Login

एक बेट मंतरलेलं (भाग -६) #मराठी_कादंबरी

Horror story of island. Horror Marathi kadambari. Story of college friends.

एक बेट मंतरलेलं (भाग -६)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
********************************
एव्हाना आता सगळे त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचत आले होते. आजूबाजूला असलेली हिरवळ, मध्येच येणारी हवेची झुळूक आणि पांढरे शुभ्र अगदी सस्या सारखे वेगाने पुढे पुढे जाणारे अवकशातले ढग अजूनच भारी दिसत होते.

"ताई... यार अजून किती वेळ... आपण कधी पोहोचणार?" समृध्दी ने विचारलं.

"झालंच आता ५ मिनिटात पोहोचू... पुढे गेल्यावर अजून काहीतरी तुम्हाला बघायला मिळेल." श्वेता म्हणाली.

तिचं हे बोलणं ऐकून आता पुढे काय असेल याची कल्पना करत करत सगळे नव्या जोमाने चालू लागले. दोनच मिनिटात त्यांच्या समोर जे दृश्य होतं त्याने सगळे एकदम बिथरले!

"हे सगळं काय आहे?" मयुर ने सगळीकडे एक नजर टाकून विचारलं.

सगळीकडे भरपूर बाहुल्या होत्या! काही फाटलेल्या, तुटलेल्या तर काही अक्षरशः मळलेल्या! काही बाहुल्यांचे हात नव्हते, काहींची डोकी नव्हती, काहींची धडं नव्हती तर काही जळलेल्या अवस्थेत सुद्धा होत्या! काही झाडांवर, काही बुंध्यांपाशी, तर काही आजूबाजूच्या खडकांवर! पूर्ण बेट त्या बहुल्यांनी व्यापलं होतं! त्या बाहुल्या बघून असं वाटत होतं जणू कोणीतरी त्या तश्या ठेवल्या आहेत! अगदी भयाण आणि किळस येईल असं ते रूप होतं. इतकावेळ छान भासणारं बेट आता एकदम भयंकर आणि विचित्र वाटायला लागलं होतं. वातावरणात एक वेगळाच बदल झाल्यासारखा वाटत होतं. श्वास कोंडल्यासारखं वाटायला लागलं होतं आणि आता आकाशात सुद्धा मळभ दाटून आलं होतं! त्यामुळे एक विचित्रपणा अजूनच वाढत होता. एवढा वेळ हसत खेळत चालणारी सगळी मुलं आता एकदम शांत झाली होती. कोणीही काहीही बोलत नव्हतं! अमन ने फक्त मागे वळून पाहिलं... श्वेता आणि त्याने काहीतरी खाणाखुणा केल्या आणि तो बोलू लागला; "इथे हे गेले अनेक वर्ष आहे असं म्हणतात. पण, कोणीही घाबरु नका... आधी इथे वस्ती असेल ज्यामुळे हे असं झालं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कसलाही विचार करू नका... इथून पुढे सगळ्या बेटावर अश्या बाहुल्या दिसतील..."

"दादा अरे मग आपण पुढे का जायचं? किती किळसवाणे आहे हे...." समृध्दी सगळीकडे नजर फिरवत म्हणाली.

"अगं... पुढे पाण्याचा स्त्रोत आहे... तिथे आपल्याला कॅम्प साठी बरं पडेल ना... शिवाय तो मध्य भाग आहे तिकडून आपण जंगलात फिरून आगीसाठी लाकूड, आपल्याला खायला फळं वैगरे गोळा करू शकतो म्हणून तिकडे जायचं आहे...." अमन म्हणाला.

"हो... आणि तुम्ही सगळे हे पहिल्यांदा बघताय ना म्हणून असं वाटत असेल.... त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि एन्जॉय करा... आम्ही दोघं आहोत ना..." श्वेता म्हणाली.

"असेल... ताई आम्हाला भीती नाही वाटत पण, आम्ही इथे येण्याआधी काही गोष्टी ऐकल्या होत्या त्या खऱ्या आहेत का? असं वाटायला लागलं आहे." मयुर म्हणाला.

