Login

एक बेट मंतरलेलं (भाग -८) #मराठी_कादंबरी

Horror island story. Horror Marathi kadambari. Story of college friends. Marathi kadambari.

एक बेट मंतरलेलं (भाग -८) 

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
*****************************
सगळे आता फोटो शूट करून आणि खेळून दमले होते. आता काहीतरी बैठे खेळ खेळावे म्हणून तिथल्याच गवतात गोल करून ते पासिंग द पास खेळत बसले होते. कोणालाच आता त्या बाहुल्यांची भीती वाटत नव्हती. त्यातलीच एक बाहुली घेऊन त्यांचा खेळ सुरू होता. श्वेता गाणं सुरू करायला आणि पॉज करायला त्यांच्याकडे पाठ करून बसली होती तर अमन जो कोणी आऊट होईल त्याला शिक्षा करण्यासाठी तिथल्या एका दगडावर बसला होता. 

"तेरा यार हूँ मै.... जाते नही कही रिश्ते पुराने, किसी नये के आ जाने से...." बॅकग्राऊंड ला गाणं वाजत होतं आणि हे चौघ एकमेकांकडे बाहुली पास करत होते.... समृद्धीच्या हातात बाहुली आली आणि गाणं वाजयचं थांबलं. 

"ये..... समृध्दी आऊट!" अमन मोठ्याने बोलला. 

ती पण लहान मुलीसारखं मुद्दाम गाल फुगवून; "शी रे! एवढ्या लगेच मी आऊट..." असं म्हणाली. 

तिचं हे रूप खूप निरागस आणि गोड दिसत होतं! हे बघून सगळे हसले. आता नम्रता सुद्धा नॉर्मल झाली होती. सगळ्यांच्या हातात जेव्हापासून तिने धागे बांधले होते तेव्हा पासून जरा टेंशन कमी झाल्यामुळे ती सुद्धा छान मजा करत होती. तिने समृद्धीच्या न कळत तिचा त्या अवतरतला फोटो काढला...

"ओ ग... आमची समू आऊट झाली? हे बघ आधी.." नम्रता तिचे गोबरे गोबरे गाल ओढत तिला तिचा गाल फुगवलेला फोटो दाखवत म्हणाली. 

"अरे यार हे काय नमु?... पण, खूप भारी आलाय फोटो.. " ती नाटकं करत म्हणाली. 

तिचं हे असं दिलखुलास आणि निरागस बोलणं ऐकून सगळ्यांनी एकमेकांना टाळ्या दिल्या! 

"बरं.... आता समृध्दी! तुझी शिक्षा... तुझी शिक्षा ही असेल की, तू प्रवीण ची नक्कल करायची." अमन म्हणाला. 

सगळे आता एकदा समृध्दी कडे तर एकदा प्रवीण कडे बघत होते. प्रवीण ने तर डोक्याला हात लावून घेतला होता! कारण, त्याला माहित होतं समृध्दी नक्कल करणार म्हणजे त्यात नौटंकी जास्त! समृध्दी "हो चालेल चालेल" करत उभी राहिली. तिने त्याचाच चष्मा काढून घेतला! तो डोळ्यावर लावला आणि आता ती त्याची नक्कल करायला सज्ज झाली. 

"वा... काय मस्त अक्षर आहे ग तुझं नम्रता! तुम्ही सगळे.... जरा शिका हीच्याकडून... आणि समृध्दी तू.... हे काय आहे सगळं? अगं मी तुला कोणते पॉइंट्स दिले होते प्रोजेक्ट साठी? तू हे काय केलं आहेस? आणि मयुर महाशय तुम्ही! जरा काहीतरी सिरियसली घ्या! सगळीकडे नुसती मजा आणि जोक हवेत...." तिने अगदी त्याच्याच टोन मध्ये जरा ओव्हर अॅक्टींग करून त्याची नक्कल केली. 

समृद्धीची ही नक्कल बघून त्यांना कॉलेज चे हे शेवटच्या सेमीस्टर चे दिवस आठवले. प्रवीण सगळ्यांसाठीच झटला होता. त्याच्यामुळेच सगळ्यांना सगळे पेपर छान गेले होते आणि सगळ्यात मस्त प्रोजेक्ट या चौघांचे च होते! 

