एक बेट मंतरलेलं (भाग -४) #मराठी_कादंबरी

Horror island story. Marathi kadambari. Horror Marathi kadambari. Story of college friends.

एक बेट मंतरलेलं (भाग -४) 

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
********************************
समृद्धीच्या दारावर पोहचत नाहीत तोवर तिचं आई... आई... ओरडणं सुरू झालं होतं! शहाण्या मुलीसारखं ती कधीच दार वाजवत नसे... तिचं हे दरवेळी असायचं! घराजवळ पोहोचलं की, मोठ्याने हाका मारायच्या! 

"समृध्दी! अगं जरा हळू... आधी बघ तरी दार उघडं आहे. सगळ्या बिल्डिंग ला समजतं तू घरी आलीस की..." तिची आई दारात येऊन म्हणाली.

सगळे घरात गेले. तिथे नम्रता ची आई सुद्धा आलीच होती. समृध्दी ने घरी गेल्या गेल्या भूक लागली म्हणून फर्मान सोडलं. तिच्या आई ने सगळ्यांसाठी लाडू, चिवडा आणला आणि ती सुद्धा तिथे बसली. 

"नम्रता! काय झालं ग? इथे का बोलावलं आहेस?" नम्रता च्या आई ने विचारलं. 

"अगं जरा ते कॅम्प च बोलायचं होतं ना म्हणून.." नम्रता म्हणाली. 

"अजूनही ते खूळ आहेच का तुमच्या डोक्यात?" समृद्धीची आई म्हणाली. 

"काकू.. त्या पोरांना नका काही बोलू... आम्ही दोघं सांगतो सविस्तर..." अमन म्हणाला. 

समृध्दी ने फक्त हम्म केलं... ती खाण्यात पार गुंग होती. तिला असं बघून सगळे हसले आणि गप्पा मारता मारता आधी सगळ्यांनी खाऊन घेतलं. अमन आणि श्वेता ने त्यांना सविस्तर सगळं सांगितलं. जसं मयुर आणि प्रवीण च्या घरी सगळे भान हरपले होते अगदी तसंच इथेही होत होतं. फक्त नम्रता आणि तिची आई भानावर होते. 

"वहिनी... काय झालं? कुठे हरवला आहात?" नम्रता च्या आई ने समृद्धीच्या आई ला भानावर आणत विचारलं. 

"काही समजलंच नाही... असं अचानक काय झालं?" ती डोक्याला हात धरून म्हणाली. 

"काकू... नका काळजी करू... कधीतरी जास्त काम केल्यावर त्याच्या स्ट्रेस मुळे होतं असं..." श्वेता म्हणाली. 

"असेल... बरं.. तुम्ही दोघं नक्की या मुलांची नीट काळजी घ्याल ना?" समृद्धीच्या आई ने विचारलं. 

"हो... स्वतः पेक्षा जास्त जपू.... छान कोवळी पोरं आहेत हो..." अमन म्हणाला. 

श्वेता ने पटकन त्याच्याकडे बघितलं! आपण नक्कीच काहीतरी माती खाल्ली आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं. आता ते सावरून घेण्यासाठी तो बोलू लागला; "म्हणजे, आम्ही आजवर खूप कॅम्प अरेंज केले आहेत.. यांच्या पेक्षा लहान लहान मुलांना सांभाळलं आहे. तुम्ही काहीच काळजी नका करू..." 

"मला थोडा वेळ हवा आहे विचार करायला. मी दुपार पर्यंत सांगते." नम्रता ची आई म्हणाली. 

तिचं हे असं बोलणं अमन आणि श्वेता ला अजिबात पटलं नाही. त्यांनी तिचा विचार बदलायचा खूप प्रयत्न केला पण सगळं फोल ठरलं. नम्रता आणि तिची आई पटकन आपल्या जाळ्यात येणार नाहीत आणि जास्त प्रयत्न केले तर त्यांना संशय येईल म्हणून दोघं काहीही बोलले नाहीत. 