"हा विषय काढला आहे म्हणून सांगते... अमन आणि मी सुद्धा त्याच गोष्टी ऐकुन इथे आलो होतो. पण, दोन वेळा इथे येऊन सुद्धा आम्हाला तसं काही जाणवलं नाही.... उलट छान आहे इथे सगळं.... मस्त मोकळी हवा, भरपूर झाडं, ताजी फळं... आणि खूप मजा येते.. फक्त हे जे आत्ता दिसतंय त्याकडे दुर्लक्ष करा..." श्वेता म्हणाली.

बोलता बोलता कधी ते त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचले समजलंच नाही. नम्रता ला आता आतून काहीतरी विचित्र होणार आहे हे जाणवत होतं! पण, कोणालाही काहीही बोलून उपयोग होणार नव्हता म्हणून ती सगळ्यांसाठीच प्रार्थना करत होती.

"तर बच्चे कंपनी.... आपण इथे आपला कॅम्प लावणार आहोत! आत्ता ५ वाजत आले आहेत, साधारण ६:३० ला सगळं अंधारून येईल... म्हणून आधी आपण टेंट लावू आणि आगी साठी लाकडं घेऊन येऊ..." अमन त्याची बॅग तिथल्या एका दगडावर ठेवत म्हणाला.

सगळ्यांनी आजूबाजूला बघत बघत स्वतःच्या बॅग खाली ठेवल्या. सगळ्यात आधी सर्वांनी मिळून तिथली जागा थोडी साफ करून घेतली.

"आता आपण दोन टीम मध्ये काम करायचं आहे. श्वेता, प्रवीण आणि नम्रता एक टीम... मी, मयुर आणि समृध्दी एक टीम!" अमन म्हणाला.

"आपण इथे टेंट लावायचा... तोवर हे सगळे लाकूड आणि फळं घेऊन येतील." श्वेता म्हणाली.

सगळे त्यांना जसं जसं सांगितलं तसे विभागले गेले. दोन टीम मध्ये विभागले गेल्यामुळे कामाला पटकन उरक आला. एका टेंट मध्ये दोन जण राहणार होते. म्हणून, तीन टेंट मध्ये जागा सोडून गोलाकार पद्धतीने लावून हे तिघे अमन, समृध्दी आणि मयुर ची वाट बघत होते. पाचच मिनिटात ते सुद्धा आले. सगळ्यांनी मिळून बोन फायर ची तयारी केली. आगी भोवती बसायला मोठे मोठे तीन ओंडके ठेवले आणि त्या पाण्याच्या स्त्रोतातून पाणी घेऊन एका बाटलीत कोळशाचे तुकडे टाकून ते फिल्टर करत ठेवलं. दिवसभराच्या या सगळ्या प्रवासात मुलं दमली होती.

"चला... आता आपण थोडावेळ इथे बसू... जेवून घेऊ आणि मग सगळे झोपा! उद्या सकाळी लवकर उठून आपण बाकी बेट बघूया...." श्वेता म्हणाली.

आता बऱ्यापैकी अंधारून आलं होतं. त्या दोघांनी आधी सांगितल्या प्रमाणे वातावरणातला गारवा वाढत चालला होता. सगळे आगी पाशी बसले होते. आगीतून निघणाऱ्या ठिणग्यांचा चुर चुर आवाज तिथली शांतता भंग करत होता. डासांची कानापशी सतत भुणभुण सुरू होती...

"अरे यार... किती डास आले अचानक..." नम्रता हाताने डास हकलत म्हणाली.

"एक मिनिट थांब! मी आलोच...." प्रवीण म्हणाला आणि तो तिथून उठून गेला.

दोन मिनिटात तो लगेच आला. त्याच्या हातात कसलातरी पाला होता आणि एक क्रीम होतं.

"हे क्रीम घे... सगळ्यांनी हे लावून घ्या..." तो नम्रता च्या हातात ते क्रीम देत म्हणाला.