"हो का समृध्दी? मी काय बॉसिंग करायचो का तुमच्या तिघांवर?" प्रवीण ने गमतीने विचारलं. 

"ए... नाही ग समु... बरोबर केलीस नक्कल.." नम्रता म्हणाली. 

तिच्या अक्टिंग वर सगळे खुश झाले आणि पुन्हा खेळाला सुरुवात झाली. 

"ये दोस्ती हम नही छोडेंगे.... तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे...." गाणं वाजत होतं. 

आता नम्रता, प्रवीण आणि मयुर मध्येच बाहुली पास होत होती... थोड्याच वेळात गाणं थांबलं आणि प्रवीण च्या हातात बाहुली होती. 

"तर आता प्रवीण ला काय शिक्षा द्यावी बरं?" अमन विचार करत होता. 

"ए दादा... मी सांगू?" मयुर म्हणाला आणि त्याच्या कानात जाऊन काहीतरी सांगितलं. 

"प्रवीण! तुझी शिक्षा ही असेल की, तू आपल्या कॅम्प वर जाऊन तिथून फळं आणि पाण्याची बाटली घेऊन ये.... पण, पण.... तू एकटा नाही जाणार तर आत्ता मयुर आणि नम्रता मधलं जे कोणी आऊट होईल ते येईल..." अमन म्हणाला. 

अमन च हे बोलणं ऐकून मयुर ने त्याला आता नम्रता सोबत बोलण्याची संधी मिळवून दिली आहे हे लक्षात आलं. पण, सगळा खेळ आता नशिबाचा होता नम्रता आऊट होणं गरजेचं होतं! तो तिथे नम्रता आऊट होऊदे म्हणून मनोमन विचार करत बसला. पुन्हा खेळ सुरू झाला.... 

"हम तो उड गये...." गाणं वाजू लागलं.

मयुर पूर्ण काळजी घेत होता नम्रता कशी आऊट होईल यावर! म्हणून तो ती बाहुली स्वतः कडून पटकन नम्रता कडे देत होता आणि तिच्या कडून घेताना मात्र हळू हळू... यामुळे नम्रता आऊट झाली! 

"ये..... नम्रता आऊट...." प्रवीण उत्साहाच्या भरात उड्या मारत म्हणाला. 

नम्रता आणि बाकी सगळ्यांनीच त्याच्याकडे पाहिलं! त्याने जीभ बाहेर काढली आणि पुन्हा नीट उभा राहिला. मयुर मात्र गालातल्या गालात हसत होता! 

"थँक्यू यार दादा... या प्रवीण ला तू कॅम्प वरून फळं आणि पाण्याच्या बाटल्या आणायला सांगितलं. आपण इथे घेऊन आलेलो सगळं संपतच आलंय..." समृध्दी म्हणाली. 

प्रवीण ने फक्त मयुर कडे बघितलं आणि डोळ्यांनीच त्याला थँक्यू म्हणाला! 

"Thanks to मयुर! त्यानेच ही आयडिया दिली. बरं नम्रता, प्रवीण जा लवकर घेऊन या.. आत्ता दुपारचा १ वाजला आहे... तुम्हाला यायला १:२० तरी होतील.... आपण इथून संध्याकाळी सूर्यास्त बघून मग कॅम्प वर जाणार आहोत... तर त्या हिशोबाने सगळं घेऊन या.." अमन म्हणाला. 

"ओके दादा! पण, संध्याकाळी अंधार होईल तर आपल्याला परत जाताना काही प्रॉब्लेम नाही होणार ना? म्हणजे रस्ता जरी पाच मिनिटांचा असला तरी रात्री सगळे रस्ते सारखे वाटतात म्हणून..." प्रवीण ने विचारलं. 

"अरे नाही... आपल्याकडे नकाशा आहे आणि झाडांवर खुणा सुद्धा केलेल्या आहेत त्यांच्या मदतीने पोहोचू आपण..." श्वेता म्हणाली. 