"नम्रता! चल घरी..." तिची आई तिला म्हणाली. 

दोघी घरी जायला निघाल्या. तिच्या आई ला सतत यात नक्कीच काहीतरी गडबड आहे असं वाटत होतं. नम्रता च्या सुद्धा हे लक्षात आलं होतं आणि म्हणूनच त्या अमन, श्वेता समोर काहीही न बोलता ती आई बरोबर घरी जायला निघाली होती. त्या निघाल्या नंतर अमन आणि श्वेता सुद्धा त्यांच्या घरून निघाले होते. त्या दोघी अर्ध्या वाटेत होत्या तोवर तिला प्रवीण चा फोन आला. 

"हॅलो नम्रता! अगं का गेलीस तू? आई ला आपण समजावू ना... ये ना परत..." तो म्हणाला. 

"आत्ता नाही... आई म्हणाली आहे ना दुपार पर्यंत सांगते... मग तेव्हाच बघू काय म्हणतेय.." ती म्हणाली. 

"अगं पण... अमन दादा आणि श्वेता ताई ला माहितेय तुझी आई हो म्हणेल... ते तयारी करायला गेले आहेत... आपण पण आपलं सगळं प्लॅनिंग करून तयारी करुया ना..." तो म्हणाला. 

"प्रवीण! मी दुपारी काय ते सांगते... बाय..." ती म्हणाली आणि फोन ठेवला. 

फोनवर बोलता बोलता दोघी घरी पोहोचल्या. पूर्ण रस्त्यात कोणीही काहीही बोललं नव्हतं. 

"नम्रता! बाळा! मी विचार करून सांगते असं म्हणलं म्हणून तुला वाईट वाटतंय का?" तिच्या आई ने ती शांत आहे हे पाहून विचारलं. 

"नाही आई... उलट मला तुझ्याशी बोलायचं आहे जरा..." नम्रता म्हणाली. 

आणि ती आईच्या बाजूला जाऊन बसली. खूप काहीतरी तिच्या मनात चालू होतं जे तिला अस्वस्थ करत होतं. 

"बोल ना.." तिची आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. 

"आई... जेव्हा पासून अमन दादा आणि श्वेता ताई भेटले आहेत ना तेव्हा पासून अस्वस्थ वाटतंय ग... ते काही बोलले की सगळे भान हरपल्या सारखे कुठेतरी हरवतात. जसं की स्वप्नात गेले आहेत." ती म्हणाली. 

"हम्म... मला सुद्धा तसंच काहीतरी जाणवलं. म्हणजे ते दोघं असतील तेव्हा असं negative वाटतंय... म्हणून तर मी दुपार पर्यंत सांगते असं म्हणले." तिची आई म्हणाली. 

"आई.. पण, आपल्या दोघींना असं वाटतंय.. बाकी कोणाला काही जाणवत नाहीये... असं का? आणि आई खरंच जर काहीतरी गडबड असेल तर बाकीच्यांना सुद्धा सावध केलं पाहिजे ग..." नम्रता म्हणाली. 

नम्रता च्या आई ने थोडावेळ विचार केला. नम्रता बोलत होती त्यात तथ्य होतं. बाकी कोणाला हे असं जाणवलं नाही फक्त या दोघींना जाणवलं. शिवाय, त्यांनी कोणाला काही सांगितलं असतं तरी त्यांनी विश्वास ठेवला नसता. 

"आई... आई... काय झालं? कसला विचार करतेस?" नम्रता ने तिच्या आईला विचारात गढलेलं पाहून विचारलं. 

"काही नाही... मला जरा थोडा वेळ दे... तू जा कॅम्प साठी तयारी कर...." तिची आई म्हणाली. 