नंतर त्याने त्याच्या हातातला पाला हातावर चोळून त्या आगीत टाकला. त्यामुळे थोडा धूर व्हायला सुरुवात झाली.

"खो.. खो... अरे हे काय टाकलं?" अमन ने खोकत खोकत विचारलं.

"अरे दादा या वनस्पती मुळे जास्त धूर होतो आणि त्यातून एक विशिष्ट प्रकारचा गंध सुद्धा येतो तर एकही डास इथे फिरकणार नाही... मी मगाशी टेंट लावताना बघितलं होतं हे रोप इथे... त्यात भर म्हणून मी घरून कापूर सुद्धा आणला होता तो पण घातला आहे... आता बघ किती छान वाटेल..." प्रवीण म्हणाला.

कापूर आणि त्या वनस्पती मुळे आता डास पळून गेले होते. कापूर वातावरण शुद्ध करत होता तर त्याचा श्वेता आणि अमन ला त्रास व्हायला लागला होता. हे नम्रता ने बरोबर बघितलं होतं.

"चला... आता आपलं जेवण सुद्धा झालं आहे आणि खूप अंधार झाला आहे... झोपा आता सगळे! नम्रता, समृध्दी एका टेंट मध्ये, मयुर, प्रवीण एका आणि मी आणि अमन एका..." श्वेता कसंबसं स्वतःला सावरत म्हणाली.

सगळे त्यांच्या त्यांच्या टेंट मध्ये गेले. आकाशात आता एकही ढग नव्हता! पूर्ण स्वच्छ निरभ्र आकाश... चांदण्यांची नक्षी आणि लहानशी चंद्राची कोर खूप छान दिसत होती. टेंट च्या वरच्या बाजूला पारदर्शक शीट असल्यामुळे त्यांना मस्त चांदण्यात झोपल्याचा आनंद मिळत होता. नम्रता तिच्याच विचारात गढून आकाशाकडे बघत होती. समृध्दी मात्र केव्हाच झोपली! नम्रता ला आता तिथलं वातावरण खूपच भयानक वाटायला लागलं होतं... बाहेर असणारी झाडं आता आपल्याला गिळायला येतात की काय असं भासत होतं, त्या बाहुल्या ज्या दिवसा किळसवाण्या वाटत होत्या त्या झाडावरून आत्ता खाली उडी मारून आपल्या उरावर बसतील की काय असं वाटत होतं आणि वारा वाहिल्यावर तो अंगाला पार झोंबत होता.

"नाही... मला आत्ता काही झोप लागणार नाही. नक्कीच ते अमन आणि श्वेता जागे असणार... काहीतरी आहे जे त्यांच्या डोक्यात चालू आहे." नम्रता स्वतःशीच पुटपुटत उठून बसली.

एवढ्यात तिला कोणीतरी चालत येत असल्याची चाहूल लागली म्हणून ती पुन्हा आडवी झाली आणि किलकिल्या डोळ्यांनी टेंट च्या वरच्या भागातून बघायचा प्रयत्न करत होती. तर श्वेता आणि अमन तिथे बाहेर उभे आहेत हे तिला त्यांच्या आवाजावरून समजलं. ती कान देऊन ते दोघं काय बोलतायत हे ऐकत होती!

"आपल्याला त्या सगळ्या मुलांना जरा जपायला हवं.. इथे आज हे सगळं बघून थोडे तरी घाबरले आहेत हे... उद्या त्यांनी म्हणायला नको लगेच घरी जायचं आहे... अजून दोन दिवस त्यांना खूप जपावं लागेल... काहीही बोलता सुद्धा येणार नाही त्यांना..." अमन म्हणाला.

"हो... पण, मला नाही वाटत सगळी मुलं घाबरली आहेत. सगळी धीट आहेत..  आणि म्हणून तर आपण या मुलांना निवडलं ना आपल्या "त्या" कामासाठी!" श्वेता म्हणाली.