नम्रता आणि प्रवीण कॅम्प कडे जायला निघाले. थोडावेळ कोणी काहीच बोललं नाही. नम्रता, प्रवीण शी काय आणि कुठून बोलायला सुरुवात करावी या विचारात होती तर प्रवीण कधी एकदा कॅम्प वर पोहोचून तिला सरप्राइज देतो या विचारात! दोघं त्यांच्या त्यांच्या तंद्रीत चालत होते... एवढ्यात नम्रता च्या बरोबर पायाजवळ एक डोळा नसलेली बाहुली झाडावरून पडली. 

"आई... प्रवीण...." नम्रता एकदम घाबरली आणि तिने प्रवीण चा हात एकदम घट्ट पकडला. 

तिच्या ओरडण्याच्या आवाजाने आणि अचानक हात धरण्यामुळे प्रवीण भानावर आला. 

"अगं काय झालं?" प्रवीण ने तिला शांत करत विचारलं. त्याने त्याचा दुसरा हात तिच्या हातावर ठेवून तिला धीर द्यायचा प्रयत्न केला. 

"सॉरी! अरे ही बाहुली एकदम झाडावरून पडली म्हणून जरा घाबरले मी..." नम्रता तिचा हात सोडवत म्हणाली. 

"जरा? तुझ्या ओरडण्याने मला आत्ता मिनी हार्ट अटॅक आला असता..." तो हसत म्हणाला. 

ती काहीही बोलली नाही. दोघं पुन्हा चालू लागले. तिच्या डोळ्यासमोरून ती बाहुली काही केल्या जातच नव्हती! 

"प्रवीण! ऐक ना... तू एकदम मागे नको बघू पण, मला वाटतंय की मगाशी जी बाहुली माझ्या पाया जवळ पडली ती आपला पाठलाग करतेय..." ती दबक्या आवाजात म्हणाली. 

"काहीही काय? अचानक ती पडली ना म्हणून तुला असं वाटत असेल... नको काळजी करुस.. चल आपण कॅम्प वर गेलो ना की तुला बरं वाटेल... तो बघ आपला कॅम्प हाकेच्या अंतरावर आहे आता..." प्रवीण तिला समजावत कॅम्प कडे बोट दाखवून म्हणाला. 

त्याने नम्रता चा हात धरून जवळ जवळ तिला पळवतच कॅम्प मध्ये नेलं. कॅम्प मध्ये पोहोचल्यावर ती फळं आणि बाटली सॅक मध्ये भरत होती तोवर प्रवीण ने त्याच्या टेंट मधून तिच्यासाठी आणलेलं गिफ्ट आणलं. दोन्ही हात मागे घेऊन त्याने ते लपवलं होतं. नम्रता च्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत तो काय बोलावं याची मनात जुळवा जुळव करत तिच्यापाशी गेला. 

"नम्रता! This is for you...." तो तिच्या समोर ते गिफ्ट करत म्हणाला. 

तिचं आधी लक्ष नव्हतंच! त्याचं असं अचानक मागून येऊन गिफ्ट देण्यामुळे ती दचकली. तिच्या मनातून काही ती बाहुली जात नव्हती. 

"काय हे प्रवीण... तुझं काय चाललंय? माझं काय चाललंय? घाबरले ना मी.." ती म्हणाली. 

"अगं कशाला? मी आहे ना... हे बघ तरी... तुला आवडेल... तुझी भीती जाईल कुठच्या कुठे..." प्रवीण तिच्या हातात ते गिफ्ट देत म्हणाला. 

तिने ते गिफ्ट घेतलं आणि ती ते उघडू लागली. तो तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघत होता. तिने ते गिफ्ट अगदी व्यवस्थित उघडलं तर आत एका पांढऱ्या रंगाच्या बॉक्स वर एक चिठ्ठी होती. आधी तिने ती उघडली. 

"मनात तू, स्वप्नात तू... 
ध्यानात तू, हृदयात तू...
श्वासात तू, वास्तवात तू..
माझ्या सगळ्या विश्वात फक्त तू... 
लव्ह यू डिअर नमु...." त्यात चारोळी लिहिलेल्या होत्या. 

