणाला. 

"काय ग नम्रता! तुला तर जास्तच हौस आहे ना सगळ्यांच्या जीवाची? पहिला बळी तर तुझाच जाईल... बघच तू....." श्वेता तिच्याकडे एकदम रागात बघून म्हणाली. 

तिने प्रवीण नी नम्रता ला दिलेल्या बाहुलीला च खूण करून तिला स्वतः जवळ आणायला सांगितलं. त्या बाहुली ने सुद्धा नम्रता वर वार केला पण, तो वार उलटा पडला. हे बघून श्वेता अजूनच चवताळली. तिने बाकीच्यांवर हल्ला करण्याचा आदेश दिला पण सगळे वाचले. 

"ते धागे.... तेच यांचं रक्षण करतायत... आ...." श्वेता लालबुंद होऊन रागात ओरडली. 

"असुदे... असुदे... आज वाचतील.. पण, उद्या? उद्या संध्याकाळ पासून आपली शक्ती वाढायला सुरुवात झाली की मग आपल्याला ते धागे नाही अडवू शकणार.... हा... हा... हा..." अमन म्हणाला. 

त्याचं बोलणं ऐकून श्वेता पण त्याच्या भयानक हास्यात सामील झाली आणि ते दोघं बाहुल्यांना त्यांच्यावर नजर ठेवायला सांगून निघून गेले. 

"आता काय करायचं? कसं जाणार आपण घरी?" मयुर म्हणाला. 

"निघेल काहीतरी मार्ग... आपल्या हातात फक्त उद्याचा दिवस आहे... त्याआधी या बाहुल्यांचा काहीतरी सोक्षमोक्ष लावला पाहिजे..." नम्रता काहीतरी विचार करून हळू आवाजात म्हणाली. 

क्रमशः....
*****************************
सगळ्यांसमोर आता अमन, श्वेता च खरं रूप आलं आहे. पण, हे जे संकट त्यांच्यासमोर आलं आहे त्यांचा सामना हे चौघे कसे करतील? सगळे सुखरूप घरी जाऊ शकतील का? आणि समजा गेलेच तरी हे अमन, श्वेता त्यांच्या मागावर पुन्हा त्यांच्या घरी गेले तर? आता पुढे नक्की काय होईल पाहूया पुढच्या भागात. 

🎭 Series Post

View all