एक बेट मंतरलेलं (भाग -७) #मराठी_कादंबरी

Horror island story. Horror Marathi kadambari. Story of college friends.

एक बेट मंतरलेलं (भाग -७) 

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
********************************
नम्रता तर कशीबशी झोपली पण, प्रवीण ला मात्र झोप लागत नव्हती! तो त्याच्याच विश्वात रमला होता. उद्याच नम्रताशी बोलूया आणि तिला गिफ्ट देऊ हा विचार करत तो वर आकाशाकडे बघत होता. त्याला सगळंच वातावरण प्रसन्न वाटत होतं. आकाशात असणाऱ्या चांदण्यांनी सगळीकडे मस्त लकाकी निर्माण केली होती. पूर्ण अवकाशात चमकणाऱ्या त्या ताऱ्यांमध्ये त्याला नम्रता चा चेहरा दिसत होता. तो त्याच्याच तंद्रीत एकटाच हसत होता. एवढ्यात मयुर ने त्याची कुस बदलली. तरीही या महाराजांचं त्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. 

"प्रव्या अरे झोपला नाहीस का? कसला एवढा विचार करतोयस? आ... आ..." मयुर ने त्याला एकट्यालाच हसताना बघून चिडवायला सुरुवात केली. 

"गप ना... जरा हळू बोल... आपण सामसूम ठिकाणी आहोत.. सगळे झोपले आहेत... किती मोठ्याने बोलतोयस..." प्रवीण त्याचं तोंड दाबत त्याला गप्प करत म्हणाला. 

मयुर ने सुद्धा लगेच तोंडावर बोट ठेवलं आणि थोडावेळ शांत बसला.

"आता तरी सांग कसला विचार करतोयस? नम्रता चा ना? आ... आ...." तो त्याला कोपराने डिवचत म्हणाला. 

"हो... उद्या मी तिला माझ्या मनातलं सांगायचा विचार करतोय... ती काय म्हणेल, तिच्यासाठी मी गिफ्ट आणलं आहे ते तिला आवडेल का हा विचारच मला झोपू देत नाहीये." प्रवीण म्हणाला. 

हे बोलताना सुद्धा तो वर आकाशात बघत हरवला होता. त्याच्या डोळ्यात नम्रता विषयी असणारा आदर, प्रेम आणि जिव्हाळा स्पष्ट दिसत होता. खूप महिन्यांपासून त्याला तिला त्याच्या मनातलं सांगायचं होतं पण आजतागायत त्याला तो मुहूर्त म्हणा किंवा ती संधी मिळाली नव्हती! या कॅम्प च्या निमित्ताने त्याने तिच्याशी बोलण्याचा निर्णय घेतला होता. 

"मयुर! तुला काय वाटतं रे? नम्रता कशी react होईल? तिच्या मनात सुद्धा तेच असेल का?" प्रवीण ने त्याच्याकडे कुस करत विचारलं. 

"बघ मित्रा! आपण एवढे वर्ष सोबत आहोत... तिचा स्वभाव कोणालाही प्रेमात पाडेल असा आहे. पण, तिच्या मनात नक्की काय सुरू आहे हे तुला तिच्याशी बोलल्यावर समजेल... आणि ती खूप समंजस आहे अरे.... तिच्या मनात जर असं काही नसेल तरी ती तुला दुखावणार नाही आणि दूर पण करणार नाही... उद्या तिच्याशी सगळं बोल..." मयुर त्याला समजवत म्हणाला. 

"हो... ते मला माहित आहे म्हणून तर मी हिम्मत करतोय तिला माझ्या मनातलं सांगायची." प्रवीण म्हणाला आणि त्याने एक दीर्घ श्वास घेऊन पुन्हा आकाशाकडे बघू लागला. 

मयुर सुद्धा आता उताणा झोपून आकाशाकडे बघत होता. वेगवेगळ्या चांदण्या बघत, मोजत दोघांनाही झोप लागली. सकाळी जाग आली ते अमन आणि श्वेता च्या हाकेनेच! 

"गुड मॉर्निंग... उठा आता लवकर.... आज आपण फोटो शूट करुया आणि सगळं बेट बघू..." श्वेता शिट्टी वाजवून म्हणाली. 