"अगं आई पण?" नम्रता बोलत होती. तिला तोडत तिची आई म्हणाली; "मी सांगतेय ते कर.. मी काहीतरी विचार केला आहे. आत्ता बाकी कोणाला काहीही बोलून उपयोग होणार नाही आणि ते दोघं सावध होतील... तुम्हाला कोणाला काहीही होणार नाही... जा तू तयारी कर." 

नम्रता मानेने हो म्हणून तिच्या खोलीत गेली. सगळ्यात आधी तिने बाकीच्यांना कॉन्फरन्स मध्ये घेऊन ती सुद्धा कॅम्प ला येतेय हे सांगितलं. सगळे खुश झाले. त्यांच्या व्हॉटसअप ग्रुप वर श्वेता ने कॅम्प साठी काय काय लागेल याची यादी देऊन ठेवली होती त्यानुसार पॅकिंग करायचं होतं. प्रवीण ने श्वेता ला सुद्धा नम्रता येतेय हे सांगितलं. 

"अमन... आपलं काम झालं... सगळी बच्चे कंपनी येतेय... आता आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही..." ती त्याच्याकडे एकदम तीक्ष्ण नजरेने पाहत म्हणाली. 

दोघं एका सामसूम जागी येऊन थांबलेले होते. जवळ जवळ जंगलच होतं ते! ही बातमी ऐकून ते दोघं खूप मोठ मोठ्याने हसले आणि बाजूने सरपटत जाणारा विषारी साप पकडून कच्चा खाल्ला! दोघंही आता त्यांच्या खऱ्या अवतारात आले होते! अमन चे मोठे सुळे, रक्ताने माखलेली लाल भडक जिव्हा, फाटलेला जबडा आणि खोप पडलेलं डोकं एवढा भयाण अवतार तर श्वेता चा अर्धा जळलेला चेहरा, त्यातून निघणारा पू, एका डोळ्यातून येणारं रक्त आणि अर्ध्या बाजूचे उपटलेले केस! तिला फार भयाण करत होते. मुलांसमोर असणारं त्यांचं रूप पाहून कोणीही म्हणणार नाही हे त्यांचं खरं रूप असेल एवढं भयाण रूप हे होतं! 

"आता हे चार बळी दिले की, आपण सर्वशक्तीमान! हा.... हा.... हा...." श्वेता एकदम घोगऱ्या किळसवाण्या आवाजात मोठ्याने ओरडून म्हणाली. 

अमन सुद्धा तिच्या त्या भयाण हास्यात सामील झाला आणि थोड्याच वेळात ते दोघं पुन्हा त्यांच्या चांगल्या रुपात परत आले. 

"आपल्याला त्या नम्रता पासून सावध राहायला हवं. मगाशी मला तिचा धक्का लागला होता तेव्हा चटका लागला आहे मला." श्वेता अमन ला तो चटक्याचा व्रण दाखवत म्हणाली. 

अमन ने जादूच्या मदतीने तो व्रण घालवला आणि बोलू लागला; "तिच्या गळ्यात एक लॉकेट आहे आणि तिच्याकडे सात्विकता आहे तीच तिचं रक्षण करतेय.... आपल्याला यावर तोड शोधायला हवा आहे. नाहीतर सगळा खेळ उलटा पडेल." 

"बेटावर एकदा आपण त्या सगळ्यांना नेलं की अर्ध काम होईल... तोवर फक्त सांभाळून घ्यावं लागेल. ते आपण घेऊ...." श्वेता म्हणाली. 
***************************
इथे ही सगळी मुलं त्या संकटापासून अनभिज्ञ होती. संध्याकाळी सगळ्यांनी भेटून चार दिवसांनी कॅम्प ला जायचं म्हणून शॉपिंग करायची ठरवलं होतं. नवीन कपडे, मोठ्या पाण्याच्या बाटल्या, बॅग, टेंट, फर्स्ट एड किट... सगळी यादी घेऊन या चौकडीने मॉल गाठला होता. 

