एक बेट मंतरलेलं (भाग -५) #मराठी_कादंबरी

Horror story of island. Story of college friends. Marathi kadambari. Horror Marathi kadambari.

एक बेट मंतरलेलं (भाग -५) 

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
********************************
सगळ्यांच्या घरी आता पोरं पिकनिक ला जाणार म्हणून उत्साहाचं वातावरण होतं. फक्त नम्रता च्या घरी विशेष तयारी सुरू होती. त्या दोघींनी नम्रता च्या बाबांना सुद्धा याबद्दल कल्पना दिली होती. त्यांना सुद्धा तिच्या आईच म्हणणं पटत होतं! हे साधं संकट नाही.... यासाठी नम्रता ला बाकीच्यांबरोबर तिथे जाणं भाग आहे! पण, सगळ्या तयारीनिशी! म्हणूनच  नम्रता च्या आई ने तिला बरंच सामान एक्स्ट्रा दिलं होतं. 

"हे तुझ्या पर्स मधेच ठेव! कोणालाही याबद्दल सांगू नकोस... विशेषतः त्या अमन आणि श्वेता ला याबद्दल कळता कामा नये." तिची आई तिच्या हातात छोटी पर्स देत म्हणाली. 

"हो आई! नाही सांगणार कोणाला." नम्रता म्हणाली. 

आता त्यांना जास्त धास्ती वाटत नव्हती. फक्त नम्रता ला धीर सोडून चालणार नव्हता. तिथे जे काही बघायला लागेल, जी काही संकटं येतील ती तिलाच हाताळावी लागणार होती. यासाठी त्यांच्या घरी आता रोज होणाऱ्या प्रार्थनांमध्ये वाढ झाली होती. जेणेकरून नम्रता ला मनोबल मिळेल. ते दोघं भूत असतील हे त्यांना वाटत नव्हतं तर, मानवाच्या सप्तचक्रांवर ताबा मिळवून त्यांच्याकडून चुकीची कामं करून घेणारी टोळी वाटत होती. अप्रत्यक्षपणे नम्रता आणि तिच्या घरचे सुद्धा या खऱ्या संकटापासून अनभिज्ञ होते. तर दुसरीकडे एवढ्या लांब मुलं पहिल्यांदा जाणार म्हणून सगळ्यांच्या घरी सुक्या खाऊ ची तयारी सुरू झाली होती. चार दिवसातला एक दिवस तर संपला होता! तीन दिवसात सगळ्यांनी मिळून चिवडा, लाडू, थेपले असे टिकतील असे पदार्थ बनवून ठेवले होते. चार दिवसाच्या कॅम्प साठी कपडे, बूट, टॉर्च सगळं सामान सुद्धा पॅक झालं होतं. प्रवीण च्या बाबांनी घरी बनवलेला फ्रूट जाम, लोणचं हे सुद्धा दिलं होतं. शेवटी सगळे वाट बघत होते तो दिवस आज उजाडला! अमन आणि श्वेता ने सांगितल्या प्रमाणे त्यांनी सर्व सामान घेतलं होतं. सकाळी ७ वाजता गेट वे ऑफ इंडिया साठी निघायचं आणि तिथून समुद्रा मार्गे त्या बेटावर! अमन, श्वेता ने सगळी तयारी करून ठेवली होती. सगळ्यांच्या घराच्या मध्यावर असणाऱ्या ग्राउंड जवळ भेटायचं ठरलं होतं. सगळे एकदमच तिथे आले! अमन आणि श्वेता त्या सगळ्यांच्या आधीच तिथे येऊन थांबले होते. 

"गुड मॉर्निंग!" श्वेता ने सगळ्यांना अभिवादन केलं. 

"गुड मॉर्निंग" सगळे एका सुरात म्हणाले. 

"अमन, श्वेता! आम्ही तुमच्या जबाबदारी वर मुलांना तिथे जाण्याची परवानगी दिली आहे. काळजी घ्या सगळ्यांची आणि मुलांनो दादा, ताई ला त्रास देऊ नका... ते जे सांगतील ते ऐका." प्रवीण चे बाबा म्हणाले. 

"हो काका! आम्ही सगळ्यांना सांभाळू... तुम्ही वाट बघा..." श्वेता पटकन म्हणाली. 

"काय?" नम्रता ची आई हे ऐकुन म्हणाली. 