तिच्या आवाजाने सगळे उठले. सगळे त्या दोघांना गुड मॉर्निंग करत डोळे चोळत चोळत टेंट मधून बाहेर आले. 

"चला... या लवकर... पटकन सगळे ब्रश करून घ्या मी ग्रीन टी बनवतेय..." श्वेता म्हणाली. 

सगळे लगेच स्वतःच्या बॅगेतून ब्रश घेऊन आले. नम्रता ने हीच संधी आहे हे ओळखून ते धागे सोबत घेतले. 

"नम्रता चल ना... किती वेळ..." समृध्दी तिची वाट बघत बाहेरून म्हणाली. 

"आले ना... चल..." ती म्हणाली. 

सगळे मिळून त्या पाण्याच्या स्त्रोताच्या थोडं पुढे गेले. अमन आणि श्वेता कॅम्प च्या इथेच होते. नम्रता ने हळूच इकडे तिकडे बघून कोणीही नाही याची खात्री करून घेतली! 

"ऐका... मी काल हे तुम्हाला द्यायलाच विसरले. चला आधी सगळ्यांनी हात पुढे करा...." ती म्हणाली. 

"काय ते तर सांग आधी..." मयुर म्हणाला. 

"अरे आपण इथे येण्याआधी मी देवळात गेले होते तर तिथून हे पूजेचे धागे आणले होते... ते तुम्हाला सगळ्यांना बांधायचे राहिले... तेच बांधते आता..." नम्रता म्हणाली. 

लगेच तिने सगळ्यांच्या हातावर ते धागे बांधले. नम्रता दरवेळी प्रवसाच्या आधी देवळात जायची, तिला पूजेची वैगरे आवड आहे आणि मुळात तिची श्रद्धा आहे हे सगळ्यांना माहीत होतं! त्यामुळे अजून काहीही न विचारता सगळ्यांनी धागे बांधून घेतले आणि ब्रश करून सगळे कॅम्प जवळ आले. 

"बसा.... नंतर आंघोळीची पण आम्ही व्यवस्था केली आहे.... पटापट सगळं आवरून घ्या..." अमन म्हणाला. 

सगळे तिथल्या ओंडक्यांवर बसले. श्वेता ने केलेला ग्रीन टी आणि घरून आणलेल्या खाऊ चा नाश्ता करून बाकीचं आवरायला सगळे गेले. 

"या मुलांना आज काय ते एन्जॉय करू दे.. त्यांना आता पुढे काय होणार आहे हे कुठे माहितेय? हा... हा... हा...." श्वेता तिच्या मूळ रूपात येऊन अमन सोबत बोलत होती. 

तो सुद्धा त्याच्या मूळ रूपात तिथे उभा होता. त्या बेटावरच्या सगळ्या बाहुल्या त्यांच्या आजूबाजूला आल्या होत्या! असं वाटत होतं जसं की, त्या बाहुल्या त्यांचं सैन्य आहेत. त्यांना काहीतरी सांगतायत, त्यांच्या अपरोक्ष काय काय घडलं याचं सगळं रीपोर्टींग सुरू आहे असा भास निर्माण झाला होता. एवढ्यात कोणीतरी त्यांच्या जवळ येतंय असं श्वेता ला वाटलं आणि क्षणार्धात सगळं पूर्ववत करून ते दोघं त्यांच्या अमन, श्वेता च्या रूपात आले. समृध्दी आणि नम्रता त्यांचं आवरून येताना त्या दोघांना दिसल्या. 

"ताई... आमचं आवरून झालं आहे... आपण काल फिल्टर करत ठेवलेलं पाणी आता उकळून ठेवूया का? आणि त्यात दुसरं पाणी भरून ठेवू... आपल्या कडचं पाणी संपत आलं आहे..." समृध्दी म्हणाली. 

तिच्या या बोलण्याने त्या दोघींनी काहीही बघितलं नाहीये हे दोघांच्या लक्षात आलं आणि ते निश्चिंत झाले. 

"हो.. ठेव... नम्रता! तू माझ्यासोबत चल... दुपारी जेवणासाठी थोडी फळं आणून ठेवूया.." श्वेता म्हणाली. 