"नम्रता! सगळे एवढे खुश आहेत.. तू एवढी खुश नाही दिसत... काय झालं आहे?" प्रवीण ने तिला नेहमी सारखं हसत नाही म्हणून विचारलं. 

"अरे कुठे काय.. काही नाही... आज खूप धावपळ झाली आहे ना म्हणून वाटत असेल." ती म्हणाली. 

"अरे ती बरोबर बोलतेय... नको काळजी करुस... दमली असेल... रात्री आराम केला की उद्या तिला वाटेल बरं...." मयुर म्हणाला आणि तो पुढे गेला. 

मागून आता फक्त नम्रता आणि प्रवीण चालत होते. 

"तिथे तुझ्यासाठी एक खास सरप्राइज आहे. तू कधीच ही कॅम्प विसरणार नाहीस बघ..." तो नम्रता ला म्हणाला. 

तिने फक्त एक स्मित केलं. तिचं तर आज कशात लक्ष लागत नव्हतं. बाकीच्यांना वाईट वाटू नये म्हणून ती फक्त त्यांच्या सोबत हसत होती, आनंदी असल्या सारखी दाखवत होती पण, मनातून तिला तिथे जाऊ नये असंच वाटत होतं. फायनली त्यांची शॉपिंग झाली आणि सगळे आपापल्या घरी आले. 

"आई... खरंच तिथे नको ना जायला... मी बाकीच्यांना समजवते...." नम्रता सगळ्या शॉपिंग बॅग सोफ्यावर ठेवत म्हणाली. 

"नको असं... ते दोघं मला साधे वाटत नाहीयेत.. तू नकार देतेस हे त्यांना समजलं तर तुला इथे ठेवून बाकीच्यांना घेऊन ती दोघं जातील आणि मग आपल्याला काहीच करता येणार नाही." तिची आई म्हणाली. 

"पण, मग आता करायचं काय? दोघं कोण आहेत? आपल्याला त्यांच्या बद्दल जे वाटतंय ते खरं आहे का कसं समजणार?" नम्रता ने विचारलं. 

"ते कसं समजेल काय मला नाही माहित पण, आपण आपल्या परीने प्रयत्न करायचे. तुला मी लहानपणापासून सांगत आले आजही सांगते, श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी. पूर्ण श्रध्देने आपण बाप्पाचं करतो तोच मार्ग दाखवेल." नम्रता ची आई तिला समजावत म्हणाली. 

तिच्या आईच्या बोलण्याने आता नम्रता बरीच शांत झाली होती. मनात सुरू असणारा गोंधळ एका क्षणात दूर झाला होता. त्यांच्या घरात एक मोठा बाप्पाचा फोटो होता, त्यासमोर हात जोडून दोन मिनिटं ती शांत उभी राहिली आणि आता तिला प्रसन्न वाटत होतं. 

"बाप्पा.. तू सदैव आमच्या पाठीशी असतोस.. कोणतंही संकट डायरेक्ट आमच्यावर येऊ देत नाहीस. आजही तुच आम्हाला सावध केलं आहेस... उद्या सुद्धा तूच सांभाळून घेशील याची खात्री आहे. असाच पाठीशी रहा आणि सगळ्या संकटांचा सामना करण्याचं बळ दे..." तिने मनोमन प्रार्थना केली. 

त्यानंतर रोजच्या सवई प्रमाणे शुभंकरोती आणि प्रार्थना म्हणून ती आई ला मदत करायला गेली. दुपार पेक्षा आत्ता दोघी जास्त रिलॅक्स होत्या. मस्त हसत खेळत सगळी कामं आवरली. 

क्रमशः....
**************************
नम्रता आणि तिच्या आई ला तर अमन, श्वेता मध्ये काहीतरी गडबड वाटतेय... तिथे गेल्यावर सगळ्यांची जबाबदारी न कळत नम्रता वर येणार आहे... ती हे सगळं कसं निभावून नेईल? श्वेता, अमन त्या चौघांना काही करणार तर नाहीत ना? पाहूया पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all