अमन ने श्वेता कडे पटकन बघितलं आणि त्यानेच आता सावरून घेतलं; "अहो म्हणजे, तुम्ही आता कसली काळजी नका करू... तुम्ही मुलांची वाट बघा, सगळे तिथून आले की त्यांनी केलेली मजा ऐकण्यासाठी... असं म्हणायचं आहे तिला!" 

"हो काकू... नका काळजी करू.... चार दिवस तर चाललोय आम्ही!" प्रवीण म्हणाला. 

"तरीही अमन, श्वेता तिथे पोहोचलात की कळवा. ही पोरं फिरण्याच्या नादात फोन करायला विसरतील... त्यांना मोबाईल फक्त फोटोसाठी आणि सोशल मीडिया साठी हवा असतो..." मयुर चे बाबा म्हणाले. 

"हो.... तिथे नेटवर्क चा प्रॉब्लेम असतो जेव्हा जेव्हा रेंज येईल तेव्हा तेव्हा आम्ही तुमच्या संपर्कात राहू..." अमन म्हणाला. 

एवढ्यात त्यांनी बुक केलेली एक आठ सीटर मिनी बस तिथे आली. 

"चला पोरांनो! बस मध्ये बसून घ्या..." श्वेता म्हणाली. 

सगळे एक एक करून बस मध्ये चढत होते. नम्रता ने बस मध्ये चढण्याआधी तिच्या आई - बाबांना नमस्कार केला. तिच्या आई ने तिला डोळ्यांनीच धीर दिला आणि ती बस मध्ये जाऊन बसली. अमन आणि श्वेता पहिल्या सीट वर बसले होते. त्यांच्या मागोमाग बाकी मुलं! बस सुरू होण्याआधी नम्रता च्या बाबांनी नारळ वाढवला आणि "गणपती बाप्पा मोरया...." या जयघोषात बस सुरू झाली. सगळ्यांनी असं म्हणलं तसे अमन आणि श्वेता च्या कानात दडे बसायला लागले, त्यांच्या हातापायाचा कंप व्हायला लागला होता आणि डोक्यात मुंग्या आल्या सारखं त्यांना वाटत होतं. कसंबसं त्यांनी कोणाच्याही न कळत स्वतःला सावरलं. सगळ्या मुलांनी आपापल्या पालकांना बाय केलं. आता किमान अर्धा, पाऊण तास बसचा प्रवास होता! सगळे चांगलेच जोशात आले होते. दमशेराज आणि भेंड्या खेळत खेळत कधी ते गेट वे ऑफ इंडिया ला पोहोचले समजलंच नाही. साधारण सकाळी ८:३० ची वेळ! अगदी गरम नाही आणि अगदी थंड नाही असं वातावरण, कोवळं ऊन, हळूहळू होऊ लागलेली पर्यटकांची गर्दी आणि तिथे फिरणारे फोटोग्राफर, चहा - कॉफी ची सायकल घेऊन फिरणारे फेरीवाले यांची वर्दळ! 

"चला... आता सगळे आमच्या मागून या... आपल्याला बोटीने बेटाकडे जायला निघायचं आहे. त्या आधी किनाऱ्यावर जाऊन आपण नाश्ता करणार आहोत..." अमन ने शिट्टी वाजवून सगळ्यांना एकत्र गोळा केलं. 

मस्त सगळे हातात हात घालून किनाऱ्यावर आले. त्या सोनेरी मऊ मऊ वाळूवर चप्पल काढून आधी सगळे मनसोक्त धावले, फोटो काढले आणि इंस्टा वर रील सुद्धा बनवलं. तोवर अमन, श्वेता ने सगळ्यांच्या नाश्त्याची तयारी केली होती. छान वाळूत बसून सगळ्यांनी खाऊन घेतलं. नम्रता चा घरी मेसेज करून झाला होता; "आम्ही गेट वे ऑफ इंडिया ला पोहोचलो... आता इथून बेटावर जायला निघणार आहोत." 

"चला.... आता तिथे एक बोट आहे... त्यातून आपण जातोय... आत्ता ९:४५ झाले आहेत... तिथे पोहोचायला साधारण दोन तास लागतील म्हणजे ११:४५ ते १२ पर्यंत आपण तिथे पोहचू असं धरून चला... " श्वेता म्हणाली. 