नम्रता तिच्या बरोबर जंगलाच्या दिशेने जाऊ लागली. तोवर मयुर आणि प्रवीण सुद्धा त्यांचं आवरून आले. थोड्याच वेळात नम्रता आणि श्वेता सुद्धा परत आल्या. फोटो शूट साठी कॅमेरा घेऊन आता सगळे सज्ज झाले होते त्यांची ही आठवण कायमस्वरूपी त्यांच्या आठवणीच्या खजिन्यात बंदिस्त करायला. 

"चला.... इथून थोडं पुढे गेलं की छान निसर्ग आहे... तिथे तुम्ही मस्त मस्त फोटो काढू शकता." अमन म्हणाला. 

सगळे चालू लागले. एवढ्यात नम्रता ला तिने गॉगल आणले आहेत हे लक्षात आलं. ते आणायला म्हणून ती टेंट मध्ये गेली! तिच्यासोबत थोडा वेळ मिळेल असा विचार करून प्रवीण तिच्यासाठी थांबला. 

"अरे हे काय? तू गेला नाहीस?" नम्रता ने त्याला बाहेर थांबलेलं बघून विचारलं. 

"नाही... तुझ्यासाठीच थांबलो होतो.... चल.." प्रवीण म्हणाला. 

तिने डोळ्यावर गॉगल चढवला आणि ती त्याच्या सोबत चालू लागली. 

"प्रवीण! मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे." नम्रता म्हणाली. 

"मला पण..." तो सुद्धा म्हणाला. 

"बरं आधी तू बोल..." ती म्हणाली.

"आत्ता नाही... तुझ्यासाठी सरप्राइज आहे ते.. ते मी तुला नंतरच सांगेन... तू बोल ना..." तो म्हणाला. 

एवढ्यात पुढून अमन ने शिट्टी वाजवली. त्या शिट्टीच्या आवाजाने आपण खूप मागे राहिलो आहोत हे दोघांना समजलं... झपझप पावलं टाकत त्यांनी सगळ्यांना गाठलं आणि आता सगळ्यांसमोर नम्रता ला त्याच्याशी बोलता येत नव्हतं. सगळे निसर्ग बघण्यात गुंग झाले होते. काल त्या बाहुल्या सगळ्यांना किळसवाण्या वाटत होत्या पण, आज सगळे त्याकडे दुर्लक्ष करून फक्त आनंद उपभोगत होते. अपवाद होती नम्रता! काल पासून तिला त्या बाहुल्या खूप विचित्र वाटत होत्या! त्यांच्यात जीव आहे की काय असं वाटत होतं. ती सतत मोबाईल ला रेंज आहे का बघत होती... तिला नक्की माहित होतं या अमन, श्वेता च्या डोक्यात काहीतरी शिजतंय.... 

"अगं नम्रता! नको उगाच प्रयत्न करुस... इथे रेंज येत नाही.... इथे फक्त आपण आहोत... बाहेरच्या जगाशी काहीही संपर्क इथून होत नाही." श्वेता तिच्याकडे बघत कुत्सित स्मित करत म्हणाली. 

नम्रता ला हे फार विचित्र वाटलं. पण, यांना काहीही संशय यायला नको म्हणून तिने फक्त स्मित करून सोडून दिलं. थोड्याच वेळात ते छान जागी पोहोचले. हा बेटाचा भाग आणि हे सगळे थांबले होते तो यात जमीन आस्मानाचा फरक होता. 

"किती छान आहे इथे... इथे या बाहुल्या आहेत त्या पण छान आहेत... तिथे ज्या बाहुल्या आहेत त्या किती किळसवाण्या वाटत होत्या.." समृध्दी सगळीकडे बघत म्हणाली. 

"हो... पण, इथे पाण्याचा स्त्रोत नाहीये आणि जंगल पण बरंच लांब आहे ना म्हणून आपण तिकडे कॅम्प केली आहे." अमन म्हणाला. 

"चला... इथे आता आपण फोटो शूट करुया आणि खेळूया..." श्वेता म्हणाली. 