दोघं मिळून हसले..... हे सगळं नम्रता ने ऐकलं होतं! आता या दोघांचं काय असं काम असेल ज्यामुळे आम्हाला सगळ्यांना इथे आणलं याचा ती विचार करत होती.

"आई जसं म्हणाली तसं हे हीपनोटाईज वैगरे करणारे नाहीयेत ना? पण, किती भयानक वाटतंय.... काय चालू आहे हे सगळं काही कळतच नाहीये.... काय करू मी?" नम्रता तिच्या विचारात पूर्ण गढून मनात बोलत होती.

तिचा हा सगळा विचार सुरू असताना तिला पुन्हा चालण्याचा आवाज आला... ती सावध झाली आणि झोपण्याचं नाटक केलं... तर श्वेता आणि अमन त्यांच्या टेंट कडे जात होते. यावेळी मात्र तिला त्यांच्या मागे काहीतरी वेगळंच दिसलं! सावली सारखं काहीतरी जे फार अक्राळ विक्राळ वाटत होतं! त्यांच्या पुन्हा चालण्याने आता त्या झाडावरच्या बाहुल्या जिवंत झाल्या आहेत की काय असं वाटत होतं... त्या सगळ्या बाहुल्या अमन, श्वेता कडे पाहत आहेत असं वाटत होतं तर एका बाहुली ने डोळे सुद्धा उघडझाप केले असं नम्रता ला राहून राहून वाटत होतं! एकदा अमन, श्वेता कडे तर एकदा आपल्याकडे या बाहुल्या बघतायत असे भास तिला व्हायला लागले!

"शी.. उगाच हे वरून पारदर्शक शीट असलेले टेंट घेतले असं वाटायला लागलं आहे..." ती स्वतःशीच म्हणाली आणि आता तिने कीलकीले केलेले डोळे गच्च मिटून घेतले. ती कशीबशी स्वतःच्या मनाची समजूत काढत होती. कदाचित रात्रीची वेळ आहे म्हणून असेल असा विचार करत, बाप्पाच नाव घेत आता ती झोपायचा प्रयत्न करू लागली. एवढ्यात तिचा मोबाईल वाजला!

"नम्रता! मी तुला म्हणालो होतो ना तुझ्यासाठी एक सरप्राइज आहे... ते तुला लवकरच मिळेल.. आणि मला खात्री आहे तुला आवडेल. आत्ता तू झोपली असशील... आज फार दमली आहेस ना.. पण, उद्या आपण मस्त एन्जॉय करू आणि जमल्यास उद्याच तुला मी सरप्राइज देईन... बाय... स्वीट ड्रीम्स..." प्रवीण ने तिला मेसेज केला होता.

तिने मेसेज वाचला! पण, श्वेता, अमन च बोलणं ऐकल्यामुळे तिचं त्याकडे एवढं लक्ष नव्हतं! त्यात पुन्हा मोबाईल वाजला. बॅटरी लो च नोटिफिकेशन आलं होतं! तिने लगेच उठून तिच्या पर्स मधून पॉवर बँक काढून त्याला मोबाईल चार्जिंग ला लावला आणि पुन्हा पर्स बंद करताना तिला आई ने दिलेले देवाचे धागे, अंगारा आणि गॉगल दिसले.

"अरे आई ने हे दिलं होतं! माझ्या डोक्यातून गेलंच होतं!" ती स्वतःशीच पुटपुटली आणि पुन्हा पर्स बंद करून झोपायला गेली.

आता तिला शांत झोप लागली. उद्या सगळ्यांना श्वेता, अमन नसताना ते धागे बांधायचे हे तिने ठरवलं आणि ती शांत चित्ताने झोपली.

क्रमशः....
****************************
आता उद्याचा दिवस त्या सगळ्यांच्या आयुष्यात काय नवीन वळण घेऊन येणार आहे? खऱ्या संकटाची चाहूल कोणालाही नाहीये.. काय सुरू असेल श्वेता, अमन च्या डोक्यात? प्रवीण नम्रता ला जे सरप्राइज देणार आहे ते तिला आवडेल ना? पाहूया पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all