सगळे एकाच सुरात "ये........" करून ओरडले. नाचत, उड्या मारत सगळे बोटीपाशी आले. अमन, श्वेता आधी बोटीत चढले आणि एकेकाला हात देऊन सगळ्यांना आत घेतलं. फक्त नम्रता ला हात देऊन आत घेण्याची हिंमत दोघांनाही होत नव्हती. श्वेता ने आधीच तो चटका अनुभवला होता. अमन फोनच्या बहाण्याने तर श्वेता व्हिडिओ काढण्याच्या बहाण्याने बाजूला झाले! प्रवीण ने तिला हात देऊन आत घेतली. हे सगळं पाहून नम्रता तर आता अजून सावध झाली होती. बोटीत सगळे बसले आणि मस्त गाणी गात गात, फोटो - व्हिडिओ काढत त्यांचा प्रवास सुरू होता. मस्त बोटीतून बाहेर पाण्यात हात घालत एकमेकांवर  पाणी उडवत सगळे हसत होते. नम्रता सुद्धा बाप्पावर सगळं सोपवून त्यांच्यात मजा करत होती. कारण, तिचा जर पडलेला चेहरा किंवा टेंशन कोणी ओळखलं असतं तर त्यांच्या आनंदाला सुद्धा विरजण लागलं असतं! समुद्रात असलेली नीरव शांतता, फक्त लाटांचा आवज, मध्येच उड्या मारताना दिसणारे मासे, आकाशातून उडत जाणारे पक्ष्यांचे थवे असं मनमोहक दृश्य सगळेच जण मनात आणि कॅमेरात कैद करत होते. या प्रवासात जराही न कंटाळता फक्त आणि फक्त मजा करत सगळे बसले होते. अचानक त्यांच्या बोटीच्या इंजिन मधून कसला तरी आवाज आला आणि बोट थांबली. 

"काय झालं ताई? हा कसला आवाज होता?" मयुर ने विचारलं. 

"थांबा... कोणीही घाबरु नका... काका, काय झालं? बोट का थांबली अशी?" श्वेता ने बोट चालकाला विचारलं. 

"ताई बोटीचं इंजिन बंद पडलं आहे. आपल्याला आता दुसरी बोट येत नाही तोवर थांबावं लागेल." ते म्हणाले. 

"पण, आता दुसरी बोट कधी येईल? काही करता येणार नाही का?" अमन नी विचारलं. 

"दादा! इंजिन मध्ये स्पार्क झाला आहे... आता दुसरी बोट येई पर्यंत आपला स्पीड आधी सारखा नाही होणार... दुसरी बोट दिसे पर्यंत मी बोट वल्हवतो..." ते म्हणाले. 

पोरं आधी थोडी बावरली होती पण, जेव्हा त्या बोटवाल्या काकांनी त्यांना हे असं होत असतं आणि समुद्रात कोळी बांधवांच्या बोट असतात तर लवकरच मदत सुध्दा मिळेल हे सांगितलं तेव्हा कुठे सगळे नॉर्मल झाले. हळूहळू बोट वल्हवत वल्हवत त्यांचा प्रवास सुरू होता. त्या काकांकडून त्यांचे रोजचे अनुभव, समुद्राच्या कथा ऐकत ऐकत सगळे बरेच अंतर पुढे आले. 

"काका... ती बघा तिकडे एक बोट आहे...." अमन दूरवर असलेल्या एका बोटीकडे बोट दाखवून म्हणाला. 

त्या काकांनी लगेच सिग्नल देऊन त्या बोटीचं लक्ष वेधून घेतलं. लगेच सगळे या बोटीतून त्या बोटीत गेले! पुन्हा नविन बोटीतून नवीन गोष्टी ऐकत त्यांचा प्रवास पूर्ण झाला! जिथे ते २ तासात पोहोचणार होते तिथे या सगळ्या गोंधळामुळे चार तास लागले. दुपारचे २ वाजून गेले होते आणि ऊन खूप चढलं होतं. सगळे बोटीतून उतरले. एकदम भयाण शांतता असलेलं ते बेट, सगळीकडे फक्त किर्र झाडी, ना प्राणी ना पक्षी असल्याच्या काही खुणा! 

"किती भयाण वाटतंय इथे...." नम्रता पटकन म्हणाली. 

तिचं हे वाक्य ऐकून श्वेता आणि अमन नी तिच्याकडे एक वेगळाच कटाक्ष टाकला! पण, तिचं लक्ष नव्हतं. तिने जोवर नेटवर्क आहे तोवर घरी पोहोचल्याचा मेसेज करून टाकला. 