सगळे मस्त एन्जॉय करत होते. आंधळी कोशिंबीर खेळायची असं ठरवून कॅमेरा मध्ये टायमर सेट करून तो व्हिडिओ काढायला तिथल्या एका झाडावर लावून ठेवला आणि सगळे खेळू लागले. पहिलं राज्य मयुर वर होतं! त्याने सगळ्यात आधी श्वेता ला आऊट केलं. पण, जेव्हा त्याने तिला हात लावला तेव्हा अगदी सुरुवातीला जसा नम्रता च्या धक्क्याने तिला चटका लागला होता अगदी तसाच आत्ता लागला. तिने अमन ला खुणावले. दोघांनी नीट बघितलं तर सगळ्या मुलांच्या हातात नम्रता ने बांधलेले धागे होते. 

"त्या धाग्या मुळे असं होतंय... आपण या मुलांनाच खेळायला सांगू... आत्ताच आपली पोल खोल झाली तर सर्वशक्तीमान होण्याचं आपलं स्वप्न स्वप्नच राहील..." अमन ने टेलिपथी वापरून श्वेता ला सावध केलं. 

"एक... एक मिनिट हा मुलांनो..." श्वेता म्हणाली आणि तो कॅमेरा लावलेल्या झाडापाशी आली! 

"अरे हे बघा यात नीट रेकॉर्ड होत नाहीये... एक काम करा तुम्ही सगळे खेळा आम्ही दोघं तुमचे फोटो व्हिडिओ काढतो..." ती म्हणाली. 

सगळे तिच्यावर विश्वास ठेवून खेळू लागले... पण, मयुर ला चांगलंच माहीत होतं प्रवीण ला नम्रता सोबत थोडा वेळ घालवायचा आहे... म्हणून, तो आता त्या दोघांना कसा वेळ मिळेल याचा विचार करत होता. त्याने सगळ्यांची नजर चुकवून प्रवीण ला गाठलंच! 

"तुला नम्रता सोबत बोलायचं होतं ना? अरे जा ना तिला जरा बाजूला घेऊन..." तो म्हणाला. 

"हो रे... बोलायचं आहे... Infact तिला सुद्धा काहीतरी बोलायचं आहे म्हणत होती..." प्रवीण म्हणाला. 

"ओ हो मित्रा! आज तर लॉटरी आहे तुझी... तुझ्या मनात जे आहे तेच आहे वाटतं तिच्या मनात आ... आ...." तो त्याला चिडवत म्हणाला. 

"देव जाणे! पण, आत्ता तू मदत कर ना माझी... समृध्दी, अमन दादा आणि श्वेता ताई ला काही समजणार नाही आणि आम्ही इथून परत कॅम्प मध्ये जाऊ शकू म्हणून काहीतरी शक्कल लढव ना..." तो त्याला एकदम केविलवाणा होऊन म्हणाला. 

"हो का? मी मदत करू? फक्त एका अटीवर.." मयुर म्हणाला. 

"आता काय?" प्रवीण वैतागून म्हणाला. 

"वैतागू नकोस... मला तू नम्रता ला कसं तुझ्या मनातलं सांगितलं हे सांगायचं... तरच करतो मदत... नाहीतर बघ बाबा तुझं तू..." तो नाटकं करत म्हणाला. 

प्रवीण आढे वेढे घेत कसाबसा तयार झाला. 

"अरे... तुम्ही दोघं तिकडे काय करताय... या ना फोटो काढू...." समृध्दी त्या दोघांना ओरडली. 

दोघं "आलो आलो" म्हणून फोटो शूट साठी गेले. मस्त गवतात बसून, झाडावर चढून - लटकून, बाहुल्या हातात घेऊन सगळे फोटो काढत होते. प्रवीण कधी एकदा नम्रता ला कॅम्प वर घेऊन जातो आणि मनातलं सांगतो याची वाट बघत होता. तर मयुर त्याच्या स्वभावाप्रमाणे मुद्दाम त्याला ती संधी मिळवून देण्यासाठी उशीर करून त्याची मजा घेत होता. 

क्रमशः.....
****************************
नम्रता ला प्रवीण शी काय बोलायचं असेल? तिला सुद्धा तेच वाटत नाहीये ना जे प्रवीण ला वाटतंय? प्रवीण ने तिच्यासाठी काय गिफ्ट आणलं असेल? तो त्याच्या मनातलं तिला सांगू शकेल का? श्वेता, अमन चा पर्दा फाश कधी होईल? पाहूया पुढच्या भागात... 

🎭 Series Post

View all