नम्रता ते वाचून एकदम स्तब्ध झाली. ती काहीही बोलत नाही किंवा काहीही react होत नाही हे पाहून प्रवीण थोडा टेंशन मध्ये आला. 

"नम्रता! काहीतरी बोल ना... तुला आवडलं नाही का हे सगळं?" तो तिला शांत पाहून म्हणाला. 

"अं? नाही काही नाही... छान आहे कविता." ती म्हणाली आणि ते बॉक्स उघडू लागली. 

नम्रता चा एकदम साधा, भोळा स्वभाव आहे आणि ती लगेच आपल्याला उत्तर देणार नाही हे प्रवीण ला माहीत होतं. तिने ज्या अर्थी कविता छान आहे असं सांगितलं आणि बॉक्स उघडू लागली त्या अर्थी तिला राग आलेला नाही हे त्याने जाणलं होतं. 

"आ.... हे काय आहे?" नम्रता एकदम ओरडली आणि तिच्या हातातून तो बॉक्स खाली पडला. 

प्रवीण ला एकदम काय झालं हे समजलंच नाही. त्याने पटकन तो बॉक्स उचलला आणि तिच्यापुढे केला. 

"काय झालं? तू ठीक आहेस ना?" त्याने काळजीने तिला विचारलं. 

"हो... सॉरी तो बॉक्स...." नम्रता बोलत होती.. तिला तोडत तो बोलू लागला; "अगं इट्स ओके.. त्यात काय... हे घे.. बघ तरी काय आहे.." 

"तूच बघ... अरे किती किळसवाणी बाहुली आहे ही...." नम्रता त्या बॉक्स ला दूर करत म्हणाली. 

त्याने ते बॉक्स उघडून त्यातून बाहुली बाहेर काढली. 

"अगं एकदा बघ तरी... काय किळसवाण आहे यात?" तो ती बाहुली तिच्या समोर धरून म्हणाला. 

"हे कसं शक्य आहे? अरे आत्ता तर अर्धा चेहरा जळल्या सारखी, अर्धे केस नसलेली, एका डोळ्यातून रक्त येणारी खूप भयानक बाहुली होती यात...." नम्रता ती बाहुली हातात घेऊन म्हणाली. 

तिचं हे बोलणं ऐकून प्रवीण जोर जोरात हसू लागला. 

"का हसतोय? तू माझ्यावर जराही विश्वास नको ठेवू...." ती रागाने त्याला म्हणाली. 

"बरं बाई... सॉरी.... तुला भास झाला असेल ग.. मगाच पासून तू बाहुलीचा विचार करतेस ना म्हणून तुला असं वाटलं असेल... पण, असं काही नाहीये... ही बघ किती मस्त आहे बाहुली! अगदी तुझ्यासारखी...." तो तिला समजावत म्हणाला. 

त्याचं बोलणं ऐकून आपल्यालाच भास झाला असेल असं समजून तिने ती बाहुली नीट बघितली आणि त्याच्या हातातून घेतली. 

"मी पण सॉरी...." ती म्हणाली. 

"चलता है.... बरं चल आता जाऊ आपण.. नाहीतर इथेच संध्याकाळ व्हायची." तो म्हणाला. 

नम्रता ने ती बाहुली आणि चिठ्ठी तिच्या टेंट मध्ये नेऊन ठेवली आणि दोघं पुन्हा जायला निघाले. 

"मी तुझ्या उत्तराची वाट बघतोय... विचार करून मला नक्की सांग..." प्रवीण तिला म्हणाला. 

"अजूनही तुला उत्तर समजलं नाही का?" ती खाली मान घालून लाजून म्हणाली. 

तिचं हे बोलणं ऐकून त्याच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. तो काही बोलणार एवढ्यात नम्रता जोरात ओरडली. 

क्रमशः....
**************************
प्रवीण ने तर त्याच्या मनातलं नम्रता ला सांगितलं. नम्रता ला सुद्धा ते आवडलं आहे... पण, तिला ती बाहुली तशी विद्रूप दिसली तो भास असेल की खरं असेल? ती आत्ता का ओरडली असेल? पाहूया पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all