"इथे जराही जैविक खुणा नाहीयेत ना म्हणून असं वाटत असेल... पुढे छान आहे जागा.. आपण तिथे जाण्याआधी जेवून घ्या... आपल्याला इथे पोहोचायला आधीच उशीर झाला आहे... खाऊन घेऊ आणि मग जाऊ.." श्वेता म्हणाली. 

सगळे तिथेच एका झाडाखाली सावलीत गोल करून बसले. घरून आणलेले थेपले आणि लोणचं सगळ्यांनी खाऊन घेतलं आणि थोडावेळ तिथेच आराम केला. 

"श्वेता, अगं मुलांच्या घरी फोन करायचा आहे.. इथे रेंज आहे तोवर करून घेऊ..." अमन म्हणाला. आणि लगेच त्याने सगळ्या पालकांना कॉन्फरन्स मध्ये घेऊन फोन करून ते पोहोचल्याचा निरोप दिला. 

"चला... आता ३:३० वाजले आहेत. इथे अंधार लवकर होतो... आपल्याला कॅम्प लावायचा आहे. साधारण तासभर तरी आत चालत जावं लागेल आपल्याला. तिथे एक वाहत्या पाण्याचा स्त्रोत आहे आणि जागा पण छान आहे तिथेच आपण कॅम्प लावणार आहोत." अमन म्हणाला. 

सगळे एका रांगेत त्याच्या मागे निघाले. सगळ्यात पुढे अमन, त्याच्या मागे मयुर, प्रवीण, नम्रता, समृध्दी आणि शेवटी श्वेता असे सगळे चालले होते. 

"वाव... काय भारी सीन आहे ना... किती मोठी मोठी झाडं आहेत इथे...." समृध्दी म्हणाली. 

"हो... पुढे तर अजून छान छान निसर्ग बघायला मिळेल... आत्ता कुठे चालायला लागून ५ मिनिटं झाली आहेत." अमन म्हणाला. 

या सगळ्यात नम्रता मात्र शांत झाली होती. तिचं कुठे लक्ष लागत नव्हतं. सतत काहीतरी विचित्र जाणवत होतं. एक प्रकारची अस्वस्थता तिला जाणवत होती. त्यामुळे इतरांपेक्षा जास्त घाम तिला येत होता आणि पाणी जास्त लागत होतं.  थोडावेळ असाच गेला. तर, दुसरीकडे प्रवीण तो नम्रता ला जे सरप्राइज देणार आहे त्याबद्दल विचार करत स्वतःच्याच विश्वात हरवला होता. 

"काय ग नम्रता! तू बेचैन वाटतेस... काय झालं?" समृध्दी ने तिला विचारलं. 

तिच्या बोलण्याने वातावरणातील शांतता भंग झाली होती आणि प्रवीण सुद्धा भानावर आला. 

"अगं काही नाही... तुला माहितेय ना मला आधी पासूनच उन्हाचा त्रास होतो... म्हणून तुला असं वाटलं असेल..." नम्रता ने सारवा सारव केली. 

"झालंच आता आपण पोहोचू... आणि ऊन होईल थोड्यावेळात कमी... पुढे अजून झाडं आहेत तर सावली मिळेल." श्वेता म्हणाली. 

सगळे पुन्हा नवीन जोमाने चालू लागले. नम्रता च्या लक्षात आलं आई नी आपल्याला असं अस्वस्थ वाटलं तर बाप्पाचं नाव घ्यायला सांगितलं होतं. ती मनोमन देवाचं नाव घेऊ लागली आणि आता कुठे तिला बरं वाटायला लागलं. मगापासून कोणीतरी आपला पाठलाग करत आहे, कुठूनतरी आपल्यावर नजर ठेवली जात आहे असं तिला वाटत होतं ते आता वाटणं बंद झालं होतं. 

क्रमशः....
****************************
सगळे बेटावर पोहोचले आहेत! पण, अजूनही ते कॅम्प च्या ठिकाणापर्यंत पोहोचलेले नाहीत. तिथे जाताना काही अडचणी येतील का? नियतीने त्यांच्या नशिबात काय मांडून ठेवलं असेल? श्वेता, अमन च खरं रूप या मुलांना कधी समजेल? पाहूया पुढच्या भागात. 

🎭 Series Post

View all